Save Tax
Save Tax
Reading Time: 4 minutes

 How To save your Tax 

कर भरणे हे कुणालाच आवडत नाही प्रत्येकाला कमीतकमी कर जावा असे वाटत असते. मात्र, हे सरकारच्या उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे सरकारकडून कर आकारणीच्या नवनवीन संधी शोधल्या जातात. अनेक संघटित असंघटित गटांचा त्यास विरोध असतो आणि सरकारवर ते दबाव आणतात जर काही सवलती दिल्याच तर त्याची भरपाई अन्य ठिकाणाहून करण्यात येते. यामुळे काही जण नाराज होऊ शकतात. या सर्वाचा समतोल राखणे हे कौशल्याचे काम आहे. सरकार आपले आहे हे प्रत्येकास वाटले पाहिजे हा यामागील सुप्त हेतू आहेच. कर आकारणीत सरकार ज्या सवलती देते त्यांचा वापर करून कर कमी करता येऊ शकतो यालाच करनियोजन असे म्हणतात. आयकर कायद्यात अशा अनेक संधी आहेत ज्याचा चतुर करदाता वापर करून घेऊन करबचत करू शकतो. अशी करबचत म्हणजे करचुकवेगिरी नसून कायद्यातील तरतुदींचा वापर करून कर कमी करण्याचे न्याय्य मार्ग आहेत. अशाच काही वेगळ्या मार्गांचा आपण विचार करूयात.

हेही वाचा – Tax Planning: आपण स्वतः कर नियोजन करावे का ?

  • आपल्या पालकांना घरभाडे देणे 

आपण रहात असलेले घर आपल्या आई किंवा वडिलांच्या मालकीचे असेल तर त्यांना तुम्ही घरभाडे देऊन त्याची नियमानुसार वजावट तुमच्या उत्पन्नातून घेऊ शकता. असे भाडे चेकने अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्यावे. मिळणारे एकूण भाडे हे मालमत्ता कर वजा करून येणाऱ्या रकमेतून सरसकट 30% प्रमाणित वजावट घेतल्यावर करपात्र असल्याने आपल्या आयकर विवरणपत्रात ते दाखवून जर काही कर भरावा लागत असेल तर तो घरमालकाने भरावा लागतो. याप्रमाणे आपल्या पालकांना घरभाडे दिल्यास त्यातील काही रकमेवर आपल्याला सूट मिळू शकते. वार्षिक भाडे ₹1 लाख हून अधिक असल्यास घरमालकाचे नाव आणि पॅन आयकर विभागास द्यावा लागतो. अशाच पद्धतीने घर पत्नीच्या नावे असल्यास तिलाही घरभाडे देता येईल यात काही किरकोळ पण कायदेशीर मुद्दे उपस्थित होत असल्याने असे करण्यापूर्वी सनदी लेखापाल (CA) किंवा कर सल्लागार (Tax Consultant) यांचा सल्ला घ्यावा.

  • राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील (NPS) गुंतवणूक 

या योजनेतील गुंतवणूक तीन प्रकारे फायदेशीर ठरू शकते. यात गुंतवणूक केलेल्या ₹ 1.5 लाख रकमेस 80/ C नुसार सवलत मिळते याशिवाय आणखी ₹ 50 हजार या रकमेवर 80/ CCD(1B) नुसार अधिकची सवलत मिळत असल्याने अशी एकूण सवलत जास्तीत जास्त ₹ 2 लाख पर्यंत घेता येऊ शकते. या खात्यात कोणत्याही निर्बंधाशिवाय कितीही गुंतवणूक करता येत असल्याने आपल्या निवृत्तीची तरतूद म्हणून मोठी रक्कम यात जमा करता येऊन त्यावर महागाईवर मात करणारा परतावा मिळवणे शक्य आहे. याशिवाय तिसरा आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मालकाने यात टाकलेल्या गुंतवणुकीवर मूळ पगाराच्या 10% मर्यादेत (80/ CCD2) आयकरात सवलत मिळते. अनेक खाजगी कंपन्यांचे मालक त्यांच्या कर्मचाऱ्यांना देऊ केलेल्या एकूण पगाराची विभागणी कशी असावी ते विचारतात, या सवलतीचा लाभ घेतल्यास कर सवलत मिळेलच पण वर उल्लेख केल्याप्रमाणे निवृत्तीसाठी मोठी रक्कम उभारता येणे शक्य आहे. यातील पैसे सहजासहजी काढता येत नाहीत एवढाच यातील म्हटला तर तोटा पण खऱ्या अर्थाने त्यात करदात्याचा फायदा आहे.

