शेअर बाजारात मोठी घसरण – जाणून घ्या ही ४ प्रमुख कारणे !

Reading Time: 2 minutes
 • जागतिक मंदीची शक्यता, वाढती महागाई व वाढते व्याजदर यांचा तिहेरी फटका शेअर मार्केटला बसल्याने, या आठवड्यात (१३ जून ते १७ जून २०२२) सेन्सेक्स २,९४३ अंकांनी घसरला. तसेच हा आठवडा  निफ्टीसाठी दोन वर्षांतील सर्वात वाईट आठवडा होता. 
 • जागतिक चलनवाढीच्या चिंतेमुळे सर्व देशांतील केंद्रीय बँकांकडून व्याजदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली. परिणामी, १७ जून रोजी बाजारातील घसरण ही मे २०२० नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण होती. 
 • आठवडाभरात बीएसई सेन्सेक्स २,९४३ अंकांनी (५.२१ टक्के) घसरून ५१,३६० वर बंद झाला, तर निफ्टी दर ९०८ अंकांनी (५.६ टक्के) घसरून १५,२९३ वर बंद झाला.
 • आठवडाभरात सर्व बीएसई सेन्सेक्समधील शेअर्सच्या किमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या भागधारकांची जवळपास १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या यादीमध्ये रिलायंस इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक यांचा देखील समावेश आहे. 
 • अमेरिकन डॉलरच्या किमतीत भारतीय रुपया या आठवड्यात २३ पैशांनी घसरून ७७.८४ वर बंद झाले.
 • टाटा स्टील, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, विप्रो आणि इंडसइंड बँक हे सेन्सेक्समधील शेअर्स सर्वाधिक ६.०४ टक्क्यांनी घसरले तर नेसले हा एकमेव शेअर किरकोळ ०.३ टक्क्यांनी वाढला. .

 

शेअर बाजारातील घसरणीमागील प्रमुख करणे –

१.  रशिया – युक्रेन युद्ध –

 • रशिया – युक्रेन युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली. आपले पैसे सुरक्षित पर्यायांमधे  गुंतवण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे, त्यांनी धडाधड शेअर्सची विक्री करण्यास सुरुवात केली. 
 • बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भाव कोसळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे  नुकसान झाले आहे.

 

२.  महागाईचा भडका –

 • आपला भारत देश खनिज तेल आणि खाण्याचे तेल परदेशातून आयात करतो. यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर्स मोजावे लागतात. या दोन्ही मालाची भाववाढ तर झालीच व त्या बरोबरच रुपयाचे डॉलर्सच्या तुलनेत अवमूल्यन झाले आणि महागाईचा भडका उडाला. 
 • रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. गेल्या  काही महिन्यांतच बहुतांश खाद्यपदार्थांच्या व तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली.
 • अन्नसाठा, उर्जेच्या वाढत्या किमती, पुरवठा साखळीतील अडथळे, निर्यातीवरील निर्बंध अशा अनेक कारणांमुळे दोन वर्षांपासून अन्न बाजारपेठेवर ताण पडत होता. म्हणूनच जगभरात महागाई  वेगाने वाढत गेली. 
 • युक्रेन हे जगाचे गव्हाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. युद्धामुळे भारतीय गव्हाला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी होती. परंतु कडक उन्हाळ्यामुळे भारतातीलच गव्हाचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज आहे म्हणून गव्हाच्या निर्यातीवर लगाम लावले गेले.  

 

हे ही वाचा – Share Market Tips for Beginners : शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी टाळा

 

३.  परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची तुफान विक्री –

 • गेली काही वर्षे भारतीय शेअर बाजार परदेशी गुंतवणूकदारांमुळे सतत वाढत गेला होता. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) कमकुवत जागतिक परिस्थितींमुळे आपल्या देशांत गुंतवलेले त्यांचे पैसे काढून घेण्याच्या मागे लागले आणि त्यांनी त्यांच्याकडच्या भारतीय शेअर्सची जोरदार विक्री करण्यास सुरुवात केली. 
 • जून महिना हा परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा करण्याचा सलग ९ वा महिना आहे. FII ने आतापर्यंत ३१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत. 

 

४.  बाजाराचे महागडे मूल्यांकन

 • कोरोना महामारीच्या काळातही, शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी जास्त परतावा दिला होता. २०२१ मध्ये सेन्सेक्स व निफ्टी या दोघांनीही अनेक विक्रमी उच्चांक गाठले होते.
 • तेव्हा अनेक विश्लेषकांनी सांगितले होते की भारतीय शेअर्सचे मूल्य इतर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. शेअर्सच्या किमती नफ्याच्या गुलाम असतात. कंपन्यांची आर्थिक कामगिरी व शेअर किंमत यांचे गणित व्यवस्थित जुळत नव्हते.
 • बाजारात असलेल्या जास्तीच्या तरलतेमुळे खूप जास्त पैसे कमी शेअर्सच्या मागे होते. बाजार कोसळल्याने अनेक शेअर्सचे मूल्यांकन आता आकर्षक झाले आहे. 

 

हे ही वाचा – Share Market : शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करताना गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

 

शेअर बाजाराचा “टोकाचे चढ उतार” हा अविभाज्य भाग आहे. तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले असतील आणि त्यांचेही भाव कोसळले असतील तर काळजी करू नका. चांगल्या कंपन्या दीर्घकाळात सर्वोत्तम परतावा देतातच. 

वॉरेन बफे यांचे पुढील वाक्य नेहेमी लक्षात ठेवा आणि निश्चिंत रहा – 

I will tell you how to become rich. Close the doors. Be fearful when others are greedy. Be greedy when others are fearful.” — Warren Buffett

 

तुमच्या अभ्यासपूर्ण शेअर्स खरेदीसाठी शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published.