पूर्वी गाजलेल्या नया दौर चित्रपटात दोन गावे जोडण्यासाठी जेव्हा नव्याने बस येते, तेव्हा त्या मार्गावर व्यवसाय करणारे टांगेवाले अस्वस्थ होतात आणि बसचा व्यवसाय गावात चालू नये, असा प्रयत्न करतात. पण कायद्याने तसे करता येत नाही, म्हणून बस आणि टांग्यांची शर्यत लावली जाते.
‘धनवानके आगे सर उंचा कर दो’, अशी प्रार्थना दिलीपकुमार शंकराच्या मंदिरात करतो. शर्यत लागते आणि जवळचा मार्ग पकडून टांगा जिंकतो. याचा अर्थ फक्त नया दौर सिनेमात टांगा जिंकतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात टांगा हरतो. कारण साठीच्या याच दशकात गावे बसने जोडली जाऊ लागली आणि शहरातील वाहतूकही स्वयंचलित रिक्षाने होऊ लागली. एक एक करत टांगे मागे पडले आणि सर्वत्र स्वयंचलित गाड्या दिसू लागल्या. हा बदल समाजाने स्वीकारला.
आता मागे वळून पाहिले की प्रवासी बसमध्येच बसणार, टांग्यात कसे बसतील, असे आपण सहजपणे म्हणतो. पण ज्या टांग्यावाल्यांचा रोजगार बुडाला, त्यांच्यासाठी हा स्वीकार अवघडच होता. असे किती बदल आपल्या समाजाने स्वीकारले, हा गेल्या साठ वर्षांचा इतिहास आपण जाणतो. जग बदलत गेले आणि त्यानुसार भारतीय समाजही बदलत गेला.
- अर्थात, त्या बदलांत आणि आज होत असलेल्या बदलांत एक मोठा फरक आहे. तो असा की त्या बदलांत तो बदल व्यवहारात येण्यासाठी मोठ्या शहरात एखादे दशक सहजपणे निघून जात असे. आणि छोट्या गावांत हे बदल १५ ते २० वर्षे रेंगाळत असत.
- त्यामुळे जुन्या पद्धतीचे जीवन जगणाऱ्यांना बदल पचविण्यास मुभा मिळत असे. आताचे बदल तसे नाहीत. ते एखाद्या वादळासारखे येतात आणि कमीत कमी काळात आजूबाजूची परिस्थिती बदलून टाकतात आणि माणसांना बदलण्यास भाग पाडतात. हे बदल योग्य की अयोग्य, याचा निर्णय लगेच होऊ शकत नाही. होणारे बदल हे सामाजिक आणि राजकीय नेत्यांच्या नावावर जमा होत असले तरी जगातील आतापर्यंतचे बदल विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने घडवून आणले आहेत, हे विसरता कामा नये.
- समाजाचे नेतृत्व करणारी मंडळी या बदलावर स्वार होतात, एवढेच. त्यामुळे सध्या होत असलेल्या बदलांकडे त्याच दृष्टीने पहावे लागेल. तात्पर्य, ते अपरिहार्य आहेत. अधिक खोलात जाऊन विचार केल्यास असे लक्षात येते की या बदलांत आणखी तीन गोष्टींची भर पडली आहे.
- पहिली गोष्ट, वर्तमानातील बदलांच्या मागे जागतिक कंपन्यांचे प्रचंड भांडवल आहे. त्याच्या आधारे वेळप्रसंगी तोटा सहन करून या कंपन्या वेगाने ग्राहक मिळवत आहेत.
- दुसरी गोष्ट म्हणजे जीवनाचा वाढलेला वेग आहे. तो बदल चांगला की वाईट, याचा विचार करण्यासही आता कोणालाच वेळ नाही. त्यामुळे ते बदल स्वीकारण्याची समाजात चढाओढ लागली आहे. यातून समाधान हरवल्यामुळे जे मिळते आहे, ते कोणालाच पुरेसे वाटत नाही.
- तिसरी गोष्ट म्हणजे होणारे हे बदल संघटीत पद्धतीने होत आहेत. बदल स्वीकारणारे संघटीतपणे जीवन जगण्याच्या शर्यतीत पुढे जाताना दिसतात. त्यामुळे मागे राहिलेले असंघटीत तो बदल पकडण्याचा प्रयत्न करत राहतात. या सर्व बदलाला त्या त्या वेळी आपापल्या आकलनानुसार वेगवेगळी नावे दिली जातात, पण बदल थांबत नाहीत.
- जीवनाचा प्रचंड वाढलेला वेग, कागदी नोटांच्या चलनाच्या आधारे मोजक्या लोकांकडे जमा झालेले राक्षसी भांडवल आणि तंत्रज्ञानावर आधारित जागतिकीकरणाच्या रेट्याने संघटीत होणारे उद्योग व्यवसाय ज्या प्रकारचा बदल आज जगात घडवून आणत आहेत, त्याचेच दुसरे नाव मंदी आहे.
- जीवनाचा वेग वाढल्याने भौतिक सुखांच्या न संपणाऱ्या स्पर्धेत आपण सर्वच उतरलो आहोत. कारण आपण मागे राहतो की काय, अशी प्रत्येकाला भीती वाटते आहे. त्यामुळे शक्य असेल तेवढे या स्पर्धेत पळत राहणे, अपरिहार्य झाले आहे.
- नव्या जगात सर्वात मौल्यवान ठरत असलेले चलनी भांडवल तंत्रज्ञानाच्या मार्गाने काही मोजक्या अतिश्रीमंतांच्या ताब्यात गेले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात या भांडवलाला आता देशाच्या सीमा रोखू शकत नाहीत. असे हे भांडवल सतत गुंतवणुकीच्या शोधात जगभर फिरत असते.
- जेथे ग्राहक आहेत, तेथे त्याला जायचे आहे. ही सर्व प्रक्रिया कमीतकमी काळात झाली पाहिजे, यासाठी ते संघटीत उद्योग व्यावसायिकांच्या शोधात असते. त्यामुळे पूर्वी जे उत्पादन किंवा सेवा मोठे उद्योग करत नव्हते, ते सर्व उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न मोठे उद्योग करू लागले आहे. या उद्योग आणि सेवांचा विस्तार इतका प्रचंड आहे की, सर्वसामान्य माणूसही त्याचा उपभोग केव्हा सुरु करतो, हे त्यालाही लक्षात येत नाही.
- पैसा पैशांकडे जातो, असे म्हणतात, या न्यायाने पैसा संघटीत क्षेत्राकडे वेगाने चालला आहे. उद्योग व्यवसायात असंघटीत क्षेत्राचा वाटा अजूनही मोठा असलेल्या भारतात, हा बदल आता फार वेगाने होतो आहे. त्यामुळे जे संघटीत आहेत, त्यांचे चांगले चालले आहे आणि जे असंघटित आहेत, त्यांना हा बदल त्रासदायक ठरतो आहे. त्याला जगाने मंदी असे नाव दिले, म्हणून आम्हीही त्याला मंदी म्हणत आहोत. असेच तर होत नाही ना?
- याचे एक ताजे उदाहरण पाहू. सध्या बाजारात मंदीची चर्चा आहे. पण माणसाला लागणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांची विक्री करणाऱ्या जगातील सर्वात मोठी कंपनी – अमेझॉनचा व्यवसाय जोरात चालला आहे. या अमेरिकन कंपनीने २१ ऑगस्टला हैद्राबादला जगातील एका प्रचंड इमारतीत आपला कारभार हलविला. अमेझॉनची ही अमेरिकेबाहेरील पहिलीच मालकीची इमारत आहे.
- सध्याची मंदी ही तात्पुरती असून आपण तिच्याकडे लक्ष न देता दीर्घकालीन संधीवर आम्ही लक्ष देतो, असे त्यावेळी अमेझॉन इंडियाचे व्यवस्थापक अमित अग्रवाल यांनी सांगितले. भारतात होणाऱ्या विक्रीविषयी तर ते आशावादी आहेतच, पण भारतातून अमेझॉनतर्फे होणाऱ्या निर्यातीविषयीही ते आशावादी आहेत! ही कंपनी ५० हजार भारतीय उत्पादकांचा माल जगात विकते. सध्या सुमारे सात हजार कोटी रुपयांची विक्री वर्षाला जगात करते. ती आगामी तीन वर्षात तिला ३५ हजार कोटी रुपयांवर न्यायची आहे!
