Reading Time: 3 minutes

शेअर बाजाराबरोबर सोन्याच्या भावात झालेली विक्रमी वाढ अनेक पारंपरिक गुंतवणूकदार मित्रांना आकर्षित करीत आहे. ही वाढ चलन वाढीहून किंचित जास्त आहे. त्यामुळे ती सुरक्षित गुंतवणूक म्हणता येईल. खर तर गुंतवणूक करणे या हेतूने सोनं विकत घेणारे लोक अत्यंत कमी आहेत. सोन्यातील त्यांची गुंतवणूक ही भावनात्मक असते. अत्यंत कठीण प्रसंगातही ते सोने विकत नाहीत. अनेकदा त्याचे दागिने केले जातात, यात घडणावळ जाते शिवाय ते मोडताना त्यात घट कापली जाते. याशिवाय दागिने सांभाळण्याची जोखीम वेगळीच असते. 

सोन्याचे दागिने विकून अथवा गहाण ठेवून कर्ज मिळवणे हे कमीपणाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे एकदा दागिन्यांत रूपांतर झालेले सोने फक्त फारतर नवीन पद्धतीचा दागिना निर्माण करण्यासाठी वापरले जाते. यात बदल व्हावा म्हणून सरकारने सोन्याच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा सुवर्ण सार्वभौम रोखे खरेदी करण्यास वापरला तर त्यावर कोणताही भांडवली नफ्याची आकारणी केली जाणार नाही अशी तरतूद गेल्या वर्षी केली आहे. 

सोन्यातील खरीखुरी गुंतवणूक ही शुद्ध स्वरूपातील सोने खरेदी विक्री करून होऊ शकते, परंतू सोन्यावर 3% व त्याचे नाणे किंवा बिस्कीट बनवण्याच्या मजुरीवर 5% जीएसटी लावला जातो.  त्यामुळे त्याच्या हाताळणी खर्चात वाढ होते. याशिवाय त्याला सुरक्षित ठेवण्याची जोखिमही वाढते. हा खर्च कमी करण्यासाठी सुवर्ण सार्वभौम रोखे, इ गोल्ड, गोल्ड ईटी एफ, इजिआर यासारखे पर्याय आता गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक गुंतवणूक व्यासपीठावर किमान गुंतवणुकीत डिजिटल गोल्ड खरेदी विक्री याचे सुलभ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गरजेनुसार योग्य मार्ग शोधता येणे शक्य आहे.

नक्की वाचा : GST: व्यापाऱ्यांसाठी ‘जीएसटी’ विषयक २० महत्वाच्या गोष्टी

सोन्याचांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची कारणे-

  • कोविड 19 नंतर जगभरातील अर्थव्यवस्था मंदावली. त्यामुळे बहुतेक सर्व देशांनी अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी ज्या योजना योजल्या, त्यातील बरीचशी रक्कम ही थेट मदत या स्वरूपात होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पैसा हा बाजारात आला, याचा परिणाम म्हणून कोसळलेला शेअरबाजार सावरून तो नवनवे उच्चांक करू लागला.
  • याच काळात व्याजदर कमी झाल्याने लोक म्युच्युअल फंड योजनांकडे वळले सध्या एसआयपीच्या माध्यमातून दरमहा 18,000 कोटीहून अधिक रुपये भांडवल बाजारात येत आहेत.
  • आजवरील अनुभव असा की जेव्हा शेअरबाजार वाढतो तेव्हा सोन्याचा भाव स्थिर राहतो यावेळी प्रथमच शेअरबाजार आणि सोने उच्चांकी भाव दर्शवित आहेत. अलीकडे हा भाव वर जाऊन किंचित खाली आला असला तरी भावावाढीच्या तुलनेत तो अत्यल्प आहे. 
  • अर्थव्यवस्था सुधारत असताना सोन्याचांदीच्या औद्योगिक वापरात वाढ होत असल्याने त्याचा मागणीवर प्रभाव पडत आहे. इलेक्ट्रॉनिक आणि आटोमोटिव्ह आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या  उद्योगात सोन्याचांदीचा वापर केला जातो.
  • गेल्या काही महिन्यात विशेषतः ऑक्टोबर 2023 पासून ज्या गतीने सोन्याच्या भावात वाढ झाली ती पाहता येत्या दिवाळीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव  70,000 ₹ पर्यत जाऊ शकेल, असा या क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही 1औस सोन्याचा भाव 2030$ वर गेला आहे, जो यावर्षभरात लवकरच 2300$  वर जाईल. 
  • तर सन 2025 मध्ये 2500$ होऊ शकेल असा अंदाज आहे. प्रति 1 औस चांदीची किंमत गेल्या वर्षभरात 19$ होती ती 26$ चा उच्चांक गाठून 23$ वर रेंगाळत आहे. बहुतेक सर्व देशाच्या मध्यवर्ती बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करीत असतात. याप्रमाणे आपली रिझर्व बँक ही सोन्याची नियमित खरेदी करीत असते. जुलै 1991 मध्ये आपल्याकडे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला त्यावेळी आयातीसाठी आणि परकीय कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे काहीच शिल्लख नव्हती. 
  • जागतिक बँकेने कर्ज देण्यास नकार दिला, अशा वेळी आपल्याकडील सोने गहाण ठेवून पैशांची उभारणी करण्यात आली. फेडरल रिझर्व ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक सोने खरेदी न करता सरकारच्या मालकीच्या सोन्याचे विश्वस्त म्हणून काम पहाते. बाकी बहुतेक सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका नियमित स्वरूपात सोने खरेदी करीत असतात. यामुळे साठा कमी आणि खरेदीदार अधिक परिस्थिती बाजारात निर्माण होते भाव वाढतात. 
  • भाववाढ आणि चलनाचे अवमूल्यन यावर मात करण्यासाठीही (हेजिंग) सातत्याने जगभरातून गुंतवणूक होत असल्याने सोन्याचांदीचे भाव वाढत असतात.
  • न्यूयॉर्क मकंटाईल एक्सचेंज आणि लंडन मेटल एक्सचेंज हे सोन्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होणारे जागतिक बाजार आहेत. येथील चालू भावाचा जगभरातील बाजारातील सोन्याच्या भावावर फरक पडतो. जगभरातील बाजारात  कुठेतरी सोन्याचांदीचे व्यवहार होत असतात.

न्यूयॉर्क मकंटाईल एक्सचेंज आणि लंडन मेटल एक्सचेंज हे सोन्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होणारे जागतिक बाजार आहेत. येथील चालू भावाचा जगभरातील बाजारातील सोन्याच्या भावावर फरक पडतो. जगभरातील बाजारात  कुठेतरी सोन्याचांदीचे व्यवहार होत असतात.

याशिवाय-

  • सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध असते तर चांदीची शुद्धता संख्येने दर्शवली जाते “999” असा शिक्का असलेली चांदी सर्वाधिक शुद्ध असते. अधिक शुद्धता अधिक किंमत.
  • सोने चांदी यांची खरेदी विक्री बार, लगडी, बिस्कीट, तयार दागिने या पैकी कोणत्या स्वरूपात आहे त्याचा त्यांच्या भावावर परिणाम होतो.
  • अर्थव्यवस्था अस्थिर असली की लोकांचा चलनावरील विश्वास कमी होतो व ते गुंतवणुकीचे पर्यायी मार्ग शोधतात. त्यामुळे जगभर असुरक्षिततेच्या भावनेतून सोन्याची सातत्याने खरेदी होत असते. 

थोडक्यात-
घाऊक बाजारातील भाव हे शुद्धता आणि वजन, आकारमान, औद्योगिक मागणी, अर्थव्यवस्थेची स्थिती, भूराजकीय परिस्थिती यावर सोन्याचांदीचे भाव अवलंबून असतात

सोन्याचांदीची दुर्मिळता, रोकडसुलभता आणि सर्वंमान्यता या गुणांमध्ये आता मोठ्या परताव्याची शक्यता हा गुणधर्म जोडला गेल्याने त्याच्या भावात उत्तरोत्तर वाढ होत राहील. याच बरोबरीने अमेरिकेत नवीन सरकार स्थापन होऊन त्यांचे जे औद्योगिक धोरण ठरेल तोपर्यंत या वाढीस लगाम बसणे अशक्य वाटते. तेव्हा आज जास्त वाटणारा भाव अजून आठ  महिन्यानी, कमी भाव होता असे वाटण्याची शक्यता कदाचित जास्त आहे.

आपल्या गुंतवणुकीतील 5% ते 10 % वाटा सोन्यामध्ये असावा असे गुंतवणूक तज्ञांचे मत आहे, त्या दृष्टीने ज्यांना शक्य असेल त्यांनी यात आपली गुंतवणूक करायला आणि असलेल्यांनी ती वाढवायला हरकत नसावी. आपल्या आवश्यकतेनुसार यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा याबाबत खात्रीपूर्वक माहितीचा विचार करून सोन्याचांदीची खरेदी/ विक्री करणे किंवा जैसे थे स्थिती कायम ठेवणे याविषयी गुंतवणूकदारांनी निर्णय घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक उदय पिंगळे हे मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून लेख शैक्षणिक हेतूने लिहला आहे)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…