Mutual Fund Terms
आजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पनांबद्दल (Mutual Fund Terms) माहिती घेऊया. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, बहुतांश व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती नसते. कोणतीही गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.
हे नक्की वाचा: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ?
Mutual Fund Terms: म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पना
१. निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) –
- निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) म्युच्युअल फंड योजनेच्या प्रति युनिट मूल्याशी संबंधित आहे. विशिष्ट तारखेला थकबाकी असलेले एकूण युनिट्स व असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) यांचा भागाकार करून एनएव्ही काढले जाते.
- उदाहरणार्थ, म्युच्युअल फंड सिक्युरिटीजचे बाजार मूल्य २०० कोटी रुपये आहे आणि म्युच्युअल फंडाद्वारे १०० लाख युनिट्स जारी केलेली आहेत, तर फंडाची प्रति युनिट एनएव्ही २०० रुपये असेल (म्हणजे २०० कोटी / १०० लाख).
- असेट अंडर मॅनेजमेंट ही संकल्पना म्युच्युअल फंडाच्या समभाग, कॅश, डेरिव्हेटिव्ह्ज, बॉन्ड्स, गोल्ड इत्यादी सिक्युरिटीजच्या मार्केट व्हॅल्यूशी संबंधित असते.
- फंड युनिट्स नेहमी एनएव्हीवर खरेदी अथवा रेडिम केल्या जातात.
२. बेंचमार्क निर्देशांक –
- म्युच्युअल फंडाची कार्यक्षमता मोजण्यासाठी फंड हाऊस विशिष्ट निर्देशांकांचा संदर्भ बिंदू म्हणून वापर करतात. त्यालाच बेंचमार्क निर्देशांक म्हणतात
- उदाहरणार्थ मिड कॅप फंड एनएसई मिडकॅप इंडेक्सचा वापर बेंचमार्क म्हणून करतात, तर लार्ज कॅप फंड सेन्सेक्स, निफ्टी ५० किंवा बीएसई १०० निर्देशांक वापरू शकतात.
- बेंचमार्क इंडेक्सच्या बाहेर जाणारा फंड हा उत्तम फंड मानला जातो.
महत्वाचा लेख: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे …
३. एक्स्पेंस रेशो –
- म्युच्युअल फंडाच्या दैनंदिन निव्वळ मालमत्तेच्या वार्षिक खर्चाची (annual operating expenses) पूर्तता करण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे एक्स्पेंस रेशो.
- वार्षिक खर्चामध्ये फंड व्यवस्थापन, जाहिरात, प्रशासन आणि वितरक आणि कमिशन यासाठी लागणारा विविध खर्च समाविष्ट असतो.
- फंड हाऊसना थेट योजना विक्री करण्यासाठी वितरकांना कमिशन देण्याची गरज नसल्यामुळे थेट योजनांचा ऑपरेटिंग खर्च त्यांच्या नियमित भागांच्या तुलनेत १% कमी असू शकतो.
- वार्षिक खर्चात केलेली बचत थेट योजनांमध्ये गुंतविली जाते त्यामुळे त्यांना चक्रवाढीचा फायदा मिळतो आणि साहजिकच जास्त उत्पन्न मिळू शकेल.
४. एसआयपी (SIP) –
- एसआयपी ही संकल्पना अनेकांना परिचित असेल. नवीन गुंतवणूकदार एसआयपीला स्वतंत्र गुंतवणूक योजना समजण्याची गल्लत करतात. एसआयपी म्युच्युअल फँडाचा प्रकार नसून म्युच्युअल फँडात गुंतवणूक करायची एक पद्धत आहे
- ज्यामध्ये प्रतिमाह गुंतवणूकदाराने निवडलेल्या तारखेला निश्चित केलेली रक्कम बँकेमधून ऑटो डेबिट केली जाते.
- ही रक्कम म्युच्युअल फंड युनिट खरेदी करण्यासाठी वापरण्यात येते.
- यामुळे नियमित गुंतवणूक करण्याची सवय लागते तसेच यामध्ये अगदी ५०० रुपायांपासून प्रतिमाह गुंतवणूक करता येत असल्याने तुलनेने जोखीम कमी असते.
- एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये केलेली नियमित गुंतवणूक आर्थिक शिस्त लावते.
विशेष लेख: एसआयपी गुंतवणूक करून आपली आर्थिक उद्दिष्टे साकार करा! …
५. लाभांश व वाढीचा पर्याय (Dividend & Growth Option) –
लाभांश (Dividend) –
- म्युच्युअल फंडाचा लाभांश हा अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत आहे या गैरसमजांमुळे बरेच गुंतवणूकदार या पर्यायाची निवड करतात. परंतु, लाभांश फंडाच्या स्वत:च्या एयूएममधून (AUM) दिले जातात
- लाभांश या पर्यायामध्ये म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीनुसार नियमित अंतराने लाभांश मिळतो. लाभांशची रक्कम फंडांच्या दर्शनी मूल्यावर आधारित असते, त्यांच्या एनएव्ही मूल्यावर नाही.
- यामध्ये एनएव्हीचे मूल्य कमी होते. लाभांश रक्कम फंडांच्या फेस व्हॅल्यूनुसार मोजली जाते आणि त्यांच्या एनएव्हीवर आधारित नाही.
- सेबीच्या (SEBI) नियमानुसार फंड मॅनेजर्सना प्रथम त्यांनी बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून एनएव्ही वाढीचा फंडाच्या मालमत्तेमध्ये झालेला नफा बाजूला काढावा लागतो. या नफ्यामधूनच गुंतवणूकदारांना लाभांश दिला जातो.
- उदाहरणार्थ, एनएव्ही ८०% असेल आणि जाहीर केलेला लाभांश २०% असेल, तर रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या म्हणजेच १० रुपयांच्या २०% म्हणजेच २ रुपये लाभांश मिळेल. लाभांश जमा झाल्यानंतर फंडाची एनएव्ही ७८ रुपये होईल.
ग्रोथ ऑप्शन (Growth) –
- ग्रोथ ऑप्शन एका उदाहरणामधून समजून घेऊया. उदा. १००० युनिट्स १०,००० च्या एनएव्ही किंमतीवर विकत घेतल्या आहेत, म्हणजे एकूण गुंतवणूक १० हजार रुपये आहे.
- समजा ५ वर्षांनंतर एनएव्हीचे मूल्य १० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत वाढले तर, प्रति एनएव्ही ३० रुपये नफा म्हणजेच १००० युनिट्सचा एकूण नफा ३०००० रुपये. त्यानुसार पाच वर्षात दहा हजार रुपयांच्या गुंतवणूकीचा निव्वळ नफा ३० हजार रुपये होईल. तथापि, गुंतवणूकीदरम्यान गुंतवणूकदाराला इतर कोणताही लाभ मिळणार नाही.
- म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे १ वर्षानंतर एनएव्हीची विक्री केल्यास दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १०% कर भरावा लागतो.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही शेअर बाजाराच्या तुलनेत कमी जोखीम असणारी गुंतवणूक आहे. परंतु, गुंतवणूक करताना थोडाफार अभ्यास आणि गुंतवणूक प्रकारची मूलभूत माहिती घेणं आवश्यक आहे. तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय स्वतः घेत असाल तर व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणूक करा अन्यथा गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तम.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Mutual Fund Terms in Marathi, Important Terms of Mutual Fund in Marathi, Mutual Fund Terms Marathi Mahiti, Mutual Fund Terms Marathi info