कोणत्याही कर्जावर ग्राहकाला व्याज द्यावे लागते. हे व्याज साधारणपणे ८.०% (गृहकर्ज) पासून ४२% (क्रेडिट कार्ड वरील व्याजदर) पर्यंत असू शकते. यातील गृहकर्जाचा विचार केल्यास त्यावरील सद्याचा व्याजदर ८.१०% ते १२% आहे. कर्ज घेतलेल्या घराचे तारण ठेवलेले असल्याने हे कर्ज सर्वात सुरक्षित मानले जाते.
- घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यावरील व्याज यामुळे घर घेणाऱ्याची सर्व मिळकत पणास लागते. आयुष्यातील उमेदीची वर्ष फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात, इतर खर्चाना मुरड घालावी लागते.
- जरी हे कर्ज ८.५% दराने इतक्या कमी व्याजदराने घेतले तरी १ लाख रुपये कर्ज १० वर्षात फेडण्यासाठी साधारणत: दीड लाख, २० वर्षात २ लाख १० हजार तर, ३० वर्षात २ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड करावी लागते.
- हाच व्याजदर सर्वसाधारण महागाईच्या दराएवढा म्हणजे ५% एवढा आला तर हीच रक्कम १०, २०, ३० वर्षासाठी अनुक्रमे १ लाख २७ हजार, १ लाख ५४ हजार, १ लाख ९३ हजार होईल.
- तालुक्याच्या ठिकाणीही घर घेण्यास सध्या लाखो रुपये कर्ज घ्यावे लागत असल्याने यातून बऱ्याच ग्राहकांना बराच दिलासा मिळू शकतो.
- कर्जास ‘ऋण’ असा समानार्थी शब्द आहे तर त्याचा दुसरा अर्थ वजा असाही आहे तो समर्पकही आहे. कारण यात आपल्याकडून कर्ज देणाऱ्यास व्याजासह पैसे जात असतात. आपल्या या समजुतीला धक्का देणारी बातमी १३ ऑगस्टच्या “दि गार्डीयन” या वृत्तपत्रात आली आहे.
- १० वर्षांसाठी गृहकर्ज घेतल्यास त्याबद्दल ग्राहकास अर्धा टक्क्याने व्याज देणाऱ्या बँकेची बातमी वाचली. अशा प्रकारे कर्ज देणारी आणि त्याबद्दल कर्जदारास व्याज देणारी ही जगातील एकमेव बँक आहे.
- “ज्यसके बँक (Jyske bank)” या डेन्मार्कमधील तिसऱ्या सर्वात मोठया बँकेने आपल्या कर्जदारांना -०.५% वार्षिक व्याजदराने १० वर्ष मुदतीचे तारणसह गृहकर्ज देऊ केले आहे.
- ऋण व्याजदराने कर्ज याचा अर्थ असा होतो की असे कर्ज घेणाऱ्यास कर्जापोटी बँकेस मुद्दलापेक्षा कमी रकमेचा भरणा करावा लागेल. दुसरी एक डेनिश बँक नोरडीआ (Nordea) यांनी २० वर्ष मुदतीचे गृहकर्ज ०% व्याजदराने तर ३० वर्ष मुदतीचे कर्ज ०.५% व्याजदराने द्यायचे ठरवले आहे.
- ज्यसके बँकेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या “निगेटीव्ह मोरगेज स्कीम”नुसार या योजनेतून गृहकर्ज घेणाऱ्यांना प्रत्यक्ष पैसे दिले जात नाहीत. त्यांचा नेमून दिलेला हप्ता तसाच रहातो. त्याने भरलेल्या हप्त्यानुसार त्याची मूळ रक्कम कमी कमी होते.
- हप्ता भरल्यानंतर त्याची शिल्लक त्यांनी प्रत्यक्ष भरलेल्या हप्त्याहून अधिक प्रमाणात कमी होईल अशा रितीने त्याचा समान मासिक हप्ता (EMI) ठरवला जातो. यासंबंधी आश्चर्य व्यक्त करून ग्राहकांकडून योजनेच्या खरेपणाविषयी आणि ‘हे कसं शक्य आहे?’ याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जातात.
- अशा तऱ्हेची कर्जरचना डेन्मार्क, स्वीडन, स्विझरलँड येथे शक्य आहे कारण या देशात सरकारी रोख्यावरील दर अतिशय कमी आहेत. ज्यसकेच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे ग्राहकांनी पैसे ठेव म्हणून ठेवल्यास त्यांना त्यावर व्याज द्यावे लागत नाही याचाच अर्थ असा की त्यावर ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नाही.
- तर बड्या वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात ऋण व्याजदराने ठेवी ठेवल्यामुळे जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातील थोडा भाग कर्जदारांना देण्यात येत आहे. ऋण उत्पन्नाच्या ठेवी सर्वसामान्य ग्राहकाकडूनही स्वीकाराव्यात का? यावर उच्च पातळीवर विचार चालू आहे पण याबाबत अंतिम निर्णय झाला नाही.
- स्विझरलँड मधील ‘युबीएस बँकेने अलीकडेच €५,००,०००/- हून जास्त ठेव बँकेत ठेवल्याबद्दल ०.६% वार्षिक दराने बँकेस मोबदला द्यावा लागणारी नवीन योजना बाजारात आणली आहे.
आर्थिक सुधारणा काळानंतर व्याजदर बरेच कमी होतील असा अंदाज होता त्याप्रमाणे सुरुवातीच्या काही काळात १२% च्या आसपास असलेले हे आता दर झपाट्याने खाली येऊन ८% वर स्थिरावले आहेत आणि ते याहून खाली येण्याची शक्यता कमी वाटते.
याची बरीच सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. ते अजून काही प्रमाणात खाली आल्यास दिर्घकाळात क्रयशक्तीला चालना मिळेल. सर्वसामान्यांना, त्यातही देशाच्या लोकसंख्येच्या १०% भाग असलेल्या जेष्ठ नागरिकांना याची झळ न पोहोचता ते महागाई वाढीच्या दराजवळपास आणणे हे कोणत्याही सरकारपुढील मोठे आव्हान आहे.
– उदय पिंगळे
काय आहे गृहकर्ज टॉप अप?
कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे
कर्जे स्वस्त होणार : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची कपात
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.