सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes

आपलं रोज सकाळचं वर्तमानपत्र असो नाहीतर संध्याकाळच्या बातम्या; मुख्यत्वे दोनच महत्वाचे मुद्दे असतात, राजकीय पटलावरच्या घडामोडी आणि देशाची “सुधारणारी” नाहीतर “ढासळती” अर्थव्यवस्था. अर्थविषयक बातम्यांमध्ये एक सतत कानावर पडणारा शब्द म्हणजे, जीडीपी! आजच्या लेखात आपण याच ठेवणीतल्या संज्ञेविषयी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) बद्दल जाणून घेणार आहोत.    

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

सकल राष्ट्रीय उत्पन (Gross Domestic Product):

 • जीडीपी(ग्रॉस  डोमेस्टिक प्रॉडक्ट) ची पुस्तकी व्याख्याच करायची तर, “sum total of all goods and services produced in a country, expressed in money terms, during a specific period, generally an year”, म्हणजेच “एका ठराविक वर्षात, काही ठरविक काळात,  एखाद्या देशात निर्माण झालेले उत्पादन आणि सेवा यांचे पैशाच्या स्वरूपात मांडलेलं मूल्य.” 
 • एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्था आणि तिच्या परिणामकतेचं हे एक अतिशय महत्वाचं समग्र आर्थिक एकक आहे. 
 • अंतर किंवा वेग किंवा वेळ मोजण्यासाठी जसे जागतिक पातळीवर आपण मेट्रिक पद्धत वापरतो त्यानुसारच अर्थव्यवस्थेची तब्येत समजून घेण्यासाठी जीडीपी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरले जाणारे एक मानक आहे.  याचा थेट संबंध गरिबी, आरोग्य व्यवस्था, साक्षरता, बेरोजगारी अश्या अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या घटकांशी आहे. 
 • कोणतीही अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी तिच्या ‘जीडीपी’चा अभ्यास गरजेचं ठरतो.

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग २

‘जीडीपी’साठी आवश्यक माहिती कुठून येते?

 • ‘जीडीपी’चे महत्व समजून घेतल्यावर, तो कसा मांडला जातो/ केला जातो हेही समजून घेणं महत्वाचं आहे.  
 • ‘जीडीपी’ची गणना करताना अर्थव्यवस्थेच्या आठ महत्वाच्या विभागातून माहिती गोळा केली जाते, यात, कृषी; खाणकाम; उत्पादन; जंगले आणि मासेमारी; वीज आणि गॅस पुरवठा; बांधकाम, व्यापारउदीम, हॉटेल,वाहतूक आणि संपर्क; वित्त, स्थावर मालमत्ता क्षेत्र आणि विमा, व्यापारविषयक, सामाजिक आणि सार्वजनिक सेवा यांचा समावेश होतो. 

‘जीडीपी’चे प्रकार-

जीडीपी एक संकल्पना तशी क्लिष्ट असली तरी त्याची व्याख्या आणि प्रकारावरून आपल्याला त्याचा थोडा- बहुत अंदाज आला असेलच. बऱ्याचदा, सरासरी आणि करांच्या अप्रत्यक्ष मोजदाद वगैरे मधून बऱ्याचश्या त्रुटीही आढळतात. पण, आता जी माहिती आपण गोळा केली, तिच्या वापरावरून आणि आपल्या निकषांच्या आधारे, जीडीपी चे काही विशिष्ठ प्रकार पडतात. कोणते ते पाहू.  

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

१. रिअल जीडीपी (Real GDP) :

 • यात आपण एका प्रमाण वर्षावर आधारीत किंमत निश्चित करतो आणि मग जीडीपी मोजतो.
 • एका ठराविक प्रमाण वर्षाच्या तुलनेत उत्पादन आणि सेवा यांच्या प्रमाणात होणारे बदल यात आपल्याला तपासता येतात. त्यामुळे याला रिअल जीडीपी म्हटले जाते. 
 • भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हे प्रमाण वर्ष २०११ – २०१२ आहे. प्रत्येक नॅशनल अकाउंट्स डाटासेट जीडीपी बद्दल माहिती देताना ती दोन वर्षांच्या संदर्भाने देतो, चालू आर्थिक वर्ष आणि २०११ – २०१२. 