- अमेझॉनमध्ये ६२ हजार भारतीय सध्या काम करतात आणि त्यातील १५ हजार कर्मचारी या नव्या इमारतीत काम करणार आहेत. साडे नऊ एकरावरील या इमारतीत कंपनीने ३० लाख चौरस फूट जागा तयार केली आहे.
- अमेझॉनने २००४ दरम्यान भारतात प्रवेश केला, तिच्या दीड दशकातील वाढीच्या वेगाची कल्पना या आकडेवारीवरून येऊ शकते. रिटेल विक्रीचा केवळ तीन टक्के वाटा सध्या आमच्यासारख्या ईकॉमर्स कंपन्यांना मिळाला आहे, असे अग्रवाल म्हणतात, यावरून अमेझॉनच्या पुढील वाढीचा वेग आणि आवाका लक्षात यावा.
- याचा साधासरळ अर्थ असा आहे की ईकॉमर्सच्या माध्यमातून विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार असून रस्त्यारस्त्यावरील दुकानांतील विक्रीवर त्याचा परिणाम होणार आहे. अमेझॉनवर अनेक सवलती दिल्या जातात, चांगल्या आणि स्वस्त वस्तू मिळतात, याची चर्चा तर भारतातील घराघरात होते आहे. याचा अर्थ भारतीय ग्राहकांनी हा बदल स्वीकारला आहे. जे संघटीत नाहीत, त्या विक्रेत्यांना या बदलाचा त्रास होतो आहे, हे उघड आहे.
- अमेझॉन झाली परकीय कंपनी. पण आता सेवा क्षेत्राचे एक उदाहरण घेऊ. रितेश अग्रवाल या भारतीय युवकाने ओयो ही कंपनी स्थापन केली. त्याला जपानच्या सॉफट बँकेने भांडवल पुरविले. हॉटेलांच्या खोल्यांचे ऑनलाईन बुकिंग करण्याचे काम ही कंपनी करते. सेवा क्षेत्रात या बँकेने एक लाख कोटी रुपयांचे भांडवल पुरविले आणि त्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा नफा पदरात पाडून घेतला, असे या कंपनीने म्हटले आहे! म्हणजे ३० टक्के नफा! सेवा क्षेत्र संघटीत केल्याने हे त्यांना शक्य झाले. आता ही भारतीय कंपनी चीनमध्येही सेवा पुरविते आहे आणि जगात इतरही ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाली आहे.
- ओला ही भारतीय कंपनी, हे तसेच आणखी एक उदाहरण आहे. ओला, उबरमध्ये आज १५ लाख भारतीय तरुण काम करत आहेत. अमेझॉन, ओला, उबर, झोमोटो, स्वीगी, बिग बास्केट अशा कंपन्या हे करू शकतात, कारण त्यांच्याकडे भांडवल आहे आणि त्याच्या माध्यमातून उत्पादने आणि सेवा संघटीत करण्याचे कौशल्य त्यांनी मिळविले आहे.
- याचा अर्थ असा की १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात वस्तू आणि सेवांची विक्री होतेच आहे, फरक असा झाला आहे की ही विक्री संघटीत क्षेत्रातील कंपन्यानी ताब्यात घेतली आहे. जागतिकीकरण मान्य केलेला भारत हे आता रोखू शकत नाही.
- आधुनिक आणि प्रगत जगाने आपल्याकडील भांडवल फिरते ठेवून त्याला कामाला लावले. त्यातून ते नफा मिळवत आहेत. त्याचा भारतीय म्हणून आपल्याला त्रास होतो आहे, पण तो आता अपरिहार्य आहे. कारण भारतीयांनी भांडवल एकतर सोन्यात गुंतविले आहे किंवा ते वेगवेगळ्या मार्गाने बँकेबाहेर पडले आहे.
- देशात भांडवल फिरत नसल्याने त्यातून पुढे एक दुष्टचक्र तयार होते. त्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत. कोट्यवधी भारतीयांकडे पुरेशी क्रयशक्ती नसणे, हाही त्याचाच परिपाक आहे. ती नसली की मंदीसारखी स्थिती निर्माण होण्यास वेळ लागत नाही. हा बदल समजून घेऊन त्यानुसार बदलाची तयारी भारतीय नागरिकांनी केली तर मंदी पळून जाईल. पण त्यासाठी, यापुढे टांगा जिंकणार नाही, बसच जिंकणार आहे, हे स्वत:ला पटवून घ्यावे लागेल.
