Credit Score
कर्ज देताना बँक नेहमी कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासते. क्रेडिट स्कोअर हा कर्ज मंजुरीसाठी अत्यंत आवश्यक असतो. आजच्या लेखात आपण आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, याबद्दल माहिती घेणार आहोत.
ऑफिसमध्ये जेवणाची सुटी झाली होती. नेहा आणि तिचा ग्रुप या जेवणाच्या सुटीत सुद्धा एकमेकांना माहिती देण्या-घेण्यात तरबेज मानला जायचा. हा ग्रुप म्हणजे एकाच कॉलेज मधून कंपनीने उचलेला ग्रुप होता. मित्र-मैत्रिणींना एकाच ग्रुपमध्ये टाकले तर कार्यक्षमता वाढते असा मॅनेजरचा विश्वास त्यांनी सार्थ केला होता.
आज अमित बोलायला लागला, नेहा तू म्हणत होतीस की क्रेडिट कार्ड घ्यायचेय. घेतलेस का?”
“हो रे घेणार आहे, लागते कधी अडचणीच्या वेळी” नेहा.
तसा अमित म्हणाला, “तुला माहिती आहे काय की, क्रेडिट कार्ड घायला अथवा कर्ज घ्यायला आपला क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो.”
ते ऐकून नेहाने शंका व्यक्त केली, “अरे हे काय असते, आता मिळेल का मला क्रेडिट कार्ड?”
तसा हसून अमित म्हणाला, “अग मिळेल तुला नक्की. मात्र सगळे क्रेडिट स्कोअरबद्दल ऐकून तर घे. पुढे गरज पडणार आपल्याला याची.
अमितच्या या वाक्यावर सगळ्यांनी माना डोलवल्या तसे अमितने सुरुवात केली-
आपला क्रेडिट स्कोअर ही एक अशी गोष्ट आहे की जी आता आणि भविष्यात आपल्या जीवनावर परिणाम करु शकते. आपला क्रेडिट स्कोअर क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी आपण पात्र आहोत किंवा नाही हे ठरवतो शिवाय आपला क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठीचा व्याजदर देखील निर्धारित करतो.
हे नक्की वाचा: क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?
क्रेडिट स्कोअर (Credit Score):
काय आहे क्रेडिट स्कोअर?
- क्रेडिट स्कोअर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो.
- पुढे हाच क्रेडिट स्कोअर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना तसेच क्रेडिट कार्ड देताना विचारात घेतात.
उत्तम क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
- क्रेडिट स्कोअर हा 300 पासून 900 पर्यन्त असतो.
- एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर जर 750 च्या वरती असेल तर तो चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो.
- आपला क्रेडिट स्कोअर जितका जास्त तेवढी आपल्याला आपल्या गरजेनुसार कर्ज मिळण्याची शक्यता जास्त.
क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे घटक –
१. पेमेंट हिस्ट्री –
- पेमेंट हिस्ट्री वरून आपण वेळेवर पैसे परत करण्यास किती तत्पर आहात हे समजते.
- आपल्या क्रेडिट स्कोअर साठी ऑन-टाइम पेमेंट्स म्हणजेच वेळच्या वेळी बिले भरण्याचा दीर्घ इतिहास असणे सर्वात चांगले आहे.
- आपण वेळेवर आणि वेळेमध्ये हफ्ते भरत असल्यास आपल्या क्रेडिट स्कोअर मध्ये वाढ होते. त्यामुळे शक्यतो कोणतेही हफ्ते हे वेळेतच भरावे.
- हफ्ते थकलेले असल्यास ते हळूहळू भरून थकीत हप्ते आपण भरून काढू शकतो. असे केल्याने आपला खराब झालेला क्रेडिट स्कोअर व्यवस्थित व्हायला मदत होईल.
२. क्रेडिटचा वापर (Credit usage) –
- क्रेडिटचा वापर हा देखील एक महत्वाचा घटक आहे. आपला स्कोअर उंचावण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो.
- ‘क्रेडिट युजेस’ द्वारे आपण किती क्रेडिट्स वापरले आहेत आणि आपल्या क्रेडिटची मर्यादा किती आहे हे समजते.
- यावरून आपल्याकडे किती देणे आहे हे समजते. आपण जितके कमी क्रेडिट वापरता तितका आपला स्कोअर वाढतो.
- एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे आणि वेळेवर हफ्ते न भरणे यामुळे आपला क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.
विशेष लेख: क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने कसे वापराल?
३. क्रेडिट एज (क्रेडिट वय) –
- क्रेडिट एज हे आपल्याला प्रथम क्रेडिट कार्ड अथवा कर्ज मंजूर झालेल्या तारखेपासून मोजले जाते. जितका जास्त काळ जुने आपले अकाऊंट असेल तितका आपला स्कोअर वाढतो.
- नवीन अकाऊंट असणार्यापेक्षा एखादा व्यक्ति ज्याचे ४ वर्ष झाले क्रेडिट अकाऊंट आहे त्याला आधी प्राधान्य दिले जाते.
४. क्रेडिट मिक्स –
- दीर्घ मुदतीचे सुरक्षित कर्ज खाते असणे हे चांगल्या क्रेडिट मिक्सचे लक्षण आहे.
- सुरक्षित कर्ज घेतलेले असणे आपल्याला कधीही फायदेशीर असते जसे की दीर्घकालीन गृह कर्ज तेच, अनेक असुरक्षित कर्जे आपल्या नुकसाणीत भर घालतात.
- क्रेडिट मिक्स हे क्रेडिट स्कोअरवर फारसे परिणाम करत नाहीत त्यामुळे फक्त क्रेडिट मिक्स वाढवण्यासाठी कर्ज काढून व्याज भरणे योग्य नाही.
५. रीसेंट क्रेडिट चौकशी –
- आपला क्रेडिट रीपोर्ट आणि स्कोअर आपण जेव्हा नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेता तेव्हा पहिला जातो. त्यालाच क्रेडिट चौकशी म्हणतात, ही माहिती आपल्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये दोन वर्षांपर्यंत राहते.
- यामध्ये हार्ड चौकशी आणि सॉफ्ट चौकशी असे दोन प्रकार आहेत.
- सॉफ्ट चौकशी: आपण आपला क्रेडिट स्कोअर स्वतः तपासाल तर ती सॉफ्ट चौकशी होईल. तसेच जर आपल्याला आधीच मंजूर झालेले कर्ज किंवा क्रेडिट कार्ड ची आपण चौकशी कराल तर ती सुद्धा सॉफ्ट चौकशी मध्ये येते. आपण अशा कितीही सॉफ्ट चौकशी केल्या तरी त्याचा आपल्या क्रेडिट स्कोअर वर परिणाम होत नाही.
- हार्ड चौकशी: जेव्हा आपण क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमची जी माहिती उपलब्ध ब्यूरो मधून घेतली जाते. आपण अनेक अर्ज केले असतील तर आपला क्रेडिट स्कोअर खाली जातो.
- एकाच प्रकारच्या कर्जासाठी आपण कमी काळात (15 ते 45 दिवस) अर्ज केला असेल तर क्रेडिट स्कोअर मोजताना ती एकच चौकशी धरली जाते.
६. क्रेडिट लिमिट वाढवून घेणे –
- वारंवार जर आपण आपली क्रेडिट लिमिट वाढवून घेत असाल तर ती आपल्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करेल. तेव्हा खरंच आवश्यकता असेल तेव्हाच क्रेडिट लिमिट वाढवून घ्यावी.
महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड घेताना माहित करून घ्या या ६ महत्वाच्या गोष्टी
७. नवीन अकाऊंट उघडणे –
- आपण नवीन अकाऊंट तेव्हाच उघडतो जेव्हा आपले सध्याचे अकाऊंट आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. यामुळे आपणास कर्जाचा भार होण्याचा धोका असतो. यामुळे क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो.
“तर आपल्याला भविष्यात कर्ज आणि क्रेडिट कार्ड घेताना बाधा येऊ नये यासाठी आपण या वरील सर्व बाबी लक्षात घेऊन पावले उचलली तर आपणास पुन्हा क्रेडिट स्कोअर मूळे कर्ज नाकारले जाण्याची शक्यता नाही. समजले का ?” अमित म्हणाला. जेवणाची सुटी संपली होती. सगळे भविष्याच्या योजना आखत आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले.
आपण सर्वांनी देखील तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीपासूनच आपल्या क्रेडिट स्कोअरकडे लक्ष दिले, तर कर्ज काढताना / क्रेडिट कार्ड घेताना आपल्याला ते विनासायास मिळेल. तेव्हा आपण सुद्धा वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Credit Score in Marathi, Credit Score Marathi Mahit, Credit Score Marathi, Credit Score mhanaje kay