Reading Time: 3 minutes

देवभाषा संस्कृतमध्ये शेकडो वर्षांपासून कर्जाविषयी पुढील सुभाषित आहे – 

अग्निशेषम् ऋणशेषम् शत्रुशेषम् तथैव च |  

पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषम् न कारयेत् ||

जर आग, कर्ज किंवा शत्रू अगदी थोड्या प्रमाणात जरी शिल्लक असतील तर त्यांना लगेच संपवा कारण ते अस्तित्वात राहिले तर पुन्हा पुन्हा वाढतात…! 

कर्जामुळे अनेक न संपणाऱ्या अडचणी निर्माण होतात. कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध या लेख मालिकेत आपण घेणार आहोत. 

कृती क्रमांक १ :

आपण नक्की किती देणे लागतो याची “एकूण कर्ज यादी” तयार करणे. 

  • जोपर्यंत आपले नक्की देणे किती आहे हे आपल्याला समजणार नाही तोपर्यंत कर्जमुक्त जीवनाचा लाभ आपल्याला होणार नाही. 
  • बऱ्याचदा “खूप कर्ज आहे” हे एकच वाक्य सारखे सारखे जुन्या हिंदी सिनेमात जसे “प्यार प्यार प्यार” व्हायचे तसे आपल्या डोक्यात आणि कानात आपल्याकडूनच वाजवले जाते. 
  • आता कर्ज आहे तर आहे. त्यातून आपली सुटका करायची आहे असे मनापासून ठरवल्यावर आजीबात मागे फिरायचे नाही. 
  • चला तर मग, एखादा कोरा कागद आणि पेन घ्या. तुम्ही टेक्नोसॅव्ही असाल तर स्प्रेडशीट ओपन करा. (मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा स्प्रेडशीटचा जगातला सर्वात प्रसिद्ध ब्रँड आहे. त्यामुळे एक्सेल शीट ओपन करा असे सांगितल्यावर पटकन समजते. असो.)
  • कागदावर कर्ज देणाऱ्याचे नाव डावीकडे आणि कर्जाची व्याजासहित रक्कम उजवीकडे अशी यादी करायला घ्या. 
  • कर्जावरील व्याजाचा दर माहिती असेल तर, तो सुद्धा कर्ज रकमेपुढे लिहा. 
  • घाबरू नका. अजिबात टेन्शन घेऊ नका. वाघ म्हटले तरी खाणार अन् वाघोबा म्हटले तरी खाणारच. समस्यांना निडर होऊन सामोरे गेलो की त्या १००% सुटतातच. 
  • तुम्ही जर वरीलप्रमाणे “एकूण कर्ज यादी” तयार केली असेल तर, कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर तुमची गाडी जोमाने सुरू झालेली आहे. 

कृती क्रमांक २ :

