Reading Time: 5 minutes

मरण अटळ असले तरी ते येत असताना, आपण परावलंबी आहोत नाकातोंडात नळ्या घातल्या आहेत आणि केवळ कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने जिवंत आहोत अशी स्वतःबद्दलची कल्पनाच कोणी करू शकत नाही. आपला शेवटचा दिस गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असल्याने अश्या विषयावर चर्चा करणे म्हणजे काहीतरी अभद्र बोलणे असे समजले जाते. आपल्या माहितीत अशी काही उदाहरणे असतील ज्यांच्यावर त्यांच्या प्रिय व्यक्तींना केवळ भावनेच्या आहारी जाऊन असे फारसा उपयोग नसलेले उपचार करण्याची वेळ आली. यात ती व्यक्ती तर गेलीच पण त्याच्या कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावे लागले, याशिवाय मोठे भरमसाठ बिल झाल्याने आर्थिक झटका बसला ते वेगळे. उपाय होत नाही, परवडत नाही किंवा काही उपायच नाहीत अशा प्रसंगात नंतर पेशंटला घरी नेऊन तो कधी जातो याकडे वाट पाहत बसावे लागते ते वेगळेच.

          अशी वेळ नक्की कोणावर कधी येईल हे सांगून येत नसेल तरी कोणतीही सुजाण व्यक्ती आपल्यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबावर कदाचित अशी वेळ आली तर काय करायचे ? आपल्या आजारावर उपचार करून उपयोग होणार नसेलच तर खर्च करत राहायचा का? ज्याच्या सुखासाठी आपण आयुष्यभर धडपडलो त्या प्रिय व्यक्तींना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासात अडकवून ठेवावे का? कोणते उपचार करावेत करू नयेत याबद्दल आपली इच्छा व्यक्त करणारे इच्छापत्र आपण बनवू शकते यास लिव्हिंग विल असे म्हणतात. आपण यासंदर्भात निर्णय घेण्यास सक्षम नसू अशा वेळी कोणते उपचार करावेत आणि कोणते करू नयेत यासंबंधी आपल्या इच्छा त्यात व्यक्त करता येतील. थोडक्यात आपली इच्छा नसताना आपल्यावर कोणते उपचार केले जाऊ नयेत याविषयी आपल्या कुटुंबियांना केलेले हे मार्गदर्शन असते. त्यामुळे लोक काय म्हणतील सुचवलेले उपचार करावेत की नाही करावे यासंबंधी वेळेत निर्णय घेण्याचे मानसिक बळ त्यांना मिळेल. वैद्यकीय इच्छापत्राद्वारे आपण ते करू शकतो.

        कोणतेही निर्णय घेण्यास आपण असमर्थ असलो किंवा झालो तर आपल्यावर कोणत्या टप्यापर्यंत उपचार करावेत याविषयी आपले वारस किंवा जे कोणी काळजी घेणारे असतील त्यांना आणि आपल्यावर उपचार कारणारे कोणीही डॉक्टर ( अलीकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता मोडीत निघाली आहे) यांना दिशादर्शन करणारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. उदा. मेंदू काम करेनासा झाल्यास कृत्रिम साधने लावू नयेत, अन्न जात नसल्यास नळीच्याद्वारे अन्न देऊ नये. श्वसनाचा त्रास होत असल्यास ऑक्सिजन लावू नये, व्हेंटिलेटरवर ठेऊ नये किंवा विशिष्ठ पॅथीचेच उपचार करावेत अथवा करू नयेत यासंबंधी आपण त्यात लिहू शकतो. याचबरोबर आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान, देहदान, अवयवदान करायचे असल्यास त्या संदर्भातील आपल्या इच्छा यात लिहिता येतील.

          यासंबंधी पूर्ण विचार करून आपल्या इच्छा लिहाव्यात आणि त्याचा तपशील एकत्रित करून ₹ 100/- च्या बॉण्डपेपरवर ते लिहून काढून त्यावर सही करावी साक्षीदार म्हणून जोडीदार मुले यांची सही घ्यावी याशिवाय या व्यक्तीची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे डॉ तेथेच प्रमाणित करून सही करावी याशिवाय दोन विश्वासू व्यक्तीच्या सह्या घ्याव्या म्हणजे कठीण प्रसंगात घरचे लोक द्विधा मनस्थितीत असले तर त्यांचे ते अशा प्रसंगात योग्य निर्णय घेण्यात सहाय्य करतील. असे वैद्यकीय इच्छापत्र नोटराईजकरून त्याच्या प्रमाणित प्रति अधिक जास्तीची प्रत प्रत्येक संबंधितांना द्यावी.

          मृत्यपत्र आणि हे इच्छापत्र यातील महत्वाचा फरक हा की मृत्यूपत्राची अंमलबजावणी व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते आणि तो आपल्या संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे सांगणारा कायदेशीर दस्त आहे. त्यातील तरतुदींची माहिती वारसांना नसते. वैद्यकीय इच्छापत्रातील तरतुदी तुम्ही जेव्हा कोणतेही निर्णय घेण्यास अकार्यक्षम होता तेव्हाच उपयोगात आणण्याचा विचार केला जातो. मृत्युपत्रातील तरतुदी लाभार्थीना माहिती नसण्याची शक्यता जास्त असते. वैद्यकीय इच्छापत्रात त्यांना याची माहिती आधीच असल्याने ठोस निर्णय घेण्यास मदत होते. याचा अर्थ आपण असे  इच्छापत्र केल्यास आपल्यावर उपचार होणार नाहीत असा नाही कारण जोपर्यंत व्यक्ती विचार करू शकते तोपर्यंत तिच्या इच्छेनेच त्यावर उपचार केले जातात जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही अशा प्रसंगातच काय करावे याचे मार्गदर्शन तुम्हीच करून ठेवलेले असल्याने त्याचा नक्की सारासार विचार केला जातो त्यामुळे असे इच्छापत्र केले तर त्याप्रमाणे केले जाईल का? अशी शंका आपण बाळगू नये उलट आपली निश्चित इच्छा सांगून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे कारण आपल्या प्रिय व्यक्तीचे हाल झालेले पहात राहणे कोणताही संवेदनशील माणूस पसंत करणार नाही.

       डॉ मुरी या शास्त्रज्ञांनी त्यांच्या आयुष्यात राहिलेल्या इच्छांमध्ये (बकेट लिस्ट)  जिवंतपणीच आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या शोकसभेत लोक काय म्हणतील ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांनी अशी शोकसभा आयोजित केली होती ज्यात ते स्वतः सहभागी झाले होते. याच संकल्पेनेच्या जवळपास जाणारी ही कल्पना आहे.

      तुलनेने नवी अशी ही संकल्पना असून ती कितपत पचनी पडते ते पाहावे लागेल याविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असून वृद्धकल्याणशास्त्र या विषयातील डॉक्टरेट मिळवलेल्या विदुषी डॉ रोहिणी पटवर्धन आणि त्यांचे सहकारी याविषयी जागृती निर्माण करीत आहेत तेव्हा अधिक माहिती मिळवून तसेच काही शंका असल्यास त्यांच्याशी याविषयावर चर्चा करावी आणि एक पाऊल पुढे टाकावे त्याच्या ‘आपल्यासाठी आपणच’  या पुस्तकात दिलेला वैद्यकीय इच्छापत्राचा नमुना संदर्भासाठी जसाच्या तसा देत आहे.

वैद्यकीय इच्छापत्र नमुना :

माझे कुटुंबीय, माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.

1) मी                           वय

जन्मतारीख              माझा पत्ता

मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन, अशा अवस्थेत माझ्यावर

केल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करून, माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे.

2) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेला, जगण्याचा अधिकार, या संकल्पनेची, तसंच आविष्कारस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मल पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणं आणि सन्मानाने मरणं य भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

3) माझ्या आजारपणात, मला जगवण्यासाठी जे उपचार केले जाती त्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधितांसाठी पुढीलप्रमा लिहून ठेवत आहे :

अ) मी मरणाच्या दारात असेन, किंवा गाढ बेशुद्धीत असेन, माझा मृत्यू लांबवण्याकरता काहीही उपचार करू नयेत. शरीरात सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मद मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करू नये. कारण अशा अव आपल्या परावलंबनाचं ओझं इतरांवर टाकणं आणि जगत राह मला कीव करण्यासारखं आणि म्हणूनच घृणास्पद वाटतं.

ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरू झाले असतील आणि तेही मला सन्मानाचं जिणं जगण्याच्या दृष्टीने ठरणार नसतील तर मला असं निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून हे उपचार ताबडतोब थांबवावेत अशी माझी आग्रहाची विनंती आहे..

क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत किंवा माझ्या बेशुद्धीतून मी बाहेर येण्याचीही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरीत्या अन्नपाणी देऊन जगवण्याचा खटाटोप करू नये. मला पुन्हा आग्रहपूर्वक सांगायचं आहे की, मला अशा परिस्थितीत कृत्रिमरीत्या जिवंत ठेवणारे सारे उपचार मी नाकारू इच्छिते /इच्छितो.

ड) मला माहीत आहे की, मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी इथे वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल, पण मला ठामपणे म्हणायचं आहे की, या बाबतीतला कायदा असं स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणूस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचं ऐकावं. म्हणूनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणाऱ्या सर्वांना माझी पुनःपुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.

4) माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याविषयी आस्था बाळगणाऱ्या साऱ्यांसाठी या इच्छापत्रांतून मी सांगू बघत आहे की, ज्या वेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखं स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्या वेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्या वेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेन, म्हणूनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलीकडे तुम्हाला काही विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणं आणि तसंच सन्मानाने मरणं या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र, मी कुणाच्याही दबावापोटी नव्हे, तर स्वतःच राजीखुषीने करत आहे.

मी

खालील साक्षीदारांसह दि.

रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे.

नाव

सही

साक्षीदार क्र.1

नाव

फोन / मोबाइल

सही

साक्षीदार क्र. 2

नाव

फोन / मोबाइल

सही

         यात जोडीदार मुले डॉक्टर (त्यांच्या टिपणीसह) आणि त्रयस्थ व्यक्ती अशी साक्षीदार संख्येत वाढ करता येईल. वैद्यकीय इच्छापत्र हे कायदेशीर कागदपत्र नसून सर्वांच्या सोयीसाठी त्यांच्याशी विचार विनिमय करून केलेली सोय असून ही एक प्रकारची निरवानिराव म्हणू शकतो ज्या योगे आपल्या प्रियजनाना आपण चुकीचे काही करत असल्याची खंत राहणार नाही. ते करण्याची मानसिक तयारी करण्यासाठीची कृती रोहिनीताईंच्याच शब्दात-

        ★दोन शब्द प्रत्यक्ष कृतीसाठी★

       वैद्यकीय इच्छापत्र ही काळाची गरज आहे. आपले स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे हाल वाचवण्याचा तोच एक मार्ग आहे. मरण अटळ आहे आणि ते सन्मानाने यावं यासाठीचा उपाय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. मानसिक ताकदीने पुढचा विचार केला तर ते सर्वांच्या हिताचं ठरेल. स्वत:चं वैयक्तिक इच्छापत्र करण्यापूर्वी एखाद्या काल्पनिक केसचं इच्छापत्र तयार करा आणि फाडून टाका. मग स्वतःचं इच्छापत्र करून फाडून टाका. पुन्हा करा. जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातल्या व्यक्तीला ते दाखवा. परत एकदा फाडून टाका आणि मग खरोखरी स्वतःचं वैद्यकीय इच्छापत्र करा. असं केल्याने आपली स्वत:ची मानसिक तयारी होईल. पहिल्या मसुद्यात असणारा भावनेचा कल्लोळ कमी होईल. कुटुंबाचीही थोडीफार मानसिकता तयार होईल आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्या जवळच्या लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, मानसिक बळ मिळेल.

     असे बळ आपल्याला मिळून प्रत्यक्ष कृती आपल्या हातून घडल्यास लेखाचा हेतू सार्थकी लागेल.

©उदय पिंगळे

(आधारित-

पुस्तके-आमच्यासाठी आम्हीच, आनंदस्वर जेष्ठांसाठी  डॉ रोहिणी पटवर्धन रोहन प्रकाशन)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.