निवृत्ती नियोजन
https://on.mktw.net/2N5USN9
Reading Time: 5 minutes

माझे फसलेले/असलेले निवृत्ती नियोजन

आजच्या लेखाचा विषय आहे निवृत्ती नियोजन. पण हा लेख म्हणजे कोणतीही माहिती नसून माझा वैयक्तिक अनुभव आहे. हा लेख प्रकाशित होईल तेव्हा मी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली त्यास बरोबर 38 महिने पूर्ण होतील. गेल्या वर्षी बाजार मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकात सातत्याने ऊर्ध्वगामी वाढ होत असल्याने सेन्सेक्सने 50 हजाराचा टप्पा कदाचित ओलांडला असेल. आमच्या कंपनीत स्वेच्छा निवृत्ती लागू होऊन ती बहुतेक सर्वाना सक्तीने घ्यावी लागेल याचा आधीच अंदाज होता. केवळ 150 लोकांची ही नोकरी संपून त्यांना तेवढ्याच पगारात दुसऱ्या कंपनीत नोकरीची हमी होती. या भाग्यवान लोकांत मी होतो तरीही काही आखाडे बांधून मी ही नोकरी सोडायची ठरवली. 

हे नक्की वाचा: पेन्शन योजनांत भाग घेणाऱ्यांची संख्या आताच का वाढते आहे? 

  • नोकरी सोडण्याच्या पूर्वी काही महिने पगार नियमित मिळत नव्हता. धाकट्या मुलाचे उच्चशिक्षण आणि जोडीदाराचे आजारपण यामध्ये बरीच रक्कम खर्च झाल्याने कोणतीही श्रीशिल्लख नव्हती.
  • तुलनेने थोडे कर्ज होते, मिळणारी रक्कम तेव्हा आणि आजचा काळाचा विचार करता नक्कीच घसघशीत होती. माझी 35 वर्षाहून अधिक काळ नोकरी झाली होती, केवळ 27 महिने शिल्लक होते.
  • मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी लागली होती. राहिलेल्या महिन्यांचा पूर्ण पगार मला स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यास मिळणार होता. माझ्याकडे नोकरीचा पर्याय होता अशा पार्श्वभूमीवर मी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे 1 मार्च 1982 पासून सुरू झालेली माझी सेवा 15 नोव्हेंबर 2017 रोजी समाप्त झाली.
  • मला कोणतेही निवृत्ती वेतन मिळणार नव्हती त्याचप्रमाणे वयाची 60 वर्ष पूर्ण झालेली नसल्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने केवळ वरिष्ठ नागरिक बचत योजना या एकाच योजनेत टाकता येत असलेले 15 लाख रुपये गुंतवणे हा एकमेव पर्याय माझ्याकडे होता.
  • सुदैवाने सन 1984 पासून अनपेक्षितपणे माझा शेअर बाजाराशी संबंध आला त्यात रुची निर्माण झाली.
  • लोकांच्या तुलनेने बचत, गुंतवणूक, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, आयकर, विमा, आर्थिक नियोजन यासंबंधात वेळेवेळी होणारे बदल याची मी माहिती ठेवत गेलो. त्यात आवड निर्माण होऊन ती टिकून राहिल्याने मला त्याचा सातत्याने फायदाच होत गेला.
  • अनेक गोष्टी मी तुलनेत आधी साध्य करू शकलो. स्टॉक एक्सचेंजकडून घेण्यात येणारे मार्केट विषयक बेसिक आणि डव्हान्स असे 4 दिवसांचे प्रशिक्षण मी 30 वर्षांपूर्वी पूर्ण केले होते. यासाठी त्या वेळच्या पगाराच्या मानाने किंचित अधिक रक्कम मला फी म्हणून द्यावी लागली होती. त्याचा आजतागायत मला फायदाच होत गेला.
  • काळाबरोबर राहून नवे बदल समजून स्वीकारत गेलो त्यामुळे गुंतवणूकीसंबंधी एक निश्चित भूमिका, मग ती चूक असो अथवा बरोबर निर्माण होण्यास निश्चित हातभार लागला.
  • आज तटस्थपणे याकडे पाहताना आपल्यात कोणकोणते बदल होत गेले ते पहाताना त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचे हसू येते. यामुळेच जवळपास 3 वर्ष सातत्याने फक्त डे ट्रेंडिंग फायदा मिळवून मी करू शकलो.
  • अनेक वर्ष बाजारात काम करून चार पैसे जोडू शकलो, संकटांशी लढू शकलो. कोणाकडे पैसे न मागता जमेल तशी इतरांना मदत करू शकलो. त्यामुळेच मी आणि शेअर बाजार असे एक अभेद्य नाते तयार झाले आहे. याच माहितीची बळावर, थोडंफार खरडून, वेगवेगळी मांडणी करून गेले काही वर्षे मी नियमितपणे आपल्याशी नियमित संवाद साधत आहे. 

विशेष लेख: निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

निवृत्ती नियोजन कसे असावे?

  • आपल्या निवृत्तीचे नियोजन कसे असावे? यावर वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी त्यांचे निवृत्ती नियोजन करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? यावर यापूर्वी मी किमान 3/4 लेख  लिहले आहेत.
  • यात आपल्याला पेन्शन असो वा नसो त्या त्या वेळी उपलब्ध सरकारी योजना, बँक, पोस्ट, म्युच्युअल फंड योजना, कॉर्पोरेट डिपॉझिट, बॉण्ड, भरपूर डिव्हिडंड देणारे आणि तुलनेत जोखीम कमी असलेले शेअर्स, जे अधिक जोखीम स्वीकारू शकतात त्यांच्यासाठी बाजारातील थेट गुंतवणूक असे पर्याय उतरत्या क्रमाने सुचवत असतो.
  • निवृत्तीच्या काळात आपणास गरज असो अथवा नसो, सातत्याने अनेक ठिकाणाहून पैसा मिळायला हवा. जर तो गरजेपेक्षा जास्त असेल तर त्यातून अधिकची गुंतवणूक करता येईल, पण तो कमी पडायला नको अशी माझी यासंबंधीचे काही लिहिण्यामागे भूमिका असते.
  • टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम असायला हवा. त्याचप्रमाणे प्रत्येकाने शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करावा. आनंद घ्यावा व द्यावा.
  • निवृत्तीनंतर आपल्या मनाप्रमाणे समाजपयोगी काम करावे. अनाहूत सल्ला देण्याचे सोडून, मागेल त्याला सल्ला म्हणजे आपले मत सांगावे पण त्याचा आग्रह धरू नये. ‘सर्वात असून कशातही गुंतून राहू नये’.
  • या आधी सांगितल्याप्रमाणे माझे व माझ्या पत्नीचे वय 60 पूर्ण न झाल्याने माझ्याकडे फक्त माझ्या नावावर शक्य असलेला वरिष्ठ नागरिक बचत योजना हा एकमेव पर्याय शिल्लक होता.
  • मुले कमावती असल्याने चिंता नव्हती. आपणास आहे हीच जीवनशैली राखण्यास दरमहा किती लागतील त्याचा अंदाज घेऊन तेवढी रक्कम कोणतीही काटछाट न होता आपल्याला मिळेल आणि काही अकस्मात रक्कम लागली तर सहज काढता येईल अशा पारंपरिक पर्यायात बँक/ पोस्ट रक्कम गुंतवली. यामुळे पैसे मिळवण्यासाठी काहीतरी करायला हवे या चिंतेतून मी काहीसा मुक्त झालो. तरीही मोठी रक्कम शिल्लक होती.
  • दोघांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्यास 4/5 वर्ष शिल्लक असल्याने ही सर्व रक्कम 2 म्युच्युअल फंडाच्या योजनांत गुंतवण्याचा मी निर्णय घेतला. यासाठी मी HDFC Balance Advantage Fund आणि ICICI Equity & Debit Fund या दोन फंडाची निवड केली. त्यांचा Monthly Dividend हा प्लॅन घेतला. मी याच दोन योजना का निवडल्या त्याची कारणे अशी होती. 

