सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे. यासोबतच आपल्या पाल्यांना देखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर (financial literate) बनवणं आता काळाची गरज आहे. आपण कित्येक पालकांना त्यांच्या मुलांना पॉकेट मनी (Pocket Money) म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिलं असेलच. हे सर्व सुरु असताना आता शिक्षण पद्धतीमध्ये देखील काहीसा बदल होणं आपल्याकडं गरजेचं झालं आहे.
बाहेरच्या देशांमध्ये १५ वर्षाच्या मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शाळेत विषय आणि परीक्षादेखील आहे. २०१७ साली अमेरिकेमध्ये एक सर्वे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे. किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता, असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही असंच चित्र आहे.
आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनविण्यासाठी आपल्याकडे कोणतीही फायनान्सची डिग्री अथवा काही विशेष ज्ञान असणं गरजेचं नाही. काही मूलभूत आर्थिक गोष्टींचे नियम आपण पाल्यांना शिकवल्यास मुलं हे सर्व ज्ञान आरामशीरपणे समजू शकतात.
मुलांचा पहिला पॉकेटमनी किती असावा ?
आपल्यातील घरातील पैशांचे बजेट बघता मुलांनाही त्या प्रमाणतच पैसे द्यायला हवे. आपली परिस्थिती एक आणि आपण मुलांना पैसे देतोय अनेक, असं व्हायला नको. मुलांना पैशांच्या बाबतीत काही अनुभव देण्यास सुरुवात करायला हवी.
जर त्यांच्यात आर्थिक साक्षरता आणायची असेल तर तशी शिकवणही द्यावी लागेल. मुलांना ज्यावेळी पहिल्यांदा आपण पॉकेटमनी (खर्च) देतो तो अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. यामधून त्यांच्यात परिपक्वता वाढते आणि पालकांचा देखील त्यांच्यावर विश्वास बसण्यास मदत होते. जेव्हा आपण मुलांना पैसे देतो तेव्हा ते एखादी आनंददायी वस्तू, मेजवानी किंवा इतर काही गोष्टीसाठी पुरतील इतके असायला हवेत.
पैशांची बचत करायला शिकवा –
जर आपण 5 किंवा 10 वर्षांपूर्वीचा काळ आठवल्यास आपल्याकडे लहान मुलं छोट्या लाकडी गल्ल्यांमध्ये पैसे साठवायचे. एखादा नातेवाईक आला किंवा घरच्यांनी पैसे दिल्यावर मुलं गल्ल्यांमध्ये पैसे टाकून बचत करायचे.
सध्या पिगी बँक किंवा काही ऑनलाईन ऍपचादेखील मुलं वापर करतात. जपानमधील बँकांनी लहान मुलांना समजण्यासाठी बँकिंग सुविधेमध्ये खूप चांगले बदल केले आहेत. आपल्याकडे असे काही अस्तित्वात नसले तरीदेखील आपण पिगी बँक किंवा ऑनलाईन काही अॅपच्या माध्यमातून मुलांना बचत करायला शिकवू शकतो. यातून आपण मुलांच्या व्यवहारांवर देखील लक्ष ठेऊ शकतो. मुलांना पैशांची बचत करायची आणि पैसे योग्य ठिकाणी खर्च करायची सवय यामुळेच लागते.
हेही वाचा – [Podcast] Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे
आपल्या आवडी निवडी मुलांवर थोपवू नका –
जर समजा, मला लहानपणी खेळण्यात जेसीबी आवडायचा तर माझ्या मुलालाही जेसीबीचं, आवडेल असं नाही. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे काहीही आवडू शकतं. त्याने कोणती खेळणी घ्यावी किंवा काय करावे, याबाबत मी माझे मत लादू शकत नाही. योग्य गोष्टींची समज मी त्याला देऊ शकतो, हे मात्र नक्की. इंटरनेटवर एका आईची आणि मुलीची गमतीदार गोष्ट आहे. एक आई आपल्या मुलीला सात दिवसांच्या सहलीसाठी पैसे देते आणि खाण्यासाठी एक मोठा चिप्सचा पुडा देते. त्या चिप्सच्या पुड्याच्या किंमतीमध्ये मुलीला इतर काही गोष्टी घेता येत होत्या. मात्र, आईने पहिलेच तो पुडा तिला दिल्याने ती तिच्या आवडत्या गोष्टींना मुकली. असंच आपल्याही पाल्यांच्या बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे आपणही याबाबत जागरूक असले पाहिजे.
छोटे छोटे निर्णय घेण्यास मुलांना मोकळीक द्या –
मुलांना छोटे छोटे निर्णय त्यांच्या पद्धतीने घेऊ द्या. त्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणं द्या आणि त्यांना व्यवहार नीट शिकवा. एक उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण फळांच्या खरेदीचे उदाहरण घेऊ शकतो. एखादी गोष्ट किती प्रमाणात, तिचा दर्जा कसा असायला हवा, किंमत या गोष्टी मुले फळे खरेदी करण्याच्या उदाहरणातून शिकू शकतात. जसं जसं मुलं मोठं होतील तसं तसं त्यांना आर्थिक गणित मांडायला, तुलना करायला जमेल. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींमधून आपण मुलांना चांगल्याला चांगला व्यवहार, त्याची पारख करणं शिकवू शकतो. त्यांच्या ऐच्छिक भावनांनुसार काही गोष्टी झाल्यास निश्चित त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. अशाप्रकारे उद्याचे नागरिक असणाऱ्या आजच्या लहान मुलांना आर्थिक साक्षरता शिकवणे फार महत्वाचे आहे.