आरोग्य विमा पॉलिसी – कूलिंग-ऑफ कालावधी म्हणजे काय रे भाऊ ?

Reading Time: 2 minutes

मागच्या दोन वर्षांमध्ये भारतासह जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं होतं. आता कुठं अर्थचक्राची गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशात आता कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या या संकटकाळात आपल्याकडं आरोग्य विमा पॉलिसी(हेल्थ इन्शुरन्स) असणं अनिवार्य आहे. 

अनिवार्य म्हणजे आपण विमा घ्यावा अशी जबरदस्ती नाही, मात्र खबरदारी !

कुटुंब सुरक्षित व्हावे म्हणून आरोग्य विमा पॉलिसी असायलाच हवी. कोरोनाच्या लाटेत ज्यांना कोरोना झाला होता, त्यांना आरोग्य विमा पॉलिसीचा खरा फायदा किंवा तोटा काय आहे ? हे कळलंच असेल.अशात ज्यांच्याकडे विमा पॉलिसी होती, त्यांना कोरोनानंतर पॉलिसी नूतनीकरणावेळी “कूलिंग-ऑफ कालावधी” हा शब्द ऐकायला मिळाला आहे. आपल्यातील कित्येकांना हे काय आहे ? हे माहिती नाही. मात्र याचं महत्व मोठं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. 

 

हे ही वाचा – Health Insurance : जाणून घ्या, आरोग्य विमा दावा दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा किती असते?

 

आरोग्य विमा पॉलिसी नूतनीकरणाचा “कूलिंग-ऑफ कालावधी” म्हणजे नेमकं काय ?  

  • कूलिंग-ऑफ कालावधी हा आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीचा कालावधी असतो.
  •  कूलिंग-ऑफ कालावधी विमा कंपन्यांना ग्राहकाची आरोग्य स्थिती कशी आहे याबाबत निर्णय घेण्यास अनुमती देतो. या कालावधी दरम्यान आपण आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकत नाही. कूलिंग-ऑफ कालावधी हा काही महिन्यांसाठी असू शकतो. काही दिवस यामध्ये पुढे-मागे होऊ शकतात.  
  • आरोग्य विमा खरेदी करण्याऱ्या ग्राहकाची तब्येत चांगली आहे की नाही हे तपासण्याचं काम विमा कंपनीचं आहे. कुलिंग ऑफ कालावधीमध्ये पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकाला वैद्यकीय तपासणी करून अहवाल (आरोग्य स्थिती किंवा रोगासाठी नकारात्मक परिणाम दर्शविणारा अहवाल) सादर करावा लागतो. 
  • यासाठी काही कंपन्या ग्राहकाच्या मागील सहा महिने किंवा एक वर्षाचा वैद्यकीय इतिहास तपासू शकतात. वैद्यकीय अहवालावरून एक मूल्यांकन केले जाते. याआधारे विमा पॉलिसी लगेच खरेदी करता येईल किंवा नाही याबात कंपनी निर्णय घेते. 

कूलिंग-ऑफ कालावधी आणि प्रतीक्षा कालावधीमध्ये(waiting period) फरक काय आहे

  • कूलिंग-ऑफ कालावधी आणि प्रतीक्षा कालावधीमध्ये बरंच अंतर आहे. कुलिंग ऑफ कालावधी हा आजार झाल्यानंतरचा कालावधी असतो, साधारणतः १५ ते ९० दिवसांचा. या १५ ते ९० दिवसांमध्ये आरोग्य विमा खरेदी करता येत नाही. त्यामुळे कधीही आरोग्य विमा योजना खरेदी करण्यापूर्वी कुलिंग ऑफ कालावधी असतो हे लक्षात ठेवावं. 
  • कोरोनाच्या तीन लाटांमध्ये आरोग्य विमा कंपन्यांचे कमालीचे नुकसान झाले होते. दुर्दैवाने कुलिंग-ऑफ कालावधीच्या बाबतीतही पॉलिसीधारकांना जाचक अटींना सामोरे जावे लागले होते. मात्र आता सर्व काही सुरळीत असून कूलिंग ऑफ कालावधी सुमारे ७ दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
  • प्रतीक्षा कालावधी म्हणजे आरोग्य विमा खरेदी केल्यानंतरच कालावधी. हा कालावधी कंपनीनुसार बदलू शकतो. साधारणतः १५ ते ६० दिवसांचा हा कालावधी असू शकतो. या दिवसांदरम्यान पॉलिसीधारक कोणतेही दावे करू शकत नाही. यामध्ये फक्त ऍक्सीडेन्टल क्लेम होऊ शकतो. 
  • प्रतीक्षा कालावधीचा अर्थच आहे की प्रतीक्षा करा. म्हणजेच एखाद्या रोगासाठी कव्हरेज मिळविण्यासाठी तुम्हाला किती कालावधी प्रतीक्षा करावी लागेल, हे यामध्ये ठरवलेलं असतं. 

हे ही वाचा – Health insurance premiums : आरोग्य विमा पॉलिसीचे महागडे हप्ते टाळण्यासाठी हे वाचा

 

आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना कुलिंग-ऑफ कालावधी टाळणे शक्य आहे का

  • नाही, कदापि शक्य नाही. जर समजा तुम्हाला एखादा आजार झाला असेल तर कंपनी तुमचा कुलिंग ऑफ कालावधी संपेपर्यंत विमा खरेदी करण्यास मनाई करते. अन्यथा काही गुंतागुंतीचा अटी-शर्थीना तुम्हाला सामोरे जावे लागू शकतो. ज्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. 
  • जर आपली तब्येत अत्यंत चांगली असेल, कसलाही आजार नसेल तर  कुलिंग-ऑफ कालावधीची काळजी करण्याचं कसलंही कारण नाही. कोणताही आजार होण्यापूर्वी आपण आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केलेलं कधीही उत्तम ठरेल. कारण कोणता आजार कधी होईल हे कुणीही सांगू शकत नाही.

सुयोग्य आरोग्य विमा खरेदी करणे तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!