Kalyan Jewellers IPO: तुमचे आर्थिक कल्याण होऊ शकते का ? 

Reading Time: 5 minutes

Kalyan Jewellers IPO

केरळातुन सुरुवात झालेल्या आणि देशभरात ज्वेलरी शोरूम्सचे जाळे निर्माण करणाऱ्या कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ (Kalyan Jewellers IPO) 16 मार्च ते 18 मार्च पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. 

अमिताभ बच्चन, कतरिना कैफ ते साऊथ सुपरस्टार नागार्जुन अशी तगडी स्टारकास्ट  घेऊन भव्य जाहिराती करणाऱ्या कल्याण ज्वेलर्स बाबत जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच इच्छा असेल. कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपणही कल्याण ज्वेलर्सच्या प्रगतीत भागीदार होऊ शकतो. 

कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स योग्य किंमतीत उपलब्ध आहेत का?

कंपनीचे बिजनेस मॉडेल काय आहे ?

शेअर्स विक्रीतून उभारलेले भांडवल कंपनी कुठे वापरणार आहे ? 

मी कल्याण ज्वेलर्स चे शेअर्स आयपीओद्वारे खरेदी करण्यासाठी अर्ज करावा का ? 

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे नक्की वाचा: IPO: आयपीओ म्हणजे काय?

कल्याण ज्वेलर्स : कंपनीचा इतिहास 

 • कल्याण ज्वेलर्सच्या स्थापनेची कहाणी अतिशय रंजक आहे. एका टेक्सटाईल उद्योगातील कल्याणरमण यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कल्याण ज्वेलर्सचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. 
 • कल्याणरमण यांच्या वडिलांचा केरळच्या थ्रीसुर येथे कापडाचा व्यवसाय होता. सुरुवातीला  कल्याणरमण  वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत असत. 
 • त्यांच्या दुकानाला लागूनच दागिन्यांच्या दुकानांची एक गल्ली होती. त्या दुकानांमधील गर्दी पाहून कल्याणरमण यांच्या लक्षात आले की कपड्यांपेक्षा चांगला नफा दागिन्यांच्या व्यवसायातून मिळू शकतो. 
 • अखेर विचाराअंती त्यांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्वतःजवळची जमापुंजी वापरून आणि बँकेकडून  50 लाख रुपयांचे कर्ज घेऊन 1993 मध्ये कल्याण ज्वेलर्स’च्या पहिल्या शोरुमची सुरुवात केली. 
 • त्यावेळेसच्या सराफी पेढी म्हणजे छोट्या आकाराची दुकाने होती. ग्राहकांना फारच थोडे नमुने बघायला आणि हाताळायला मिळायचे. वेगळी डिझाईन आणि दागिने प्रकारांसाठी फोटो अल्बम बघून नोंदणी करावी लागायची. कारागीर निवांत दागिने घडवून दुकानदारांना आणि मग ग्राहकांना उपलब्ध करून देत असत. 
 • कल्याणरमण यांना मात्र जुन्या काळच्या पद्धती आणि दिरंगाई मान्य नव्हती. त्यांनी आपल्या शोरुमची सुरुवातच 4000 स्क्वेअर फुटाचे भव्य दालन थाटून केली. हे शोरूम सुपरहिट झाले.      
 • आपल्या दोन मुलांसाठी प्रत्येकी एक शोरूम असावे अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार केरळमधल्याच पल्लकड मध्ये कल्याण ज्वेलर्सची दुसरी शाखा उघडण्यात आली.  
 • दुसऱ्या शोरूमला लगेचच चांगला प्रतिसाद मिळाला नाही.पलक्कडमधील शोरूमच्या अपयशाने त्यांना एक मोठा धडा दिला तो म्हणजे, “दागिन्यांच्या उद्योगात स्थानिकीकरण खूप महत्वाचे आहे. एका प्रदेशात जे विकले जाते ते कदाचित दुसर्‍या प्रदेशातील ग्राहकांना आवडेलच असे नाही. कारण दागिन्यांच्या आवडी-निवडी प्रदेशागणिक बदलत जातात”,  
 • कल्याणरामन व त्यांचे दोन्ही मुलगे रमेश आणि राजेश यांनी हा धडा लक्षात ठेवून पुढचं प्रत्येक पाऊल उचलताना आवश्यक ते संशोधन करायचं ठरवलं. त्यानंतर कल्याण ज्वेलर्सने 2003 मध्ये तामिळनाडूच्या कोयंबतूरमध्ये आपल्या व्यवसायच विस्तार केला
 • आज कल्याण ज्वेलर्सची  भारत आणि मध्य आशियामध्ये मिळून 137 शोरूम्स असून यामधील 107 भारतामध्ये तर उर्वरित 30 शोरूम्सचे  जाळे मध्यपूर्व आशियामध्ये पसरले आहे. आहे आणि यामध्ये जवळपास 8000 कर्मचारी काम करतात. 
 • आजच्या घडीला कल्याण ज्वेलर्स भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह दागिन्यांच्या विक्रेत्यांपैकी एक पेढी असून त्यांची उलाढाल 10,000 कोटींपेक्षा जास्त आहे. 
 • दागिन्यांच्या व्यवसायात कल्पकता आणि त्याचबरोबर पारदर्शकता असणे आवश्यक आहे कल्याणरमण यांनी या दोन्ही गोष्टींना महत्व देऊन आपला व्यवसाय केला त्यामुळेच यशाचं प्रत्येक शिखर पार करणे त्यांना शक्य झालं. 
 • आज कल्याण ज्वेलर्स एक यशस्वी ब्रँड आहे. बिग बी अमिताभ बच्चन सारखा नामवंत कलाकार कल्याण ज्वेलर्सचा ब्रँड अँबॅसिटर आहे. 
 • कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक टी.एस. कल्याणरमण यांनी केवळ यशस्वी व्यवसाय साम्राज्यच निर्माण केले नाही तर ज्वेलरी उद्योगामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. 

