क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

Reading Time: 3 minutes

 मागच्या भागात आपण क्रेडीट कार्ड  देणाऱ्या बँका अनेक मार्गांनी कसे पैसे आपल्याला आकारतात आणि बऱ्याचदा आपण खर्च करायला कसे बळी पडतो हे खालीलप्रमाणे बघितले:

 • भक्कम व्याजदर
 • लेट पेमेंट फी
 • नोंदणी आणि वार्षिक फी
 • रोख रक्कम  क्रेडीट कार्ड द्वारे काढली असता लागणारी फी
 • ओव्हर लिमिट फी

या भागामध्ये आपण काळजी घ्यायचे इतर मार्ग विचारात घेऊया :

६. कार्ड रीइश्यू शुल्क :

 • तुमचे क्रेडीट कार्ड हरवले अथवा चोरीला गेल्यास पुन्हा कार्ड देण्यासाठी फी जाते
 • कार्ड रीइश्यू फी रु. १०० ते रु. ५०० च्या दरम्यान आकारली जाते. 

आपली जबाबदारी:  आपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण परत घ्यायचे विसरलो म्हणून!

७. स्टेटमेंट चार्जेस:

 • साधारणपणे तुमच्या क्रेडीट कार्डचे स्टेटमेंट दरमहा पोस्टाने व ईमेलद्वारे पाठवले जाते. तुम्ही पर्यावरणाचा विचार करून स्पेलिंग न चुकवता ईमेल आय डी दिला असेल तर ते ईमेल द्वारे विनाशुल्क  पाठवले जाते. 
 • तुम्ही नेटबँकिंगचा वापर करत असाल तर बऱ्याच बँका निःशुल्क पद्धतीने स्टेटमेंट डाउनलोड करायची सुविधा देतात. 
 • परंतु काही कारणाने तुम्ही पुन्हा स्टेटमेंट पोस्टाने मागवले किंवा ईमेल करायला सांगितले तर काही बँका  रु. १०० ते रु. ३०० च्या दरम्यान स्टेटमेंट फी आकारतात   

आपली जबाबदारी: आपण आपले क्रेडीट कार्ड स्टेटमेंट वाचायचा प्रयत्न शेवटचा कधी केला हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. मुळात आपल्याला स्टेटमेंट मिळते का? मिळालेले स्टेटमेंट आपण वाचायचा प्रयत्न केला का? यामध्ये काही चार्जेस आकारले गेले आहेत का? याकडे आपले लक्ष हवे. नाहीतर दर महिन्याला आपल्या बँक खात्यातून काहीतरी रक्कम क्रेडीट कार्ड बिलापोटी वजा होते एवढेच आपले लक्ष असते. 

८. परकीय चलन व्यवहार शुल्क (Foreign Currency Transaction Fees ):

 • बँक तुम्ही परदेशामध्ये क्रेडीट कार्डवरून व्यवहार केल्यास प्रति व्यवहार ३.५% फी आकारते. 
 • सदर फी त्या दिवसाचा परकीय चलन विनिमय दर लक्षात घेऊन भारतीय रुपयांमध्ये तुमच्या बिलात आकारली जाते. 

आपली जबाबदारी: आपण परदेशी प्रवासासाठी विमान तिकीट, हॉटेल  बुक करणे , सॉफ्टवेअर विकत घेणे अशा खर्चांसाठी क्रेडीट कार्ड वापरणार असू तर परकीय चलन व्यवहार फी आहे याचा आधी विचार करावा. 

९. शिल्लक हस्तांतरण शुल्क ( Balance Transfer Fees ):

 • काही कारणांनी तुम्ही क्रेडीट कार्ड बदलले आणि सध्याची शिल्लक रक्कम दुसऱ्या बँकेच्या नवीन क्रेडीट कार्डवर हस्तांतरीत केली तर शिल्लक हस्तांतरण शुल्क आकारले जाते.
 • सध्याचे क्रेडीट कार्ड जुन्या शिल्लक रकमेवर जास्त व्याज आकारत असेल तर किंवा एकंदर शुल्क जास्त असतील तर तुम्ही कार्ड बदलायचा निर्णय घेता. हे तर सध्याच्या क्रेडीट कार्ड कंपनीचे नुकसान होईल म्हणून तुम्हाला शिल्लक हस्तांतरण शुल्क आकारले जाते. 

आपली जबाबदारी: कार्ड कंपनी बदलून किती फायदा होणार आहे, याची तुलना आकारल्या जाणाऱ्या  शिल्लक हस्तांतरण शुल्काशी करूनच योग्य तो निर्णय घ्यावा. 

१०. व्यवहार  शुल्क (Transaction Fees):

 • प्रत्येक क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँकेचे  क्रेडीट कार्ड स्वीकारून व्यवहार करू देणाऱ्या विविध विक्रेत्यांबरोबर करार असतात. 
 • क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका सदर विक्रेत्यांकडून २% ते ३% व्यवहार शुल्क आकारतात.  
 • उदा: तुम्ही जेव्हा एखाद्या दुकानातून काही खरेदी करता आणि रु. ५०० क्रेडीट कार्डद्वारे देता तेव्हा दुकानदाराला रु. ४९० मिळतात आणि क्रेडीट कार्ड कंपनीला रु. १० व्यवहार शुल्क म्हणून मिळतात.  

आपली जबाबदारी: दुकानदार आपला नफा कमी न करता त्याला क्रेडीट कार्ड कंपनीद्वारे आकारले जाणारे व्यवहार शुल्क अप्रत्यक्ष पणे आपल्याकडून वसूल करत असतो. मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू , फर्निचर व इतर महाग वस्तूंची खरेदी करताना तुम्ही दुकानदाराला चेकद्वारे, ऑनलाईन पेमेंटद्वारे किंवा भीम ऍप सारख्या युपीआय पेमेंट पद्धतीने रक्क्म दिली असता तो अजून थोडी सूट देऊ शकतो. 

११. जीएसटी (१८%):

 • व्याज सोडून वरील इतर सर्व शुल्कांवर १८% दराने जी.एस.टी. सुद्धा आकारला जातो.
 • उदा : रु. ५०० शुल्क (+) रु. ९० जी.एस.टी. १८% दराने  = एकूण देय शुल्क रू. ५९०

अशाप्रकारे विविध सेवांवर क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँका शुल्क आकारतात. ते आकारणे त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. आपण आपल्या फायद्यासाठी आपल्या क्रेडीट कार्ड ला लागू होणारे शुल्क व व्याज यांचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा. 

क्रेडीट कार्ड चा अती वापर तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी हानिकारक आहे !   

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच ते अर्थसाक्षरता अभिनयाच्या कार्यशाळा घेतात.)

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल? : भाग १ ,

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?,

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]