Home Loan: लवकरात लवकर गृहकर्जातून मुक्त व्हायचे आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes

Home Loan

सर्वसामान्य माणूस घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) घेतोच. हे गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्याचे अनेक उपाय आहेत. यापैकीच एक म्हणजे गृहकर्जाचे Part Prepayment करणे, म्हणजेच जास्तीत जास्त रक्कम आपल्या कर्जखात्यामध्ये जमा करणे. पण हे  करताना काही महत्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. 

रविवारचा दिवस असल्याने मस्त चहा आणि शंकरपाळ्यांसोबत घरात चर्चा रंगली होती. बोलता बोलता चर्चेचा विषय गंभीर होत गेला आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात रवी काका उभे होते. निकीताने त्यांचे हसून स्वागत केलेले असले तरी वातावरणातील गंभीरता चाणाक्ष रवी काकांना लगेच जाणवली. 

निकिता आणि प्रवीण दोघेही नोकरी करणारे सुखवस्तू जोडपे. संसाराची गाडी सुरू झाली की एक एक गोष्टी घरात येत जातात. व्याप वाढत जातात. बर्‍यापैकी सगळे स्थावर झाल्यावर या दोघांनी जमवलेले पैसे डाउनपेमेंट म्हणून आणि उर्वरित रक्कम कर्ज काढून छानसे घर घेतले. दोघांची नोकरी उत्तम सुरू असली तरी, निकीताने पुढील काही काळात नोकरी सोडून काहीतरी व्यवसाय सुरू ठेवत घरच्या जबाबदाऱ्या घेण्याचे ठरवलेले. मात्र गृहकर्ज आहे तेवढे वर्ष तरी तिने नोकरी करणे आता गरजेचे झाले होते. हाच विषय निघाल्याने दोघे चिंतेत होते. 

रवी काका पडले मनकवडे! त्यांनी मस्त गप्पा सुरू केल्या आणि पुढच्या पाच मिनिटांमध्ये त्यांना चिंतेचे कारण समजले. तसे ते बोलायला लागले, अरे प्रवीण तू मागे म्हणाला होतास की तुला यावर्षी छान इनसेनटीव्ह मिळाला. काय केलेस बरे त्याचे.

“काका, अजून काहीच नाही केले फिक्स करायचेत. कुठे जास्त व्याज मिळेल पाहतो आहे.” प्रवीण उत्तरला.

तसे काका म्हणाले, “हे पहा आपल्या गृह कर्जाचे प्रीपेमेंट केलेत तर तुम्हाला व्याज देखील कमी लागेल आणि लवकर कर्ज मुक्त व्हाल”. “पण काका प्रिपेमेंट बद्दल आम्हाला फार काही माहीत नाही”, निकिता म्हणाली. 

काकांनी स्वतः याबद्दल खूप माहिती काढलेली असल्याने काकांनी सांगायला सुरुवात केली. 

हे नक्की वाचा: गृहकर्जाची वेळेआधी परतफेड करण्यापूर्वी या ८ गोष्टींचा विचार करा

Home loan: गृहकर्जाचे पार्ट प्रीपेमेन्ट 

  • प्रत्येकाकडे घराचे स्वप्न असते आणि प्रत्येकजण स्वतःच्या ऐपतीप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त पैसा लावून ते स्वप्न पूर्ण करत असतो. 
  • घर घेताना कर्जाचे हफ्ते फेडताना प्रत्येकालाच थोडाफार प्रमाणात त्रास होत असतो. 
  • आपल्या स्वतःच्या घरात आणि कर्ज नसताना राहणे म्हणजे कोणाला नाही आवडणार? पण स्वतःच्या हिमतीवर घर घेणार्‍या बर्‍याच जणांना या कर्जाचा फेरा काही चुकत नाही. 
  • आपल्या मिळकतीला अनुसरून सुलभ कर्जाचे हफ्ते घेतल्यास हे देखील सुकर होते. शिवाय झालेली बचत, मिळणारे बोनस ई. चा योग्य वापर करूनही आपण कर्ज, त्याची मुदत, व्याज यामध्ये उत्तम फायदा करून घेऊ शकतो. त्यासाठी गृहकर्जाचे प्रिपेमेंट कधी करावे, कसे करावे, करावे की नाही हे आपण पाहूया.
  • गृहकर्ज मुदतीआधी लवकरात लवकर फेडायचे (prepayment) अनेक मार्ग आहेत. आपण सुरुवातीपासूनच काही ठराविक रक्कम आगाऊ भरून आणि दरवर्षी त्यात हळूहळू वाढ करत जायची. केलेली बचत, मिळालेले बोनस आपण यासाठी वापरू शकतो. 
  • गृहकर्ज लवकरात लवकर फेडायचे नियोजन करताना आपल्याकडे आपत्कालीन निधीची तरतूद असणे गरजेचे आहे. कारण आरोग्य विषयक संकटामध्ये तसेच नोकरी/व्यवसायामधील अस्थिरता या सगळ्या बाबी लक्षात घेता ही तरतूद करून घेणे आणि त्यांनंतरच मुदतीआधी कर्जफेड करण्याबाबत विचार करणे योग्य ठरेल. 

विशेष लेख: Home Loan Transfer: गृहकर्ज हस्तांतरणाची योग्य वेळ कोणती?

Home loan: गृहकर्जाचे पार्ट प्रिपेमेंट करण्यापूर्वी विचारात घ्या या ४ गोष्टी 

१. कर्जफेड करणे आपल्याला फायद्याचे ठरते आहे ना हे तपासणे –

  • आपल्या कडे जेव्हा काही रक्कम असते तेव्हा ती फिक्स डिपॉझिट करून अथवा इतर गुंतवणूक करून आपल्याला उत्तम व्याज मिळून जास्त फायदा मिळतो की ती रक्कम आपले कर्जफेड करण्यासाठी वापरुन जास्त फायदा होतो हे विचारात घेऊन कर्जफेड करण्याचा निर्णय घ्यावा. 
  • उदा. – जर आपण 20 वर्षाच्या मुदतीमध्ये 50 लाखांचे गृहकर्ज 7.5% व्याजदराने घेतलेले असेल आणि 5 लाखांचा प्रिपे आपल्याला पाचव्या वर्षी करायचा असेल तर आपण 8.8 लाखाचे व्याज वाचवू शकतो. तेच सध्याच्या दराने जर आपण 5 लाख फिक्स केले तर आपणास सध्याच्या 5.4% व्याजदराने 15 वर्षाच्या शेवटी 6 लाख रुपये मिळतील. अर्थात इथे प्रिपे करणे फायद्याचे ठरेल.  

२. प्रत्येक वर्षी ठराविक प्रिन्सिपल रक्कम भरणे- 

  • यात आपल्या वार्षिक खर्चाची आधीच योजना करून ठेवून दरवर्षी आपल्या ईएमआय शिवाय काही निश्चित रक्कम प्रिन्सिपल रक्कम म्हणून भरत जायची. यामुळे देखील आपल्या कर्ज रकमेमध्ये बचत होते. 

३. आपल्या मासिक ईएमआय मध्ये वाढ करणे- 

  • आपला महिन्याच्या ईएमआयची जी काही ठराविक रक्कम आहे त्यापेक्षा जास्त रक्कम दर महिन्याला भरत गेल्यास आपल्याला आपले कर्ज लवकर फेडण्यास मदत होईल.

४. संपूर्ण कर्ज एकत्र फेडता येते –

  • अनेकदा असे होते की आपली आर्थिक परिस्थिति उत्तम रीतीने सुधारते, तर कधी आपली जुनी एखादी मालमत्ता विक्री केल्याने आपल्याकडे पैसे येतात. तर अशा वेळेस आपण आपले गृह कर्ज एकाच वेळी पूर्ण फेडण्याचा पर्याय निवडू शकता. 
  • मुदतपूर्व कर्ज फेडले तर आपले व्याज वाचते मात्र कर्जदाराला संपूर्ण प्रिपेमेंटसाठी दंड भरावा लागू शकतो.   

महत्वाचा लेख: Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा

इतके सगळे सांगून काका थांबले. आल्यावर जो आनंद काकांच्या चेहर्‍यावर होता तो आता निकिता आणि प्रवीणच्या चेहर्‍यावर दिसू लागला आणि हो लवकर कर्ज फेडू शकणार याचा विश्वासही ! 

गृहकर्जाबाबतीत प्रीपेमेंट ही अत्यंत महत्वाची बाब आहे. प्रत्येकाची परिस्थिती कालांतराने सुधारत जाते असे गृहीत धरले तर प्रत्येक जण प्रीपेमेंटचा फायदा घेऊ शकतो. मात्र असे करताना आम्ही वर सांगितल्या प्रमाणे भविष्यासाठी तरतूद करायचे नक्की लक्षात असू द्या. गृहकर्ज घेतलेल्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांना हा लेख आठवणीने वाचायला सांगा, धन्यवाद!

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Home loan Prepayment Marathi Mahiti, Home loan Prepayment in Marathi, Home loan Prepayment kase karal, 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.