Kalyan Jewellers IPO: कंपनी किती पैसे आयपीओद्वारे उभे करणार आहे ?

 • आयपीओची किंमत प्रति शेअर 86-87 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 
 • आयपीओ साठी अर्ज करायचा एक लॉट 172 शेअर्सचा ठरवण्यात आलेला आहे. तुम्हाला अर्ज करताना 172 शेअर्सच्या पटीतच अर्ज करावा लागेल. 
 • कमीत कमी एका लॉटच्या खरेदीसाठी किमान 14,964 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
 • आयपीओद्वारे कल्याण ज्वेलर्स रु. 1175 कोटी उभे करणार आहे. यामध्ये 2 भाग आहेत:
  1. ऑफर फॉर सेल: सध्याचे शेअरहोल्डर्स त्यांच्याकडचे रु.375 कोटींचे शेअर्स विकणार आहेत. सदर रक्कम कंपनीकडे न जाता विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडे जाइल. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक टी.एस. कल्याणरमण त्याच्याकडील रु.125 कोटी रुपयांचे शेअर्स विक्री करणार आहेत. प्रायव्हेट इक्विटी फर्म वारबर्ग पिनॅकस त्यांच्या हायडेल इन्व्हेस्टमेंट या कंपनीद्वारे रु. 250 कोटी रुपयांचे पूर्वीच खरेदी केलेले शेअर्स विकणार आहेत.
  2. नवीन शेअर विक्री: नवीन शेअर विक्रीद्वारे रु.800 कोटी रुपये प्रत्यक्ष कल्याण ज्वेलर्सकडे जातील. कंपनी सदर रक्कम खेळते भांडवल म्हणून उपयोगात आणले जाईल. कंपनीला व्यवसाय वृद्धीसाठी खेळते भांडवलाची असलेली गरज भागवली जाईल. 
 • आयपीओमध्ये 50% भाग संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% बिगर संस्थात्मक निविदाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
 • कल्याण ज्वेलर्सच्या आयपीओसाठी अ‍ॅक्सिस कॅपिटल, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि एसबीआय कॅपिटल मार्केट हे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम करत आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती (Company Financials)

तपशील  31-12-20 31-03-20 31-03-19 31-03-18
एकूण महसूल (रु.कोटींमध्ये) 5,549.79 10,181.016 9,814.02 10,580.19
करोत्तर नफा (रु.कोटींमध्ये) -79.94 142.27 -4.86 140.99
करोत्तर नफा- एकूण महसूल गुणोत्तर  -1.4% 0 1.4% -1.3%
एकूण मालमत्ता (रु.कोटींमध्ये) 8,122.98 8,218.68 8,059.91 8,551.23
 • कंपनीचे आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्रति शेअर उत्पन्न रु. 1.49 होते. मागील 3 वर्षांचे सरासरी प्रति शेअर उत्पन्न रु. 0.98 आहे. 
 • कल्याण ज्वेलर्सच्या आयपीओ साठी किंमत पट्टा रु.86 ते रु. 87 पर्यंत आहे.
 • मागच्या 3 वर्षांचे सरासरी प्रति शेअर उत्पन्न रु.0.98 असून याप्रमाणे पी.ई. रेशो 89 पट येतो. 
 • आर्थिक वर्ष 2020-21 च्या 9 महिन्यांमध्ये नुकसान असल्याने या कालावधीचा पी.ई. रेशो मोजलेला नाही. 

कंपनीची वैशिष्ट्ये व जमेच्या बाजू :

 1. भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये कल्याण ज्वेलर्स अग्रगण्य कंपनी आहे
 2. कोरोनामुळे व्यवसायातील मंदी, नफ्याचे कमी प्रमाण व इतर वरती उल्लेख केलेल्या धोक्यांचा विचार करता आयपीओसाठी ठरवलेली रु.87 किंमत महाग वाटू शकते. दीर्घकालात कल्याण ज्वेलर्स मध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल तर शेअरची बाजारात नोंद झाल्यावरसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता.
 3. शुद्धता आणि विविधता या वैशिष्ट्यांसह असणारी दागिन्यांची विस्तृत श्रेणी
 4. भारतातील नामांकित  विश्वसनीय ज्वेलरी ब्रँडपैकी एक ब्रँड.
 5. देशभरात चांगले वितरण जाळे, परदेशात विशेषतः आखाती देशातसुद्धा चांगली विक्री होणारा ब्रँड
 6. अनुभवी व्यवस्थापन 

कल्याण ज्वेलर्सच्या व्यवसायतले धोके :

 1. मागची 3 वर्षे आणि आर्थिक वर्ष 20-21 च्या सुरुवातीच्या तीन तिमाहीत विक्रीचा घसरता आलेख
 2. आर्थिक वर्ष 2018-19 आणि आर्थिक वर्ष 2020-21 मधील 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीने नुकसान नोंदवले आहे
 3. कल्याण ज्वेलर्स सारखाच व्यवसाय टाटा समूहातील टायटन इंडस्ट्रीजचा आहे. तुम्ही म्हणाल टायटन तर घड्याळं विकते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की “तनिष्क” नावाने प्रसिद्ध असलेले ज्वेलरी शोरूम्स टायटनच्या मालकीचे आहे. आपल्या एकूण विक्रीपैकी ८०% पेक्षा जास्त रक्कम टायटन तनिष्कद्वारे मिळवते. कल्याण ज्वेलर्स म्हणजे भविष्यातील टायटन असे काही   विश्लेषकांचे मत आहे. अशी तुलना लगेच करणे थोडे घाइचे ठरेल कारण टायटन गेल्या अनेक वर्षांपासून शेअर बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी सातत्याने करत आहे.     
 4. कोव्हीड महामारी मुळे झालेल्या नुकसानीची मोठी झळ ज्वेलरी व्यवसायास सोसावी लागली आहे. भविष्यात कोव्हीडचा अजून वाईट परिणाम कंपनीच्या कामकाजावर होऊ शकतो
 5. आखाती देशातील कल्याण ज्वेलर्सच्या व्यवसाय तेथील कायद्यात होण्याऱ्या बदलांमुळे कमी होऊ शकतो. शोरुम्सच्या मालकी हक्कांबाबत आखाती देशात स्थानिक मालकीच्या दृष्टीने नियंत्रणे आहेत
 6. कल्याण ज्वेलर्सची विक्री ज्या आभूषणांच्या डिझाईनवर अवलंबून आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलू शकतात. पुरवठादार बदलू शकतात आणि इतर स्पर्धकांच्या तुलनेत कंपनी भविष्यात मागे पडू शकते. 

Kalyan Jewellers IPO: तुम्ही कल्याण ज्वेलर्सच्या आयपीओसाठी अर्ज करावा का ?  

सध्या शेअर बाजारात प्रचंड तेजी आहे. तेजीच्या काळात पैसे उभे करण्यासाठी अनेक कंपन्या आपले आयपीओ आणत आहेत. बाकीचे लोक आयपीओ साठी अर्ज करत आहे म्हणून आपण करायलाच हवा म्हणून तुम्ही अर्ज करावा असे नाही. तुमच्या दीर्घकालीन ध्येयांना अनुसरून अभ्यासपूर्ण निर्णय तुम्ही घ्यायला हवा. 

अधिक अभ्यासासाठी आणि माहितीसाठी कल्याण ज्वेलर्सचे रेड हेरींग प्रॉस्पेक्ट्स वाचा : येथे क्लिक करा

कल्याण ज्वेलर्स -आयपीओ माहिती 
एकूण भांडवल उभारणी रु. 1175 कोटी 
ऑफर फॉर सेल रु. 375 कोटी
नवीन शेअर विक्री रु.800 कोटी
आयपीओ विक्री सुरु होण्याची  दिनांक  16/03/2021
आयपीओ विक्री सुरु होण्याची  दिनांक 18/03/2021
आयपीओ अलॉटमेंट दिनांक 23/03/ 2021
रिफंड प्रक्रिया दिनांक 24/03/2021
डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स जमा दिनांक 25/03/2021
आयपीओ लिस्टिंग दिनांक 26/03/2021

(लेखात माहिती दिलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. सदर कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *