e voting
सेबीने सर्वच कंपन्यांना इ वोटिंग (e voting) सुविधा देण्यास सांगितले आहे. काय आहे इ वोटिंग सुविधा?
कंपन्या आर्थिक वर्ष संपल्यावर त्याच्या हिशोबाची तपासणी करून असा तपासणी केलेला अहवाल, देऊ केलेला डिव्हिडंड यांची सूचना सर्व धारकांना पाठवतात कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भागधारकांची त्यास मान्यता घेतली जाते. याशिवाय अनेक धोरणात्मक निर्णय जसे कर्ज उभारणी, संचालक नेमणूक, पुनर्नियुक्ती, मुख्याधिकारी, हिशोब तपासनीसाची नेमणूक, त्याचा मेहनताना, वसूल भांडवलात वाढ, मर्जिंग, डिमर्जिग यासाठी कंपनीचे भागधारक म्हणजेच मालक म्हणून आपली संमती हवी असते. भागधारकांचा तो हक्कच आहे याप्रमाणे त्यात सहभागी होण्यासाठी सर्वाना संधी दिली जाते. कंपनी कायदा 2013 नुसार अशी संधी कंपनी भागधारकांना उपलब्ध करून देते.
हे नक्की वाचा: कंपन्यांचे प्रकार
वार्षिक सर्वसाधारण सभा आणि मतदान
- पूर्वी म्हणजे अगदी सन 2020 मार्च अखेरपर्यत अशा वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभा प्रत्यक्षात घेतल्या जात असत.
- सभासदांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीपैकी एका पद्धतीने मतदान करता येत असे.
- कोरोनानंतर यात बदल झाला असून भागधारक म्हणून आभासी पद्धतीने सभा घेऊन भागधारकांना ऑनलाईन मतदान आता करता येते. सर्वच कंपन्यांनी याची सोय भागधारकांना देणे सक्तीचे आहे. याशिवाय आता पोस्टाने मतदान करण्याची सुविधा देता येत असली तरी त्याची आता सक्ती नाही.
- सर्वसाधारण भागधारकांना या कार्यपद्धतीत विशेष रस नसतो त्यामुळेच कायदेशीर प्रक्रिया म्हणून घेण्यात येणाऱ्या अशा सभेस भागधारक येतच नाहीत. ते अहवाल पाहतच नाहीत तर मतदान ही खूप दूरची गोष्ट.
सेबीचा नवीन नियम
- आता सेबीने सर्वच कंपन्यांना इ वोटिंग सुविधा देण्यास सांगितले आहे. हे मतदान पारंपरिक मतदानाची पूर्तता वेगळ्या पद्धतीने करेल. त्यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होईल.
- यात ठराविक कालावधीत भागधारक कोणत्याही वेळी मतदान करू शकेल.
- हे मतदान हे विविध ठरावाच्या बाजूचे किंवा विरुद्ध असू शकेल. ते सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभा होण्यापूर्वी पूर्ण केले जाईल. त्याचे निकाल जाहीर केले जातील.
- उदा IEX ltd या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या 21 ऑक्टोबर 2021 च्या बैठकीत प्रत्येक भागधारकास त्याने धारण केलेल्या 1 शेअर्समागे 2 शेअर बोनस शेअर्स म्हणून देण्याची शिफारस केली आहे.
- यामुळे भरणा झालेल्या भागभांडवलात वाढ होत असल्याने कंपनीचे भागभांडवल त्याप्रमाणात वाढवावे लागेल. यानंतर शेअर धारकांना संमती दिल्यास कंपनीच्या रिजर्व मध्ये असलेल्या पैशांचे बोनस शेअरमध्ये रूपांतर होईल.
- हे शेअर कट ऑफ डेटच्या दिवशी जे भागधारक आहेत त्यांनाच देण्यात येतील.
- शेअरबाजार नियामक मंडळ आणि डिपॉसीटरी यांच्याशी चर्चा करून या शेअर्सचे खरेदी विक्री व्यवहार बाजारात चालू होतील. यासाठी आवश्यक मतदान तारीख, विशेष सर्वसाधारण सभेची तारीख, रेकॉर्ड डेट मेलद्वारे भागधारकांना कळवण्यात येईल.
महत्वाचा लेख: काय आहे कंपनी कायदा आणि नोंदणी करारातील कलम ४९?
e voting: इ मतदान कसे करणार?
- भागधारकांनी कंपनीकडून आलेला मेल वाचवा त्यात दिलेली मतदान पद्धत समजून घ्यावी.
- यात उल्लेख केलेल्या मतदान तारखेस आपला युजर आयडी व पासवर्ड यांचा तसेच आपल्या नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपीचा वापर करून मतदान करावे.
- आपले खाते CDSL कडे आहे की NSDL याप्रमाणे आपल्या डिपॉसीटरीकडील लॉग इन आयडी पासवर्ड यात किंचित फरक असू शकतो.
- जरी आपल्याकडे कागदी स्वरूपात शेअर्स असतील तरीही आपण डिपॉसीटरीकडे जाऊम मतदान करू शकतात. यासाठी कंपनीकडून EVEN (Electronic voting even no) देण्यात येतो. याचा वापर करून लॉग इन आय डी पासवर्ड बनवता येईल.
- दिलेल्या तारखेस याचा वापर करून मतदान चालू झाल्याचे दिसेल आणि ते करता येईल. हा कालावधी किमान 3 दिवस असेल.
e voting: इ मतदान का?
- अलीकडे काही भागधारक आणि त्यांचे गट कंपनीच्या कार्यपद्धती बाबत जागरूक झाले आहेत. त्यांना अयोग्य वाटणाऱ्या कृतीस ते कंपनीला विरोध करू शकतात.
e voting: इ मतदानाचे फायदे-
- प्रशासकीय खर्चात बचत
- अधिक अचूक पद्धत
- पर्यावरण पूरक पद्धत
- मतपत्रिका हरवण्याची भीती नाही
- मतदानास पुरेसा कालावधी
- आपल्या बदली प्रतिनिधी (proxy) देण्याची गरज नाही
- इ मतदान पद्धतीने कंपनी कार्यपद्धतीवर लक्ष ठेवता येते. गुंतवणूकदार आपल्या हिताचे रक्षण करू शकतात.
- तुमच्याकडे किती शेअर्स आहेत यापेक्षा तो एकच शेअर्स जरी असेल तरीही तुम्ही मतदान करू शकता.
- येथे एक शेअर्स म्हणजे एक मत समजले जाते. तेव्हा प्रत्येक भागधारकांनी आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचा वापर करावा.
सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies