Air transport Sector : तयारी हवाई वाहतूक क्षेत्राच्या ‘टेक ऑफ’ ची

Reading Time: 4 minutes

Air transport Sector

मार्च महिन्यात एक कोटीवर भारतीय नागरिकांनी विमान प्रवास केला, याचा अर्थ कोरोनानंतर ही सेवा पूर्वपदावर आली आहे. या क्षेत्रात अलीकडे अशा काही घटना घडत आहेत की ते मोठी झेप घेण्यास सज्ज झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, जलद प्रवास आणि रोजगार वाढ – अशा सर्वच दृष्टीने या घडामोडी महत्वाच्या आहेत.

एकेकाळी अतिश्रीमंत नागरिकांचाच विमान प्रवासाशी संबंध येत होता. पण आता अनेक मध्यमवर्गीय नागरिक विमानाने प्रवास करू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढली, असून ते नवी झेप घेण्यास सज्ज झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका या क्षेत्राला बसला आणि या क्षेत्राचे आता कसे होणार, अशी चिंता निर्माण झाली. पण जेव्हापासून प्रवासावरील निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घेतले जाऊ लागले. तेव्हापासून भारताअंतर्गत हवाई वाहतूक नवनवे उच्चांक प्रस्थापित करू लागली आहे. गेल्या तीन चार महिन्यातील या क्षेत्रातील घटना देशाच्या दृष्टीने अतिशय उत्साहवर्धक अशा आहेत.

 

हेही वाचा – Mutual fund asset management  : म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापनासंदर्भात ‘हे’ घ्या महत्वाचे निर्णय

 

मार्चमध्ये एक कोटी प्रवासी

आगामी चार वर्षांत एअरपोर्टची बांधणी आणि विकास यासाठी तब्बल १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. देशातील विमानतळांची संख्या याकाळात सध्याच्या १४१ वरून २०० होईल, अशी माहिती अलीकडेच हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे आकडे खूप महत्त्वाकांक्षी वाटतात, हे खरे असले तरी या क्षेत्रात ज्या हालचाली सध्या सुरु आहे, ते लक्षात घेता ही आकडेवारी वास्तवदर्शी म्हणता येईल. गेल्या आठ वर्षात ६७ नवी विमानतळे देशात सुरु झाली आहेत, हे लक्षात घेता आणि सध्या सुरु असलेली कामे पाहता २०० हा आकडा भारतासारख्या मोठ्या देशासाठी जास्त नाही. रविवारी, १६ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल चार लाख सात हजार नागरिकांनी विमान प्रवास केला, यावरून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात येते. मार्च २२ मध्ये एक कोटी सहा हजार नागरिकांनी विमान प्रवास केला, जो फेब्रुवारी २२ पेक्षा २२ लाखांनी अधिक होता. विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय चांगला व्हायचा असेल तर प्रत्येक विमानात विशिष्ट प्रवासी बसले पाहिजेत. या निकषाचा विचार करता मार्चमधील लोड ८० टक्के इतका राहिला आहे. अर्थात, कोरोनानंतर नागरिक घराबाहेर फिरण्यासाठी आतुर असून त्याचा फायदा सध्या हवाई वाहतुकीसह पर्यटन क्षेत्राला मिळतो आहे.

 

नव्या विमान कंपन्या रांगेत

इंडिगो, स्पाईसजेट, विस्तारा, गो फस्ट, एअर इंडिया आणि एअरआशिया या देशातील प्रमुख कंपन्या असून त्या त्यांची सर्व क्षमता वापरून सध्या सेवा देत आहेत. एवढी स्पर्धा असूनही सर्वाना प्रवासी मिळत असतील तर या क्षेत्रात अजून संधी आहे, असा संदेश नव्या गुंतवणूकदारांनी घेतला, तर काही नवल नाही. या क्षेत्रात उतरायचे तर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. विमान कंपन्या संकटात सापडण्याच्या घटना जगात घडत असताना भारतात या क्षेत्रात नव्या कंपन्या उतरत आहेत, यावरून भारतातील संधीची कल्पना येते. भारतातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आकाश एअरलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला असून तिची सेवा यावर्षी पुढील दोन तीन महिन्यात सुरु होईल. जेट एअरवेज कंपनी २०१९ मध्ये बंद पडली, पण ती नव्या गुंतवणूकदारांनी विकत घेतली.  तिची सेवा येत्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, असे जाहीर झाले आहे. या कंपनीत नव्याने एक हजार ३५० कोटी रुपये टाकण्यास गुंतवणूकदार तयार झाले आणि फ्लायबिग, स्टार एअर आणि ट्रूजेट अशा नव्या कंपन्या रांगेत आहेत, यावरून या क्षेत्रातील संधीची कल्पना येते.

 

हेही वाचा – Term insurance : सर्वात स्वस्त टर्म इन्शुरन्स प्लॅन फायदेशीर आहे का?

 

रोजगारवाढीसाठीही महत्वाचे क्षेत्र

भारताच्या आकाशात सध्या ८०० मोठी आणि १५० छोटी विमाने उडतात. प्रवासी वाढल्यामुळे त्यांच्या फेऱ्या वाढत आहेत, याचा अर्थ त्यासाठी पायलट लागणारच. पण तेवढे पायलटच सध्या उपलब्ध होत नाहीत. कारण भारतात साधारण ४०० ते ६०० पायलट दरवषी कमर्शियल पायलटचे शिक्षण पूर्ण करतात. पण आगामी काळात दरवर्षी १५०० ते २००० पायलट लागणार आहेत. पायलटचे शिक्षण घेण्यासाठी अनेकांना परदेशात जावे लागते. कारण त्या प्रकारचे शिक्षण देणाऱ्या संस्था देशात कमी आहेत. त्याचे कारण त्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक होय. या दीड दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी ४० ते ५० लाख रुपये लागतात. ही रक्कम खर्च करणारे नागरिक किती असणार? त्यामुळे अनेकदा भारतीय विमाने विदेशी पायलट उडवताना दिसतात. एका विमानाला दोनच पायलट लागतात, पण ती सेवा देण्यासाठी शेकडो कर्मचारी काम करत असतात. त्यामुळे  या क्षेत्रात रोजगार वाढीच्या संधी पाहता त्यादृष्टीनेही त्याला महत्व आहे. याचा अर्थ हवाई वाहतूक क्षेत्रात जाण्यासाठीचे शिक्षण मुलांना देण्याची गरज आहे.

हवाई वाहतूक क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी

  • भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी – इंडिगोने कतार एअरवेजशी करार केला, त्यानुसार दोहा ते दिल्ली, मुंबई, हैद्राबाद प्रवासात या दोन कंपन्या एकमेकांना सहकार्य करणार आहेत. (कोड शेअरिंग) ही सेवा सोमवारपासून (ता. २५) सुरु होते आहे. तर दोहा ते चेन्नई, बंगळूरू, कोची, कोझीकोड ही सेवा ९ मे पासून सुरु होते आहे. कतार एअरवेज भारतातून आठवड्याला १२ शहरांतून १९० उड्डाणे करते तर इंडिगो दोहाहून भारतीय आठ शहरांत आठवड्याला १५४ उड्डाणे करते, यावरून या कराराचे महत्व लक्षात येते.
  • स्पाईसजेटने २७ मार्चपासून नव्या ६० फेऱ्या सुरु केल्या असून त्यात उडाण योजनेतील छोट्या शहरांचाही समावेश आहे.  कंपनीची काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात सुरु होत आहेत.
  • हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी आतापर्यंत फक्त लष्करी विमानांची बांधणी करत होती, पण तिने आता नागरी विमानांची निर्मिती सुरु केली आहे. असे देशी बनावटीचे पहिले विमान (डोर्नियर २२८) आसामचे दिब्रुगढ ते अरुणाचलच्या पासीघाट दरम्यान सुरु झाले आहे. सरकारी अलायन्स ही कंपनी ही सेवा देते आहे. आसामच्या लीलाबारी येथे विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणारी संस्था एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु झाली आहे.
  • काश्मीरमध्ये यावर्षी विक्रमी पर्यटक गेल्याचे आपण वाचले. त्यात हवाई वाहतुकीचा किती वाटा आहे पहा. २९ मार्च रोजी श्रीनगर विमानतळावर १५ हजार १४ प्रवाशांची ये – जा झाली. या विमानतळावर आता दररोज १०२ विमान फेऱ्या होत आहेत.
  • ईशान्य भारत हा भारताच्या मुख्य भूमीपासून लांब तसेच काही भाग दुर्गम आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी हवाई वाहतुकीचा विस्तार करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन त्या भागासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून तेथे पुढील तीन वर्षात १८ धावपट्ट्या तयार केल्या आहेत. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर होणार आहे.
  • गुजरात आणि महाराष्ट्रात विमान सेवा वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे लक्षात घेऊन या दोन्ही राज्यात नवी विमानतळे होत आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया आणि कोकणात चिपी येथे अशातच विमानसेवा सुरु झाली आहे. तर शिर्डी येथील विमानफेऱ्या वाढू लागल्या आहेत. गुजरातमध्ये अलीकडेच केशोद येथे विमानसेवा सुरु झाली.

 

हेही वाचा – Akasa Airline: राकेश झुनझुनवाला सुरु करणार सर्वात कमी किमतीची विमान सेवा

 

हवाई वाहतूक क्षेत्रातील पमुख लिस्टेड कंपनी आणि त्यांचे बाजारमूल्य

 कंपनीचे नाव बाजारमूल्य (३० एप्रिल २२)
–    इंडिगो ७१,५८४ कोटी रुपये
–    स्पाईसजेट ३३०६ कोटी रुपये
–    जेट एअरवेज ९९९ कोटी रुपये
–    ग्लोबल व्हिक्टरा ७४ कोटी रुपये
–    जेट फ्राईट लॉजिस्टिक ७२.५६ कोटी रुपये
–    जीएमआर इन्फ्रा २२ हजार ७२५ कोटी
–    अदानी इंटरप्रायझेस २,५६,६७५ कोटी रुपये (अंशतः हवाई क्षेत्रात)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.