Reading Time: 3 minutes

कंपनी एकत्रीकरण आणि विभाजन म्हणजे काय? याबद्दल प्राथमिक माहिती आपण मागील लेखात घेतली. कंपनी विभाजन झाल्यास त्यांच्या विविध व्यवसायांचे विविध नवीन कंपनीत रूपांतर होते. यात मूळ कंपनीची मालमत्ता विभागली जाऊन त्याचे हसत्तांतर होत असले तरी कायद्याच्या दृष्टीने ती एक व्यावसायिक सोय असून त्यातून कोणताही आर्थिक लाभ झाला असे समजले जात नाही.

असे विभाजन विविध प्रकारे होऊ शकते. उदाहरणार्थ

*अ या कंपनीचे वाहतूक आणि फायनान्स असे दोन व्यवसाय आहेत यातील वाहतूक व्यवसाय कंपनीस वेगळा करायचा आहे अशावेळी वाहतूक व्यवसाय नवी स्वतंत्र कंपनी स्थापन केली तिचे नाव ब समजू यात मूळ कंपनी तशीच राहून त्याचा फायनान्स व्यवसाय तसाच राहील तर त्याच कंपनीचा वाहतूक व्यवसाय नव्या वेगळ्या कंपनीकडे आला. याला स्पिन ऑफ असे म्हणतात म्हणजे एका व्यवसायातून निर्माण झालेला दुसरा व्यवसाय यासाठी दुसरी स्वतंत्र कायदेशीर स्थान असलेली स्वतंत्र निर्मिती केली गेली यात मूळ कंपनीचे अस्तीत्व कायम राहिले.

*जर अ या अस्तीत्वात असलेल्या कंपनीतील 2 व्यवसाय ब आणि क या दोन स्वतंत्र कंपनीची निर्मिती करून त्याच्याकडे गेले तर त्यास व्यवसायाची  विभागणी झाली असे समजतात यात मूळच्या अ या कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व न राहता ब आणि क या दोन वेगळ्या स्वतंत्र कंपन्या निर्माण होतील.

*जर अ या कंपनीने तिच्या एका विभागाचा व्यवसाय स्वतंत्र व्यवसायिकाकडे बी उपकंपनीमार्फत हस्तांतरित केला त्यातील समभागांची प्राथमिक विक्री केली तर अशा कंपनीवर सर्वाधिक मालकीहक्क हे अ या कंपनीचेच असतील.

याप्रकारे जरी व्यवसाय विभागणी होत असताना मालमत्ता हसत्तांतरीत होत असेल तरी त्यास विक्री समजले जात नाही.

साधारण तीन वर्षांपूर्वी इंडिया इन्फोलाईन कंपनी लिमिटेड या मूळ कंपनीचे तीन कंपन्यात विभाजन झाले-

आयआयएफएल वेल्थ

आयआयएफएल फायनान्स

आयआयएफएल सिक्युरिटीज

या तीन स्वतंत्र कंपन्या निर्माण झाल्या हे होत असताना मूळचे इंडिया इम्फोलाईन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डरचे मूळ शेअर रद्द होऊन त्या ऐवजी वरील कंपन्यांचे पुस्तकी मूल्यानुसार प्रमाणशीर शेअर्स मिळाले.

हेही वाचा – Future Valuation Of Technology Stock : आयटी कंपन्यांचे मूल्यमापन करताना विचारात घ्या  गोष्टी

  यासर्वात मालमत्ता हस्तांतरण होऊन विभागली गेली असली तरी यात कोणतीही विक्री झाली असे समजण्यात येत नसल्याने कंपनी आणि भागधारक याच्या दृष्टीने कोणतीही करदेयता उद्भवत नाही. उलट अनेक प्रकरणात कंपनीस करविषयक फायदेशीर होईल अशीच विभागणी होते. अशा विभागणीस करविरहित विभागणी असे म्हणतात. त्याचप्रमाणे एकत्रीकरण किंवा विलीनीकरण असेल तर मिळालेल्या शेअरचे खरेदीमूल्य हे मूळ कंपनीचे खरेदीमूल्य असेल. याप्रकरणी शेअरहोल्डरच्या दृष्टीने जेव्हा शेअर्स विकले जातील तेव्हाच करदेयता निर्माण होईल. यातून होणारा नफातोटा हा भांडवली नफातोटा समजला जाईल. विभाजन झालेली मूळ कंपनी वर सांगितलेल्या प्रकारातून अस्तीत्वात असेल किंवा नसेल तरी मिळालेले शेअर्स जरी कंपनी अस्तित्वात आल्यावर मिळाले असतील तरी ते जेव्हा खरेदी केले त्याच दिवशी घेतले असे समजण्यात येऊन जर एक वर्ष पूर्ण झाले नसेल तर अल्पमुदतीचा आणि एक वर्ष पूर्ण झाले असल्यास दीर्घ मुदतीचा भांडवली नफातोटा होईल. याशिवाय ज्यांनी हे शेअर्स 31 जानेवारी 2018 किंवा त्यापूर्वी खरेदी केले असल्यास आयकर विभागाने देऊ केलेल्या ग्रॅण्डफादरिंग सवलतीचा लाभ घेता येतील. या शेअर्सवरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त होता त्याची भरपाई या सवलतीतून मिळू शकते.

      आपल्या शेअर्सची खरेदी तारीख यातून सहज समजेल पण ते शेअर्स शेअरबाजारातून खरेदी केले असतील तर त्याचे मूल्य व्यक्तीनुसार बदलेल. ते कसे काढायचे, ते पाहू. आपल्याला माहिती आहेच की विभाजन होईल ते त्याच्या पुस्तकी मूल्याचा विचार करून केले जाते. यामुळे अस्तीत्वात असलेल्या प्रत्येक कंपनीच्या पुस्तकीमूल्यात फरक पडेल. विभाजनाने प्रत्येक कंपनीच्या मालमत्तेत आणि देयतेत फरक पडेल. ही विभागणी कशी झाली हे कंपनीकडून जाहीर केले जाते याच पद्धतीने आपली खरेदी किमतीची प्रमाणशीर पद्धतीने विभागणी करावी. यातून मिळणारी किंमत ही त्या शेअर्सची खरेदी किंमत समजून त्याप्रमाणे भांडवली नफातोटा मोजावा. 31 जानेवारी 2018 पूर्वी घेतलेल्या शेअर्सच्या बाबतीत आपली खरेदी किंमत ही 31 जानेवारी 2018 ची सर्वोच्च किंमत विचारात घेऊन प्रमाणित पद्धतीने विभागता येईल.

विभाजनाचे फायदे-

★प्रमुख व्यवसायाकडे लक्ष देता येते: व्यवसायाची विभागणी झाल्यामुळे प्रत्येक कंपनीस आपल्या मुख्य व्यवसायाकडे लक्ष देता येईल.

★कर्जभार कमी होतो: मालमत्ता आणि देयता याची विभागणी झाल्याने प्रत्येक कंपनीचा कर्जभार कमी होतो.

★नवे गुंतवणूकदाराना आकर्षण : व्यवसाय विभागणी झाल्याने नवे गुंतवणूकदार विशिष्ट कंपनीकडे आकर्षित होऊ शकतात.

★भागधारकांच्या मालमत्तेत वाढ: योग्य पद्धतीने विभागणी झाल्यास बाजारमूल्य वाढते त्यामुळे भागधारकांच्या मालमत्तेत वाढ होते.

हेही वाचा – Mutual fund asset management  : म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापनासंदर्भात घ्या महत्वाचे निर्णय

सर्वसाधारणपणे योग्य विभाजनामुळे भागधारकांचा फायदाच होतो परंतू रिलायन्स इंडस्ट्रीजने पूर्वी अयोग्य पद्धतीने विभाजन करून आपल्या भागधारकांस 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स देऊ केले होते त्यामुळे भागधारकांचा विशेष फायदा झाला नाही. अनेकदा करात सवलती मिळवण्यासाठीही अशी व्यवसाय विभागणी केली जाते तेव्हा विभाजन होणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करताना या गोष्टींचा सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.

©उदय पिंगळे

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळात असून लेखातील मते वैयक्तिक समजावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutesमाझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutesतुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutesडिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…