  • शेअरवरील करसवलतींचा कल्पक उपयोग 

एक दिवसाहून अधिक  कालावधीचा व्यवहार करून शेअरबाजारात होणारा निव्वळ नफा /तोटा  हा भांडवली नफा तोटा समजण्यात येतो यातील 1 वर्षाच्या आतील नफा/ तोटा  हा अल्पकालीन भांडवली नफा/ तोटा समजला जाऊन निव्वळ नफ्यावर 15% या विशेष दराने करआकारणी केली जाते. तर एक वर्षाहून अधिक काळाने झालेला निव्वळ नफा हा दीर्घकालीन नफा समजला जाऊन 1 लाखाहून अधिक नफ्यावर 10% विशेष दराने करआकारणी होते. वर्षाअखेर बहुतेक करदाते या सवलतीचा वापर करातील सवलत किंवा एकूण कर आकारणी कमी करण्यासाठी करतात. अनेकजण दिर्घमुदतीचा 1 लाख फायदा शेअर किंवा शेअरवर आधारित म्युच्युअल फंड युनिट विकून काढून घेतात आणि पीपीएफ, एसएसवाय किंवा एनपीएस याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी किंवा पुन्हा तेच शेअर घेण्यासाठी करतात यामुळे दीर्घकाळ करमुक्त भांडवली नफा मिळतो. जर  तोटा बुक करून पुन्हा तेच शेअर घेतल्याने मालमत्तेत फरक पडत नाही. बुक केलेला तोटा भांडवली नफ्यात समायोजित होत असल्याने एकूण करदेयता कमी होते. यात मध्ये ब्रोकरेज किती जाते ते पाहावे बरेचदा कोणताही फारसा आर्थिक भार न पडता बराच कर वाचवू शकतो.

हेही वाचा – Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?

  • जोडीदाराच्या नावे गुंतवणूक

जोडीदारास घरखर्च चालवण्यासाठी दिलेल्या पैशांस करकायद्यात असलेल्या परिशिष्ट 64 नुसार करदात्याचे उत्पन्न मानले जात नाही पण जोडीदाराने त्यातून गुंतवणूक केल्यास ते करदात्याचे उत्पन्न मानले जाते. या प्रकारची गुंतवणूक वाचवलेल्या रकमेतून किंवा मिळालेली बक्षिसांची रक्कम शेअर किंवा म्युच्युअल फंड युनिटमध्ये गुंतवल्यास ते उत्पन्न करदात्याचे न समजता जोडीदाराचे समजण्यात येते. त्याला दीर्घमुदतीच्या 1 लाख रुपये भांडवली नफ्याचा लाभ घेता येईल. अशी गुंतवणूक करत असताना जोडीदाराचे उत्पन्न कमी असल्यास असे व्यवहार कर वाचवण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात.

  • हिंदू अविभाज्य कुटुंबाची निर्मितीकरून गुंतवणूक

कर कायद्याच्या दृष्टीने हिंदू अविभक्त कुटुंब ही एक कृत्रिम पण स्वतंत्र कायदेशीर अस्तीत्व असलेली वेगळी व्यक्ती समजली जाते. आपल्या उत्पन्नातील काही भाग येथे देऊन त्याची गुंतवणूक केल्यास त्यास उपलब्ध असलेल्या करविषयक सर्व करसवलती मिळवता येतील. त्यातून व्यक्तीची करदेयता कमी होईल. फक्त जितक्या सहज हिंदू अविभक्त कुटुंबाची निर्मिती करता येते तितक्या सहजासहजी ते विसर्जित करता येत नाही. त्यामुळे असे व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्यावा.

  • कुटुंबातील वरिष्ठ नागरिकांच्या नावे गुंतवणूक 

6घरातील जेष्ठ व्यक्ती कमी उत्पन्न असलेल्या गटात असतील तर त्याच्या नावे गुंतवणूक करून अधिक व्याज मिळवता येईल सध्या वरिष्ठ नागरिक बचत योजना आणि प्रधानमंत्री वय वंदन योजना येथून मिळणाऱ्या व्याजाचा दर 7.4% असून तेथे एका व्यक्तीला दोन्ही योजनेत जास्तीत जास्त प्रत्येकी ₹ 15 लाख रुपये गुंतवता येतात. याशिवाय आरबीआय फ्लोटिंग रेट बॉण्डमध्ये गुंतवणूक करून 7.15% व्याज मिळवता येईल. याशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करून तेथे मिळत असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन करदेयता कमी करता येईल यात करदात्याची गुंतवणूक पालकांच्या नावाने होत असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर भावंडांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून वाद उद्भवू शकतात.

हेही वाचा – Tuition fee: आयकर बचतीचे नियोजन करताना मुलांची ट्युशन फी विसरलात तर नाही ना?

  • सज्ञान मुलांच्या नावे गुंतवणूक –

जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करून ज्या ज्या सवलती मिळवता येतात त्या सर्व सवलती सज्ञान मुलामुलींच्या नावे गुंतवणूक करून करदात्यास मिळवता येतील. ही गुंतवणूक मुलांची मानली जात असल्याने त्यांनी ती देण्यास कदाचित नकार दिल्यास मनस्ताप होण्याची शक्यता आहे. 20% ते 30% कर वाचवण्याच्या नादात  100% गुंतवणूक नाहीशी होण्याचा धोका आहे याची जाणीव ठेवून आवश्यक ती काळजी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.