प्रमाणित वजावटीचे (Standard Deductions) काही नियम

Reading Time: 3 minutes

व्यावसायिक आणि पगारदारांच्या कररचनेत मुख्य फरक हा आहे की व्यावसायिकांची कर आकारणी सर्व व्यावसायिक खर्चांची वजावट आणि उपलब्ध अन्य वजावटी घेऊन केली जाते, तर नोकरदारांना त्यांचे निव्वळ उत्पन्न मोजून त्यातून उपलब्ध अन्य वजावटी घेऊन त्यावर नियमानुसार कर आकारणी होते.

व्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या अनेक प्रकारच्या खर्चांची सूट मिळते. छोट्या व्यापाऱ्यांना उलाढालीच्या ६ ते ८% हे उत्पन्न धरून, सल्लागार म्हणून व्यवसाय करणारे जसे डॉक्टर, वकील यांना ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असल्यास, कोणत्याही प्रकारे हिशोब नोंदी काटेकोरपणे न ठेवता अर्धी रक्कम ही व्यवसायासाठीचा खर्च म्हणून दाखवता येतो. 

छोट्या वाहतूक व्यावसायिकांना गाडीच्या प्रकारानुसार निश्चित उत्पन्न मिळते असे गृहीत धरून, अनुमानीत उत्पन्नावर कर आकारणी होते. मात्र व्यवसायाचा खर्च यात नमूद केलेल्या मर्यादेहून अधिक असेल तर तो प्रमाणित करून घ्यावा लागतो. 

 • प्रमाणित वजावट ही अशी विशेष सवलत आहे की आपले करपात्र रक्कम ठरवण्यात येण्यापूर्वी या रकमेची वजावट आपणास एकूण उत्पन्नातून घेता येते. 
 • यासाठी कोणत्याही प्रकाराच्या खर्चाचा पुरावा मागितला जात नाही. सन २००४ पर्यंत काही प्रमाणात अशी सवलत पगारदार लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात मिळत होती. 
 • सन २००५-२००६ च्या अर्थसंकल्पात कररचनेत आमूलाग्र  सुधारणा आणि करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेत मोठया प्रमाणावर वाढ केल्याने ही सवलत रद्द करण्यात आली. सन २०१८- २०१९ च्या अर्थसंकल्पात प्रवासखर्च प्रतिपूर्तीसाठी उपलब्ध रु. १९२००/- आणि औषधोपचारावरील खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी म्हणून रु १५०००/- या मिळत असलेली सवलत रद्द करून, सर्व पगारदारांना आयकर अधिनियम १६ (१ए) खाली रु. ४००००/- ची प्रमाणित वजावट देऊ केली आहे. 
 • याचा फायदा असा पगारदारांना वरील खर्चांची प्रतिपूर्ती बिले सादर करावी लागणार नाहीत. परंतू करावरील सरचार्जमध्ये  १% ने वाढ झाल्याने नोकरदारांना अगदी किरकोळ फायदा होईल, तर पगार या सदराखाली ज्यांना ज्यांना उत्पन्न मिळते अशा निवृत्त व्यक्तींना त्याचा अधिक फायदा होईल. 
 • सन २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पात यात रु. १००००/- ची वाढ करून ही सवलत रु. ५००००/- पर्यंत करण्यात आली आहे. 
 • केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT) केलेल्या खुलाशानुसार जे पगारदार आहेत त्यांना वरील मर्यादेत सरसकट वजावट घेता येईल. याशिवाय ज्यांना आपल्या मालकाकडून निवृत्तीवेतन मिळते त्यांनाही याचा लाभ घेता येईल. 
 • आयकर कायद्याप्रमाणे निवृत्ती वेतन देण्याची जबाबदारी मालकाची असल्याने त्याचा सामावेश पगार या संज्ञेत होतो. ज्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून पेन्शन मिळते त्यांचाही सामावेश यात केला जातो त्यांनाही हा लाभमिळेल. कारण या योजनेचे अंशदान हे मालकाकडून केले जाते. असा फायदा मिळू शकणारे बहुतेक लोक हे जेष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या हाती पडणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल.
 • या प्रकारात मोडणारे आणि न मोडणारे वेतन आणि निवृत्तीवेतन खालीलप्रमाणे-
  • भागीदारास दिले जाणारे वेतन:- भागीदारीच्या व्यवसायात भागीदारास त्याच्या कौशल्यावर सुयोग्य वेतन घेण्याचा अधिकार आहे. हे वेतन आयकर कायद्यानुसार ४०(बी) पगार म्हणून समजण्यात न येऊन, त्याची गणना भागीदारीतून मिळालेले उत्पन्न म्हणून अन्य मार्गानी मिळालेले उत्पन्न या सदराखाली होईल.
  • विमा योजना अथवा पेन्शन योजनांतून मिळणारी रक्कम:- अनेक व्यक्तींनी नोकरीत असताना अथवा निवृत्तीनंतर अशा योजनेत गुंतवणूक करून अथवा एकरकमी रक्कम भरून नियमित उत्पन्न मिळेल अशी तरतूद केली आहे. ही रक्कम मिळताना जरी ते पेन्शन म्हणून मिळत असेल तरी ही रक्कम आयकर नियमाप्रमाणे ती पगार म्हणून समजली जात नाही. यासाठी या रकमेच्या ३३.३३% किंवा रु. १५०००/- ची (यातील जे अधिक असेल ते) प्रमाणित वजावट आयकर कायदा ५७ (२ए) उपलब्ध असल्याने त्यांना वरील प्रमाणित वजावटीचा लाभ घेता येणार नाही.
  • ‘इपीएफओ’कडून  (EPFO) मिळणारे कुटुंब निवृत्ती वेतन:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधिकडून सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला, अवलंबित अपंग मुलास किंवा २५ वर्षांखालील मुलांना कुटुंब निवृत्तीवेतन दिले जाते. यातील सदस्यांला दिलेले पेन्शन हे आयकर कायद्यानुसार पगार समजला जाईल, तर त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन हे पगार समजले जाणार नाही. या वेतनास ३३.३३% अथवा रु.१५०००/- यांपैकी जास्त असेल एवढ्याच रकमेची प्रमाणित वजावट ५७ (२ए)  मिळेल.
  • राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) योजनेतून मिळणारे पेन्शन:- ज्या व्यक्तींची वरील योजनेतील वर्गणी मालकाकडून भरली जाते त्यांनी योजनेच्या पूर्ती नंतर मान्यताप्राप्त विमा कंपनीकडून घेतलेले निवृत्तीवेतन पगार समजून त्यास चालू वर्षी रु. ४० हजार तर पुढील वर्षी रु.५० हजारची प्रमाणित वजावट मिळेल. परंतू या योजनेत ऐच्छिक वर्गणी भरणाऱ्या व्यक्तींना मिळणारे निवृत्तीवेतन हे पगार म्हणून धरले जाणार नाही.  त्यास जास्तीतजास्त रु. १५ हजार वजावट ५७(२ए) मिळू शकेल.

एखाद्या व्यक्तीस पगाराशिवाय अन्य रक्कम वर उल्लेख केलेल्या योजनांतून मिळत असेल, तर त्यास दोन्ही प्रकारच्या प्रमाणित वजावटी घेता येतील. या शिवाय घरापासून मिळणारे घरभाडे यासाठी सर्वांना कोणत्याही मर्यादेशिवाय ३०% प्रमाणित वजावट आयकर कायदा सेक्शन २४(२ए) नुसार उपलब्ध आहे. आपले विवरणपत्र भरताना या सर्व सवलतींचा विचार करून अचूक विवरणपत्र भरावे.

– उदय पिंगळे

अनुमानीत देयकर योजना

भांडवली नफा/ तोटा व त्यावरील कर

आयकर रिटर्न भरताना झालेल्या चुका कशा दुरुस्त कराल?

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

error: Content is protected !!