Success Story of ITC
सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या बॉडी लोशनपर्यंत आयटीसीची कित्येक उत्पादने आपण दिवसभरात वापरत असतो. एवढ्या मोठ्या कंपनीची यशोगाथा (Success Story of ITC) नक्की काय आहे? चला तर मग आजच्या लेखात याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
सनफिस्ट बिस्किट्स,
आशिर्वाद आटा,
क्लासमेट वह्या,
गोल्डफ्लेक सिगरेट,
बिंगो वेफर्स,
यिप्पी नूडल्स,
फियेमा-डी-विल्स साबण,
मंगलदिप आगरबत्ती..
या विविध क्षेत्रातील यशस्वी ब्रॅण्ड्सची नावे वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा तसा एकमेकांशी संबंध नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांची मालकी भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक असलेल्या एकाच कंपनीकडे आहे. ती कंपनी म्हणजे “आयटीसी लिमिटेड”!
भारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)
आयटीसीचा इतिहास :
- स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश शेअर होल्डर्स आयटीसीचे मालक होते. हळूहळू सगळे शेअर्स भारतीयांनी विकत घेतले.
- आयटीसीचे वेगळेपण मालकी हक्कात आहे. आयटीसीचा कोणी एक समूह, कुटुंब अथवा सरकार प्रवर्तक अथवा मालक नाही तर ती व्यवसायिक व्यवस्थापनाद्वारे संचलित केली जाते. भारतातील बहुतेक मोठे उद्योग एका घराण्याच्या मालकीचे आहेत. उदा : मुकेश अंबानींचा रिलायन्स गृप, कुमार मंगलम बिर्ला यांचा आदित्य बिर्ला गृप, मुरुगुप्पा कुटुंबियांचा मुरुगुप्पा गृप इ. आयटीसीचे मालक मात्र विविध म्युच्युअल फन्ड्स, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि काही प्रमाणात भारत सरकार सुद्धा आहे.
- आयटीसी चे एकूण बाजारमूल्य रोजी १ नोव्हेंबर,२०१९ मध्ये एकूण रु. ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
- आयटीसी कर्जमुक्त कंपनी आहे.
- आयटीसीने गेल्या १० वर्षात ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारला टॅक्स स्वरूपात भरली आहे.
- आयटीसी समूहात ३४००० कर्मचारी काम करतात.
- आयटीसीने गुंतवणूकदारांना भरभक्कम परतावा दिला आहे. १ जानेवारी २००० रोजी केवळ १६ रुपयांना असलेला एक शेअर आज २६१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामधील प्रतिशेअर फायदा रु. २४५ इतका म्हणजे जवळपास १५ पट आहे. शिवाय दरम्यानच्या वर्षात कंपनीने दिलेले बोनस शेअर, दिलेला लाभांश या परताव्यात आपण मोजलेला नाही. इथून पुढे आयटीसीने असाच चांगला परतावा देईल की नाही, हे मात्र सांगता येणार नाही.
आयटीसीच्या विविध व्यवसायांची माहिती घेऊया-
सेगमेंट १: सिगारेट्स
- आयटीसीचा मुख्य व्यवसाय सिगारेट्स आहे. भारतातील सिगारेट्स व्यवसायांपैकी तब्बल ८०% व्यवसाय हिस्सा आयटीसीकडे आहे. म्हणजे दर ५ सिगारेट्सपैकी ४ आयटीसीने विकलेल्या असतात.
- कंपनीच्या नफ्यापैकी ८०% पेक्षा जास्त हिस्सा सिगारेटच्या व्यवसायातून येतो.
- १०० वर्षांपेक्षा जास्त सिगारेट्स निर्मितीचा अनुभव असल्याने आयटीसीचे सिगारेट्स ब्रॅन्ड्समध्ये लोकप्रिय झाले आहेत. उदा: ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लेक्स , इंडिया किंग्स, क्लासिक, गोल्ड, अमेरिकन क्लब, नेव्ही कट ई.
- भारतात विक्रीबरोबरच पश्चिम आशियामध्ये सिगारेट्स निर्यात केल्या जातात.
- याचबरोबर आयटीसी २०१० पासून सिगारच्या उत्पादनात आहे.
- सिगारेट्सच्या व्यवसायात चांगला नफा, निश्चित ग्राहकवर्ग, वाढीच्या उत्तम संधी असल्या, तरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सरकारच्या मर्जीवर अवलंबून होता आणि आजही आहे.
- सरकारला विकास कामांसाठी सदैव कररूपी पैसा गोळा करावा लागतो. कुठल्याही वस्तू अथवा सेवांवर कर वाढवला तर, जनतेची ओरड सुरु होते.
- दारू, सिगारेट्स, गुटखा, लॉटरी यासारख्या सामाजिकदृष्ट्या पापी वस्तूंवर कर आकारल्यावर जनता नाराज होत नाही असे नाही.
- व्यसनी लोक कितीही किंमत द्यावी लागली, तरी तल्लफ भागवण्यासाठी या पापी वस्तूंची खरेदी करतातच. तेव्हा सरकार जरा काही महसूल कमी पडला की या सिगारेट्ससारख्या वस्तूंवरील कर वाढवते.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)
बेकायदेशीर सिगारेट उत्पादने-
- सिगारेट व्यवसायांमध्ये २ प्रकार आहे कायदेशीर आणि बेकायदेशीर
- कायदेशीर सिगारेट्स चा धंदा प्रचंड नफा मिळवून देणारा आहे. कंपनीला आणि सरकारला असा दोघांनाही तो फायदेशीर ठरतो. याचबरोबर विनापरवाना, सरकारचे सर्व कर चुकवून बेकायदेशीर सिगारेटचे उत्पादन व विक्री करणारेही बरेच व्यावसायिक आहेत.
- बेकायदेशीर सिगारेट्स विक्री मध्ये भारताचा जगात ४था क्रमांक आहे. यामुळे सरकारला दरवर्षी सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा करकवसुली फटका बसतो.
- भारताचे कायदेशीर सिगारेट्स मार्केट २०१०-११ पासून ४% वार्षिक दराने वाढते आहे, तर बेकायदेशीर मार्केट दरवर्षी ५% दराने वाढते आहे.
- आयटीसीचे सरकार दरबारी गाऱ्हाणे असते की आम्ही सर्व नियम पाळतो, कर भरतो, कर्मचारी निगडित सर्व कायदे पाळतो त्यामुळे आमचे उत्पादन खर्च जास्त आहेत. याउलट बेकायदेशीर सिगारेट्स विक्रेत्यांवर बंधने नसल्याने त्यांची विक्री किंमत फार कमी होते.
- सहाजिकच ग्राहक स्वस्त म्हणून बेकायदेशीर वस्तू खरेदी करतो. परिणामी आयटीसी आणि सरकार असे दोघांचेही नुकसान होते.
- सिगारेटमुळे कॅन्सर होतो याचे चित्र सिगारेट पाकिटावर ८५% जागा व्यापते. या चित्रांचे उपभोक्त्यांवर परिणाम होतो का नाही याचा स्वतंत्र अभ्यास व्हायला हवा पण बेकारदेशीर सिगारेट विक्रेते हे ८५% जागा वापरणारे चित्र छापत नाही. त्यामुळे ग्राहकांचा असा गैरसमज असा होतो की कँसरवाले चित्र नसलेल्या बेकायदेशीर सिगारेटी आरोग्यास चांगल्या आहेत.
- या सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून आयटीसीची मागणी आहे की कर कमी करा म्हणजे कायदा पाळणाऱ्या कंपन्यांच्या सिगारेट स्वस्त होतील आणि ग्राहक बेकायदेशीर उत्पादनांकडे आकर्षित होणार नाही.
आयटीसीच्या दृष्टीने सिगारेट्स व्यवसायातील संधी –
- भारताची लोकसंख्या जरी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७% आहे तरी जागतिक सिगारेट सेवनामध्ये भारतीयांचा वाटा फक्त २% आहे.
- सिगारेट्स आरोग्याला हानिकारक आहे हे आपणा सर्वाना माहिती आहे. सिगारेट सेवन करावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.
- गेल्या अनेक वर्षांपासून वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच व्यसनाचे प्रमाणही वाढत चालले आहे.
विस्तारीकरणाची गरज :
सिगारेट्स विकत असताना कंपनीला विस्तारीकरण करायचे होते. नावात टोबॅको असणाऱ्या कंपनीचे विस्तारीकरण इतर क्षेत्रात सहजासहजी विस्तार नावामुळे होणे तसे अवघड म्हणून “इम्पेरियल टोबाको कंपनी”चे नाव बदलून “आय. टी. सी. लिमिटेड” असे करण्यात आले. पुढे या नावातही बदल करून फक्त “आयटीसी लिमिटेड” करण्यात आले. तुम्ही म्हणाल की या दोन्ही नावात काय फरक आहे? पुन्हा एकदा नंतरची दोन्ही नावे वाचा. फरक एका बिंदूचा म्हणजे डॉटचा आहे. ब्रँड एक्सपर्ट्सनुसार नाव वाचायला सोपे करण्यासाठी बिंदू नावातून काढण्यात आले.
“व्हर्टिकल इंटिग्रेशन” या प्रकारे आयटीसीने आपला व्यवसाय विस्तार केला. सिगारेट्स पॅकिंग साठी लागणारे बॉक्सेस बनवणारा कारखाना १९३६ सुरु केला गेला व पुढच्या विविध क्षेत्रात आयटीसीने आपला विस्तार केला.
सेगमेंट २ : हॉटेल
- १९७५ मध्ये हॉटेल व्यवसायात कंपनीने पदार्पण केले. आज कंपनीची १०० पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत.
- आयटीसीची आर्थिक ताकद किती मोठी आहे हे समजून घ्यायचे असेल, तर हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक एक चांगले उदाहरण ठरेल.
- आयटीसीच्या एकूण नफ्यापैकी फक्त २% नफा हॉटेल व्यवसायातून येत असला, तरी भारतातील दुसरी सगळ्यात मोठी शृंखला आयटीसी हॉटेल्सची आहे.
- आयटीसीचे भारतातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत ७० ठिकाणी १०८ हॉटेल्स आहेत. यामध्ये पंचतारांकित, लक्झरी सेगमेंट, मिड मार्केट सेगमेंट्स मध्ये असणाऱ्या विविध हॉटेल्स मध्ये एकूण १०,००० पेक्षा जास्त रूम्स आहेत.
- कंपनीच्या हॉटेल्स मध्ये पुढील ४ प्रकार आहेत :
- आयटीसी हॉटेल्स: लक्झरी हॉटेल्स, देशातील सर्वात महाग हॉटेल्सपैकी एक ब्रँड
- वेलकम हॉटेल्स: पंचतारांकित हॉटेल्स पण वरच्या आयटीसी हॉटेल्स पेक्षा थोडी स्वस्त
- फॉर्च्युन हॉटेल्स: वेलकम हॉटेलपेक्षा थोडी स्वस्त आणि मध्यम बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी सोयीची
- हेरिटेज हॉटेल्स: देशातील जुन्या वास्तू , सुंदर नयनरम्य “क्लासिक” मालमत्ता या हॉटेल्स कडे येतात. प्रचंड महाग पण धनाढ्य व्यक्तींसाठी सुयोग्य हॉटेल्स
- आयटीसीची हॉटेल्स म्हणजे नक्की काय जादू आहे, हे जाणून घ्यायचे असेल आणि थोडाफार “फिल” घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा.
- खर्च करणारी युवा पिढी, वाढलेलं उत्पन्न, व्हिजा ऑन अरायव्हल यामुळे परदेशी प्रवांशाची वाढती संख्या यामुळे आयटीसीला हॉटेल व्यवसायातून चांगल्या नफ्याची अपेक्षा आहे.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)
– सी.ए. अभिजीत कोळपकर
(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात.)
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Success Story of ITC Marathi Mahiti, Success Story of ITC in Marathi, Success Story of ITC, ITC Marathi Mahiti, ITC in Marathi, ITC Marathi