- सरकार त्याच्या बाजूने प्रयत्न करून मंदीचे वातावरण कमी करण्याच्या कामाला लागले आहे. त्याला यश येते का, ते पाहायचे. वरवरच्या तात्कालिक उपायांनी आता यश येण्याची शक्यता नाही. त्यासाठी धोरणात्मक बदल करणे अपरिहार्य आहे.
- देशाला सतत भेडसावणाऱ्या अशा समस्यांवर अर्थक्रांतीने मंथन करून काही प्रस्ताव देशासमोर ठेवले आहेत. सरकारने त्या दिशेने जाणे, हेच त्यावरील खरे उत्तर आहे. त्यातील पहिले उत्तर आहे ते, करपद्धतीत अमुलाग्र बदल करून सरकारने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. म्हणजे सरकारने अधिक खर्च करावा, अशी जी गरज आहे, ती पूर्ण करता येईल.
- बँक व्यवहार कर हा एकमेव कर अर्थक्रांतीने त्यासाठी सुचविला आहे. फक्त मंदीच्या वातावरणात ज्या संघटीत समूहांना करपद्धती टोचू लागते, अशा उद्योग व्यावसायिकांनी बँक व्यवहार कराचा आवाज मोठा करण्याची वेळ आली आहे.
- दुसरी गरज आहे ती भारतीयांची ग्राहकशक्ती वाढण्याची. त्यासाठी रोजगार संधी वाढली पाहिजे. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षेत्रात अॉटोमेशन वाढले आहे. उत्पादक त्या माध्यमातून नफा कमावत आहेत आणि रोजगार कमी होत आहेत.
- १३५ कोटी लोकसंख्येत रोजगार वाढविण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे किमान संघटीत आणि सरकारी क्षेत्रात आठऐवजी सहा तासांची शिफ्ट करून किमान दोन शिफ्टमध्ये देश चालविणे. म्हणजे महिन्याला वेतन घेणाऱ्यांची संख्या सुमारे १० कोटींच्या घरात जाईल. ज्यातून खात्रीची क्रयशक्ती तयार होईल.
- अर्थव्यवस्थेचे चाक वेग घेईल. अर्थचक्रही चालले पाहिजे आणि कुटुंबव्यवस्थाही टिकली पाहिजे, असा एक प्रस्ताव अर्थक्रांती मांडते. तो आहे, साठी पूर्ण केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे. असे सुमारे १३ ते १४ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील ज्यांना पेन्शन मिळत नाही, अशा सर्वांना महिन्याला विशिष्ट रक्कम त्यांचा सन्मान म्हणून देण्यास सुरवात करणे.
- याचे सामाजिक चांगले परिणाम तर होतीलच, पण एवढे सगळे खात्रीचे ग्राहक बाजाराला मिळतील. लोकसंख्येमुळेच भारत मागे पडला आहे, हे सिद्ध करण्यात आता शहाणपणा राहिलेला नाही. लोकसंख्येचा बोनस चांगला वापरणे, एवढेच आपल्या हातात आहे. ते या धोरणात्मक बदलांनी शक्य आहे.
भारतीय ग्राहक हवा, म्हणून जागतिक कंपन्या धडपड करत आहेत. भांडवलाच्या जोरावर त्यात त्या यशस्वीही होतील, पण ती धडपड फक्त मध्यमवर्गापुरतीच आहे. तो वर्ग सोडून जो सुमारे ८० टक्के भारतीय उरतील, त्यांनी काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय भारताला पुढे जाता येणार नाही.
त्यामुळे सध्याच्या मंदीचे रुपांतर सरकारने धोरणात्मक बदलाच्या संधीत केले तर आपल्या सर्वांचे भवितव्य उज्ज्वल आहे. नाहीतर मंदीचे दर चार पाच वर्षांचे रडगाणे ठरलेले आहे!
– यमाजी मालकर
पिक विमा योजनांचे महत्व
भारत – पाकिस्तानची करपद्धतीतील ‘भाऊबंदकी’ !
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना?
बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.