निवृत्ती नियोजन: म्युच्युअल फंडाच्या योजना निवडण्याची कारणे –

  • दोन ठिकाणी गुंतवणूक केल्यास धोका विभागला जातो.
  • हे दोन्ही फंड चांगल्या कंपन्यांनी पुरस्कृत केले होते.
  • लाभांश देण्याचे त्यांचे सातत्य आहे. यातील HDFC ने विनाखंड आणि वाढता लाभांश सातत्याने 17 वर्ष दिला होता, तर ICICI ने 17 वर्ष बहुतेक सातत्याने कमी अधिक लाभांश दिला होता.
  • फंड निव्वळ मालमत्ता मूल्य कमी झाले तरी लाभांश सातत्याने मिळणे व त्यामुळे गुंतवणूक परतावा 10% हून अधिक आणि करमुक्त मिळणे हे मला आकर्षित करणारे मुद्दे वाटले.
  • मालमत्ता मूल्य कमी अधिक होणे यामुळे होणारा नफा / तोटा आभासी असल्यामुळे मी या गोष्टींचा फारसा विचार करायला नको असे ठरवले.
  • याप्रमाणे पूर्ण गुंतवणूक केल्यावर आपण केले ते योग्यच केले अशी माझी खात्री होती याउपर काही गडबड झालीच, तर घरचे माझ्यावर स्वतःला जास्तच हुशार समजता असे तुटून पडण्याची शक्यता होती एवढाच धोका होता.
  • सगळं सुरळीत चाललेलं असताना डिसेंबर 2017 ते मार्च 2020 पर्यंत 28 महीने नियमित आणि करमुक्त असे भरभक्कम उत्पन्न मला मिळत असल्याने नियमित गुंतवणूकीमध्ये वाढ होत होती. बऱ्यापैकी सढळपणे खर्च करता येत होता. 
  • मार्च 2020 ला शेअर बाजार गडबडला आणि एप्रिल 2020 मध्ये यामध्ये महत्वाचे बदल झाले. 

हे नक्की वाचा: तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

निवृत्ती नियोजन आणि एप्रिल 2020 मध्ये शेअर बाजारात झालेले महत्वाचे बदल –

  • बाजार 40% पडला, तर फंड मालमत्ता मूल्य 60% कमी झाले.
  • डिव्हिडंड करपात्र झाला.
  • HDFC म्युच्युअल फंडने 20 वर्षांच्या इतिहासात प्रथमच डिव्हिडंड कमी केला, तर ICICI म्युच्युअल फंडने 5 महीने डिव्हिडंड दिलाच नाही आणि  नंतर तो कमी केला. त्यामुळे मिळणारा परतावा कमी झाला.
  • बाजार पुन्हा वाढून सर्वोच्च स्थानी पोहोचल्यावर फंड मालमत्ता मूल्य बऱ्यापैकी वाढले तरीही ते मूळ गुंतवणुकीहून थोडे कमी आहे प्रत्यक्षात त्यात अधिक वाढ होणे अपेक्षित होते.
  • मालमत्तेतील घट व लाभांश घटल्याने कमी झालेला परतावा यामुळे एके काळी घटलेला अप्रत्यक्ष परतावा  -23% झाला होता तो +7% च्या वर गेलाआहे, बँकेशी तुलना करता तसेच अन्य सुयोग्य पर्याय नसल्याने तो समाधानकारक म्हणता येईल.
  • बाजार वाढीशी म्हणजे निर्देशांकात किमान पातळीवरून जवळपास 100% वाढ झाली, सन 2008 नंतर प्रथमच एका वर्षात निर्देशांक आपल्या किमान पातळीवरून दुप्पट झाला. याच्याशी तुलना करता अजूनही या दोन्ही फंडाची कामगिरी सुमार असे म्हणता येईल.
  • निव्वळ मालमत्ता मूल्य जवळपास पूर्वपदावर आल्यावरही फंड मॅनेजमेंट लाभांश वाढवत नाहीत हे निश्चितच फंड मॅनेजरचे अपयश म्हणावे लागेल.
  • दोन्ही फंडांकडे मिळून गुंतवणूकदारणाचे 60 हजार कोटी रुपये मालमत्ता स्वरूपात आहेत.  मधल्या काळात मी अन्यत्र केलेली वाढीव गुंतवणूक आणि बाजार पडलेला असताना प्रत्येक टप्यावर शेअर खरेदी करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय यामुळे एकूण गुंतवणूक संच मूल्यात झालेली भरीव वाढ झाली.
  • याबळावरच पुढील वर्षी यातील गुंतवणूक टप्याटप्याने काढून दोघांची गुंतवणूक प्रधानमंत्री वय वंदना आणि वरिष्ठ नागरिक योजनेत करण्याचा प्रस्तावित संकल्प पूर्ण होऊ शकेल असा विश्वास वाटतो. असलेल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढवणे किंवा किमान कमी होऊ न देता ते कायम राखणे हे येणाऱ्या काळातील मोठे  आव्हान आहे.

– उदय पिंगळे

(हे वैयक्तिक अनुभवाचे सादरीकरण असून यात उल्लेख केलेल्या योजना ही शिफारस नाही.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.