Benami Property
आजच्या लेखात आपण (Benami Property) काळा पैसा, बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्तेत समाविष्ट संपत्ती, दंड आणि शिक्षेच्या तरतुदींवर चर्चा करू. भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या काळ्या पैशामुळे त्यावरील आयकर भरला जात नसल्याने सरकारचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने १ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात काही सुधारणा केल्या.
Benami Property: बेनामी व्यवहार कायदा
- बेनामी व्यवहार कायदा १९८८ साली लागू झाला, परंतु त्या कायद्याचा जितका विचार केला गेला तितका त्याचा फायदा झाला नाही.
- बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्याची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यात दुरुस्ती करण्यात आली, जेणेकरुन काळ्या पैशावरील व्यवहार थांबवता येतील.
- बेनामी व्यवहार कायदा १९८८ चे नाव बदलून आता बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा २०१६ लागू करण्याचे श्रेय तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.
- बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी आयकर खात्याकडे सर्व अधिकार दिलेले आहेत.
बेनामी संपत्ती म्हणजे नक्की काय?
- आजकाल प्रत्येक व्यक्तीस हे जाणून घ्यायचे आहे की मुळात बेनामी संपत्ती नक्की काय असते आणि कोणत्या संपत्ती बेनामी संपत्तीमध्ये समाविष्ट आहेत?
- जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता बेनामी मालमत्ता असते का?
- कोणते व्यवहार बेनामी व्यवहार मानले जात नाहीत?
- बेनामी संपत्ती किंवा बेनामी व्यवहार यावरील दंड आणि शिक्षा काय असते? काळा पैसा म्हणजे काय?
काळा पैसा –
- काळा पैसा म्हणजे ज्या पैशांवर प्राप्तीकर आणि इतर कर भरले नाहीत असा पैसा. असा काळा पैसा विविध प्रकारे भारतात आणि भारताबाहेर साठवला जातो.
- लाचखोरी, हवाला व्यवहार आदी अवैध मार्गाने हा काळा पैसा तयार होतो. शून्य कर असणाऱ्या देशात एखादी कंपनी स्थापन करून त्याद्वारे कर चुकविला जातो.
- असा अवैध मार्गाने तयार झालेला पैसा काळा पैसा म्हणून रोख स्वरुपात साठवला जातो किंवा स्थावर मालमत्ता, सोने किंवा इतर मालमत्तेत दुसऱ्यांच्या नावाने गुंतविला जातो.
- काळा पैसा रोखणे हा कळीचा मुद्दा आहे. अशा काळ्या पैशामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. एक समांतर अर्थव्यवस्था तयार झाली आहे. भ्रष्टाचार, अवैध व्यवहार यामुळे काळा पैसा तयार होतो आणि तो अवैध मार्गाने परत “पांढरा” करण्यात येतो.
बेनामी संपत्ती –
- बेनामी संपत्तीला आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो की, “कोणाच्याही नावावर नसलेली संपत्ती” यालाच मराठीत ‘निनावी संपत्ती’ देखील म्हणले जाते.
- एखादी व्यक्ती कोणतीही संपत्ती आपल्या स्वत: च्या नावाने खरेदी न करता दुसर्या एखाद्याच्या नावावर मालमत्ता खरेदी करते, परंतु त्या मालमत्तेचे फायदे स्वतःस मिळत असतील, तर अशा व्यवहारास बेनामी व्यवहार मानले जाईल आणि अशा मालमत्तेस बेनामी संपत्ती मानले जाईल.
- ज्याच्या नावावर बेनामी मालमत्ता विकत घेतली गेली आहे अशा व्यक्तीस बेनामी व्यक्ती समजले जाईल.
- या व्यतिरिक्त असे व्यवहार बेनामी व्यवहार म्हणून देखील मानले जातील ज्यात एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला रोख रक्कम देते आणि ती व्यक्ती त्या रोखीतून त्याच्या नावावर मालमत्ता खरेदी करते, परंतु ज्याचा लाभ किंवा होणारा फायदा केवळ पहिली व्यक्ती मिळवत असेल.
- मालमत्तेपासून मिळणारा लाभ किंवा फायदा थेट किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही स्वरूपात मिळू शकतो. मिळणारा लाभ किंवा फायदा हा आज मिळालेला नसेल परंतु भविष्यात अशा बेनामी संपत्तीपासून लाभ किंवा फायदा मिळणार असेल हे इथे विचारात घेतले जाते.
- बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार बेनामी मालमत्ता म्हणजे जिची खरेदी एखाद्या व्यक्तीने केली आणि त्याची किंमत दुसऱ्याच व्यक्तीने अदा केली असल्यास आणि एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आजच्या किंवा भविष्यातील लाभासाठी धारण केलेली मालमत्ता.
- या नियमास काही अपवाद आहेत. उदा. पती, पत्नी, मुलगा, मुलगी, इ.नी एकमेकांसाठी धारण केलेली मालमत्ता इ.
बेनामी मालमत्तेत समाविष्ट संपत्ती –
- हे आवश्यक नाही की केवळ रिअल इस्टेटमधील व्यवहार बेनामी मालमत्तेत समाविष्ट केले जातात.
- प्रॉपर्टीमध्ये सर्व प्रकारचे जंगम, स्थावर, मूर्त, अमूर्त, कोणतीही स्वारस्ये किंवा हक्क किंवा कायदेशीर दस्तऐवज देखील समाविष्ट आहेत.
- म्हणजेच, जर तुम्ही इतर कोणाच्या नावावर शेअर्स विकत घेतले असतील तर ते बेनामी व्यवहार म्हणूनही मानले जातील.
- ‘जनधन’ किंवा अन्य कोणत्याही बँक खात्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची रक्कम स्वतःची भासवून जमा केल्यास ती ‘बेनामी’ मालमत्ता ठरेल. कारण, खरा लाभधारक पैसे पुरवणारा असेल.
जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता –
- जर मालमत्ता आपल्या जोडीदाराच्या, मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर देखील खरेदी केली असेल तर ती बेनामी मालमत्ता असू शकते, परंतु यासाठी अट ही उपलब्ध असलेल्या स्त्रोतांकडून खरेदी केली गेली आहे हे सिध्द करता आले नाही, तर बेनामी आहे हे सिद्ध होते.
- याचाच अर्थ जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या, मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर काळ्या पैशातून मालमत्ता खरेदी करत असाल तर ती बेनामी संपत्ती म्हणून गणली जाईल.
- जर आपण आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली असेल, तर आपण ती आपल्या आयकर रिटर्नमध्ये दर्शविणे आवश्यक आहे.
बेनामी नसलेले व्यवहार –
असे काही व्यवहार आहेत ज्यात मालमत्ता आपण दुसर्याच्या नावावर विकत घेतली तरीही बेनामी व्यवहार मानला जात नाही, जसे की –
- कर्ता किंवा एचयुएफ सदस्याने स्वत: च्या नावावर मालमत्ता ठेवली जी इतर कुटुंबातील सदस्यांच्या हितासाठी किंवा फायद्यासाठी वापरली जात असेल, तर हा व्यवहाराचा अशा स्थितीत बेनामी व्यवहार मानला मानला जाणार नाही.
- एखाद्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करणे.
- एखाद्या व्यक्तीकडे Fiduciary Capacity द्वारे संपत्ती नावावर करणे किंवा नावावर ठेवणे. उदाहरणार्थ, ट्रस्टी, एक विश्वस्त, कार्यकारी, भागीदारी फर्मचा भागीदार किंवा डिपॉझिटरी म्हणून.
- एखादी व्यक्ती आपल्या भाऊ किंवा बहिणीच्या नावावर किंवा लाइनल एसेन्डंट म्हणजेच वंशपरंपरागत किंवा डिसेन्डंट म्हणजेच वंशजांच्या नावावर मालमत्ता खरेदी करणे जिथे अशा व्यक्ती संयुक्त मालक आहेत.
दंड आणि शिक्षा-
बेनामी कायद्यात बेनामी व्यवहारासाठी दंड व शिक्षेची तरतूद आहे. जेव्हा एखादी व्यक्ती बेनामी व्यवहार करते तेव्हा –
- मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या २५% इतका दंड भरावा लागतो. आणि
- किमान १ वर्षाची आणि जास्तीत जास्त ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.
या व्यतिरिक्त चौकशी दरम्यान एखाद्या व्यक्तीने आयकर अधिकाऱ्यास चुकीची माहिती दिली तर –
- मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या १०% इतका दंड भरावा लागतो आणि
- किमान ६ महिने आणि जास्तीत जास्त ५ वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
आशा आहे की हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला काळा पैसा, बेनामी संपत्ती आणि बेनामी व्यवहाराबद्दल माहिती झाली असेल. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध व्हा कारण बेनामी मालमत्ता कोणतीही नुकसानभरपाई न देता जप्त करण्याचा अधिकार आयकर खात्याला आहे.
– आशिष भोजने
करसल्लागार, पुणे
7038577577
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Benami Property Marathi Mahiti, Benami Property in Marathi, Benami Property Marathi