Reading Time: 5 minutes

पेन्शन योजना

बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने सामावून घेण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्यांच्या आर्थिक विवंचना आधी दूर करणे. त्यासाठी पेन्शन योजना हा मार्ग जगाने निवडला आहे. त्याला भारतात प्रथमच चांगली गती आली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र भारतीय ज्येष्ठ नागरिकांची विशिष्ट स्थिती लक्षात घेता सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे क्रमप्राप्त आहे. 

विशेष लेख: भांडवल आणि तंत्रज्ञानाची मशागतच देईल बरकत! 

 • युरोपीय देश, अमेरिका आणि जपानसारख्या देशांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत असून त्याचे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत. 
 • अर्थात, याही स्थितीत ज्येष्ठ नागरिकांना पुरेशी सामाजिक सुरक्षितता कशी देता येईल, असा प्रयत्न तेथे केला जातो आहे. 
 • हे करताना सरकारी तिजोरीतील मोठा वाटा त्या कामी खर्च होऊ लागला आहे. तेथील तरुण पिढीला ही तरतूद ओझे वाटते, हा भाग वेगळा. 
 • तशा प्रकारची सामाजिक सुरक्षितता भारतात असली पाहिजे, अशी अपेक्षा करणे अगदी योग्य आहे. पण भारताची अर्थव्यवस्था तेवढा बोजा आज सहन करू शकत नाही. त्यामुळे ज्यांना पेन्शन लागू आहे, असे भाग्यवान नागरिक वगळता इतर ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. 
 • भारतात सध्या सुमारे १५ कोटी (६० वर्षावरील) ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील अंदाजे चार कोटी नागरिकांना पेन्शन मिळते. याचा अर्थ ११ कोटी नागरिकांना साठीनंतर एकतर काम करावे लागते किंवा तुटपुंज्या पुंजीवर जगावे लागते. 

पेन्शन योजना: जागरूकता वाढते आहे, हे स्वागतार्ह 

 • इतक्या कमी नागरिकांना आर्थिक सुरक्षितता दिली जाते, ही ज्येष्ठ नागरिकांची अवहेलनाच आहे. साठी पार केलेले साडे सात कोटी नागरिक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत आणि ७८% नागरिकांना कोणतेही पेन्शन लाभ मिळू शकत नाही, असा ज्येष्ठांच्या जगातील सर्वात मोठ्या पाहणीचा निष्कर्ष परवा ७ जानेवारी रोजी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे. 
 • मग यावर मात करण्याचा काही व्यवहार्य मार्ग आहे का? या प्रश्नाची जाणीव सरकारला आणि सुजाण नागरिकांना आहेच. त्यामुळेच जसे बदल वेगवान होत आहेत, तसतसे ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या योजना सरकार आणते आहे. 
 • अर्थात, या सर्व योजनांमध्ये नागरिक सक्रीय असताना त्यांनीच पैसा टाकायचा असून त्या फंडाचे व्यवस्थापन सरकारच्या पुढाकाराने होते आहे. 
 • खरे म्हणजे ज्या नागरिकांनी आपल्या साठीपर्यंत देशासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात योगदान दिले आहे, त्यांच्या वृद्धत्वाची आर्थिक जबाबदारी सरकारने घेणे अपेक्षित आहे. (अर्थक्रांतीचा सोबतचा प्रस्ताव पहा) पण आज ते व्यवहार्य नसल्याने त्यातल्या त्यात काय करता येईल, असे प्रयत्न सरकार करताना दिसते आहे. 
 • आनंदाची गोष्ट म्हणजे नागरिकांमध्येही त्याविषयीची जागरूकता वाढत चालली असून त्या त्या योजनेत भाग घेणाऱ्या नागरिकांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. 

वैचारिक लेख: ठेवी व कर्ज : कोणते व्याजदर कमी हवेत?

पेन्शन योजना: पेन्शन फंडांच्या मालमत्तेत १८ टक्के वाढ 

 • अलीकडेच यासंबंधीची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून ती अतिशय उत्साहवर्धक आहे. उदा. भारतातील पेन्शन फंडांची मालमत्ता या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात (सप्टेंबर २०२० अखेर) १८ टक्क्यांनी वाढली आहे. 
 • कोरोना साथीच्या संकटात आर्थिक गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार अधिक होऊ लागला, हे अगदी साहजिक आहे. शिवाय, अर्थव्यवस्थेत होणारे बदल आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे तरुण पिढी ज्येष्ठ पिढीला पुढे ढकलू लागली आहे. याची जाणीव सर्वांनाच होत असून त्यामुळेच पेन्शन योजनांत भाग घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. 
 • गेल्या सप्टेंबरअखेर पेन्शन फंड ७६ हजार कोटींनी वाढला असून तो आता पाच लाख कोटी रुपये इतका झाला आहे. 
 • सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) चा वाटा त्यात सर्वाधिक आहे. 
 • Interim Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDAनावाचा न्यास या दोन्ही योजनांचे व्यवस्थापन करतो. एवढ्या प्रचंड फंडाचे व्यवस्थापन करणे, ही मोठी जबाबदारी असल्याने सरकारने यावर थेट नियंत्रण ठेवले आहे. 
 • अर्थात, जे नागरिक पेन्शन फंडांत गुंतवणूक करतात, त्यांना चांगल्या परताव्याची अपेक्षा असते. ती पूर्ण करण्यासाठी एलआयसीसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील नावाजलेल्या संस्था आणि काही खासगी आर्थिक संस्थाना सहभागी करून हे काम केले जाते आहे. 

पेन्शन योजना: सभासद वाढण्यासाठी प्रयत्न 

 • पेन्शन योजनांविषयी जागरूकता कशी वाढत चालली आहे, याचे आणखी एक ताजे उदाहरण म्हणजे अटल पेन्शन योजनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात ५२ लाख नागरिकांची पडलेली भर होय. त्यामुळे डिसेंबर २०२० अखेर या योजनेच्या सभासदांची संख्या २.७५ कोटी झाली आहे. 
 • या योजनेत साठी पूर्ण झालेले नागरीक भाग घेऊ शकतात. त्यांना सरकार विशिष्ट पेन्शनची खात्री देते, त्या नागरिकाचा त्याच काळात मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला ती पेन्शन लागू होते किंवा पेन्शन खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम वारसाला मिळते.
 • सरकारी यंत्रणेला आपण कितीही दोष देत असलो तरी अशावेळी सरकारी नियंत्रण असणाऱ्या संस्थावर अधिक विश्वास दाखविला जातो, असेही या योजनेत दिसून आले आहे. 
 • अटल योजनेत जे ५२ लाख सभासद वाढले आहेत, त्यातील १५ लाख सभासद स्टेट बँकेच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. 
 • नॅशनल पेन्शन स्कीम ही सरकारने २००४ मध्ये सुरु केलेली योजना आहे. पण २००९ पर्यंत ती फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच लागू होती. २००९ ला ती सर्वासाठी खुली झाली. 
 • साठीपूर्वी सक्रीय असणाऱ्या नागरिकांनी या खात्यात नियमित रक्कम जमा करून साठीनंतर पेन्शन मिळण्यासंबंधीची ही योजना आहे. तीत अधिकाधिक नागरिकांनी भाग घ्यावा, यासाठी सरकारने आकर्षक सवलती दिल्या आहेत. 
 • १८ ते ६० या वयोगटातील कोणीही भारतीय नागरिक केवायसी भरून या योजनेत भाग घेऊ शकतो.
 • पेन्शनसाठी रक्कम भरताना आणि पेन्शन घेताना अशा दोन्ही वेळा सरकारने करसवलत दिली आहे.
 • चांगले पेन्शन मिळवून देणारी जगातील सर्वात स्वस्त पेन्शन योजना म्हणून तिने मान्यता मिळविली आहे. तिचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घेतला पाहिजे. 

हे नक्की वाचा: पेन्शनचं टेन्शन!

‘ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्तीच’

 • खरे म्हणजे भारतातील सामाजिक, आर्थिक भेदभाव कमी होण्यासाठी सर्वव्यापी अशा पेन्शन योजनेची गरज असून अर्थक्रांतीने मांडलेल्या त्यासंबंधीच्या प्रस्तावावर व्यापक झाली पाहिजे.
 • अतिशय कमी लोकसंख्या, १०० टक्के साक्षरता आणि अधिक दरडोई उत्पन्न असलेल्या युरोपीय देशांचे पेन्शन मॉडेल भारताला लागू होऊ शकत नाही. त्याऐवजी भारतीयांमधील सर्व भेदभावांना संपविण्याची क्षमता असलेला  ‘ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्तीच’ हा प्रस्ताव पुढे जाण्याची अत्यंत आणि तातडीची गरज आहे. 
 • अर्थक्रांतीच्या या प्रस्तावानुसार भारतातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला (६० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती) ‘राष्ट्रीय संपत्तीचा’ दर्जा बहाल कारण्यात यावा. 
 • हा दर्जा –  जात, पात, धर्म, लिंग निरपेक्ष प्रत्येक भारतीय नागरिकास मिळणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा या संकल्पनेची काटेकोर मांडणी व्यापक लोकमंथनातून होईलच, मात्र सुरवात करण्यासाठी काही बिंदू अर्थक्रांती देशासमोर ठेवत आहे. त्यावर देशव्यापी विस्तृत आणि सखोल मंथन अपेक्षित आहे. 
 • साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरडोई महिना १० हजार रुपयांचे ‘मानधन’ (महागाई निर्देशांकाशी जोडलेले) मिळणे अपेक्षित आहे. 
 • या मानधनामुळे भारतातील समाज जीवनामध्ये विशेषतः ग्रामीण जीवनामध्ये वृद्धांच्या हस्ते दरमहा क्रयशक्ती वितरीत होणार असल्याने सेवा क्षेत्रास आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळेल. 
 • म्हाताऱ्या आई वडिलांच्या मानधनरुपी निश्चित उत्पन्नामुळे तरुण मुले सहजीवनास तयार होतील. (ही तरुण पिढी वर्तमानात नाईलाजास्तव वृद्ध पालकांकडे पाठ फिरवून अर्थार्जनासाठी शहरांकडे स्थलांतर करताना दिसते आहे.) 
 • तरुण पिढीच्या स्थानिक रहिवासामुळे ग्रामीण समाजामध्ये आधुनिक समाजाच्या सुविधांच्या प्रसार आणि वापर होईल. यामुळे ग्रामीण जीवन सुद्धा नागरी जीवनाप्रमाणे सुविधायुक्त व प्रगतीशील बनेल. परिणामी ग्रामीण – नागरी जीवनातील विषमता कमी होईल. 
 • आजच्या भारतीय तरुणांसमोर -‘वृद्ध पालकरुपी भूतकाळ एकीकडे तर स्वत:च्या मुलांच्या रूपाने भविष्यकाळ दुसरीकडे’, अशी परिस्थिती आहे, ती अधिक आव्हानात्मक बनते जेव्हा हा तरुण – पालकांची ‘दवाई’ की पाल्यांची ‘पढाई’ या भावनिक जीवघेण्या संघर्षात अडकतो. 
 • अंतिमत: ही परिस्थिती त्याला दु:खाच्या, नैराश्याच्या कडेवर घेऊन जात असते. ज्येष्ठाच्या ‘मानधनामुळे’ तरुण पिढीची या भावनिक संघर्षातून सुटका होऊन ‘पाल्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक आधार तर पालकांसाठी मोलाचा भावनिक आधार होऊ शकेल. एक प्रकारे तरुणांची भावनिक संघर्षातून सुटका होऊन तिचा समाधानाच्या वाटेवरचा प्रवास सुरु होऊ शकेल. 
 • राष्ट्रीय संपत्तीच्या मूळ संकल्पनेमध्ये, आर्थिक तरतुदीनंतर ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक गरजा लक्षात घेता आरोग्य व संरक्षण या गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. 
 • या दोन सेवा प्रत्येक जेष्ठास आधुनिक तंत्रज्ञानच्या सहाय्याने सर्वोच्च प्राधान्याने दिल्या जाऊ शकतात. (जसे मोबाईलसारखे एखादे उपकरण. त्यातील एक बटन पोलीस तर दुसरे म्बुलंससाठी) या सोयीस अनुरूप पोलीस व आरोग्य व्यवस्था निर्माण करता येवू शकते. 

ज्येष्ठांचे भावनिक, मानसिक, शारीरिक हळवेपण लक्षात घेता स्वतंत्र शांतता क्षेत्राची निर्मिती, वाचन आणि अध्यात्मिक सत्संगासाठी प्राधान्य सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. आणखी सूक्ष्मपणे विचार करता ज्येष्ठ नागरिकांमधील गुन्हेगारीचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता त्यांच्यासाठी अनुरूप न्यायव्यवस्था व अनिवार्य असल्यास तुरुंग व्यवस्था या सुद्धा राष्ट्रीय संपत्तीच्या दर्जास अनुसरून तयार केल्या जावू शकतात.

– यमाजी मालकर 

ymalkar@gmail.com 

टीम अर्थसाक्षरतर्फे अर्थसाक्षरच्या सर्व वाचकांना संक्रांतीच्या शुभेच्छा !!!

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…