New year Resolutions
Reading Time: 5 minutes

नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये आर्थिक नियोजनाचा तसेच आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा संकल्प (New year Resolutions) असलाच पाहिजे. २०२२ च्या नव्या वर्षाच्या शुभारंभाला असे काही आर्थिक संकल्प प्रत्येकाने केले पाहिजेत. असे आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणारे, २२ संकल्प कोणते असू शकतात? 

कोरोनाचा काळ आपल्या सर्वांची कसोटी पाहणारा ठरतो आहे. अशी संकटे भविष्यातही येवू शकतात, याची भीती त्याने निर्माण केली. आता या कसोटीत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यातच खरे शहाणपण आहे. आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष न करणार नाही, हा त्यातील एक प्रमुख पैलू आहे. अर्थात, आर्थिक नियोजन काही एका दिवसात किंवा एका वर्षातही होत नाही. जसे शरीर किंवा आरोग्य एका दिवसात कमावले जात नाही, तसेच आर्थिक नियोजनाचे आहे. ते जाणीवपूर्वक तर करावे लागतेच, पण त्यात सातत्यही हवे. पण त्याची सुरवात कधी आणि कशा पद्धतीने करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. नव्या वर्षाची म्हणजे २०२२ ची सुरवात हा अशांसाठी चांगला मुहूर्त ठरावा. अशा सर्वांसाठी २०२२ च्या सुरवातीनिमित्त असे २२ आर्थिक संकल्प येथे एकत्र केले आहेत. 

आर्थिक समृद्धीचे २०२२ च्या शुभारंभाचे २२ संकल्प (New year Resolutions)!

 1. जितक्या लवकर गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन केले जाईल, तितका त्याचा लाभ अधिक होतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ते आयुष्याच्या शेवटच्या काळात करण्याची बाब आहे, या गैरसमजापासून दूर राहीन. कमाईला लागले की म्हणजे तरुणपणातच या दोन्ही गोष्टी सुरु करीन.
 2. कुटुंबाचा आरोग्य विमा काढणे, ही सर्वात पहिली गुंतवणूक असली पाहिजे. तो लवकरात लवकर काढून घेईन. आजारी न पडल्यास अशा विम्यापासून काही मिळत नाही, असा विचार करणार नाही. आजारी पडल्यास मोठ्या खर्चाची भरपाई होते, यासाठी हा विमा काढीन. 
 3. पॅन, आधार, डेबिट कार्ड आणि लायसनच्या कॉपी काढून त्या महत्वाच्या कागदपत्रांत ठेवून देईन. आपल्याला सेल्फमेल केली तर ही कागदपत्रे कधीही उपलब्ध होऊ शकतात. डीजीलॉकर या पचा वापर केला तर ही कागदपत्रे सोबत ठेवण्याची आता गरज राहिलेली नाही. या कागदपत्रांची डिजिटल कॉपी अधिकृत आहे, असे सरकारने जाहीर केले आहे. 
 4. सर्व बँका, सर्व गुंतवणुकीशी पॅन कार्ड – आधार कार्ड लिंक केलेले नसेल, तर ते करून टाकीन. म्हणजे गुंतवणूक करताना तसेच काढून घेताना किंवा कोणतीही कार्यालयीन कामे करताना अडचण येणार नाही. लवकरच येणाऱ्या एलआयसीच्या आयपीओत भाग घेण्याची संधी, स्वतंत्र कोठा देऊन, विमा पॉलिसी धारकांना मिळणार आहे. पण त्यासाठी एलआयसीकडे पॅन कार्डची नोंद असणे आवश्यक आहे. ती लवकरात लवकर करून घेईन.      10 New Year Financial Resolutions For 2022
 5. म्युच्युअल फंड, आयपीओ आणि शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असल्यास त्यासाठी बंधनकारक असलेले डीमॅट खाते काढून स्वत:च्या नावानेच गुंतवणूक करीन. आणि त्याचे परिणाम आधी समजून घेईन. ही सर्व गुंतवणूक सुरवातीस आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक कळणाऱ्या मित्रामार्फत करीन. जी रक्कम नजीकच्या भविष्यात लागणार आहे, ती शेअर बाजारासारख्या जोखिमीच्या गुंतवणुकीत अडविणार नाही. 
 6. क्रेडीट कार्ड शक्यतो वापरणार नाही आणि वापरले तरी एकच वापरेन. त्याचे हप्ते कधीच थकवू देणार नाही. कारण त्याच्या व्याजाचे दर अजिबात परवडणारे नाहीत.  
 7. मोबाईल बील, वीज बील, गॅसचे बील, महापालिका कर, विमा हे डिजिटल पद्धतीने भरायला सुरवात करेन. रेल्वे आणि बसचे तिकीट ऑनलाईन काढीन, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो. शिवाय त्याचे वेगळे रेकोर्ड ठेवण्याची गरज राहात नाही. मात्र या व्यवहारात जे पासवर्ड वापरले जातात, ते विशिष्ट काळाने बदलत राहीन आणि ते बदल एका छोट्या डायरीत लिहून ठेवेन. ती डायरी कधीच घराबाहेर नेणार नाही. बँक किंवा क्रेडीट कार्ड कंपनीकडून फोन करतो, असे सांगून युजर आयडी, पासवर्ड, जन्मगाव आणि जन्म तारीख विचारणाऱ्या फोनवर काहीही माहिती देणार नाही. 
 8. डिजिटल व्यवहारासाठी ऑनलाईन बँकिंगसारखा एक पर्याय आणि एकच अॅप वापरीन. डिजिटलचे सर्व पर्याय वापरण्याचा मोह बाजूला ठेवीन. कॅशबॅकसारख्या मार्केटिंगच्या फेऱ्यात अडकून अनेक प वापरणार नाही. 
 9. गरज नसलेल्या वस्तू किंवा सेवा केवळ डिजिटली आकर्षक दिसतात म्हणून खरेदी करणार नाही. विशेषतः मोठी खरेदी करताना तिची आपल्याला खरोखरच गरज आहे का, ती आपण नियमित वापरणार आहोत का, याचा दहा वेळा विचार करीन. 
 10. कमी काळात अधिक लाभ होतो म्हणून ज्या अनेक योजना सांगितल्या जातात किंवा त्यात पैसे टाकण्याचा सल्ला दिला जातो, त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. रिझर्व बँक, इर्डा आणि सेबीचे तसेच अशा सरकारी व्यवस्थेचे नियंत्रण नसलेल्या गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांपासून दूर राहीन. सध्या चर्चेत असलेल्या बीटकॉईनविषयी सरकारचे धोरण स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यात गुंतवणुकीचे धाडस करणार नाही. Things to know before switching your health insurance policy
 11. आपण व्यवहार करत असलेल्या बँका, गुंतवणूक, जीवनविमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घर आणि इतर मालमत्तेचे कागदपत्र एकत्र ठेवून त्याच्या नोंदी एका डायरीत करून ठेवीन. त्यांची छायाचित्रे काढून किंवा स्कॅन करून ते पेन ड्राईव्ह, सेल्फमेल किंवा गुगुल ड्राईव्हवर ठेवीन. बँक खात्यांची संख्या वाढली असल्यास ती कमी करीन.
