आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

Reading Time: 3 minutes

वेळचं महत्व वेळीच ओळखा. कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. वेळ हातातून निघून गेली की होणाऱ्या नुकसानाला सामोरे जावं लागतं. जसं की तुमच्या विमा पॉलिसीचा हप्ता, विविध बिलं, गृहकर्जाचा हप्ता इ. अशा अनेक गोष्टींसाठी एक ठराविक कालमर्यादा म्हणजेच अंतिम तारिख नेमून दिलेली असते. त्या वेळेत बिलं भरली नाही, तर दंड भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्नचही (ITR) तसंच आहे. आपले रिटर्न वेळेत भरले नाही, तर आपल्याला काही तोटे सहन करावे लागतात.

दरवर्षी पगारदार व विना-ऑडिट व्यवसायिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. पण अनेकांचा असा गैरसमज असतो की जर आपण आपला टॅक्स भरला आहे तर रिटर्न भरायची गरज नाही.

रिटर्न दाखल करणे हे इन्कम टॅक्स भरण्याइतकंच महत्वाचं आहे. जर रिटर्न वेळेवर दाखल केले नाही, तर वेळेत  रिटर्न भरल्यामुळे मिळणारे काही फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत.

आजच्या लेखात वेळेवर आयकर रिटर्न भरण्याचे फायदे काय आहेत? याबद्दल माहिती घेऊया.

१.  शेवटच्या क्षणाची धावपळ:

 • आयकर रिटर्न भरणं ही तितकीशी कठीण गोष्ट नसली, तरीही रिटर्न भरताना अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. उदा. इंटरेस्ट सर्टिफिकेट, फॉर्म२६ AS, टीडीएस(TDS) सर्टिफिकेट, इ. कागदपत्रे जमा करताना धावपळ होण्याची शक्यता असते.
 • अंतिम तारखेला रिटर्न भरण्याची अनेकांना सवय असते. अशावेळी घाई-गडबडीत फॉर्म भरणे, काही तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म सबमिट न होणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी आपले रिटर्न वेळेवर भरणे आवश्यक आहे.

२. रिव्हाइज रिटर्न:

 • आयकर कायदा कलम १३९(५) नुसार, जर तुम्ही रिटर्न वेळेवर भरले नाही, तर तुम्ही तो रिव्हाइज करु शकत नाही. म्हणजेच; जर रिटर्न भरताना एखाद्या उत्पन्नाची माहिती द्यायची राहिल्यास अथवा चुकीची माहिती भरली गेल्यास, नंतर तुमची इच्छा असूनही तुम्ही ती माहिती दुरुस्त करु शकत नाही. ही गोष्ट  आयकर विभागाच्या लक्षात आल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.  हा नियम फक्त आर्थिक वर्ष २०१५-१६ साठीच लागू आहे.
 • १ एप्रिल २०१७ पासून सदर नियम बदलण्यात आले आहेत. रिव्हाइज रिटर्नची सुविधा रिटर्न उशीरा भरले तरी मिळू शकते. परंतु २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मात्र पूर्वीचा नियमच लागू होतो. १ एप्रिल २०१७ पासून नियम बदलल्यामुळे या पुढील आर्थिक वर्षासाठी मात्र नवीन नियम लागू केला जाईल.

३. परताव्यावरील (रिफंड) व्याजाचे नुकसान:

 • तुम्ही भरलेल्या ॲडव्हान्स टॅक्स/ टिडीएस (TDS) साठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून सध्या ६% प्रतिवर्ष या दराने संगत निर्धारण वर्ष (Assessment year) १ एप्रिल  पासून तुम्हाला व्याज दिले जाते. जर तुम्ही टॅक्स रिटर्न  उशीरा भरलात तर तुम्ही भरणा केलेल्या दिवसांपासून रिफंड मंजूर झालेल्या दिवसांपर्यंतचे व्याज तुम्हाला मिळते.
 • तुमचा एका दिवसाचा उशीरही तुमच्या चार महिन्यांच्या व्याजाचे (एप्रिल ते जून) नुकसान करतो.

४. न भरलेल्या करावरील दंड (penal interest):

 • आयकर विभागाकडून न भरलेल्या करावर (Unpaid tax) १% प्रतिवर्ष या दराने दंड आकारला जातो. हा दंड, रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेपासून रिटर्न भरलेल्या तारखेपर्यंतच्या कालावधीसाठी आकारला जातो.
 • जर रिटर्न भरायला उशीर झाला आणि न भरलेल्या कराची रक्कम रु. ३०००/- पेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून फौजदारी तक्रार दाखल केली जाऊ शकते.

५. दंड:

 • जर एखादे निर्धारण वर्ष (Assessment year) संपल्यानंतरही (३१ मार्च) रिटर्न फाईल करुन झाले नाहीत आणि सगळ्या उत्पन्नावरील कर भरलेला असेल तर तुम्ही आयकर विभागाला रिटर्न फाईल न करण्याचे योग्य ते कारण देणं आवश्यक आहे.
 • जर दिलेल कारण आयकर विभागाला पटलं नाही तर रु. ५०००/- चा दंड आकारला जाऊ शकतो.

६. नुकसानाची वजावट (Carry Forward Of Losses):

 • जर तुम्ही रिटर्न उशीरा भरलात तर व्यवसायातील नुकसानासाठी वजावट मागू शकत नाही अथवा ते पुढे ओढू शकत नाही; अपवाद फक्त घराच्या व्यवहारात झालेल्या नुकसानाचा.
 • जरी करदात्याने सगळे कर व्यवस्थित भरलेले असले तरीही त्याला रिटर्न उशीरा फाईल केल्यामुळे, व्यवहारातील नुकसानीसाठी वजावट मिळू शकत नाही किंवा सदर नुकसान पुढे ओढताही (कॅरी फॉरवर्ड) येत नाही.

७. कर्ज प्रक्रिया:

 • जर तुम्ही गृहकर्ज, वाहनकर्ज अथवा इतर कुठल्या कर्जासाठी अर्ज केला असेल आणि तुमचे रिटर्न भरलेले नसतील तर तुमच्या कर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होवू शकतात.

८. व्हिसा प्रक्रिया:

 • जर तुम्ही व्हिसासाठी अर्ज केला असेल आणि तुमचे रिटर्न वेळेवर भरले नसतील तर व्हिसा मिळण्याच्याप्रक्रियेत अनेक अडचणी येऊ शकतात.

९. क्रेडीट कार्ड प्रक्रिया:

 • जर तुम्ही बॅंकेत क्रेडीट कार्डसाठी अर्ज केला असेल आणि तुमचे रिटर्न भरलेले नसतील तर तुमच्या क्रेडीट कार्ड प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

वेळेत रिटर्न न भरण्याचे कोणतेही फायदे नक्कीच नाहीत. पण ते न भरण्याचे असे अनेक तोटे आहेत. हे तोटे सहन करण्यापेक्षा आपले रिटर्न् वेळेत भरणे कधीही चांगलं. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. तेव्हा लवकरात लवकर आपले रिटर्न भरा.

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *