Ghadi Detergent
“पहले इस्तमाल करे, फिर विश्वास करे” प्रत्येक वस्तू आणि सेवांना लागू पडणारी ही ‘घडी’ डिटर्जंटची (Ghadi Detergent) टॅगलाईन सर्वांना परिचित आहे. कानपूरच्या मुरलीधर ग्यानचंदानी आणि बिमलकुमार ग्यानचंदानी यांनी १९८७ मध्ये प्रस्थापित निरमा, सर्फ, व्हील यांच्यासमोर ‘घडी’ नावाचं उत्पादन बाजारात आणलं. ग्यानचंदानी कुटुंबाला कित्येक व्यवसायिकांनी संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती. पण, ग्यानचंदानी बंधूंनी मागणी विरुद्ध पुरवठा हा पूर्ण अभ्यास करूनच ‘घडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज ३४ वर्षांनी ग्यानचंदानी बंधूंनी ‘घडी’ला एक यशस्वी ब्रँड तयार करून आपला हा निर्णय सार्थ करून दाखवला आहे. कसा होता ‘घडी डिटर्जंट चा हा प्रवास ? जाणून घेऊयात.
हे नक्की वाचा: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा !
Ghadi Detergent: कपडे धुण्याचा साबण ते डिटर्जंट पावडर हा प्रवास कसा साध्य झाला ?
- १९३० मध्ये पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीने जगातील सर्वात पहिली डिटर्जंट पावडर तयार केली होती.
- ‘सल्फोनेट्स’चा वापर करून तयार करण्यात आलेली पावडर ही कपड्यांना साबणापेक्षा जास्त स्वच्छ धुतात हे जर्मन उत्पादकांच्या लक्षात आलं होतं.
- १९५७ मध्ये भारतात पहिल्यांदा कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर करण्याची सुरुवात झाली. सर्वात पहिली सिंथेटिक डिटर्जंट पावडर मुंबईत तयार करण्यात आली होती.
- सल्फोनेट्समुळे पाण्यात मोठ्या प्रमाणात फोमचं मिश्रण होतं जे की पर्यावरणासाठी चांगलं नाही, असा काही संस्थांनी आरोप केला होता. या आरोपाची दखल घेत सर्वच डिटर्जंट पावडर कंपन्यांनी सल्फोनेट्सचा वापर कमी केला आणि या प्रॉडक्टला बाजारात मान्यता मिळाली.
- १९६९ मध्ये भारतीय मार्केट मध्ये ‘निरमा’ ने भारतात उत्पादन करून बाजारात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या सर्फ एक्सेलला टक्कर देण्याचं ठरवलं. निरमाच्या यशाने प्रभावित होऊनच ग्यानचंदानी यांना ‘घडी’ ची संकल्पना सुचली असं सांगितलं जातं.
Ghadi Detergent: ‘घडी’ ची सुरुवात :
- १९८७ मध्ये ग्यानचंदानी बंधूंनी ‘घडी’ डिटर्जंट पावडरची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे कोणताही मार्केटिंग किंवा ब्रँडिंगचा प्लॅन नव्हता.
- रोहित सर्फेक्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीला नाव देण्यात आलं आणि ‘घडी’ हे डिटर्जंट पावडरचं नाव ठरवण्यात आलं.
- १९८८ मध्ये ग्यानचंदानी यांनी महादेव सोप इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत करार केला आणि त्या जागेत ‘घडी’ चं उत्पादन सुरू केलं.
- ‘घडी’ ला मिळालेला प्रतिसाद बघून २००५ मध्ये महादेव सोप इंडस्ट्रीजने आपल्या कंपनीचं नाव बदलून ‘घडी’ या एका ब्रँड नावाखाली येण्याचं ठरवलं. महादेव सोप इंडस्ट्रीज ही आता रोहित सर्फेक्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये समाविष्ट करण्यात आली होती.
‘घडी डिटर्जंट पावडर’ हे ब्रँड कसं झालं ?
- २०१२ पासून घडीची डिटर्जंट पावडर इंडस्ट्रीमध्ये दखल घेतली जाऊ लागली जेव्हा घडीने ‘व्हील’ या प्रस्थापित ब्रँडला विक्री मध्ये मागे टाकून १७.४% इतक्या आपल्या मार्केट शेअरची नोंद केली. या आकडेवारीनंतर ‘प्रॉक्टर अँड गॅंबल’ आणि ‘युनिलिव्हर’ सारख्या आंतरराष्ट्रीय उत्पादकांची घडीमुळे झोप उडाली होती.
सातत्यपूर्ण दर्जा आणि लोकांना एकदा आपली वस्तू वापरून बघण्याची विनंती या जोरावर घडीची यशस्वी घोडदौड पुढे सुरूच राहिली. आज त्यामुळेच घडी हे डिटर्जंट पावडर इंडस्ट्रीचा ‘मार्केट लीडर’ आहे.
विशेष लेख: ब्रँड्सच्या नावामागच्या सुरस कथा
Ghadi Detergent: काय वेगळं केलं ?
- निरमा पावडरप्रमाणेच सतत मार्केट शेअरकडे लक्ष न देता ‘घडी’ने कमीत कमी किमतीत ग्राहकांना आपली वस्तू कशी मिळेल, याकडे आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं.
- आपला सर्वात मोठा ग्राहक वर्ग हा गावात राहणारा किंवा छोट्या शहरात राहणारा असेल हे घडीच्या उत्पादकांना स्पष्ट होतं. “साबणाच्या किंमतीत घडी डिटर्जंट पावडर हे उपलब्ध होऊ शकते” हा विश्वास निर्माण करण्यात ग्यानचंदानी बंधूंना यश आलं आणि त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही.
- आपली वस्तू हे एकवेळ मॉल मध्ये उपलब्ध नसेल तर चालेल, पण ती गावातील छोट्यातील छोट्या दुकानात असली पाहिजे याकडे निर्मात्यांनी जातीनं लक्ष घातलं आणि तसं ‘डिस्ट्रिब्युशन नेटवर्क’ त्यांनी उभं केलं.
- एकावेळी एका राज्यावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धतसुद्धा ‘घडी’साठी उपयुक्त ठरली होती. उत्पादन होणाऱ्या उत्तरप्रदेशपासून घडीने आपलं मार्केटिंग कॅम्पेन सुरू केलं.
- भारताच्या डिटर्जंट पावडरच्या एकूण विक्रीपैकी १२% विक्री ही उत्तरप्रदेश मध्ये होते ही माहिती लक्षात घेऊन कंपनीने आधी फक्त उत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर बिहार, मग पंजाब आणि मग मध्यप्रदेश. या सर्व राज्यांमध्ये आपले वितरक नेमून कंपनीने त्यांना ७% इतकं प्रॉफिट मार्जिन दिलं जे की इतर कंपन्यांपेक्षा जास्त होतं. हीच पद्धत त्यांनी इतर राज्यात वापरली आणि घडी घरोघरी पोहोचली.
- आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या २% वाटा कंपनीने मार्केटिंग, जाहिरातीसाठी सुरुवातीपासून राखून ठेवलेला आहे. ‘रोहित सर्फेक्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी ही घडीची माहिती देणारे आणि अपडेट्स देणारे व्हिडीओ, जाहिरात विविध जाहिरात कंपन्यांकडून तयार करून घेत असते.
- एप्रिल २०११ मध्ये कंपनीने ‘Msales’नावाने आपल्या मोबाईल अप्लिकेशनची सुरवात केली आणि त्या मार्फत सर्व वितरकांसोबतचं काम अजून सुसह्य केलं.
- वितरकाचं लोकेशन, त्यांच्या तक्रारीवर कमी वेळात सोडवणं कंपनी ला शक्य होऊ लागलं. तंत्रज्ञानावर केलेला हा खर्च कंपनीच्या फायद्याचं झालं आणि घडी डिटर्जंट पावडरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली.
- २००८ मध्ये घडीने “पहले इस्तमाल करे, फिर विश्वास करे” ही साधी आणि सोपी टॅगलाईन घेऊन लोकांसमोर जायचं ठरवलं. कंपनीने आपल्या टीव्ही जाहिरातींमध्ये नेहमीच सामान्य माणसाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे त्यांचं वेगळेपण म्हणता येईल कारण त्या काळात प्रत्येक जाहिरात ही सेलिब्रिटीने करायची पद्धत होती.
- टीव्ही जाहिरातींसोबतच घडीने गुवाहाटी ते लखनौ एक्सप्रेस या रेल्वेवर २ महिने जाहिरात केली. त्यानंतर स्वर्ण जयंती एक्सप्रेस आणि पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेवर सुद्धा कंपनीने आपली जाहिरात केली आणि सामान्य माणसांपर्यंत आपलं नाव पोहोचवलं.
- कानपूर, जयपूर, कोटा, इंदोर सारख्या शहरांमध्ये कंपनीने जादूचे प्रयोग, रोड शोज सारख्या जुन्या जाहिरातींच्या पद्धतीचा वापर केला. आपल्या पारंपरिक ग्राहक गावातील लोकांपर्यंत पोहोचण्यास घडी ला यामुळे मदत झाली. छोट्या शहरात प्रदर्शन भरवून सुद्धा कंपनीने घडी हे नाव सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहील याची काळजी घेतली.
- ३४ वर्ष सातत्याने काम केल्यानंतर आज ‘घडी डिटर्जंट पावडर’ हा आज या क्षेत्रातील पहिल्या ५ प्रॉडक्ट पैकी एक आहे. युनिलिव्हर, प्रॉक्टर आणि गॅंबल सारख्या परदेशी कंपन्यांना रोहित सर्फेक्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RSPL) या भारतीय कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या आधाराने विक्रीच्या स्पर्धेत हरवलं ही आजच्या मार्केटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक केस स्टडी आहे.
- रोहित सर्फेक्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपलं लक्ष केवळ घडी पुरतं मर्यादित न ठेवता हेअर ऑईल, शॅम्पू, हॅण्ड वॉश, टूथपेस्ट, शेविंग क्रीम, फ्लोर क्लिनर सारख्या वस्तूंकडे सुद्धा तयार करण्यास सुरुवात केली आहे. हरिद्वार येथे सुरू केलेल्या फॅक्टरी मध्ये ही सर्व उत्पादनं सुरू आहेत. घडी डिटर्जंट पावडरचं उत्पादन हे औरंगाबाद जवळील वाळूज या भागात सध्या सुरू आहे.
ग्यानचंदानी कुटुंबाची आर्थिक संपत्ती आज १२ हजार करोड रुपयांपेक्षा जास्त आहे. रोहित सर्फेक्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही आज जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे ही आपण भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Download Arthasakshar App – CLICK HERE
web search: Ghadi Detergent success story in Marathi, Ghadi Detergent company mahiti, Ghadi Detergent marathi mahiti, Ghadi Detergent history in Marathi, Ghadi Detergent Marathi
1 comment
Khup chan mahiti… Sir asach det raha aani aamcya dnanat bhar pada…