Reading Time: 3 minutes

अर्थशास्त्रात गुंतवणुकीचा अभ्यास करताना गुंतवणूक तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विकास व्यवस्थेचा विचार करणाऱ्या अनेक मार्गदर्शकांची नावं पुढे येतात. त्यातील निवडक व्यक्तींचा आणि त्या प्रत्येकाचा त्यांच्या विषयावरील मौलिक विचारांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचे  विचार आपल्याला नक्कीच एखाद्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील.

गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजार विचारवंत:

जॉन सी. बोगल (John C. Bogle)

जॉन सी. बोगल व्हॅनगार्ड ग्रुपचे संस्थापक आहे . त्यांनी पहिला लो-कॉस्ट इंडेक्स फंड सुरू केला. अप्रत्यक्ष (Passive investing) आणि कमी खर्च असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिला.

बोगल यांचे विचार-

  • गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याचा प्रयत्न करू नका, संपूर्ण ढिगारा खरेदी करा. एकेका कंपनीऐवजी संपूर्ण बाजारात एकत्रित गुंतवणूक (इंडेक्स फंड) करा.
  • शेअर बाजार हे गुंतवणुकीपासून तुमचं लक्ष विचलित करणारं मोठं साधन आहे. रोजच्या हालचालींकडे न पाहता, दीर्घकालीन दृष्टी ठेवा.
  • वेळ हा तुमचा मित्र आहे आणि तीव्र भावना (इम्पल्स) तुमचा शत्रू. त्यामुळे संयम बाळगा, भावनांवर नियंत्रण ठेवा.
  • व्यवस्थापक जितका जास्त मोबदला घेतात, गुंतवणूकदार तितकं कमी कमावतो. जास्त खर्च म्हणजे गुंतवणूकीवरील कमी परतावा.
  • जे काही होईल ते होईलच म्हणून आपला गुंतवणुकीचा मार्ग बदलू नका. नेहमी शिस्तीत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
  • तुम्हाला शेअर बाजारात २०% तोटा होण्याची शक्यता सहन होत नसेल, तर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. बाजारातील तीव्र चढ उतार सहन करण्याची मनाची तयारी ठेवा.
  • शेअर बाजारातील एक सखोल नियम म्हणजे सरासरीकडे परतणं त्यामुळे बेफाम वाढ झाल्यावर शेअर पुन्हा स्थिर मूल्यावर येतोच येतो.
  • इक्विटी फंड गुंतवणूकदाराचे दोन मोठे शत्रू म्हणजे खर्च आणि भावना त्यांना नियंत्रणात ठेवा.
  • इंडेक्स फंड तुम्हाला वैयक्तिक शेअर्सची निवड, योग्य वेळ पकडण्याची आणि व्यवस्थापक निवडीची जोखीम टाळतात त्यातील साधेपणातच यश आहे.
  • गुंतवणुकीत तुम्हाला जे मिळतं ते सहसा त्या गोष्टींपासून मिळतं, ज्या तुम्ही पैसे न देता घेता, कमी खर्च म्हणजे जास्त परतावा.

 रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki)

रॉबर्ट कियोसाकी ‘Rich Dad Poor Dad’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहे. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला आणि लोकांनी पैशासाठी काम न करता पैसे आपल्यासाठी कसं काम करतात ही संकल्पना समजावून देण्यावर त्यांचा भर आहे.

कियोसाकी यांचे विचार-

  • श्रीमंत लोक पैसे मिळवण्यासाठी काम करत नाहीत. ते पैशांना आपल्यासाठी काम करायला लावतात.
  • तुम्ही किती पैसे कमावता ते महत्त्वाचं नाही तुम्ही ते किती आणि कसं टिकवता हे महत्त्वाचे आहे.
  • आर्थिक स्वातंत्र्य केवळ त्या लोकांसाठी उपलब्ध आहे जे त्याचा अभ्यास करतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करतात.
  • यशस्वी गुंतवणूकदार सगळं जाणणारे नाही तर शिकत राहणारे असतात.
  • ज्या गोष्टी समजत नाहीत त्यात गुंतवणूक करू नका, आधी शिकून घ्या.
  • शेअर बाजार हा संयमी व्यक्तीकडे पैसा हस्तांतरित करणारे यंत्र आहे.
  • आजच्या बदलत्या जगात, तुम्हाला काय येतं यापेक्षा तुम्ही ते किती लवकर शिकता,हे अधिक महत्त्वाचं आहे.
  • अपयश आल्यावर हार मानणारे हरतात तर वारंवार अपयशावर अपयश येऊनही न हार मानणारेच जिंकतात.
  • आपल्याकडे असलेली सर्वात शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू.
  • तुम्ही फक्त तेव्हाच गरीब होता, जेव्हा तुम्ही हार मानता म्हणूनच शिकणं कधीही थांबवू नका. 

अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विचार करणारे काही विचारवंत यांची ओळख आणि विचार 

अर्थशास्त्रज्ञ व वित्तविषयक विचारवंत

रिचर्ड थेलर (Richard Thaler)

रिचर्ड थेलर नोबेल पुरस्कार विजेते आहे. तसेच ‘Behavioral Economics’ चे संस्थापक सदस्य आहे. ‘Nudge’ या पुस्तकात त्यांनी मानवी मानसशास्त्र हे त्यांच्या गुंतवणुकीवर कसा प्रभाव टाकतं ते स्पष्ट केलं आहे.

थेलर यांचे विचार-

  • वर्तणूक अर्थशास्त्राचं गृहितक असं आहे की लोक पारंपरिक अर्थशास्त्र मानते, त्यापेक्षा खूप कमी शहाणे असतात.
  • कोणाला काही करायला प्रवृत्त करायचं असेल, तर ते आधी सोपं करा.
  • आपण विचार करणाऱ्या भावना नाही तर भावना असलेले विचार करणारे यंत्र आहोत.
  • लोक अल्पकालीन तोट्यांना अधिक महत्त्व देतात आणि दीर्घकालीन नफ्यांकडे दुर्लक्ष करतात.
  • शेअरबाजार हा गोष्टी सांगणारे मशीन आहे. त्यातील कथा या भावनांपेक्षा जास्त किंमत ठरवतात.
  • तोटा सहन करता येणं ही भावना, नफ्याच्या आनंदापेक्षा दुप्पट तीव्र असते.
  • बचत ही कठीण असते कारण आपण फक्त आत्तावर लक्ष केंद्रित करतो, पुढचं विसरतो.
  • एक चांगला हलका धक्का अथवा प्रोत्साहन म्हणजे असा पर्याय जो लोकांना त्यांचे निर्णय स्वातंत्र्य राखून चांगला निर्णय घेण्यास मदत करतो.
  • फक्त अधिक माहिती देऊन लोकांचे अज्ञान दूर करता येत नाही.
  • बाजार कितीही काळ असह्य वाटेल इतका गैरवर्तन करत राहू शकतो.

 रॉन चर्नो (Ron Chernow)

रॉन चर्नो प्रसिद्ध इतिहासकार व चरित्रलेखक आहे.त्यांनी J.P. Morgan, Rockefeller आणि Alexander Hamilton यांच्यावर चरित्रे लिहिली आहे. भांडवलशाहीचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. 

चेर्नो यांचे विचार:

  • वॉल स्ट्रीटचा इतिहास म्हणजे सट्टा आणि भ्रम यांची एक साखळी आहे.
  • बाजार अनेकदा तर्काने नव्हे तर केवळ भावनांनी चालवले जातात.
  • आर्थिक इतिहास हा अमेरिकन शिक्षणातील सर्वात दुर्लक्षित विषय आहे पण भांडवलशाही समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • प्रत्येक आर्थिक फुगवटा आनंदात सुरू होतो आणि नैराश्यात संपतो.
  • वॉल स्ट्रीट हा केवळ आर्थिक आकड्यांचा नाही तर मानवी मानसिकतेचा खेळ आहे.
  • भांडवलशाही ही एकाच वेळी सर्जनशील आणि विध्वंसक असते.
  • शेअरबाजार नेहमी अती आशावाद आणि अती निराशावाद यामध्ये वर खाली होत असतो.
  • सर्वात वाईट आर्थिक संकटे तेव्हाच उद्भवतात, जेव्हा लोक म्हणतात यावेळी वेगळं आहे.
  • महान संपत्ती केवळ मार्केटचे वेळेवर भाकीत करून नव्हे, तर जग बदलणाऱ्या कंपन्या उभ्या करून मिळवली जाते.
  • सुज्ञ निर्णय घेणे आणि संयम बाळगणे वॉल स्ट्रीटवर धाडसापेक्षा दुर्मिळ आहे. (अपूर्ण)

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

लोकप्रिय “रसना”चे संस्थापक अरीज खंबाटा यांची यशोगाथा

Reading Time: 3 minutesउन्हाळ्यात दुपारच्या वेळेला रसना हमखास पिला जातो. शुभ कार्यातही पाहुण्यांचे रसना देऊनच…

वॉरेन बफे आणि बर्कशायर हॅथवे

Reading Time: 3 minutesवॉरेन बफे हे नाव सामान्य व्यक्तींसाठी आणि अर्थात गुंतवणूकदारांसाठी एक प्रेरणादायी, चालता…

दीपस्तंभ – भाग तीन

Reading Time: 3 minutesदीपस्तंभच्या मागच्या दोन्ही भागात, आपण गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजारातील विचारवंत यांची थोडक्यात ओळख…