भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची ६ कारणे

Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्ड वापरण्याची कारणे 

आजच्या लेखात आपण भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची कारणे कोणती याबद्दल जाणून घेऊ. हल्ली बरेचदा काही चांगल्या ऑफर्स उपलब्ध झाल्यावर खरेदी केली जाते जेणेकरुन त्यावर अनेक सवलती मिळतात त्यातही क्रेडिट कार्डने खरेदी केली तर सोन्याहून पिवळं कारण त्यावर  ईएमआय सुविधा, कॅशबक अशा अनेक ऑफर्स उपलब्ध असतात. 

खरेदी करणे आणि ती सातत्याने करणे यात फरक असतो. पूर्वी गरजेच्या वस्तूंसाठी खरेदी केली जायची आणि ती देखील ठराविक कालावधीने. मात्र बदलत्या काळानुरुप खरेदीची कारणेही बदलत गेली. या कोव्हिड-19 च्या साथीने बरेचजण जमिनीवर आले असावेत. जे आणि जितके गरजेचे आहे तेवढेच घ्यावे उगाचच घरात कोणत्याही गोष्टींची साठवण करू नये, त्याची काहीही आवश्यकता नाही हे नक्कीच आपल्यापैकी बरेचजण शिकले असतील. असो.. तर विषय हा आहे की आणखी काही काळातच जशी अर्थव्यवस्था सुधारू लागेल तसे ग्राहक पुन्हा मूळ पदावर येतील आणि खरेदी-विक्रीचे चक्र पूर्ववत सुरू होईल.  

 हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा 

क्रेडिट कार्ड वापरण्याची 6  कारणे

1 –  खरेदीदाराला मिळणारे संरक्षण 

 • दरमहा, वर्षाकाठी अनेक लाखो नव्या वेबसाईट, नवी ऑनलाईन पोर्टल बाजारात येत असतात. 
 • या सगळ्यांकडे खरेदी करताना डेबिट आणि क्रेडिट कार्ड अशा दोन्हींचा पर्याय असतो. मात्र डेबिट कार्ड वापरुन जर तुम्ही खरेदी केली, तर ती रक्कम पुन्हा परत मिळवणे कठीण जाऊ शकते. मात्र क्रेडिट कार्डच्या बाबतीत तसे होत नाही.
 • क्रेडीट खरेदीवर व्यवहारातील फसवणुकीपासून ग्राहक संरक्षित असतो. 
 • समजा तुम्ही केलेली ऑर्डर विक्रेत्याकडून जर प्राप्त झाली नाही आणि तुम्ही क्रेडिट कार्डने पैसे दिले असतील तरी तातडीेने संबंधित बँक किंवा कार्ड देणाऱ्या कंपनीला संबंधित व्यवहार थांबवण्यास सांगून तक्रार दाखल करू शकता. 
 • क्रेडिट कार्डच्या अटींमध्ये, याला “चार्जबॅक” म्हणतात. डेबिट कार्ड व्यवहारावर हे उपलब्ध नाही. याचा वापर केल्यास तुमची भरलेली रक्कम पुन्हा तुमच्या क्रेडिट कार्डात जमा होते.  म्हणजेच तुमचा यात काही तोटा होत नाही. 

2 – व्याजमुक्त कालावधी साधारणतः 50 दिवस 

 • जर तुम्ही मोठ्या रकमेची खरेदी करत असाल तर डेबिट ऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करणे नक्की हितावह ठरते. 
 • जर आज तुम्ही व्यवहार केलात तर तुमची बिल सायकल आजपासून सुरू होते जी पुढचे किमान 50 दिवस तुम्हाला वापरता येते. त्या दरम्यान तुमच्या बँकेच्या बचत खात्यातील रक्कम न वापरल्याने त्यावरही काही व्याज तुम्हाला मिळते. 
 • तसेच जितक्या रकमेचा व्यवहार केला असेल तितकीच रक्कम 50 दिवसात तुम्हाला भरायची असल्याने तुमचा तोटा काहीच नाही. 

महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर 

3 – कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि एअर माईल

 • बहुतांश क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला जवळपास प्रत्येक खरेदीवर काही ऑफर, रिवॉर्ड आणि विविध लाभ देत असतात. 
 • साधारणपणे तुम्ही प्रत्येक खरेदीच्या मागे 0.25% ते 3.3% इतकी बचत करू शकता. म्हणजेच तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांमागे 3 रुपये 30 पैसे इतकी बचत करता. 
 • हे तुम्हाला कदाचित कमी वाटेल, मात्र जेव्हा तुम्ही 10 लाख रुपयांची खरेदी क्रेडिट कार्डवर करता, तेव्हा जवळपास 33 हजार रुपयांची बचत करू शकता. 
 • तुम्हाला हे पैसे रोखीने मिळणार नसतील तरी यात किमान 5-6 दिवसांचे एका जोडप्याचे मस्त नयन रम्य ठिकाणी सुट्टीचे नियोजन सहज होऊ शकते. जाणे-येणे, खाणे-पिणे, साईट सिंग इत्यादी गोष्टी 33 हजार रुपयांत शक्य होतात. पुन्हा हॉटेलच्या बुकिंगवर वेगळे रिवॉर्ड्स आणि ऑफर मिळतात ते वेगळेच. 
 • जर तुम्ही ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर मध्ये काम करत असाल, तर बिजनेस टूर्सच्या निमित्ताने विमान कंपन्यांची तिकिटे जास्तीत जास्त सवलतीच्या दरात मिळू शकतात. 
 • सोबतच त्या सर्व विमान प्रवासादरम्यान तुम्हाला कार्डवर प्रिव्हिलेज पॉईंट आणि एअर माईल मिळतात जेणेकरुन भविष्यात त्याचा मोठा फायदा मिळतो. 

4 – विमानतळावर चेक-इन ला प्राधान्य, विनामूल्य लाऊंज वापरता येणे आणि बाकी सुविधा (पर्क्स)

 • तुम्ही जसजसा क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त वापर करता, तसतसे तुम्हाला अपग्रेड केले जाते.
 • एकदा का तुम्ही प्रीमियम किंवा सुपर प्रीमियम क्रेडिट कार्ड ग्राहक या कॅटेगरीत आलात की अनेक सवलती आणि लाभांसह काही गोष्टी अगदी विनामूल्य देखील मिळतात. 
 • यामध्ये खास करून विमानतळावर लांब रांगा टाळून तुम्हाला चेक-इन करायला प्राधान्य मिळते, तसेच विमानतळावरील पंचतारांकित लाऊंजचा देखील आपण विनामूल्य वापर करू शकता, ते ही त्यातील सर्व लाभांसह, म्हणजेच शॉवर, शयनकक्ष, नाश्ता-जेवण, वाईन-बिअर इत्यादी. 
 • जेव्हा दोन विमानप्रवासांच्या मध्ये ले-ओव्हर जास्त वेळेचा असेल तेव्हा तुम्ही या सुविधांचा वापर करू शकता. 

इतर लेख: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमध्ये काय फरक आहे ? 

5 – परदेशी प्रवास आणि ऑनलाईन खरेदी

 • परदेश प्रवासावेळी तुम्ही भारतीय चलन आणि परदेशी चलन यांचे जे रुपांतर करावे लागते आणि बरेचदा जास्त पैसे मोजून परदेशी चलन घ्यावे लागते त्यापेक्षा परदेशात खरेदी करताना तुमचे क्रेडिट कार्ड वापरले तर नक्की फायदा होतो. 
 • एकतर कॅश जवळ बाळगावी लागत नाही. दुसरे म्हणजे व्हिसा आणि मास्टर क्रेडिट कार्ड आता जगभरात सर्व व्यवहारांसाठी लागू आहेत. 
 • परदेशी चलन घेताना द्यावे लागणारे सर्व कर वाचतात. दुसरीकडे प्रीमियम आणि सुपर प्रीमियम क्रेडिट कार्ड वरील कमीतकमी कर 2% आहे जो परदेशी चलन विकत घेण्यापेक्षा नक्कीच परवडतो. 
 • तसेच क्रेडिट कार्ड असल्याने, प्रत्येक खरेदीवर विविध लाभ, ऑफर आणि कॅशबॅक हे लाभ ही सुरू राहतात. 

6 – भारतात क्रेडिट कार्ड विमा संरक्षण उपलब्ध आहे 

 • ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. हल्ली भारतात दिली जाणारी जवळपास सर्व क्रेडिट कार्ड विमा संरक्षण देतात. 
 • अर्थात वार्षिक शुल्क भरुन तसे विमा संरक्षण तुम्ही घेणे अपेक्षित आहे. मात्र प्रीमियम आणि सुपर प्रीमियम दर्जाच्या कार्डना असे संरक्षण आधीच दिलेले असते. वेगळे घ्यायची गरज नाही. 
 • यामध्ये चोरी, अपघात, उशिराने सुरू झालेला विमान प्रवास, विमान प्रवासात झालेली सामानाची चोरी या बाबी कव्हर केलेल्या असतात. 
 • दुसरीकडे काही क्रेडिट कार्डांना वैयक्तिक विमा संरक्षणही लागू असते. ज्यामध्ये अचानक आजारी पडणे, परदेशात महागडी औषधे घेण्याची गरज, अनपेक्षित दुर्घटना, इस्पितळात दाखल होणे यासारख्या काही गोष्टी कव्हर केलेल्या असतात. ज्याचा वापर करुन तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Credit Card Marathi 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *