शेअरबाजारातील प्राणी

Reading Time: 3 minutes

जॉर्ज ऑरवेलची ‘Animal farms’ ही कादंबरी माहिती आहे का? यात त्यांनी व्यक्तींमधील प्रवृत्तींचे दर्शन प्राण्यांच्या प्रतिकांमधून घडवले होते.

भांडवल बाजारासंदर्भात बैल (Bulls) आणि अस्वल (Bears) या प्राण्यांचा उल्लेख केलेला आपल्या ऐकण्यात आला असेलच. यासंबंधात काही हुशार व्यक्तींनी अनेक पशु आणि पक्षांचा संबध या बाजाराशी जोडला आहे.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हटले जाते. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची सवय आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणारच. त्यामुळेच त्यांच्या वर्तनावरून ही नावे दिली असावीत.

अर्थात हीच नावे का दिली? ते अगदी ठामपणे सांगता येणार नाही. हे प्राणी म्हणजे बाजारात असलेल्या प्रवाहातील विशिष्ट  गटातील लोकांचा समूह आहे. बाजारातील तेजीचा संबध बैलाशी तर मंदीचा संबंध अस्वलाशी जोडल्याने आणि तेजी मंदीचे चक्र सातत्याने चालू असल्याचे या दोन प्राण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हा त्यांच्यासह काही अपरिचित पशु आणि पक्षी या प्रकारांच्या वर्तनांचा गंमत म्हणून मागोवा घेऊयात.

 • बैल (Bull):
  • शेअर बाजारातील ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य अधिक आहे (Large cap) अशा कंपन्यांचे भाव वाढतील या हेतूने हे लोक भराभर शेअर खरेदी करतात यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती झाल्याने भाव आपोआपच वाढू लागतात.
  • यामुळे अल्पकाळात झालेल्या भावातील वाढीमुळे दिपून इतर अनेकजण खरेदी करत सुटतात त्यामुळे अधिक भाव वाढतात आणि त्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विपरीत परिमाण होत नाही. या काळात हे बुल्स आपल्याकडील शेअर्स विकून भरपूर कमाई करतात त्यामुळेच याना ‘तेजीवाले’ असेही म्हणतात.
 • अस्वल (Bear):
  • हे बुल्सच्या बरोबर विरुद्ध प्रकारचे लोक असून मोठ्या कंपन्यांचे भाव खाली उतरतील अशा हेतूने ते आपल्याकडील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. त्यांना मंदिवाले असेही म्हणतात, त्यांनी बाजारावर नियंत्रण मिळवले तर रोज नवा नीचांक स्थापन झाल्याने बरेच लोक आपल्याकडील शेअर्सची घाबरून विक्री करतात यामुळे भाव अधिक पडतात.
  • या कालावधीत बेअर्स त्यांच्या विक्रीपेक्षा खूप कमी पातळीवर शेअर पुन्हा खरेदी करून नफा मिळवतात.

या दोन्ही प्रवाहातील व्यक्तींची बाजारात रोज चाढाओढ चालूच असते. त्यामुळेच शेअर्सचे भाव वरखाली होऊन कुठेतरी स्थिर राहण्यास मदत होते आणि हे भाव त्या कंपनीच्या कर्तृत्वाची दिशा पकडतात. भांडवल बाजाराची स्थिरता राखण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या प्रवाहांची आवश्यकता आहे.

 • हरीण (Stag):
  • स्टॅग या प्रवाहातील गुंतवणूकदार हे बुल्स आणि बेअर्स याहून अधिक वेगळे आहेत. हे लोक त्यांना प्राथमिक विक्रीतून मिळालेले शेअर, त्यांची ज्या दिवशी  नोदणी (listting) असते त्याच दिवशी विकून नफा मिळवतात.
  • शेअर विक्री करताना पूर्वीच्या (CCI) नियमांपेक्षा अधिक अधिमूल्य आकारणे आता शक्य असल्याने, बहुतेक सर्व  कंपन्या अधिकाधिक अधिमूल्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामुळेच अलीकडे यातून अधीक नफा मिळवणे पूर्वीएवढे सोपे राहिलेले नाही.
 • ससा (Rabbits):
  • प्रामुख्याने डे ट्रेडर्सना रेबीट्स म्हटले जाते. काही क्षणातील भावात पडणाऱ्या फरकातून नफा मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते त्यांचा गुंतवणुकीचा कालावधी हा सेकंदाचा काही भाग ते जास्तीतजास्त एकाच दिवसातील बाजार चालू असण्याच्या मिनिटांएवढा मर्यादित असतो.
 • कासव (Turtle):
  • या प्रामुख्याने मध्यम किंवा दीर्घकाळ गुंतवणूक करणारे लोक येतात. अल्पकाळात भावात पडणाऱ्या फरकाकडे हे लोक फारसे लक्ष देत नाहीत.
 • डुक्कर (Pigs):
  • हे अतिउत्साही ट्रेडर्स आहेत ते कोणताही अभ्यास करीत नाहीत, दुसऱ्यांनी दिलेल्या टिप्सवर काम करतात. झटपट पैसे मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. तो काही वेळा सफलही होतो त्यामुळेच अधिक जोखीम घेण्याचा प्रयत्नात आपले पैसे गमावून बसतात.
 • शहामृग (Ostrich):
  • एकाच दिशेने विचार करणारे हे गुंतवणूकदार मंदीच्या काळात आपले नुकसान होईल याचा विचारही करीत नाहीत.  
  • त्यामुळेच ते फार फायदाही मिळवू शकत नाही. शहामृग त्याच्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्यापुढे हतबल होऊन पळून न जाता वाळूत डोके खुपसून बसतो व आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो.
 • कोंबड्या (Chicken):
  • कोणत्याही प्रकारे जोखीम न पत्करणारे असे हे पारंपरिक गुंतवणूकदार असून ते कोणताही धोका न पत्करता फक्त सरकारी योजनांत गुंतवणूक करतात.
 • मेंढ्या (Sheep):
  • या प्रकारचे गुंतवणूकदार हे कोणाचे तरी अनुकरण करीत असतात. ते बाजाराचा कल अनुसरत असतात ते अभ्यास करीत नाहीत किंवा स्वताची व्यवहार करण्याची पद्धत ठरवू शकत नाहीत.
 • कुत्रे (Dogs) :
  • हे पेनी स्टॉक आवडीने खरेदी करणारे अशा प्रकारचे लोक आहेत. या कंपन्याना भविष्य नसल्याने हे गुंतवणूकदार मार खातात.
 • लांडगे (Wolves):
  • लांडगे या आडनावाची व्यक्ती नव्हे. हे लोक अतिशय लबाड असतात. यंत्रणेतील त्रुटींचा स्वताच्या फायद्यासाठी ते वापर करून घेतात. अनैतिक मार्गाने पैसे मिळवतात. अनेक आर्थिक घोटाळ्यात यांचा सहभाग असतो. हर्षद मेहता, केतन पारेख, निरव मोदी ही अशा लोकांची उदाहरणे आहेत.

याशिवाय आपले खूप नुकसान करून नादारी जाहीर करणाऱ्याना Lame Ducks (लंगडी बदके) आर्थिक बाबींचे धोरण ठरवण्यात ठाम भूमिका घेणाऱ्याना Hocks (जनावरांच्या मागच्या पायाचा घोटा) तर मुळमुळीत धोरणाचा पुरस्कार करणाऱ्याना Doves (कबुतरे) बाजारास एक दिशा देण्यास भाग पडणाऱ्याना whales (देवमासा) बाजारातील संधी साधून फायदा घेणाऱ्याना sharks (शार्कमासा) म्हटले जाते.

तर मंदीच्या काळात एखाद्या दिवशी बाजाराने उसळी मारली तरी नंतर तो खालीच येतो यास dead cat bounce (मेलेल्या मांजरास फेकले तर त्यांनी मारलेली उडी खालीच येणार) तर फक्त निर्देशांकात सामाविष्ट शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना dogs of sensex (निर्देशांकाचे पाईक) असा शब्दप्रयोग वापरला जातो.

– उदय पिंगळे

शेअर्स खरेदीचं सूत्र,

शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks) ,

शेअर्सची साधी बदलती सरासरी ,

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *