जगातील सर्वात श्रीमंत माणसाचा मुकुट आलटून पालटून घालणारे मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स आणि ॲमेझानचे मालक जेफ बीजोस यांचे भारताकडील लक्ष वाढले आहे. बिल गेट्स अशातच तीन दिवस भारतात येऊन गेले, तर जेफ बीजोस जानेवारीत भारतात येत आहेत.
- गेट्स यांनी आपल्या संपत्तीतील मोठा वाटा समाजकार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्यासाठी जगातील १९२ देशांतून भारताचीही निवड केली. बिल आणि मिलिंडा फाउंडेशनचे हे काम कसे चालले आहे, ते पाहण्यासाठीच तसेच नेत्यांना भेटण्यासाठी ते भारतात आले होते.
- मायक्रोसॉफ्टमध्ये भारतीय तरुण करत असलेल्या कामाचा त्यांनी गौरव केला आणि भारत ही प्रज्ञावंतांची भूमी असल्याचा उल्लेख केला. बिल गेट्स अमेरिकन आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीत व्यापार असण्याची शक्यता मान्य करूनही त्यांनी भारताविषयी जी निरीक्षणे नोंदविली, त्यांचा उघड्या डोळ्याने विचार करण्याची गरज आहे.
- बिल गेट्स यांची ही काही निरीक्षणे पहा –
-
- आर्थिक विकासाचा वेग प्रचंड वाढविण्याची क्षमता भारतात आहे, येत्या काही वर्षांत दारिद्र्य निर्मूलनाचे काम वेगाने होईल आणि त्यासाठी सरकारला आरोग्य आणि शिक्षणात मोठी गुंतवणूक करावी लागेल.
- भारताने स्वीकारलेली आधार कार्ड पद्धतीचे मोठे फायदे देशाला होणार आहेत. आर्थिक सेवा आणि औषध निर्मिती क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. बँकिंग सोपे करणारी यूपीआय पद्धत अफलातून असून तिचा वापर आम्ही आफ्रिकेतील काही देशांत करणार आहोत कारण त्यातील अनेक देशांत फक्त ४० टक्के नागरिकांना बँकिंग करण्याची संधी मिळाली आहे.
फ्लिपकार्ट व अमेझॉनची विक्रमी विक्री
- बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती का आहेत, याचा उलगडा होण्यास या निरीक्षणाची मदत होते. जगाच्या भविष्यातील गरजा काय असू शकतात, याचा विचार उद्योजक करतात आणि त्या गरजांना व्यवहारात बांधून त्याचा व्यापार करतात. त्या गरजा आहेत, हे कोणीच नाकारत नसते, पण उद्योजक कृती करतात.
- भारतातील गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोचविणे, जलनि:सारण, शेती आणि आर्थिक सेवा यात गेट्स यांचे फाउंडेशन काम करते. भारताची ही गरज नाही, असे आज आपण म्हणू शकत नाही. खरे म्हणजे ही कामे त्या त्या देशातील सरकारची आहेत, पण भारत सरकारकडे कधीच पुरेसा पब्लिक फायनान्स येत नसल्याने ती कामे आज अशा स्वयंसेवी संस्था करत आहेत.
- गेट्सचे मोठेपण असे की ते उपकाराची भाषा न करता ही कामे सरकारने करावयाची असल्यास सरकारला करांचा अधिक महसूल मिळाला पाहिजे आणि त्यासाठी श्रीमंतांवर अधिक कर लावण्याची गरज व्यक्त करतात. अमेरिका किंवा इतर विकसित देशांनी याच मार्गाने सामाजिक सुरक्षा योजनांचा खर्च चालविला आहे, असा दाखलाही ते देतात.
- तिकडे दुसरीकडे, ॲमेझानचे भारतात अतिशय उत्तम चालले आहे, असे जेफ बीजोस यांना वाटते. त्यांनी भारतात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे २०१६ ला ठरविले असून त्यात अजून खंड पडलेला नाही. एवढेच नव्हे तर हैद्राबादला त्यांनी टोलेजंग कार्यालयही उभारले आहे. असे कार्यालय त्यांना इतर देशात उभे करावे वाटले नाही.
- भारतातील किती छोट्या आणि मध्यम उत्पादकांना ॲमेझानने मार्केटिंगची संधी दिली आहे, याची जाहिरात आपण सध्या पहात आहोत. पण ही सर्व विक्री ई कॉमर्स पद्धतीने होत असल्याने दुकानातून होणाऱ्या विक्रीवर परिणाम होतो आहे.
- फ्लिपकार्ट आणि ॲमेझानने दिवाळीत ३१ हजार कोटी रुपयांची विक्री भारतात केली, असे एक आकडेवारी सांगते. या बदलाचा वेग आणखी वाढेल, तेव्हा भारतीय समाज त्याच्याकडे कसे पाहणार, हा कळीचा मुद्दा आहे. पण आज तरी भारतीय ग्राहक ई कॉमर्सचा स्वीकार करताना दिसत आहेत, हे नाकारून चालणार नाही.
‘मायक्रो एटीएम’ नावाची डिजिटल क्रांती!
- भारत सरकारची धोरणे अशीच ई कॉमर्सला पूरक असली पाहिजे, असा प्रयत्न फ्लिपकार्ट आणि ॲमेझान करणार, हे ओघाने आलेच. याचा अर्थ दोन अमेरिकन कंपन्या भारताच्या बाजारपेठेसाठी मैदानात उतरल्या आहेत आणि त्या प्रचंड पैसा ओतून भारतातील ग्राहक आपल्याकडे खेचून घेत आहेत तर! ही वस्तुस्थिती आपल्याला आता नाकारता येत नाही. मात्र देश म्हणून त्याविषयी विचार करावा लागेल. इतके वर्षे जागतिकीकरणाचा भारताला अनेक आघाड्यावर लाभ झाला आणि आता थेट जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची वेळ आली आहे. अर्थात, भारतीय ग्राहकांची वाढत चाललेली ही क्षमता आपण का ओळखू शकलो नाही, हा मुद्दा उरतोच.
- पण मुद्दा एवढ्यापुरता मर्यादित नाही. मुद्दा आहे, गेट्स किंवा जेफ बीजोस भारतात का येत आहेत? आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत त्यांना कोणत्या संधी दिसत आहेत? भारतातील राजकारण आणि लोकसंख्येकडे ते कसे पाहत आहेत? भारताच्या वेगाने होत असलेल्या आणि त्यापेक्षाही अधिक वेगाने होणाऱ्या विकासाविषयी ते एवढे आशावादी का आहेत? भारत पाच ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था होईल की नाही, याविषयी भारतीय नागरिक साशंक असताना जगातील ही सर्वाधिक श्रीमंत माणसे भारतात पैसा का ओतत आहे? भविष्यकाळातील भारतात होणाऱ्या विकासावर त्यांचा एवढा विश्वास का आहे? आणि त्यांनी भारतात पैसा ओतणे आपल्या फायद्याचे आहे काय?
- भारताची अर्थव्यवस्था, भारताच्या क्षमता आणि भारतातील संधी, याविषयी इतकी परस्परविरोधी मते भारतीय व्यक्त करत असताना या प्रश्नांची जी उत्तरे मिळतील, त्याविषयी एकमत होण्याची शक्यता कमीच आहे. पण ज्यांच्या संपत्ती निर्माणाकडे जग दुर्लक्ष करू शकत नाही, अशा उद्योजकांची ही मते अशी सोडून तर देता येणार नाहीत.
- भारतातील वाढत असलेले डिजिटल व्यवहार, आर्थिक व्यवहार पारदर्शी होण्यासाठी आणि १३५ कोटी नागरिकांच्या गरजांचे व्यवस्थापन करण्यासाठी आलेले आधार कार्ड, बँकिग सोपी करणारी यूपीआय पद्धत, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने तिची विश्वासार्हता, क्रयशक्ती वाढत चालल्याने ग्राहक बनत चाललेली प्रचंड लोकसंख्या, भांडवलाअभावी अडलेला विकास आणि त्यासाठी परदेशी गुंतवणुकीसाठी करावी लागत असलेली धावपळ आणि तडजोडी.. हे सर्व एक जागरूक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला समजून घ्यावे लागेल. आणि आपल्या आजूबाजूचे आपल्या आवाक्यात असलेले नकार आपण नको तेवढे मोठे तर करत नाहीत ना, याचाही विचार करावा लागेल.
एक मार्ग आहे. घराघरातील आणि धार्मिक स्थळांकडील प्रचंड सोने बाहेर काढून त्याचे रुपांतर भांडवलात करावे लागेल आणि जास्तीत जास्त व्यवहार बँकिंगनेच करावे लागतील. करपद्धती सुलभ करून पब्लिक फायनान्स पुरेसा मिळेल, यासाठीच्या प्रयत्नांना वेग द्यावा लागेल. असे करण्याची आपली तयारी आहे? असेल तर गेट्स, जेफ बीजोस आणि अशा परकीय गुंतवणूकदारांना पायघड्या घालण्याची अजिबात गरज नाही. आणि ती तयारी नसेल तर पायघड्या घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी!
– यमाजी मालकर
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.