एकूण कर्जयादीचे चिंतन करणे

  • कर्जयादीचे चिंतन का करायचे?
    • आपल्याला देणे असलेला एकूण कर्जाचा आकडा लक्षात आला की तुमची मानसिक परिस्थिती एकतर तणावाची होणार किंवा तुम्हाला वाटत असलेल्या भीतीच्या तुलनेत एकूण कर्ज रक्कम कमी आहे हे बघून हायसे तरी वाटणार.
    • “भूतकाळात मन अडकवू नका, भविष्याचा जास्त विचार न करता वर्तमानात जगा” असे आपल्याला सेल्फहेल्प, मोटीवेशनल गुरूंकडून सांगितले जाते. 
    • कर्जराक्षसाच्या तावडीतून सुटण्यासाठी मात्र आपल्याला भूतकाळाचा विचार करावा लागणार आहे. 
  • चांगले कर्ज विरुद्ध वाईट कर्ज: 
    • मागच्या लेखात बघितल्याप्रमाणे चांगले कर्ज आणि वाईट कर्ज असे कर्जाचे दोन प्रकार आहेत.
    • तुमचे घर, शिक्षण, व्यवसायवृद्धी यासारख्या संपत्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी घेतले जाणारे कर्ज म्हणजे ‘चांगले कर्ज’ समजले जाते.
    • अनावश्यक फर्निचर, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, परदेशी सहली अशा दिखाव्यासाठी आणि ‘हवा’ करण्यासाठी घेतले जाणारे कर्ज म्हणजे ‘वाईट कर्ज’!
  • चांगल्या प्रकारचे कर्ज घेतले असल्यास –
    • तुमचे कर्ज चांगले कर्ज या प्रकारचे असेल तर, मुळीच काळजी करू नका. 
    • तुम्ही घेतलेल्या चांगल्या कर्जामुळे तुमचा नक्कीच फायदा झालेला असणार. 
    • उदा: घर खरेदी हा आपल्या आर्थिक आणि सामाजिक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नियमितपणे परतफेड केल्यास १५ ते २० वर्षात गृहकर्ज संपते. घराचे बाजारमूल्य वाढते. आर्थिक स्थिरता येते. आपल्याकडे स्वतःचे हक्काचे घर आहे ही भावना अधिक चांगले काम करण्यास भाग पाडते. 
    • बँकेला तुमच्याकडून तुम्ही दरमहा नियमितपणे हफ्ते भरावेत एवढीच माफक अपेक्षा असते. 
  • वाईट प्रकारचे कर्ज घेतले असल्यास – 
    • आपल्यावर व्हाट्सएप्, फेसबुक वगैरे समाजमाध्यमांतून सकारात्मक विचारांचा एकसारखा वर्षाव होत असतो. तुम्ही वाचलेले आणि इतर जनतेला फॉरवर्ड केलेले सकारात्मक विचार आता मात्र प्रत्यक्ष आठवून आचरणात आणायची वेळ झाली आहे.
    • आपण वाईट प्रकारचे कर्ज का घेतले? याचा विचार करून पुन्हा मी अशी चूक करणार नाही याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी. 
    • तुम्ही जर कर्जमुक्तीसाठी खरोखर गंभीर असाल तर, वरील वाक्य म्हणजे “मी पुन्हा वाईट कर्ज घेण्याची चूक करणार नाही” हे वाक्य कर्जयादी कागदावर लिहा. 
    • हुशार लोक एक चूक दोनदा करत नाही. तुम्ही हा लेख इथपर्यंत जर वाचत आला असाल तर तुम्हाला कर्जमुक्त होण्याची इच्छा आहे हे मानायलाच हवे. यासाठी तुमचे अभिनंदन ! 
    • आपल्याला जास्त कर्ज घ्यायला लावणाऱ्या पुढील घटना टाळायच्या आहेत:
      • कोणालातरी इम्प्रेस करायला म्हणून केलेली महागड्या मोबाईलची खरेदी (ती पण कर्ज काढून) 
      • कोणालातरी फक्त दाखवून देण्यासाठी आपल्या स्वतःला गरज नसताना आणि परवडत नसतानाही केलेली कार खरेदी (ती पण कर्ज काढून) 
      • आपण प्रगती करतो आहोत असे आपल्याला वाटत नसताना, केवळ इतरांना दाखवण्यासाठी घर सजावट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची केलेली खरेदी  (ती पण कर्ज काढून) 
      • क्रेडिट कार्डवर ऑफर आहे म्हणून केलेली भरमसाठ ऑनलाइन खरेदी
    • अनेकदा जास्त कर्ज घ्यायला प्रिय व्यक्ती, मित्र, नातेवाईक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पणे भाग पाडतात. 
    • तुमच्यावर खरे प्रेम करणाऱ्या व्यक्ती दिखाव्यापेक्षा तुम्हाला आहे तसे स्वीकारतात. तेव्हा, “दिखावे पे ना जाओ, अपनी अकल लगाओ!”

कर्ज मुक्त जीवनासाठी करायच्या उर्वरित कृती पुढच्या भागात बघू. तोपर्यंत वरील गोष्टींवर प्रत्यक्ष कार्यवाही करायला सुरुवात करा.

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात). 

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

होम लोनचं प्रीपेमेंट करताना ह्या बाबींचा विचार जरूर करा

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…