Personal financial Budget : व्यक्तिगत आर्थिक बजेट बाबत 17 सर्वात मोठ्या चुका
- आपल्यापैकी बऱ्याच जणांची महिनाअखेर होत असताना वेगवेगळ्या खर्चाची सांगड घालता घालता अगदी दमछाक होऊन जाते. भाडे, EMI, मासिक विमा प्रीमियम, हेल्थ इन्शुरन्स, मुलांचे शाळांचे खर्च, घरातील मदतनीसाचा पगार हे ना ते असे बरेच खर्च आपल्याला करावे लागतात.
- काही खर्च महिन्याला होणारच आहेत हे ठरलेले असते पण कधीकधी काही खर्च अनपेक्षितपणे उदभवतात जसे की आजारपणं, घरातील काही यंत्रं बिघडणं, समारंभांना जावं लागणं, भेटवस्तू घेणं इत्यादी.
- अशावेळी आपली गडबड होऊन जाते कारण या अनपेक्षित खर्चांना तोंड देण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे उरलेले नसतात.
- तेव्हा आपल्या बजेटमध्ये गडबड झाली आहे हे आपल्याला कळून चुकतं. आज आपण अशा काही चुका बघूया ज्या तुमचं बजेट ठरवताना तुम्ही टाळल्यात तर दर महिन्याला तुम्हाला बँकेत अधिक पैसे साठवायला मदत होईल.
१. तुम्ही किती खर्च करता याचा अंदाज न घेणे
- तुम्ही बजेट तयार करण्यापूर्वी, तुमचा नेमका जीवनावश्यक खर्च किती आहे हे जाणून घ्या.
- खर्चाचा केवळ अंदाज लावून चालणार नाही, त्यापेक्षा तुम्ही बजेट तयार करण्यापूर्वी सलग एक किंवा दोन महिन्यांसाठी तुमच्या खर्चाचा मागोवा घ्या.
- तुम्ही पैसे खर्च करता त्या प्रत्येक गोष्टीची नोंद करा. अशा प्रकारे, तुमचा पैसा कुठे खर्च होत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि नंतर एक वास्तववादी बजेट तयार करू शकता.
हेही वाचा – LIC IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा…
२. अनपेक्षित खर्चांसाठी बचत न करणे
- एखादी वैद्यकीय Emergency, आजारपण, अपघात अशा गोष्टी आपल्याला नको असल्या तरी त्या आयुष्याचा भाग आहेतच. आपल्याला कधी आणि केव्हा त्यांना सामोरं जावं लागेल याचा अंदाज आपण करू शकत नाही.
- अशावेळी आवश्यक ती बचत आधीच करून ठेवणं फार गरजेचं असतं. आपत्कालीन परिस्थिती आली तरी किमान तीन ते सहा महिने तुम्ही साठवलेल्या पैशांवर जगू शकाल इतकी तजवीज आधी करून ठेवणं हे बजेट ठरवताना लक्षात घ्यायला हवं.
- कठीण प्रसंगांच्या वेळी एकावेळी मोठ्या प्रमाणात रक्कम उभी करणं सहज शक्य नसतं अशावेळी दरमहा थोडी रक्कम बाजूला काढून ठेवली तर मोठ्या खर्चाचे दडपण येणार नाही.
३. अवास्तव अपेक्षा ठेवणे
- तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास उत्सुक असाल, त्यासाठी तुम्ही सर्व खर्चांना कात्री लावून अत्यंत टोकाचं सेविंग्स करून बजेटिंग करायचा विचार करत असाल तर तुम्ही जगण्यातील मजाच हरवून बसाल.
- शेवटी बजेट म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या आर्थिक खर्चांवर नियंत्रण ठेवणं जेणेकरुन तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता.
- तुम्ही मौजमजेसाठी तुमच्या मिळकतीच्या ५% आणि १०% च्या दरम्यान बजेट ठेवणे हे सर्वसाधारण अपेक्षित आहे आणि यात काही चूक नाही.
४. आयकर विसरून जाणे
- आपल्याला वार्षिक पगार (Annual salary package) मिळतो ती रक्कम भागिले १२ इतकी आपली महिन्याची कमाई आहे असे गृहीत धरून बजेट ठरवत असाल तर तुमचं बजेट नक्कीच चुकू शकतं.
