आजच्या महागाईच्या काळामध्ये स्वतःचे घर घेणे सोपे राहिलेले नाही, त्यामुळे सध्या गृहकर्ज हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. गृहकर्ज (Home Loan) घेण्यासाठी किती लाखांचे कर्ज घ्यायचे? त्यासाठी हप्ता किती असेल? या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.
तुमचा महिन्यातील २० ते ३० टक्के पगार हा कर्जाचे हफ्ते भरण्यातच निघून जातो. त्यामुळे तुम्हाला कोणताही खर्च करण्याआधी दहा वेळा घराच्या हप्त्यांचा विचार करावा लागतो.
अनेकदा कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडेपर्यंत त्याच बँकेत कर्ज ठेवायचे अशी सर्वसामान्यांची समजूत असते. पण, इथे कर्ज घेतल्यानंतर दुसर्या बँकेकडुन चांगला व्याजदर मिळतो का, हे पाहणे फायद्याचे ठरते.
त्यामुळे एका बँकेत घेतलेले कर्ज दुसर्या बँकेत ट्रान्सफर केल्यास म्हणजेच कर्ज हस्तांतरित केल्यास (Home Loan Transfer) तुम्ही चांगली बचत करू शकता. तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनविषयी हा एक चांगला निर्णय नक्कीच ठरू शकतो.
जर तुम्ही तुमचे गृहकर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफ़र करण्याच्या विचार करत असाल, तर हा लेख नक्की वाचा. ज्यामध्ये तुम्हाला गृहकर्ज हस्तांतरित कसे करावे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, तसेच कर्ज हस्तांतरण याविषयी सर्व सविस्तर माहिती मिळेल.
नक्की वाचा – गृहकर्ज घेताना तुम्हाला माहितच असावीत अशी १० कलमे
कर्ज हस्तांतरित करण्याची सोपी प्रक्रिया – (Steps to Loan Transfer)
सर्वप्रथम काय करावे?
- कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला नवीन बँकेची निवड करावी लागेल.
- तुम्ही निवड करीत असलेल्या बँकेत कर्जाचे कमी व्याज भरावे लागणार असेल, तरच तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
- कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी सर्वप्रथम जुन्या बँकेत फोरक्लोजरचा अर्ज द्यावा लागेल. अकाऊंट स्टेटमेंट व प्रॉपर्टी संबंधीतील सर्व कागदपत्राच्या कॉपी जुन्या बँकेकडून घ्या. ही सर्व कागदपत्रे नवीन बँकेत जमा करा.
जुनी बँकेकडून NOC –
- नवीन बँकेत कर्ज हस्तांतरित करण्यापूर्वी जुनी बँक तुम्हाला एनओसी किंवा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देते.
- हे पत्र नवीन बँकेत जमा करा. त्याचबरोबर, कर्जासंबंधीतील सर्व कागदपत्रे नवीन बँकेला द्यावी लागतात.
- नवीन बँकेत कर्ज हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला त्यासाठी लागणारे १ टक्के प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागते.
आवश्यक कागदपत्रे – (Documents for Loan Transfer)
- केवायसी
- लोन ट्रान्स्फर अर्ज
- शिल्लक कर्ज
- व्याजाचे प्रमाणपत्र
- मालमत्ते संबंधीतील कागदपत्रे
बॅंकेचे संमतीपत्र –
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नवीन बँकेने तुमच्या जुन्या बँकेकडून संमतीपत्र घेतल्यानंतर तुमचे कर्ज बंद केले जाईल.
- नवीन बँकेशी तुमचा करार झाल्यानंतर व बँकेची काही बाकी असेल तर ती भरल्यानंतर तुमच्या नवीन बँकेतून तुमचे मासिक ईएमआय सुरू होतील.
नक्की वाचा – Foreclosure of loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर या ७ गोष्टी करायला अजिबात विसरू नका
गृहकर्ज हस्तांतराचे फायदे –
- कमी व्याजदर –
जेव्हा तुम्ही एका बँकेतील कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करता, तेव्हा नंतरचे व्याजदर पूर्वीच्या व्याजदरापेक्षा तुलनेने कमी असते. हे व्याजदर EMI च्या रूपाने आर्थिक भार कमी करते.
- उत्तम ग्राहक सेवा –
तुम्ही तुमचे कर्ज नवीन बँकेत हस्तांतर केल्यास, तुम्ही उत्तम ग्राहक सेवा अनुभवू शकता.
- कर्ज हस्तांतरित करण्याआधी या गोष्टी तपासून घ्या –
1.सर्वात आधी जुन्या बँकेशी संपर्क साधा-
- ज्या बँकेमध्ये लोन ट्रान्सफर करायचे आहे त्या बँकेमध्ये जाण्यापूर्वी जुन्या बँकेशी संपर्क साधा.
- वाटाघाटी करून तुमची सध्याची बँक कर्जावर कमी व्याजदरावर कर्ज देऊ शकते.
- भारतातील गृहकर्ज बाजारपेठ ही कमालीची स्पर्धात्मक आहे. त्यामुळे सध्याची वित्तीय संस्था किंवा बँक अपेक्षित व्याजदर देत नसेल, तर तुम्ही दुसऱ्या बँकेत कर्ज सहज हस्तांतरित करू शकता.
2. कमी व्याजदराचा फायदा व कर्ज हस्तांतराची रक्कम –
- कर्ज हस्तांतरीत करण्यासाठी काही ठराविक शुल्क भरावे लागते.
- यासाठी नव्या कर्जदात्या संस्थेला प्रक्रिया शुल्क व जुन्या कर्जदात्या संस्थेला हस्तांतरण शुल्क (ट्रान्स्फर शुल्क), तसेच मुंद्रांक शुल्कदेखील भरावे लागते. यांची किंमत साधारणत: उर्वरित कर्जाच्या रकमेच्या ०.५ ते १.५ टक्के इतकी असू शकते.
- तुमच्या गृहकर्जाच्या उर्वरित कालावधीवर, उर्वरित रकमेवर व कालावधीसाठी मिळून एकूण कमी होणारी रक्कम, यावर तुमचा कर्ज हस्तांतरित करण्याचा निर्णय अवलंबून असायला हवा.
3. मुदतपूर्व परतफेडीसाठी दंड (प्री-पेमेंट पेनल्टी) –
- वैयक्तिक ग्राहकाने फ्लोटिंग दराने गृहकर्ज घेतले असेल, तर त्यावर कोणतेही मुदतपूर्व परतफेडीसाठी दंड (प्री-पेमेंट पेनल्टी) भरावा लागत नाही.
- पण जर ग्राहकाने स्थिर दराने गृहकर्ज घेतले असेल, तर कर्जाच्या उर्वरित रकमेवर हा दंड भरावा लागू शकतो.
- कर्ज हस्तांतराचा निर्णय घेण्यापूर्वी या मुद्द्यांचा अवश्य विचार करा.
4. सिबिल स्कोर चांगला असावा –
- भूतकाळात कर्जाची परतफेड करताना एखाद-दुसरा हप्ता जरी तुम्ही चुकवला असेल तर कर्ज हस्तांतरित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
- अशा परिस्थितीमध्ये, तुमच्यासमोर एकच पर्याय असतो, तो म्हणजे आपल्या सध्याच्याच गृहकर्ज संस्थेमध्येच/ बँकेतच कर्ज पुढे चालू ठेवणे.
5. कर्ज हस्तांतरित करताना या गोष्टींची माहिती घ्या –
- प्रत्येक बँकेची कर्ज हस्तांतरण प्रक्रिया (ट्रान्स्फर प्रोसेस) ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम ज्या बँकेमध्ये तुम्ही कर्ज ट्रान्सफर करताय त्या बँकेची प्रोसेसिंग प्रोसेस जाणून घ्या.
- लोन ट्रान्सफर करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे तपासून घ्या.
- एका बँकेकडून दुसऱ्या बँकेमध्ये कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी सुट्ट्यांचे दिवस वगळून १० ते १२ दिवस लागतात.
- लोन ट्रान्सफर करण्याआधी किती कर्ज शिल्लक राहिले आहे, याची चौकशी करावी व त्यानंतरच लोन ट्रान्सफर करावे.
- शिल्लक हस्तांतरणाची निवड करण्यापूर्वी नेहमी सतर्क रहा व क्रॉसचेक करा.
- आकर्षक जाहिरातीकडे दुर्लक्ष करा. निवड करण्यापूर्वी सर्व नियम व अटी वाचा.
- कर्ज ट्रान्स्फरसाठी फोरक्लोजर शुल्क तपासा. हे शुल्क कर्ज लवकर बंद करण्यासाठी बँकांकडून आकारले जाते.
सर्वप्रकारचे कर्ज तसे वाईटच असे अनेक लोक समजतात पण गृहकर्ज तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदतीचे ठरते. जास्तीच्या कर्जाच्या आहारी न जाता आपल्याला परवडते तेवढेच कर्ज घेऊन लवकरात लवकर कर्ज परतफेड करणे हे तुमचे उद्दिष्ट्य हवे. असे कर्जमुक्तीचे ध्येय ठरवून लवकरात लवकर कर्जमुक्त आयुष्यासाठी तुम्हाला अर्थसाक्षर टीमतर्फे शुभेच्छा !