Reading Time: 3 minutes

शेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो.

ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते. समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १० कोटी रुपये असेल आणि ते रु. १०/- च्या एका भागात असेल, तर त्याच्या समभागांची संख्या १ कोटी होईल.

 • कंपनीच्या मसुद्यात कंपनीचे भाग भांडवल १० कोटी असून ते १० रुपयाचा १ समभाग याप्रमाणे १ कोटी समभागात विभागले आहे असा उल्लेख असेल. याप्रमाणे ते र.५/- मध्ये असल्यास समभागांची संख्या २ कोटी होईल तर रु.२/- असल्यास हीच संख्या ५ कोटी होईल.
 • आर्थिक उदारीकरणापूर्वी बहुतेक कंपन्यांचे दर्शनी मूल्य हे रु.१० किंवा १०० होते. नवीन मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ही अट काढून टाकली असून फक्त ते पूर्ण अंकात असावे असे म्हटले आहे. त्यामुळेच आता रु. १,२, ५, १० असे वेगळे दर्शनीमूल्य असलेले शेअर्स बाजारात आहेत.
 • हे शेअर्स यापूर्वी असलेल्या शेअर्सचे विभाजन करून निर्माण झाले आहेत. तर नव्यानेच बाजारात आलेल्या कंपन्या त्यांना अपेक्षित असलेल्या दर्शनी मूल्याचे समभाग बाजारात आणत आहेत.
 • अस्तित्वात असलेल्या शेअर्सचे दर्शनीमूल्य कंपनीचे संचालक मंडळ ठराव करून कमी / जास्त करू शकतात. यामुळे शेअर्सच्या संख्येत वाढ / घट होऊ शकते. यासाठी शेअर्सचे मूल्य विभागणी (Splitting) करून कमी / एकत्रीकरण (Consolidation) करून जास्त करावे लागेल.
 • शेअरच्या बाजारभावातही त्याप्रमाणे प्रमाणशीर पद्धतीने  घट / वाढ होईल. दर्शनीमूल्य कमी होऊन शेअरच्या संख्येत वाढ झाली की त्याप्रमाणात बाजारभाव कमी होईल, तर दर्शनीमूल्य वाढून शेअर्सच्या संख्येत घट झाल्यास त्याचे बाजारभाव त्या प्रमाणात वाढेल.
 • शेअर्सचे विभाजन किंवा एकत्रिकरणाचा कंपनीच्या बाजारमूल्यावर (Market value) सहसा कोणताही परिणाम होत नाही. तरीही अनेक कंपन्या शेअर विभाजन करण्याचा निर्णय घेतात कारण अशा शेअर्सच्या बाजारभावात खूप मोठी वाढ झालेली असते किंवा त्याचे भाव तशाच प्रकारच्या दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर असतात. त्यामुळेच अनेक लोक इच्छा असूनही ते शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय झटकन घेऊ शकत नाहीत.
 • विभाजनामुळे प्रमाणशीर पद्धतीने भाव खाली आल्यास अनेकांना हे शेअर्स आपल्या आवाक्यात आले असे वाटतात. शेअर्सच्या संख्येत वाढ झाल्याने उलाढाल योग्य शेअर्स अधिक प्रमाणात उपलब्ध होतात मागणी वाढल्याने लवकरच त्यात वाढ होऊ शकते.
 • एचडीएफसी (HDFC) बँकेच्या संचालक मंडळाने २२ मे २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत  रु. २/- दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या शेअर्सचे रु. १/- च्या दोन समभागांमध्ये विभाजन करायचे ठरवले आहे. अशाचप्रकारे रु. २/- एवढे दर्शनी मूल्य असणाऱ्या बँकांची नावे, या १८ जून २०१९ चा राष्ट्रीय शेअरबाजारातील बंद भाव, गेल्या ५२ आठवड्यातील सर्वात कमी व सर्वाधिक भाव खालीलप्रमाणे-
अ.क्र. बँकेचे नाव बंद भाव ५२ आठवड्यातील          किमान आणि कमाल भाव
आयसीआयसीआय बँक      ४२२ (३७३ – ४५६)
बँक ऑफ बडोदा ११६ (१०५ – १२८)
ॲक्सिस बँक ७७६ (७००-८५५)
फेडरल बँक १०५ (०९५ – ११७)
५. येस बँक (Yes bank) १०९ (१०७ -४०४)
६. एचडीएफसी बँक २४१७ (१८९५ – २४७०)
 • इतर बँकांच्या तुलनेत, एचडीएफसी बँकेचा चालू बाजारभाव आणि ५२ आठवड्यातील किमान- कमाल भाव यात असलेली तफावत लक्षात येईल. ७ मे २०१९ रोजी बँकेने, २२ मे २०१९ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत  रु.२/- च्या एका शेअर्सची विभागणी,रु.१/- च्या दोन भागात करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल असे जाहीर केले.
 • त्याप्रमाणे संचालक मंडळाने या दिवशी झालेल्या बैठकीत विभागणी प्रस्ताव मान्य केला आहे. त्याआधी बँकेचा आजवरचा सर्वोच्च भाव रु. २३६७/-  होता. या विभागणीस रीतसर मान्यता मिळाल्यावर तांत्रिकदृष्ट्या चालू बाजारभावाच्या निम्मा (म्हणजेच रु. १२०९/-) एक रुपयात विभागणी केल्यानंतराचा भाव राहू शकतो. परंतू तो जास्त राहील या अपेक्षेने शेअरचा भाव वाढत आहे. यामुळे या शेअर्सचा बाजारभाव  रु. २४७०/- ची विक्रमी पातळी गाठून खाली आला आहे.
 • विभाजनानंतर  भाव रु. १२५०/- च्या आसपास राहिला तरी रु. २४७०/- च्या तुलनेत तो अनेकांना ते शेअर खरेदी करायला प्रोत्साहित करू शकेल. व्यवहार होऊ शकणाऱ्या शेअर्सच्या संख्येत वाढ होईल. सातत्याने चांगले त्रैमासिक निकाल देणाऱ्या या बँकेच्या शेअरच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे अल्पकाळात तो रु. १५००/- पर्यंत जाऊ शकतो.
 • त्यामुळे आता खरेदी करणाऱ्या धारकाना अल्पकाळात २०% हमखास उतारा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या बाबतीत तंतोतंत असेच घडेल असे नाही. तर त्या कंपनीचा भाव तश्याच प्रकारच्या इतर कंपन्यांच्या भावाहून खूप अधिक असून कंपनीच्या निकालाची कामगिरी चढतीच असावी लागते आणि सर्वसाधारण बाजारही सुस्थितीत असावा लागतो.
 • समभाग एकत्रीकरणाची प्रक्रिया बरोबर याच्या उलट आहे. या कंपन्यांचा बाजारभाव तुलनात्मक दृष्टीने कमी आहे असे संचालक मंडळास वाटत असते. त्यामुळे त्याच्या बाजारभावात वाढ होण्यासाठी त्याचे दर्शनीमूल्य, भागाचे एकत्रीकरण करून पूर्ण केले जाते. यामुळे बाजारातील उलाढालयोग्य शेअर्सची संख्या कमी होऊन, मोठ्या सट्टेबाजीच्या प्रमाणात घट होते.
 • शेअर्सचे विभाजन /एकत्रीकरण यामुळे बाजारमूल्यावर काहीही फरक पडत नाही. यासाठी संचालक मंडळाचा ठराव, सर्वसाधारण सभेची मान्यता आणि त्याप्रमाणे घटनेत दुरुस्ती करून घेऊनच यासंबंधीची तारीख निश्चित केली जाते.
 • या तारखेस असलेल्या सभासदांच्या शेअरची संख्या वाढते / कमी होते. बाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सचा एक आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक असतो त्यास ISIN असे म्हणतात. आपल्या डिपॉसीटरीकडून येणाऱ्या खाते उताऱ्यावर (Holding statement) तो दिलेला असतो.
 • विभाजन किंवा एकत्रीकरण यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन शेअर्ससाठी तो नव्याने मिळवावा लागतो. जुने शेअर्स खात्यातून वगळून त्याऐवजी नवीन शेअर्स इलेक्ट्रॉनिक रुपात खात्यात जमा केले जातात. ज्याच्याकडे कागदी स्वरूपात शेअर प्रमाणपत्र आहे त्यांचे जुने प्रमाणपत्र रद्द करून नवीन प्रमाणपत्र पाठवण्यात येते आणि ही प्रक्रिया पूर्ण होते.

– उदय पिंगळे

(या लेखामध्ये उल्लेख केलेल्या बँकांची नावे, त्यांच्या शेअर्सचा बंद बाजारभाव आणि मागील ५२ आठवड्यातील कमी अधिक भाव यांचा विषय समजावा यासाठी केवळ संदर्भ म्हणून घेतला असून एचडीएफसी बँकेच्या शेअर्स मध्ये २०% भाववाढ होईल हा केवळ अंदाज व्यक्त केला आहे. यातील कोणत्याही शेअर्सची शिफारस केलेली नाही.)

शेअर्स खरेदीचं सूत्र

 पुनर्खरेदी (Shares buybacks) ,

शेअर्सची साधी बदलती सरासरी ,

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…