Marriage & Financial Consideration: लग्न करताय? मग आधी विचारात घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes

Marriage & Financial Consideration

लग्न करताना अनेक गोष्टींबरोबर आर्थिक मुद्देही विचारात घ्यावे लागतात (Marriage & Financial Consideration). “घर पाहावे बांधून आणि लग्न पहावे करून…” अनेकांनी ही म्हण अगदी लहानपणापासून ऐकली असेल. घर आणि लग्न या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आणि एकदाच घडणाऱ्या आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी करताना खूप विचार आणि काळजी घेणं आवश्यक आहे. 

पूर्वी लग्न हा एक कौटुंबिक सोहळा असायचा. आजकाल मात्र सगळं चित्र बदललं आहे. काहीजण रजिस्टर लग्न करतात, तर काही डेस्टिनेशन वेडिंग. लग्न कोणत्याही पद्धतीने करा. लग्नानंतर आयुष्यात खूप मोठा बदल घडणार असतो. सुरुवातीला सगळं छान वाटत असतं, पण नंतर मात्र वास्तवाचे चटके सहन करत एकमेकांना साथ द्यावी लागते. त्यामुळे लग्न करताना सुरुवातीपासूनच एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचा स्वभाव, विचार जाणून घेणं जितकं आवश्यक आहे तितकंच वैवाहिक जीवन अधिक सुखकर करण्यासाठी काही आर्थिक घटकांचा विचार करणेही अत्यावश्यक आहे.

हे नक्की वाचा: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Marriage & Financial Consideration: महत्वाचे ५ आर्थिक मुद्दे 

१. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती –

 • सामान्यतः ठरवून केलेल्या लग्नामध्ये म्हणजेच अरेंज मॅरेजमध्ये सर्वात आधी हा मुद्दा विचारात घेतला जातो. परंतु कधीकधी “दुरून डोंगर साजरे” अशीही परिस्थिती असू शकते. 
 • भारतामध्ये लग्न निव्वळ वर आणि वधूचं  होत  नाही, तर यामुळे दोन कुटुंब एकत्र जोडली जातात. त्यामुळे लक्षात ठेवा लग्न ठरवताना जोडीदाराची कौटुंबिक पार्शवभूमी व आर्थिक परिस्थितीची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. 
 • फसगत होऊन आयुष्याची फरफट होण्यापेक्षा थोडी काळजी घेणे कधीही उत्तम. 

२.  जोडीदाराची कर्तबगारी व कर्ज – 

 • सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात बहुतांश वेळा स्वतःचं घर गाडी, इत्यादी गोष्टी घेण्यासाठी कर्ज घेतले जाते.
 • आजकाल मुलं करिअरमध्ये सेटल होऊन स्वतःचं घर, गाडी, आदी स्वप्न पूर्ण करून मगच लग्नाचा  विचार करतात. त्यामुळे कर्ज असणं ही विशेष गोष्ट नाही. उलट असं असेल तर ते कर्तबगार असण्याचे लक्षण  आहे. 
 • एखादी व्यक्ती जर लग्नापूर्वी कर्ज घेऊन का होईना पण स्वतःचं घर घेत असेल अथवा कौटूंबिक जबाबदाऱ्यांसाठी कर्ज घेत असेल, तर ती व्यक्ती नक्कीच जबाबदार व कर्तबगार असणार हे नक्की. 
 • जोडीदाराच्या कौटूंबिक श्रीमंतीपेक्षाही तो कर्तबगार आणि जबाबदार असणं जास्त आवश्यक आहे. 
 • अर्थात कर्ज ही दोन प्रकारची असतात. चांगली कर्ज व वाईट कर्ज. आपल्या होणाऱ्या जोडीदाराने कुठले कर्ज घेतले आहे, ते किती, कधी व कशासाठी घेतले आहे? त्याचे किती हप्ते अजून बाकी आहेत? त्याने प्रीपेन्ट केले आहे का किंवा करणार आहे का? इत्यादी सर्व गोष्टींची सखोल माहिती घ्या. 
 • यामध्ये कोणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. परंतु, आपल्या जोडीदाराची आर्थिक परिस्थिती जाणून घ्यायचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि ते अत्यंत आवश्यक आहे. 
 • लग्नानंतर जोडीदाराची प्रत्येक जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. लग्नापूर्वी जोडीदाराच्या कर्जाची योग्य माहिती घेतल्यास त्यानुसार आर्थिक नियोजन करून त्याला कर्जफेड करायला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. 

महत्वाचा लेख: आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

३. सिबिल स्कोअर –

 • सिबिल म्हणजे आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया असतो. त्यामुळे या स्कोअरवरून जोडीदाराच्या आर्थिक सवयी समजणे सहज शक्य होतं.  
 • लग्नानंतरच्या आयुष्याची स्वप्ने प्रत्येकजणच बघत असतो. आपल्या आयुष्यात बघितलेली ९०% स्वप्न ही पैशाशी निगडित असतात. 
 • पुढे आयुष्यात तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कर्जाची आवश्यकता भासू शकते. अशावेळी जोडीदाराच्या खराब सिबिल स्कोअरमुळे कर्ज नाकारले जाऊ शकते किंवा त्याला सहकर्जदार करता येणे शक्य होत नाही.   
 • लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराचा सिबिल स्कोअर तपासणे अत्यंत आवश्यक आहे. 

४. आर्थिक नियोजन –

 • आपल्या जोडीदाराचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक नियोजन याबद्दल त्याच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच, एकमेकांची स्वप्ने, आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणूक व बचतीच्या सवयी याबद्दल चर्चा करणे हितावह आहे.
 • लग्नानंतर “माझं” असं काही उरत नाही जे काही असतं ते “आपलं” असतं. त्यामुळे एकमेकांच्या आर्थिक नियोजनाची पद्धत, बचत व गुंतवणुकीच्या सवयी समजून घेऊन त्यातील त्रुटी दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. कारण पुढे दोन वेगवगेळी नियोजन, आर्थिक उद्दिष्टे एकत्र येणार असतात.  

५. आरोग्य चाचणी –

 • सर्वात महत्वाचा परंतु बहुतांश लोकांकडून दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा म्हणे आरोग्य चाचणी.
 • काही विमा कंपन्यांची  “प्री मॅरिटल  हेल्थ चेक अप” साठी स्वतंत्र पॅकेजेस उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने लैगिक आजार, फर्टिलिटी चाचणी, अनुवांशिक, संक्रमित आणि संसर्गजन्य रोग चाचणी, इत्यादी चाचण्यांचा समावेश होतो. 
 • आपल्या लग्नासाठीच्या खर्चाचा काही भाग या टेस्टसाठी खर्च करायला काहीच हरकत नाही. ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप’चा फायदा दोघानांही मिळतो.

लग्न हे दोन मनांचं  मिलन असतं. यामुळे केवळ दोन व्यक्ती नाहीत, तर दोन कुटुंबे एकत्र येत असतात. परंतु कितीही नाकारलं तरी सत्य हेच आहे की अनेकदा  नात्यांमध्ये पैसा हा अनेक वादांचे कारण असतो. त्यामुळे पुढे जाऊन वाद घालण्यापेक्षा आधीच सगळं समजून उमजून पाऊल उचलणं कधीही योग्य.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Marriage & Financial Consideration in Marathi, Marriage & Financial Consideration Marathi Mahiti, Marriage & Financial Consideration Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!