 २. नॉमिनल जीडीपी (Nominal GDP) :

 • जेव्हा सद्यस्थितीतील  बाजारमूल्यांच्या आधारे जीडीपी मोजला जातो, त्याला नॉमिनल जीडीपी म्हणतात.
 • यात सरकारी दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेची वाढ दर्शविली जाते आणि तुलनात्मक अभ्यासासाठी याचा फायदा होतो. 
 • या ‘जीडीपी’चा नागरिकांच्या रोजच्या जीवनमानावर थेट प्रभाव जाणवतो.
 • नॉमिनल जीडीपी / रिअल जीडीपी म्हणजे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स (CII). होलसेल प्राईज इंडेक्स(WPI) आणि कंन्स्युमर प्राईज इंडेक्स(CPI) बद्दलची माहिती याच CII मधून मिळविली जाते.

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- २ 

जीडीपी कसा मोजला जातो ?

जीडीपी मोजण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:

 • जीडीपी = खाजगी वापर+ एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात – आयात)
 • महागाई दराचा सूचक असल्या कारणाने, यामध्ये जीडीपी डिफ्लेटर अतिशय महत्वाचा असतो. 
 • जीडीपी डिफ्लेटर= {(नॉमिनल जीडीपी) / (रिअल जीडीपी) } * 100. 

जीडीपी चे विभागवार विभाजन 

१) कृषी :१७%

२) उद्योग :२९%

३) सेवा :३०%

आता यामध्ये महत्वाची आणि चिंतेची बाब अशी की कृषी क्षेत्रावर ५०% हुन अधिक भारतीय कार्य शक्ती उपजीविकेसाठी अवलंबून असताना तिचा जीडीपी मधील वाटा मात्र केवळ १७% आहे. 

गोषवारा:

 • २०१७ – १८ च्या शेवटच्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.७% च्या आसपास होता आणि त्या निकषाच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती.
 • भारतीय प्रसारमाध्यमे देखील तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य, बँकेचे एनपीए अश्या नकारात्मक आर्थिक निकषांवर बारकाईने लक्ष ठेऊन असते, पण $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याकरता नक्की काय करावे यावर फारशी कुठे चर्चा होताना दिसत नाही. बऱ्याचदा त्याबद्दलचा सूरही नकारात्मकच असतो. 
 • फास्ट फूड आणि ब्रेकिंग न्यूजच्या आजच्या जमान्यात, कोणत्याही नकारात्मक मुद्द्यावर, राजकारण आणि अनास्थेला दोष देणे खरेतर सोपे आहे, पण भारतासारख्या खंडप्राय महाकाय देशात, मुळात कोणताही निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याचे परिणाम दिसून येणे याला थोडातरी वेळ लागणारच, हेच आपण बऱ्याचदा विसरतो. 

आता हे खरे आहे की नव्या युगातल्या नव्या भारतीयांच्या इच्छा आणि अपेक्षा या जागतिक पातळीवरील तुलनेतून उत्पन्न झाल्या आहेत आणि एका अर्थी जीडीपी हे विकास आणि अपेक्षा यांचे देखील एकक आहे, पण त्याचमुळे कुठेतरी आपण आपले समाधान हरवत चालतोय का, अशी शंका येते. आणि त्याचमुळे जीडीपी सारखाच एक ग्रॉस हॅपिनेस प्रॉडक्ट नावाचे एकक आहे जे नागरिकांचे समाधान आणि आनंद मोजते, आणि गंमत म्हणजे, त्यात भुतानसारखा इवलासा देश पहिल्या स्थानावर आहे….!!

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]

One thought on “सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) म्हणजे काय?

 1. Dear Arthsakshar Team,
  Your information is very informative for all age group.
  Is there any magazine for monthly subscription for reading.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *