Reading Time: 2 minutes
अर्थ म्हणजे पैसे आणि अर्थसंकल्प म्हणजे साहजिकच आर्थिक गोष्टींशी निगडीत असणाऱ्या गोष्टींबाबतची सविस्तर मांडणी. मुळात अर्थ हा विषयच एवढा मोठा आहे की त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश असतो. आणि जर हा अर्थसंकल्प देशाचा अर्थसंकल्प असेल तर तो तयार करताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असतो.
- कृषी ते उद्योग सर्व क्षेत्रांचा, नोकरदार ते व्यापारी सर्व स्तरावरील नागरिकांचा विचार अर्थसंकल्प तयार करताना केला जातो. अर्थसंकल्प कसा तयार केला जातो याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. अर्थसंकल्प तयार करून तो सादर करेपर्यंतची प्रक्रिया ही सोपी नसते.
- तज्ञांशी चर्चा व विचार विनिमय करून सर्व स्तरातील जनतेचा विचार करून कमालीची गुप्तता बाळगून अर्थसंकल्प तयार करून तो सादर करण्यात येतो. या अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असते.
- अर्थसंकल्पाच्या खऱ्या कामाची सुरवात होण्यापूर्वी हलवा सेरेमनी केला जातो. काय आहे हा हलवा सेरेमनी?
हलवा सेरेमनी
- हलवा सेरेमनी हा बजेट सुरु कारण्यापूर्वीचा एक समारंभ आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर जे कर्मचारी बजेट तयार करण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागी झालेले असतात, त्यांना घरी जायला परवानगी नसते. त्यांना अर्थमंत्रालयात राहूनच काम करावे लागते.
- बजेटमधली माहिती गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना बाहेरील कोणाच्याही संपर्कात राहण्यास परवानगी नसते. अगदी स्वतःच्या कुटुंबियांशीदेखील बजेट टीमला कोणताच संपर्क करता येत नाही. ही सारी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक समारंभ केला जातो. त्यास ‘हलवा सेरेमनी’ म्हणतात.
- हा समारंभ म्हणजे कोणत्याही धर्माची नाही अथवा कोणत्याही देवतेची पूजा यामध्ये केली जात नाही. ही एक सांस्कृतिक परंपरा आहे. अर्थमंत्री या कार्यक्रमाचं नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बजेट टीमसाठी मोठ्या कढईत शिरा म्हणजे हलवा तयार केला जातो. सगळी टीम मिळून या हलवा ‘पार्टीचा’ आस्वाद घेते आणि मग त्यानंतर सर्वाना नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात जावे लागते. त्यानंतर मात्र त्यांचा बाह्यजगाशी संबंध संपूर्णपणे तुटतो.
बजेट प्रक्रिया
- तळघरात गेल्यानंतर बजेट टीमचा जगाशी संबंध संपूर्णपणे तुटतो. तळघरात मोबाईल फोन न्यायला परवानगी नसते. आतमध्ये फक्त इंटरकॉम प्रकारातील एक लँडलाईन फोन असतो, ज्यात फक्त ‘इनकमिंग’ कॉल्सची सुविधा असते. या फोनवर जेव्हा बजेट टीममधील सदस्य बोलतात त्यावेळी ‘इंटलीजन्स’ म्हणजे ‘गुप्तहेर खात्यातील’ माणूस तिथे हजर असतो
- प्रत्येक मेंबरला झोपण्यासाठी पलंग व काम करण्यासाठी टेबल दिलेलं असतं. खाण्याची सोयदेखील तिथेच केलेली असते. कोणालाही दहा दिवस बाहेर पडता येत नाही. फक्त अर्थमंत्री आणि मोठ्या हुद्द्यावरील काही मोजक्या अधिकाऱ्यांना अधूनमधून बाहेर जायची परवानगी असते. या तळघरात डॉक्टर व स्वयंपाकी असतात. आतमध्ये संपूर्ण टीमची खूप चांगली बडदास्त ठेवली जाते.
- तसेच बजेट टीम व बजेट साठीची सुरक्षा व्यवस्था अगदी चोख ठेवलेली असते. तळघर व बजेटची टीमची सुरक्षा संपूर्ण आयबी (IB) म्हणजे इंटलीजन्स ब्युरोच्या देखरेखीखाली असते. कुठेही कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. बजेट हे अत्यंत गुप्तपणे तयार केलं जातं.
- बजेट तयार झाल्यावर ते तळघरातच त्याचं ‘प्रूफ रिडींग’ केलं जातं. त्यामधील व्याकरणाच्या चुका दुरुस्त केल्या जातात.
- नॉर्थ ब्लॉकमध्येच प्रिंटिंग प्रेस असते. प्रूफ रिडींग झाल्यावर येथील प्रिंटिंग प्रेसवर ते बजेट प्रिंट केलं जातं. दहा दिवसांनंतर छापलेलं भलंमोठं बजेट इंडियन आर्मी व पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये बाहेर आणून ते संसदेत आणलं जातं. फक्त दहा मिनिटे आधी कॅबिनेट मंत्रिमंडळाला बजेटचं संक्षिप्त रूप दाखवलं जातं. बजेट हे ‘टॉप सिक्रेट डॉक्युमेंट’ म्हणून ओळखलं जातं.
- बजेटबाबत एवढी सुरक्षा व गुप्तता राखण्याचं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेसंबंधित कोणतीही महत्वाची माहिती बाहेर जाणे ही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यामधील काही अप्रत्यक्ष करासंबंधित माहिती बाहेर गेल्यास अनेक व्यापाऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होऊ शकतो आणि एक प्रकारे इतर जनतेवर अन्याय होऊ शकतो.
अर्थसंकल्प – अंतरिम अर्थसंकल्प (हंगामी) अर्थसंकल्प म्हणजे काय?,
२०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था,
अर्थसंकल्प – ‘युबीआय’ च्या गरजेवर प्रथमच शिक्कामोर्तब भाग १,
बजेट २०१९ : तुम्हाला माहिती असायलाच हवे असे काही
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :