Reading Time: 3 minutes

“जी माणसं आपल्याला समजत नाही किंवा ज्यांना आपण समजून घेऊ शकत नाही, ती माणसं आपल्याला आवडत नाहीत आणि त्यांच्याबद्दल एक असुरक्षिततेची भावना आपल्या मनात निर्माण होते.” अब्राहम लिंकन यांचा हा विचार प्रत्येक मानवाच्या मूळ स्वभावाची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.  हाच विचार आर्थिक विषयांशी जोडल्यास ४ घटक महत्वाचे असतात.

१. तुम्ही स्वतः

२. तुम्हाला गरजेचं असणारं वित्तीय साधन

३. गुंतवणूकीची नफा क्षमता

४. तुमच्यासाठी काम करणारा मध्यस्थ.

१. भूमिकेतला ‘मी’ अर्थात तुम्ही स्वतः– 

  • आर्थिक निर्णय घेतांना तुमची इयत्ता काय? हे सर्वात अगोदर बघितले पाहिजे. आर्थिक निर्णय म्हणजे फक्त गुंतवणूक हा समज सर्वात अगोदर दूर करा. 
  • खर्च करणे हा सुद्धा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता माहित असलीच पाहिजे. ते न बघता जाहिरातींच्या प्रभावामुळे सामान्य माणसाचं चित्त विचलीत होते आणि गरज नसलेले आर्थिक निर्णय घेतले जातात. 
  • व.पु. नेहमी म्हणायचे खर्च केल्याचं दुःख नसतं परंतु हिशोब लागला नाही तर मग मनाची घालमेल होते.

२. वित्तीय साधनं – मला काय हवंय?

  • कमवित्या व्यक्तीला त्याच्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्यांची त्याच्या पश्चात पूर्तता होण्यासाठी सुरक्षितता गरजेची असते. म्हणजेच त्याला मुदतीच्या शुद्ध विम्याची (Term Insurance) गरज असते. 
  • परंतु त्याच्याकडे ठराविक अंतराने पैसे परत देणाऱ्या विमा योजना भरमसाठ असतात. एखादया माणसाकडे स्थावर मालमत्ता खूप प्रमाणात आहे. त्याला तरलतेची (Liquidity) गरज पडू शकते. परंतु त्याच्याकडे मुदत ठेवी किंवा मुदत बंद योजनांमधे अधिक गुंतवणूक असते.

३. नफा क्षमता – 

  • वित्तीय साधन निवडताना खरंतर अडचणीला उभा राहणारा सक्षम पर्याय म्हणून बघितले पाहिजे. त्याऐवजी नफा क्षमता बघितली जाते. 
  • उदा. आरोग्य विम्याचा हफ्ता सर्वात नावडता खर्च असतो. परंतु गंभीर आजारपण आल्यास तुम्ही भरलेले गत १० वर्षांचे हफ्ते एकदाच तुमच्या बचतीला जीवदान देऊ शकतात.

४. हम आपके है कौन?

  • ऑनलाईनचा जमाना असला तरी कुणीतरी समोरच्या बाजूला नक्कीच असतो, हे तुम्हाला पण मान्य असेल. त्याची निवड करतांना सामान्यपणे मानसिकता कशी असते? मध्यस्थाला दलाली किती मिळत असेल? मला सगळ्या आवश्यक बाबींची माहिती ऑनलाईन किंवा वर्तमानपत्रात मिळत असतांना मी सल्लागार का नेमावा? 
  • प्रत्येक ऋतूत आलेल्या तापाची लक्षणं वेग-वेगळी असू शकतात. अन्यथा डॉक्टरांना एकदाच फी देऊन आयुष्यभर त्याच औषधांच्या चिठ्ठीवर भागलं असतं.
  • ग्रीट हॉफस्टेड यांनी विविध देशांच्या आर्थिक-सामाजिक संस्कृतींचा अभ्यास करून एक अभ्यासाची पद्धती तयार केली आहे. त्यातून मानवाचा वर्तणूक निर्देशांक ठरविता येतो. त्यात त्यांनी खूप सारे मुद्दे घेतले होते. उदाहरणादाखल आपण २-३ मुद्द्यांची माहिती घेऊ. 
    • अनिश्चितता:– 
      • अनिश्चितता टाळण्यासाठी अटी, नियम, कायदे याद्वारे साधनांवर किंवा पद्धतींवर नियंत्रण ठेवून अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी प्रयत्न केला जातो. 
      • खूप निर्बंध वापरून नियोजन करणे म्हणजे फायदा तर जोखीमयुक्त सर्जनशीलतेवर येणारी बंधने म्हणजे तोटा, असे विश्लेषण ग्रीट हॉफस्टेड यांनी अनिश्चितते बाबत केले होते.
      • अनिश्चितता टाळण्याबाबत रशिया अग्रस्थानी तर त्याखालोखाल जपान, अमेरिका, भारत व शेवटी चीन या देशांचा क्रमांक येतो. भारतीय बचतकर्ता नेहमीच सावधपणे निर्णय घेत असतो.
      •  पण गुंतवणूक करतांना केलेली नक्कल त्याची अनिश्चितता वाढवत असते. उदा. डोंबिवलीस्थित एका कंपनीने ५७ हजार ५०० रुपये गुंतविल्यास त्या बदल्यात ५,२१,००० रुपयांचा परतावा व २३ साडया मिळतील असे आमिष दाखविले होते. संगमनेर तालुक्यातील घारगांव या एका गावातून ७६० लोकांनी मिळून ४ कोटी ३७ लाख रुपये या कंपनीच्या योजनेत गुंतविले होते. आता कंपनीने पोबारा केलाय.
    • दीर्घकालीन विरुद्ध अल्पकालीन वृत्ती:– 
      • लोकांची वृत्ती भविष्याचा वेध घेणारी म्हणजे दीर्घकालीन आहे किंवा नजीकच्या काळातील गरजा पूर्ण करण्याची म्हणजे अल्पकालीन आहे की भूतकाळावर जास्त केंद्रित झाली आहे. 
      • याबाबतीत अमेरिकेतील लोक बचतीला कमी प्राधान्य देतात म्हणजेच त्यांच्यात अल्पकालीन वृत्ती जास्त प्रमाणात आहे. तर जपानमधील लोक बचतीच्या बाबतीत जगात अग्रेसर आहेत म्हणजेच दीर्घकालीन वृत्ती जास्त प्रमाणात आहे. त्याखालोखाल चीन, रशिया आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो.
    • योगी विरुद्ध भोगी:– 
      • नुकत्याच साजरा केलेल्या जागतिक योग दिनामुळे योगी हा शब्द आठवणीत असेल. योग म्हणजे संयमित वृत्ती तर भोग म्हणजे आनंद घेण्याची वृत्ती. अर्थातच भोगी वृत्तीत अमेरिका सर्वोच्च स्थानी तर योगी वृत्तीत रशिया, चीन, भारत आणि शेवटी जपान या देशांचा क्रमांक लागतो.
      • अनेकदा नोकरी किंवा व्यवसाय सुरक्षित असला पाहिजे, असं ध्येय ठेवून लोकं काम करत असतात. या दोन्ही गोष्टी तुम्ही सुरळीत करू शकता सुरक्षित नाही. नोकरी किंवा व्यवसायात मिळालेला अनुभव तुमच्या उत्पन्नाचा आलेख उंचावत नेईल. त्याकरिता आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य असले पाहिजे. कारण ती गोष्ट सुरळीत आणि सुरक्षित करणे तुमच्या हातात आहे.

मागील लेख वाचून सुजाण वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. वर नमूद केलेल्या ४ मुद्द्यांच्या यादीतील पहिले २ वगळून उर्वरित २ घटक जास्त परिणामकारक असतात, असा वित्तीय साधन खरेदी करणाऱ्याचा समज असतो. 

गुतंवणूक करणे आणि वित्तीय साधन खरेदी करणे यातला फरक ज्या दिवशी सामान्य ग्राहकाला समजायला सोपे होईल, त्यादिवशी श्रीमंतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तोपर्यंत गतिरोधाकावरून गाडी उडवायची कि वेग कमी करून गतिरोधक पार करायचा? हे तुम्हालाच ठरवायचं आहे.

– अतुल प्रकाश कोतकर

9423187598

(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी [email protected] वर संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकतात.)

आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब,

नोकरी करू की व्यवसाय?,

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?,

श्रीमंतीची ‘वही’वाट

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.