क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutes

क्रेडीट कार्ड ही आजच्या युवावर्गाची फास्ट फूड, स्मार्टफोन या परमावश्यक गोष्टींपेक्षा मोठी व महत्वाची गरज म्हणून सध्या ओळखली जाते. युवावर्गाच्या जवळपास सर्वच गरजा क्रेडीट कार्ड पूर्ण करते. 

क्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात.  बँक, एटीएम सेंटर, बँकेची वेबसाईट अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे महिन्याचे स्टेटमेंटसुद्धा क्रेडीट कार्डच्या ऑफर्सने भरलेले असते आणि तुमचं मन तिकडे नकळतपणे ओढलं जात असतं. 

क्रेडीट कार्डवाल्या ताई किंवा दादा आपल्या एवढे मागे का लागतात?  ते कारण म्हणजे ‘प्रचंड नफा’!

चला तर मग क्रेडीट कार्ड विकणारे (गळ्यात मारणारे) कसे पैसे कमावतात व आपण क्रेडीट कार्डचा सदुपयोग कसा करायचा, ते बघूया:

१. भक्कम व्याजदर :

 • क्रेडीट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये ‘मिनिमम अमाउंट ड्यू’ म्हणजे बिलाची कमीत कमी रक्कम भरायचा पर्याय दिलेला असतो. तो पर्याय वापरून तुम्ही कमीत कमी रक्कम भरली की उरलेल्या देय रकमेवर साधारणपणे ३% ते ३.५% दरमहा दराने व्याज आकारले जाते. 
 • वरील वाक्य तुम्ही पुन्हा एकदा वाचा. तो व्याजदर ‘दरमहा’ आहे, प्रतिवर्षीचा नाही. म्हणजे वार्षिक ३६% ते ४२% दराने तुम्ही व्याजाची परतफेड करत असता. 
 • गृहकर्ज वार्षिक ९% ते १२% दराने तर व्यवसाय कर्ज वार्षिक १०% ते १५% दराने उपलब्ध होत असताना क्रेडीट कार्ड कर्जावर वार्षिक ३६% ते ४२% व्याजाने परतफेड करणे म्हणजे आपल्या हाताने आपलेच आर्थिक नुकसान आहे.

आपली  जबाबदारी: वेळच्यावेळी बाकी रक्कम पूर्णपणे भरणे. व्याज वाचवणे म्हणजे खर्च वाचवणे. अनावश्यक खर्च वाचवणे म्हणजे बचतीचा सर्वोत्तम मार्ग होय. 

२. लेट पेमेंट फी :

 • तुमच्या क्रेडीट कार्डच्या बीलाची रक्कम भरायला उशीर झाला की व्याजदराबरोबर दंड रक्कमसुद्धा तुमच्या देय रकमेनुसार आकारली जाते. जितकी जास्त देय रक्कम तितकी जास्त लेट पेमेंट फी! 
 • उदा : साधारणपणे रु. १०,००० देय रकमेसाठी रु. ३०० दंड आणि  रु. १०,००० ते रु.२५,००० देय रकमेसाठी रु. ६०० इतकी फी (दंड) आकारली जाते.

आपली  जबाबदारी: वेळच्यावेळी क्रेडीट कार्डच्या देय रकमेइतकी किमान रक्कम आपल्या खात्यामध्ये ठेवणे. एकतर खिशात किंवा बँक खात्यात पैसे नसताना तुम्ही खर्च क्रेडीट कार्ड वापरून केला आहे, आता परतफेड तरी वेळेवर करायला हवी. 

३. नोंदणी आणि वार्षिक फी :

 • साधारणपणे रु. ५०० ते रु. २५०० इतकी नोंदणी किंवा वार्षिक फी म्हणून तुम्हाला आकारली जाते. 
 • सुरुवातीला ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी नोंदणी फी भरण्यासाठी एक वर्षाची सूट दिली जाते. नंतर मात्र सालाबादप्रमाणे वार्षिक फी आकारली जाते. 
 • बऱ्याच बँका तुम्ही क्रेडीट कार्डवर जास्त खरेदी केल्यावर वार्षिक फी माफ करतात.

आपली  जबाबदारी: वार्षिक फी किती आकारली जाणार याबद्दलची माहिती नवीन क्रेडीट कार्ड घेतानाच करून घ्यावी. 

४. रोख रक्कम  क्रेडीट कार्ड द्वारे काढली असता लागणारी फी :

 • प्रत्येक क्रेडीट कार्डद्वारे कार्ड लिमिटच्या साधारणपणे ४०% इतकी रोख रक्कम एटीएम मधून काढता येते. हे एक प्रकारचे क्रेडीट कार्ड कंपनीने तुम्हाला दिलेले विनातारण कर्जच आहे. 
 • या सुविधेसाठी बँका २.५% फी आकारतात. उदा: तुमच्या क्रेडीट कार्डची मर्यादा रु. ५०,००० आहे, तर रोख रक्कम  रु. २०,००० पर्यंत ‘एटीएम’मधून काढता येते. या व्यवहारासाठी तुम्हाला रु. ५०० इतकी फी आकारली जाऊ शकते.
 • या फी व्यतिरिक्त सदर रोख रक्कम पूर्ण परतफेड करेपर्यंत तुम्ही वार्षिक ३६% ते ४२% व्याज भरतच असता. 

आपली जबाबदारी: शक्यतो क्रेडीट कार्डद्वारे रोख रक्कम काढू नये. 

५.  ओव्हर लिमिट फी :

 • तुमच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार क्रेडीट कार्ड द्वारे केल्यास एकतर व्यवहार पूर्ण होतच नाही किंवा व्यवहार पूर्ण होतो पण भरभक्कम ओव्हर लिमिट फी आकारली जाते. 
 • सदर ओव्हर लिमिट फी रु.५०० किंवा ओव्हर लिमिट रकमेच्या  २.५% किंवा या दोनही रकमेपेक्षा जी जास्त रक्कम असेल ती फी म्हणून आकारली जाते.

आपली जबाबदारी: अंथरूण पाहून पाय पसरावेत. क्रेडीट कार्ड लिमिटपेक्षा जास्त खर्च क्रेडीट कार्डद्वारे करू नका. बँका बऱ्याचदा तुम्ही न मागता पण लिमिट वाढवून देतात. आपली नेमकी गरज ओळखूनच क्रेडीट कार्डची मर्यादा ठरवा. 

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच ते अर्थसाक्षरता अभिनयाच्या कार्यशाळा घेतात.)

क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर,

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?,

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]