 12. काळानुसार निर्माण झालेल्या गुंतवणुकीच्या अनेक उत्कृष्ठ पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीच्या नव्या आणि कायदेशीर साधनांमध्ये गुंतवणुकीला प्रारंभ करीन.
 13. पारंपरिक गुंतवणुकीतील उदाहरण म्हणजे सोन्यामध्ये होत असणारी मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक. गरजेपुरते दागदागिने घेणे हे योग्य. परंतु कमावलेले पैसे सातत्याने याच प्रकारात गुंतवणे टाळेन. सोन्यातच गुंतवणूक करावयाची असल्यास ती डीजीटल मार्गाने घेऊन त्यातील जोखीम कमी करीन. जेव्हा प्रत्यक्ष सोने घेण्याची वेळ येईल, तेव्हा ते हॉलमार्क असलेलेच घेईन. 
 14. पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त प्रॉपर्टीज (घर, फ्लॅट, शेतजमीन, दुकानासाठी गाळा, ऑफिससाठी जागा) करून ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो. पण या प्रकारची गुंतवणूक मोडण्याची वेळ आली तर ती वेळखाऊ असते, याचे भान ठेवीन.
 15. जीवन विमा निवडताना बहुतांशी वेळा तो किती परतावा देणार आहे, याचा विचार करूनच विमा खरेदी केला जातो. प्रामुख्याने आपले वय लक्षात घेऊन आपल्यावर असणाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या व भविष्यातील उत्पन्नाची सांगड घालत संरक्षण म्हणूनच शुद्ध विमा म्हणजे टर्म विमा खरेदी करण्यास प्राधान्य देईन. गुंतवणूक म्हणून विमा खरेदी करणार नाही.
 16. उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के भाग मासिक हप्त्यापोटी (ईएमआय) अनेकवेळा दिला जातो. त्यामुळे मासिक हप्ते पगाराचा मोठा भाग खाऊन टाकत असतात. एक स्वतःचे घर सोडले तर अन्य कुठल्याही गोष्टी शक्यतो कर्ज काढून खरेदी करणार नाही. 
 17. पैशाचे योग्य नियोजन व खर्चाचे बजेट ठरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्न बचत (गुंतवणूक) = खर्च हे सूत्र अंगीकारणार. 
 18. अलीकडच्या काळात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा आणि निवृती वेतन याला अतिशय महत्व आले आहे. असे असले तरी माझ्या उत्पन्नाला आणि मानसिकतेला अधिक जोखीम असलेले पर्याय झेपत नसतील तर त्या मार्गाने जाणार नाही. मात्र निवृत्ती वेतनाच्या एनपीएससारख्या पर्यायाचा जरूर विचार करीन. 
 19. अचानक येणाऱ्या खर्चांसाठीचे नियोजन न करणे घातक ठरू शकते. यासाठी किमान काही रकमेची म्हणजे तीन ते चार महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम कायम हाताशी ठेवीन. 
 20. गुंतवणूक करत असताना गुंतवणूक तज्ञांचे मत व त्यांची मदत न घेता आपल्या मित्र परिवाराकडून अथवा नातेवाईकांकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केली जाते. सातत्याने होणाऱ्या आर्थिक नियमातील बदलांमुळे व नवनवीन पर्यायांची उपलब्धता, यामुळे माहिती न घेता गुंतवणूक करणे टाळेल.
 21. आपण केलेल्या गुंतवणुकीची माहिती घरातील आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला असलीच पाहिजे. ती असावी, यासाठी गुंतवणुकीविषयी त्या व्यक्तीशी अधूनमधून या विषयावर बोलत राहीन. वय अधिक असल्यास मृत्यूपत्र तयार करणे आणि सर्व गुंतवणुकीला वारसदारांची नावे लावलेली आहेत ना, याची खात्री करून घेईन
 22. आधुनिक काळात तंत्रज्ञानाची जाण आणि अर्थभान याला अतिशय महत्व आले आहे. या दोन्ही विषयांची मुबलक माहिती इंटरनेटवर तर उपलब्ध आहेच, पण या विषयावरील चांगल्या पुस्तकांचे वाचन करणेही गरजेचे आहे. अशी पुस्तके वाचण्यास सुरवात करीन. 

 हे नक्की वाचा: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !…

तात्पर्य, पैसे, गुंतवणूक, देशाचे अर्थशास्त्र आणि त्याच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता वाढत चालल्याने आपल्याला त्यातले काही कळत नाही, असे म्हणण्यात काही शहाणपणा राहिलेला नाही. पैशांचाच विचार करणे, हा जसा वेडेपणा आहे, तेवढाच वेडेपणा हा त्याचा अजिबात विचार न करणेही आहे. कारण त्यावरच आज सर्व काही अवलंबून आहे. खिशात पैसे नसले तर घराबाहेरही पडता येत नाही, इतके आपल्या आयुष्याचे पैशीकरण झाले आहे. खरे म्हणजे ते तसे व्हायला नको होते, पण ते झाले आहे, तर त्याचा सामना करण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. 

यमाजी मालकर 

ymalkar@gmail.com

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…