गृहलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष (भाग १)

Reading Time: 3 minutes

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते

गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।

भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥

नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. पुराणांमध्ये देवीच्या अनेक रूपांचे वर्णन आढळते. विद्येची देवता सरस्वती, अर्थ म्हणजेच पैशाची देवता लक्ष्मी, राक्षसांचा नाश करून भक्तांची सुटका करणाऱ्या दुर्गा, काली, महिषासुरमर्दिनी देवीची अशी अनेक रूपे स्री किती सक्षम आहे हे सिद्ध करतात. देवीचे नऊ हात स्त्रीमध्ये उपजत असलेली ‘मल्टिटास्किंगच्या’ क्षमतेचे प्रतिक आहेत. पुराणांमध्ये स्त्रीच्या सक्षमतेचा उल्लेख असूनही आजच्या काळातली स्त्री मात्र म्हणावं तेवढी सक्षम झाली नाही. बंधनं झुकारून स्वातंत्र्य तर मिळाले पण तिच्यामध्ये सक्षमता आली का?  

ज्या विद्येची देवता स्त्री आहे त्या विद्येपासून अनेक वर्ष दूर राहिलेल्या स्त्रीने आज शिक्षणक्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी स्त्री कधी काली तर कधी दुर्गेचे रूप धारण करते. आपल्या मेहनतीच्या व हुशारीच्या जोरावर तिने लक्ष्मीलाही प्रसन्न करून घेतले आहे. ती अर्थाजनासाठी घराबाहेर पडते. पण तरीही ती संपूर्णपणे सक्षम नाही. असे का?  ज्या भारत देशात स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपांना साक्षात देवीचे नाव  देण्यात आले आहे त्या देशातील स्त्रीयांचा देशाच्या जीडीपी(GDP) मधील वाटा फक्त १७% आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा (३७%) निम्म्याहूनही कमी आहे (संदर्भ – मॅकिन्से स्टडी, २०१७).

आज एकविसाव्या शतकातही अनेक स्त्रीया स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. दुर्दैवाने यामध्ये उच्चशिक्षित महिलांचे प्रमाण जास्त आहे. अगदी उच्चपदावर काम करणाऱ्या अनेक स्त्रीयांचे आर्थिक निर्णय त्या स्वतः घेतातच असं नाही. आर्थिक नियोजनाला गांभीर्याने घेणाऱ्या स्त्रीयांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. 

“मुलगी शिकली प्रगती झाली”

“एक स्त्री सज्ञान झाली तर संपूर्ण कुटुंब सज्ञान होतं” 

काही वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या वाक्ये जाहिरातींमध्ये वापरली जायची. आजकाल दहावी, बारावी, जेईई, यासारख्या परिक्षांचा निकाल बघता बहुतांश वेळा मुलींचेच वर्चस्व दिसून येत आहे. उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. परंतु याच उच्चशिक्षित मुलींपैकी फारच कमी मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. तसंच आर्थिकदृष्ट्या सज्ञान असणाऱ्या मुली मात्र आर्थिक नियोजनासाठी जेव्हा दुसऱ्यावर म्हणजेच नवरा, वडील किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीवर अवलंबून रहातात तेव्हा मात्र खेद वाटतो.

खाली दिलेली दोन उदाहरणे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं व आर्थिक नियोजन करणं किती महत्वाचं आहे हे स्पष्ट करतात.

उदाहरण १ : 

सारा राजेशचा घरच्यांच्या मर्जीविरुद्ध केलेला प्रेमविवाह. दोघही सॉफ्टवेअर इंजिनिअर. दोघांनाही लाखाच्या वर पगार. स्वतःचा मोठा फ्लॅट व सेडान क्लास गाडी सारं काही होतं. मुलाच्या जन्मानंतर साराने स्वखुशीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. दोन वर्ष व्यवस्थित गेली. एक दिवस अचानक राजेशला अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू. पतीच्या आर्थिक गुंतवणुकींची व व्यवहारांची काहीच कल्पना साराला नव्हती. राजेशच्या विमा पॉलिसी लग्नापूर्वीच घेतलेल्या असल्यामुळे त्यावर नॉमिनी म्हणून त्याच्या आईचे नाव होते. त्याच्या आईने राजेशच्या विम्याच्या पैशांपैकी एकही पैसा साराला मिळू दिला नाही. राजेशच्या इतर गुंतवणूकींबद्दल तिला फारशी माहिती नव्हती. राजेशच बॅंक खाते, पीएफ इत्यादीचा पैसा फारफार तर दोन वर्षांसाठी कर्जाचे हप्ते व दैनंदिन आयुष्य जगायला पुरला असता. पण पुढे काय? दोन वर्ष घरीच असल्यामुळे पुन्हा नोकरी करायची तर तिला काही हजार पगारापासून सुरुवात करावी लागणार होती. उच्चभ्रू जीवनशैलीची सवय झालेल्या साराला एवढ्या कमी पैशात जगणं खूप कठीण जाणार होतं. 

