Insurance Repository: विमा भांडार म्हणजे काय?

Reading Time: 4 minutes

विमा भांडार (Insurance Repository)

जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा आपल्याला ऑनलाईन घेता येतो, हे माहिती झाले असलेच. या व्यवहारात कोणी मध्यस्थ नसल्याने त्याचा हप्ता काही प्रमाणात कमी असतो. विविध प्रकारच्या विमा पॉलिसी एकत्रित ठेवून त्याचे हप्ते वेळोवेळी नियमितपणे भरणे यात काही बदल असल्यास त्याची नोंद सर्व कागदपत्रावर करून घेणे हे थोडे त्रासाचे काम आहे. या पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेऊन त्या एकत्रीत साठवणे अलीकडच्या काही वर्षात (16 सप्टेंबर 2013पासून) शक्य झाले असून या सर्व योजनांचे करार आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विमा भांडारामध्ये (insurance repository) एकत्रित ठेऊ शकतो.

विमा भांडार (insurance repository) संदर्भात काही मूलभूत प्रश्नोत्तरे 

१. विमा भांडार (insurance repository) म्हणजे काय?

 • ही एक अशी संस्था आहे, जिची स्थापना कंपनी कायद्यानुसार झाली असून, त्यास विमा नियामकांची म्हणजेच IRDA याची मान्यता आहे. 
 • विमाकर्त्याने धारण केलेल्या सर्व प्रकारच्या विमा योजनांची नोंद घेऊन त्याचे करार येथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून ठेवले जातील. 

२. विमा भांडराची महत्वाची उद्दिष्टे कोणती?

 • विमा भांडाराची महत्त्वाची उद्दिष्टे म्हणजे सर्व प्रकारचे विमा करार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जतन करणे. 
 • विमाधारकास कराराच्या अनुषंगाने सोई पुरवणे. 
 • करारात लगेच व तत्परतेने बदल करणे काही सेवा उदा पत्यातील बदल, वारस नोंद /बदल, बँक तपशिलात बदल यासारख्या सेवा एकाच ठिकाणी जलद गतीने, तत्परतेने आणि पारदर्शकपणे देणे.

३. विमा भांडार म्हणून व्यक्ती अगर एखादी संस्था काम करू शकते का?

 • नाही, कंपनी कायद्यानुसार याच हेतूने स्थापन झालेली व नियामकांची मान्यता असलेली कंपनीच हे काम करू शकते.

४. विमा भांडार कंपनी विमा योजनांची मागणी / विक्री करू शकते काय?

 • नाही, याची निर्मिती केवळ विमा करार इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात साठवणे, त्याची नोंद ठेवणे आणि अनुषंगिक सेवा पुरवणे यासाठीच करण्यात आली आहे.

५. ई -इन्शुरंस खाते म्हणजे काय?

 • विमा भांडराकडे असलेले आपले विमा खाते म्हणजेच ई- इन्शुरंस खाते. 
 • यात विमाकर्त्याचा कंपनीशी झालेला विमाकरार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवला जातो. 
 • सध्या IRDA मार्फत चार कंपन्याना इन्शुरन्स रिपोजेटरी म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या पुढीलप्रमाणे
  • M/s NSDL Database Management Limited
  • M/s Central Insurance Repository Limited 
  • M/s Karvy Insurance Repository Limited
  • M/s CAMS Repository Services Limited
 • प्रत्येक इ- इन्शुरंस खात्याचा विशिष्ट ओळख क्रमांक असून त्यास वापरकर्ता ओळख (log in ID) आणि संकेतशब्द (Password) दिला जाईल.

६. हे खाते उघडण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी काही फी द्यावी लागेल का?

 • नाही, ही सुविधा पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी कोणतीही आकारणी करण्यात येत नाही.

७. एकाहून अधिक खाती उघडता येतात का?

 • नाही, एक व्यक्ती फक्त एकच खाते उघडू शकते.

८. विमा भांडार (insurance repository) पुरस्कृत मान्यताप्राप्त व्यक्ती म्हणजे कोण

 • मान्यताप्राप्त व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिची नेमणूक सेवा देण्यासाठी रिपोजेटरीने केली आहे. 
 • ही व्यक्ती विमाधारक व विमाकंपनी यांच्यामध्ये रिपोजेटरीच्या वतीने समन्वय साधेल. 
 • विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे दावे पूर्ण करून योग्य व्यक्तीस रक्कम मिळण्यासाठी मदत करेल.

९. ई-इन्शुरंस खाते उघडण्याचा अर्ज कुठे मिळेल.

 • हा अर्ज आपणास रिपोजेटरीच्या ऑफिसमध्ये, मान्यताप्राप्त व्यक्तीकडे,आपल्या विमाकंपनीकडे तसेच त्यांच्या संकेतस्थळावर मिळेल.

१०. ई-इन्शुरंस खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

 • खाते उघडण्याचा अर्ज, रहिवासी पुरावा, फोटो ओळखपत्र, रद्द केलेला एक चेक, पासपोर्ट साईज फोटो.

११. आपण कोणतीही जीवनविमा, सर्वसाधारण विमा योजना घेतली नसेल तरीही ई-इन्शुरंस खाते उघडता येते का?

 • हो. कोणतीही योजना न घेता असे खाते उघडता येईल.

१२. ई-इन्शुरंस खाते अर्ज दिल्यापासून किती दिवसात उघडले जाते? ते उघडले आहे हे कसे ओळखायचे?

 • पूर्ण कागदपत्रासोबत अर्ज सादर केल्यानंतर 7 दिवसात खाते उघडले जाईल. 
 • खाते उघडणाऱ्या व्यक्तीस त्याचा 13 अंकी खाते क्रमांक, वापरकर्ता ओळख व संकेतशब्द देण्यात येईल. 
 • तो मिळाल्यावर आपले इ- इन्शुरंस खाते उघडले गेले आहे असे समजावे.

१३. आपल्या पूर्वीच्या कागदी स्वरूपातील पॉलिसी या खात्यात जमा करता येतील का?

 • हो, त्याचप्रमाणे नवीन योजना थेट या खात्यात घेता येतील. 

१४. कोणत्या विमा योजना या खात्यात घेता येतील?

 • सर्व नवीन जीवन विमा, आरोग्य विमा, पेन्शन योजना, जुन्या योजना ज्यांनी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये या योजना उपलब्ध करून देण्याचे रिपोजेटरीला मान्य केले आहे. 
 • योजना खात्यात जमा झाल्याचा मेल व एस एम एस खातेदारास पाठवण्यात येईल.
 • योजनेचा सर्व तपशील म्हणजे योजनेची स्थिती, घेतल्याची तारीख, परिपक्वतेची तारीख, अटी शर्ती, नामनिर्देशन यासारख्या गोष्टी त्यात नमूद असतील याशिवाय खातेधारकास त्याची इच्छा असल्यास योजनेची एक प्रत डाऊनलोड करून घेण्याची सुविधा असेल.

१५. आपले ई-इंश्युरन्स खाते असल्यास पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेण्यासाठी काय करावे?

 • जर आपले असे खाते आधीच काढलेले असेल तर कोणतीही नवीन योजना ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेताना अर्ज करताना त्यात पॉलिसी मिळवण्यासाठी आपल्या इ-इन्शुरंस खाते क्रमांक टाकावा म्हणजे पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळेल. 

१६. पॉलिसी इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात घेतल्याचे फायदे कोणते?

 • सुरक्षितता- फाटणे, हरवणे, गहाळ होणे यापासून संरक्षण. याशिवाय जरुरी असल्यास पॉलिसी कागदी स्वरूपात डाऊनलोड करून घेण्याची सोय आहे.
 • सुविधाजनक – सर्व प्रकारच्या विमा योजना एकत्रित असल्याने त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे. एक ठिकाणी अर्ज देऊन सर्व ठिकाणी बदल करता येणे शक्य.
 • किमान कागद वापर वेळेत बचत नवीन योजना देताना वेगळी KYC (आपला खातेदार ओळखा) देण्याची गरज नाही.
 • वर्षातून एकदा सर्व तपशिलासह खातेउतारा मिळण्याची सोय, याशिवाय कधीही ऑनलाईन खाते पाहण्याची सोय.
 • सर्व योजनांचे हप्ते ऑनलाईन भरण्याची तसेच बँकेतून परस्पर हप्ता कापून घेण्याची सुविधा यामुळे पॉलिसी बंद होण्याची भीती नाही. याचप्रमाणे मिळणारी रक्कम नियोजित वेळी परस्पर बँकेत जात असल्याने वेळेची बचत.

१७. पॉलिसीसंबंधी सेवा मिळवण्यासाठी कोणाशी संपर्क करायचा? 

 • खात्यात असलेल्या पॉलीसीसाठी रिपोजेटरीकडे त्याचप्रमाणे विमाकंपनीशीही संपर्क साधता येईल.
 • खातेदाराचा अधिकृत प्रतिनिधी कोण आणि त्याची भूमिका कोणती?
 • या खात्यासाठी प्रत्येक खातेदार एका व्यक्तीची आपल्या मृत्यूपश्चात खाते व्यवहारपूर्तता करण्यास नेमणूक करू शकतो.
 • जर खातेदाराच्या मृत्यू झाल्यास त्याच्या वतीने सर्व मागणी दावे त्याच्या रिपोजेटरीकडे त्याच्या अधिकृत प्रतिनिधीस सादर करता येतील. 
 • यासाठी धारकाचा मृत्यूदाखला आणि स्वतःची ओळख पटवून द्यावी लागेल. इ-इन्शुरंस खात्याचा वारस आणि खातेदाराचा अधिकृत प्रतिनिधी एकच अथवा वेगवेगळे असू शकतात. यांच्या नावात खातेदारास बदल करण्याचा अधिकार आहे.

१८. खातेदारास मिळणाऱ्या इतर सुविधा कोणत्या?

 • एका रिपोजेटरी कडून दुसऱ्या रिपोजेटरीकडे जाण्याची सोय.
 • पॉलीसी कागदी स्वरूपात घेऊन खाते बंद करण्याचा अधिकार.
 • खात्यासंबंधीत असलेल्या तक्रार निवारणाचा अधिकार.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!