- कारण आयकर, व्यावसायिक कर अशा गोष्टींमुळे वजा होऊन नेमक्या हातात येणाऱ्या पगाराच्या रकमेत आणि Annual salary package च्या रकमेत फरक असतो.
- म्हणून बजेट ठरवताना हातात येणाऱ्या पगाराच्या रकमेवर किंवा उत्पन्नावरच खर्चाचं बजेट ठरवा.
५. स्वस्त पर्यायांचा विचार न करणे
- जिथे शक्य आहे तिथे स्वस्त पर्यायांचा विचार करून तुम्ही चार पैसे नक्कीच वाचवू शकता. उदाहरणार्थ, बिल पे करणे, EMI भरणे, खरेदी करणे यासारख्या गोष्टींमध्ये त्या त्या कंपन्यांकडून काही सवलती, किंवा काही डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहेत का हे तुम्ही चेक करू शकता.
६. गरजेपेक्षा जास्त बँकांची खाती नावावर असणे
- तुमच्याकडे बरीच क्रेडिट कार्डे आणि अकाउंट्स असल्यास, तुम्ही तुमची रोख रक्कम कशी खर्च करत आहात याचा मागोवा घेणे कठीण होऊन जाईल.
- ATM Withdraw चार्जेस, क्रेडिट कार्ड्स चार्जेस यात नाहक पैसे वजा होत राहतात ज्यामुळे क्रेडिट स्कोअरचे नुकसान, विलंब शुल्क, रिव्हॉल्व्हिंग बॅलन्स अशा प्रकारच्या गैरसोईंना सामोरं जायची वेळ येऊ शकते.
हेही वाचा – Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?…
७. तुम्हाला बजेटची गरज नाही असा विचार करणे
- जर तुम्ही साप्ताहिक किंवा मासिक बजेट लिहिण्यासाठी कधीच वेळ काढला नाही, तर तुमची वैयक्तिक आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा करू नका.
- आर्थिक दृष्टीकोन निश्चित करण्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतात. तुम्हाला स्वतःला बदलायचे आहे असे केवळ म्हणणे पुरेसे नसते; तुम्हाला तो बदल घडून आणण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकावे लागते.
८. बजेटमध्ये वाजवीपेक्षा जास्त खर्च समाविष्ट करणे
- तुम्ही बजेट तयार करत असल्यास, कर्ज फेडणे, आपत्कालीन निधी तयार करणे, सुट्टीसाठी बचत करणे आणि गरज पडल्यास नातेवाईकांना आर्थिक मदत करणे यासारख्या खर्चांचा समावेश करणे तर्कसंगत आहे.
- पण एकाच वेळी अनेक उद्दिष्टांसाठी बचत करणे किंवा बर्याच जबाबदाऱ्या एकाच वेळी अंगावर घेणे हे अवास्तव असू शकते आणि त्याचा तुमच्या बजेटवर आणि पर्यायाने तुमच्या कार्यक्षमतेवर अनावश्यक ताण येऊ शकतो.
९. खर्चाचा तपशील न पाहणे आणि तशी जुळवाजुळव न करणे
- काही वेळा आवश्यकतेनुसार तुम्हाला तुमची खर्चाची पद्धत बदलण्याची गरज असते.समजा तुमच्या खर्चाच्या तपशीलांवरून तुम्ही मनोरंजन, खरेदी आणि करमणूक यांसारख्या गोष्टींवर खूप जास्त खर्च करत असल्यास, तुम्हाला तिथे काही प्रमाणात बदल करायला हवा अन्यथा तुम्ही दर महिन्याला जास्त खर्च करत राहाल आणि आवश्यक खर्चांच्या वेळी तुम्हाला पैसे उभे करणे कठीण होऊन जाईल.
१०. स्वतःच्या इतर बचत निधीतून पैसे फिरवणे
- उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या महिन्याच्या बजेटमधील तुमचे मनोरंजन किंवा खरेदीचे बजेट आधीच खर्च केले असेल, तर मॉलमध्ये डिस्काउंट Sale आहे म्हणून तुमच्या किराणा किंवा वाहतूक निधीतून पैसे घेऊ नका.
११. तुमचे बजेट कधीही अपडेट न करणे
- तुमचे उत्पन्न आणि खर्च दरवर्षी बदलू शकतात. त्यामुळे, तुम्ही आज तयार केलेले बजेट पुढील वर्षी या वेळेपर्यंत उपयोगी ठरेलच असे नाही.
- खर्च नेहमीच बदलत असतो, त्यामुळे तुमचे बजेट नियमितपणे अपडेट करून भविष्यात येणारी कोणतीही समस्या तुम्ही टाळू शकता. तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात वाढ करण्यास विसरू नका.
हेही वाचा – 5 Biggest Wealth destroyers : ‘या’ ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान…
१२. चुकीचे बजेटिंग सॉफ्टवेअर निवडणे
- आज आपल्याला बजेटिंग ठरवायला मदत करतील अशा संगणक सॉफ्टवेअर प्रोग्राम, मोबाईल Apps आणि वेबसाइट्स या साधनांची कमतरता नाही.
- पण फक्त हे जाणून घ्या की एका व्यक्तीसाठी काम करणारी बजेट ट्रॅकिंग सिस्टम कदाचित तुमच्यासाठी काम करणार नाही.
- तुम्हाला उपलब्ध पर्यायांची तुलना करावी लागेल आणि तुम्हाला वापरण्यास सोयीस्कर असलेले सर्वोत्तम बजेटिंग App किंवा प्रोग्राम निवडावे लागेल.
१३. वायफळ खर्च करणाऱ्या मित्रांसोबत संगत ठेवणे
- तुमचे समवयस्क मित्र तुमच्याइतके बजेटबद्दल जागरूक नसतील तर तुमची प्रगती थांबू शकते.
- तुमच्या वायफळ खर्च करणाऱ्या मित्रांसोबत संगत ठेवण्याच्या प्रयत्नात, तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे उडवत रहाल
- अशा मित्रांपासून ४ पावले लांबच राहणे हिताचे आहे. याचा अर्थ या लोकांना तुमच्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकणे असा होत नाही, फक्त तुम्ही कोणासोबत खरेदी करता याची जाणीव ठेवा.
१४. कुटुंबाशी चर्चा न करता बजेट ठरवणे
- कुटुंबाच्या किंवा जोडप्यांच्या बाबतीत, कुण्या एकाच व्यक्तीने कौटुंबिक बजेट आणि घरगुती खर्चांवर नियंत्रण ठेवू नये.
- जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी संवाद साधतात आणि बजेटमधील अटींवर सहमत असतात तेव्हाच त्या घरातील बजेट प्रभावी ठरते, त्यामुळे बजेट कागदावर उतरवण्यापूर्वी त्यावर बोलण्यासाठीही वेळ काढा.
१५. अनियमित खर्चाबद्दल विसरणे
- भेटवस्तू, कार दुरुस्ती आणि घरातील सुधारणा यांसारख्या अनपेक्षित खर्चांसाठी तुम्ही बजेट करत आहात हे चांगले आहे, परंतु तुम्हाला वार्षिक विमा पेमेंट आणि कर बिले यासारख्या अनियमित खर्चांसाठी देखील बजेट करणे आवश्यक आहे.
१६. मौजमजेच्या पैशापासून स्वतःला वंचित ठेवणे
- तुमच्या पैशाबद्दल जागरूक असणं आणि कमी खर्च करणं याचा अर्थ घरी बसून स्वतःला कंटाळून टाकणं असा नाही .
- प्रत्येकाला आपल्या पैशात थोडी मजा करणं आणि रोजच्या Routine मधून वेळ काढून स्वतःवर थोडे पैसे खर्च करण्याचा हक्क आहे आणि यात काहीच गैर नाही.
१७. गरजेपेक्षा जास्त घरं खरेदी करणे
- इन्व्हेस्टमेंट म्हणून गरजेपेक्षा जास्त घरं घेणं, त्यांचे EMI, घरभाडी भरणं तुम्हाला तुमच्या राहत्या घरातून बेघर व्हायची वेळ आणू शकतं. म्हणून गरज असेल तरच एकापेक्षा जास्त घर खरेदीत गुंतवणूक करा.
यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की बजेटिंग म्हणजे केवळ तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींपासून वंचित ठेवणे नव्हे. तर, एक चांगलं बजेट ही तुमचे भविष्य उत्तम करणारी गुरुकिल्ली आहे!
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies