तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes

प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.

आर्थिक संकटाच्या काळात/अडचणीत तुम्ही त्यांच्यासोबत नसाल, तेव्हा ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय विचार करून ठेवला आहे? तुम्ही तुमच्या परिवाराला आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार केले आहे काय? तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी आहे काय? नसेल तर, तुम्ही नसताना देखील तुमचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या मजबूत असेल, ही देखील तुमची जबाबदारी आहे.

तुम्हालाही तुमच्या परिवाराला स्वावलंबी बनवायचे आहे? पण त्यासाठी काय करावे हे माहित नाही? मग हे वाचा. काही सध्या सोप्या गोष्टी आहेत ज्याचा अवलंब करून तुमच्या प्रियजनांना तुम्ही आर्थिक संकटासाठी तयार करता.

१. आर्थिक ज्ञान द्या-

 • केवळ तुम्हीच आर्थिक घडामोडींना परिचित असणे पुरेसे नाही. तुमच्या बरोबरच तुमच्या परिवारातील वेगवेगळ्या घटकांनाची माहिती त्यांचे वय आणि क्षेत्रानुसार देणे गरजेचे आहे.
 • घरातील लहान मुलांना पासबुक, एटीएम, क्रेडीट कार्ड, आयकर अश्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सोप्या भाषेत सांगत राहिले पाहिजे.
 • थोडी मोठी मुले काही आर्थिक व्यवहार करू शकतात, जसे की पासबुक अपडेट करणे, चेक जमा करणे,इ. यामुळे त्यांना जबाबदारी घेण्याची सवय लागते आणि या व्यवहारांविषयीची भीती कमी होते.
 • तसेच घरातील प्रौढ आणि वृद्धांना नवीन संकल्पना, नव्या आर्थिक योजना, पेन्शन स्कीम्स, कर्ज योजना, तुमच्या उद्योगातील चढव- उतार आणि त्यावर तुम्ही करत असलेल्या उपाय योजना या साऱ्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतून त्यांना काही प्रश्न पडतील आणि जे सोडवण्याच्या निमित्ताने तुमचे कुटुंब आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करेल.

२. जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक संकटांची माहिती द्या आणि प्रश्न हाताळू द्या

 • घरातील व्यक्तींना तुमच्या उद्योगातील चढ-उतार आणि तुमच्या समोर असणाऱ्या आर्थिक प्रश्नांची महिती देणे गरजेचे आहे. त्यांना या सगळ्यापासून दूर ठेऊ नये. तुमचे आर्थिक प्रश्न तुमच्या कुटुंबाचेही आहेत ही जाणीव त्यांना झाली पाहिजे. यातूनच त्यांना बचतीची समज येईल.
 • इतकेच नाही तर काही वेळा छोटे छोटे प्रश्न त्यांना समोर बसवून बोलू शकता. कदाचित त्यांच्याकडून काही सर्जनशील उत्तरे येतील ज्याची तुम्हाला मदत तर होईलच पण अशा घटना त्यांना पुढील आयुष्यासाठी तयार करतील.
 • अशा आर्थिक चर्चा घरातील लोकांसोबत होणे गरजेचे आहे. लहान मुलांना मिळणारे खाऊचे पैसे कसे खर्च करायचे, हे त्यांचं त्यांना ठरवू द्या. त्यातून त्यांना आर्थिक नियोजन शिकवू शकता.
 • ज्याप्रकारे एखादे यंत्र तुमच्या हातात आल्याशिवाय ते वापरायचे कसे हे कळत नाही त्याप्रमाणे आर्थिक नियोजांची सूत्र व्यक्तीच्या हातात आल्या शिवाय त्यांना सांभाळण्याची समज व्यक्तीत येत नाही. त्यामुळे घरातील प्रत्येकाला त्यांच्या कुवतीप्रमाणे काही आर्थिक प्रश्न हाताळायला देणे गरजेचे आहे. तरच पुढील आयुष्यात त्यांना स्वबळावर आर्थिक संकटांना समर्थपणे तोंड देणे शक्य होईल.

३. नियमित बचत-

 • प्रत्येक परिवाराला काही अचानक येणाऱ्या खर्चांना तोंड द्यावे लागते. त्यासाठीची तयारी एका रात्रीत होणे अशक्य आहे. त्यासाठी तुम्हाला नियमित आणि काही वर्षांची बचत खर्ची करावी लागते. म्हणून प्रत्येक परिवाराच्या सुरक्षेसाठी कुटुंबातील कोणीतरी एक ठराविक मोठी रक्कम नियमित राखून ठेवायला हवी.
 • यासाठी बँकेचे किंवा पोस्टाचे बचत खाते हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक महिन्याला पगाराच्या १५% रक्कम तुमच्या बचत खात्यात जायला हवी, असा आदर्श सल्ला अनेकदा दिला जातो. पण हा काही सक्तीचा नियम नाही. प्रत्येकाने त्याच्या सोईनुसार पण नियमित बचत करणे गरजेचे आहे.
 • तुमचे भविष्यात काही स्वप्न असतील, तर त्यांना पूर्ण करण्यासाठी ही बचत कामाला येते. तुमच्या परिवाराला एक स्थिर आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी बचत महत्वाची आहे.       

४. विमा खरेदी करा-

 • तुमच्या परिवाराभोवती एक सुरक्षा कवच बनवण्याचा विचार करत असाल, तर आजच त्यांचा आरोग्य विमा काढून घ्या. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचा अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचा आरोग्य विमा काढून घेणे ही एक उत्तम गोष्ट आहे. शक्य असल्यास जीवन विमा ही काढायला काही हरकत नाही.
 • विमा काढतो म्हणजे आपल्या प्रेमाच्या माणसांविषयी त्यांचा अपघात होईल असा नकारात्मक विचार आपण करत नाही. तुम्ही जिथे काम करता ती कंपनी किंवा संस्था ही तुमचा विमा काढून देते, याचा अर्थ हा नाही की तुमची कंपनी, तुमच्या विषयी वाईट चिंतते. उलट तुमच्या कंपनीला तुमच्या जीवाची, तब्येतीची काळजी असते म्हणून सर्व कर्मचाऱ्यांचा विमा खर्च कंपनी करते. त्याचप्रमाणे, आपल्याला आपल्या परिवाराची चिन्त असणे स्वभावी आहे आणि त्यासाठी आपण त्यांचा विमा काढणे हे त्या प्रेमाचेच लक्षण आहे.

श्रीमंतीची ‘वही’वाट,

घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स,

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १,

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.