इंजिनिअर असणाऱ्या, लाखाच्या घरात पगार घेणाऱ्या साराने कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाबाबत मात्र कधीच जाणून घेतलं नव्हतं वा त्याचा गांभीर्याने विचारही केला नव्हता.

निल्सन आणि डीएसपी ब्लॅकरॉक सर्वेनुसार ज्या महिला स्वतःच अथवा कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करतात अशा महिलांमध्ये घटस्फोटीत (७३%) व विधवा( ६८%) महिलांच प्रमाण कुमारी म्हणजेच सिंगल महिला (१८%) व विवाहित महिलांच्या(१३%) प्रमाणात कितीतरी पटिने जास्त आहे. याचाच अर्थ आर्थिक नियोजन करण्यावाचून पर्याय नसल्यामुळे महिला या नियोजनाचा विचार करतात अन्यथा हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नसतो. 

उदाहरण 2 :  

नेत्रा एक यशस्वी आर्किटेक्ट. एका नामांकित आर्किटेक्चर फर्म मध्ये चांगल्या पगाराची नोकरी. पण आर्थिक नियोजनाच्या बाबतीत बोलायचं तर “एफ.डी” व “आर.डी” सोडून इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही. म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, इत्यादींबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. कारण तिच्या उत्पन्नाच्या आर्थिक नियोजनाबाबतचे तिचे सर्व निर्णय तिचे वडिल घेत असत व पारंपारिक(Traditional) गुंतवणूक वगळता इतर कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करणं त्यांना जोखमीचं वाटत होतं. 

चार वर्षांनंतर तिच्यापेक्षा कमी पगार घेणारे तिचे सहकारी जेव्हा बॉंड, म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणूकीतून कितीतरी पटीने जास्त फायदा मिळवत असल्याचं तिने पाहिलं तेव्हा मात्र तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. 

एमआर्क (M.Arch) असणारी, लाखाच्या घरात पगार घेणारी नेत्रा स्वतःच्या आर्थिक नियोजनाबाबत मात्र गांभीर्याने विचार करत नव्हती. 

एका इंग्रजी वृत्तपत्रामधील सर्वक्षणानुसार ९२% उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिला आर्थिक नियोजनासाठी वडील किंवा नवऱ्यावर अवलंबून असतात. त्यापैकी ८३% महिलांना एफडी, आर.डी, पोस्ट ऑफिस डिपॉझीट सोडून इतर गुंतवणूकींचे पर्यायही माहिती नव्हते. तसच कर्जाचा मासिक हप्ता(EMI) कशाप्रकारे ठरवला जातो, उत्पन्न कराबद्दलच्या (Income tax)तरतुदी, मृत्यूपत्र, इन्श्युरंस याबद्दलची माहिती असणाऱ्या महिलांचे प्रमाणही अत्यल्प आहे. 

हे आकडे खरोखरच चिंताजनक आहेत. मुळात आर्थिक नियोजन करणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यातही ज्या आहेत त्यांचाही  गुंतवणूकीचे पारंपारिक पर्याय वापरण्याकडे कल जास्त आहे. यामधून फारच कमी उच्चशिक्षित महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत हे स्पष्ट होतंय. 

महिला आणि आर्थिक सक्षमता व स्वातंत्र्य:

सामाजिक मानसिकता: 

  • आपल्या समाजाची मानसिकता अशा प्रकारे तयार झाली आहे की अर्थार्जन व नियोजन ही फक्त पुरुषांची जबाबदारी आहे. 

  • आजही पालक मुलाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं म्हणून त्याला प्रोत्साहन देतात. पण याचवेळी मुलींना मात्र तितक्या गांभीर्याने याबद्दल सांगितले जात नाही.

  • लहानपणापासूनच मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यापेक्षा लग्नासाठी/ चांगला मुलगा मिळावा या उद्देशाने शिकवलं जातं. 

पुरुष- प्रधान संस्कृती:

  • वर्षानुवर्षे चालत आलेली पुरुष-प्रधान संस्कृती महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यास फारशी उत्सुक नसते. 

  • विवाहाच्या वेळी मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्त हवा ही अपेक्षा म्हणजे या संस्कृतीचाच एक भाग आहे. 

  • आर्थिक सक्षमता असूनही निव्वळ स्त्रीवर वर्चस्व गाजविण्यासाठी तिच्या पगारावर अधिकार सांगितला जातो. त्यामुळे आर्थिक नियोजनाचा विचार करायलाही अशा महिलांना भिती वाटते.

स्रीची मानसिकता: 

  • कुटुंबवत्सलता ही स्त्रीला निसर्गाकडून जन्मजात मिळालेली भावना आहे. 

  • या भावनेमुळेच अनेकदा स्त्री पतीच्या अथवा भावंडांच्या करिअरसाठी, मुलांसाठी  स्वतःच्या करिअरचा त्याग करते. 

क्रमश:

(चित्रसौजन्यः https://bit.ly/2PlpG8H)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!