GIFT city
GIFT city
Reading Time: 5 minutes

Gujarat International Finance Tec-City

 गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City) हा गुजरात सरकारने एका उपकंपनीच्या सहकार्याने निर्मिती केलेला एक व्यापारी जिल्हा आहे. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले आणि अद्यायावत शहर (Smart City) योजनेअंतर्गत 886 एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेले एकमेव आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे.  येथे कार्यालये, निवासी क्षेत्र, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल्स, करमणूक केंद्रे आहेत. घरातून कामाच्या ठिकाणी सहज चालत जाता येईल अशी येथे व्यवस्था आहे, ज्यांना सायकलने यायचे आहे त्यांच्यासाठी विशेष मार्गिकेची योजना आहे. याशिवाय बाहेरुन सहज येता येईल अशी वाहतूक व्यवस्था आहे. याची रचना आर्थिकआणि माहिती तंत्रज्ञान यावरील उद्योगांना केंद्रस्थानी धरून करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापारी केंद्र आणि विशेष निर्यात उद्योग तेथे स्थापन करता येतील.      या शहराचे दोन विभाग पाडण्यात आले असून एका भागात देशांतर्गत उद्योग तर दुसऱ्या भागात निर्यात उद्योग असतील. देशांतर्गत उद्योग रुपया या चलनात तर निर्यात उद्योग परकीय चलनात चालतील. उपलब्ध जागेचा पुरेपूर उपयोग केला जाईल असे येथील बांधकाम आहे. येथील सर्व उद्योगांना पहिली 10 वर्ष आयकर द्यावा लागणार नाही.

     येथे उभारण्यात आलेल्या गगनचुंबी इमारती या गुजराथमधील सर्वात उंच इमारती असून त्या स्वयंपूर्ण आहेत.टाटा कम्युनिकेशने येथे डेटा सेंटर स्थापन केले आहे. तयार होणाऱ्या घन कचऱ्याची विल्हेवाट लावायची वेगळी स्वयंचलित यंत्रणा असून त्यामुळे शहर स्वच्छ सुंदर राहते या यंत्रणा पर्यावरण पूरक आहेत. पाण्याचा एकही थेंब येथून फुकट जाणार नाही तर येथे असलेल्या कोणत्याही नळास येणारे पाणी हे पिण्यायोग्य असेल. पर्यायी व्यवस्थेसह 24 तास सातत्याने वीज येथे मिळत राहील. विनाव्यत्यय जगभरात कुठेही संपर्क करता येण्याच्या दृष्टीने उच्य तंत्रज्ञानावर आधारित ऑप्टिकल केबलचे जाळे येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच कुलिंग यंत्रणा असून अशा प्रकारे  कुलिंग यंत्रणा असलेला हा एकमेव जिल्हा आहे.

हेही वाचा – Blue Chip Shares – ब्लू चिप शेअर्स मधील गुंतवणुकीचे फायदे…

 

GIFT-City ची वैशिष्ट्ये

गॅस पुरवठा आणि कचरा विल्हेवाट एवढेच प्रत्येक इमारतीस बाहेरून होईल बाकी सर्व दृष्टीने रहिवासी आणि व्यापारी इमारत स्वयंपूर्ण असेल. दोन्ही विभागात 28 मजले असलेली प्रत्येकी एक तयार इमारत बांधून पूर्ण झाली असून दुसऱ्या GIFT 2 इमारतीची उंची 122 मीटर असून ती अहमदाबादमधील दुसरी सर्वात उंच इमारत आहे.  हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतातील पाहिले आणि जागतिक क्रमवारीत तिसरे मोठे जागतिक आर्थिक व्यापारी केंद्र येथे उद्योग सुरू करण्यास एक खिडकी योजना असून सर्व परवानग्या अर्ज केल्यापासून 45 दिवसात मिळतात. विकसित व्यापार केंद्रात कमी दराने भाडेपट्टयावर जागा उपलब्ध केली जाऊन उद्योगांना नोंदणी फी, मुद्रांक शुल्क माफी असून असून अनेक करसवलतींचा त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला आहे.

GIFT-City मधील कंपन्यांना या मिळणार सुविधा

      मुंबई शेअरबाजार व राष्ट्रीय शेअरबाजार यांनी स्थापन केलेले India INE व NSE International Exchange हे आंतराष्ट्रीय शेअरबाजार येथे कार्यरत असून जगभरातून कोठूनही अनिवासी भारतीय व परकीय गुंतवणूकदार तेथे व्यवहार करू शकतात. हे व्यवहार जलद गतीने म्हणजेच 1 मिनिटात 1 लाख 60 हजाराहून अधिक सौदे या वेगाने होतात. येथील दलालांना को लोकेशनची सुविधा देण्यात आली असून  झटपट निष्कर्ष काढून आपोआप ऑर्डर देता येतील. यातील India INE हा बाजार 22 तास (सकाळी 4 ते रात्री 2) तर NSE International Exchange हा बाजार 15 तास (पाहिले सत्र सकाळी 8 ते सायंकाळी 5, दुसरे सत्र संध्याकाळी 5:30 ते रात्री 11:30) चालू असतो. येथे भारतातील व भारताबाहेरील कंपन्याचे समभाग, डिपॉसीटरी रिसीट, कर्जरोखे, परकीय चलन, व्याजदर, भारतीय निर्देशांक, वस्तुबाजारातील वस्तू, एक्सचेंज ट्रेडेड फंड यांच्यावर आधारित डेरिव्हेटिव्हच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील. या व्यवहारांना STT, CTT, Stamp Duty, Service Tax, दिर्घमुदतीच्या फायद्यावरील कर (LTCG), लाभांश वितरण कर (DDT), यातून वगळण्यात आले आहे

शेयर बाजारातही परदेशी गुंतवणूक

         आपली गुंतवणूक विविध प्रकारच्या साधनात विभागून असावी असे सर्व गुंतवणूक तज्ञ सांगत असतात. जगात नावाजलेल्या कंपन्यांमध्ये  गुंतवणूक करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. अनेक ब्रोकर्स, वित्तसंस्था, खाजगी बँका, ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आणि परदेशात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देणारे स्टार्टअप उद्योग यांच्या माध्यमातून  आपल्याला अशी गुंतवणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करता येणे आता सहज शक्य आहे. सन 2019 च्या जागतिक क्रमवारीनुसार मुंबई शेअरबाजार 10 व्या, तर राष्ट्रीय शेअरबाजार 11व्या स्थानावर आहे. भारतीय शेअरबाजारातील गुंतवणुकीत 22% परदेशी गुंतवणूक असताना जागतिक क्रमवारीत अग्रणी असलेल्या बाजारातही आपली काही गुंतवणूक का नसावी?  त्यातून किती परतावा मिळेल आणि किती धोका स्वीकारावा लागेल याच्या शक्यताबाबत विचार करून आपली प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष गुंतवणूक विदेशी शेअर, ईटीएफ, युनिट, एडीआर, जीडीआर सारख्या माध्यमातून करण्यासाठी अनेकांनी आपली गुंतवणूक खाती मोठ्या प्रमाणात उघडली आहेत.

हेही वाचा –  शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)…

 

अमेरिकन शेयर 

 कोविड 19 संकटानंतर जगभरात जवळपास प्रत्येक देशाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर तेथील शेअरबाजारानी नीचांकी पातळी गाठली. यानंतर अर्थव्यवस्थेस गती आणण्यासाठी तेथील सरकारने जे काही उपाय योजले, त्याच्या अनेक बऱ्यावाईट परिणामांपैकी महत्वाचा परिमाण हा तेथील शेअरबाजारावर झाला आणि बहुतेक देशातील बाजार निर्देशांक हे मार्च ते जुलै या चार ते पाच महिन्याच्या काळात आपल्या पूर्वीच्या पातळीजवळ आले. काहींनी नवा उच्चांक नोंदवला. तर अनेक बाजार आपल्या सर्वोच्च पातळीखाली रेंगाळले आणि त्या वर्षांअखेरपर्यंत आपली आजवरची सर्वोच्च पातळी तोडून त्यांनी नवीन उच्चांक नोंदवले. अशा तऱ्हेने सन 2020 यावर्षीची नोंद इतिहासात ‘बाजाराने वर्षभराचा किंवा मागील काही वर्षांचा गाठलेला नीचांक आणि आतापर्यंत नोंदवण्यात आलेला सर्वोच्च निर्देशांक’ अशा अभिनव स्वरूपात झाली आहे. बाजार निर्देशांक कायम वरखाली होत राहण्याचे प्रमाण अन्य देशात आपल्या तुलनेने कमी असल्याने, जगभरातील अन्य प्रमुख यशस्वी कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असावेत त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीत विविधता येईल असे गुंतवणूकदारांना वाटू लागले आहे.  युरोप, अमेरिका त्यातल्या त्यात अमेरिकेत आपली काहीतरी गुंतवणूक असावी. केओ, फेसबुक, गुगल, अँपल, जनरल मोटर्स, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, टेक्सला, कॉलकॉम, झूम, बर्कशियर हॅथवे, विसा इंटरनॅशनल यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांचे भारतीयांना सुप्त आकर्षण आहे. भारतीय रिजर्व बँकेने प्रत्येक भारतीयाला दरवर्षी Liberalised Remittance Scheme (LRS) या  योजनेअंतर्गत कोणत्याही परवानगीशिवाय अडीच लाख डॉलर्स भारताबाहेर नेण्याची परवानगी दिली असल्याने विना अडथळा गुंतवणूक रक्कम उपलब्ध असते. ही मर्यादा  जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या आसपास असली तरी बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ती अमर्यादच आहे म्हणायला हरकत नाही.

भारतीय शेअरबाजाराच्या तुलनेत अमेरिकन शेअर बाजाराचे वैशिष्ठये-

  1. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे बाजार मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता कमी.
  2. नियमकांच्या वर्चस्वामुळे बऱ्यापैकी नियंत्रित, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची अत्यंत शक्यता कमी.
  3. डॉलरची रुपयाशी केलेल्या तुलनेत गेल्या 10/12 वर्षात भारतीय बाजारापेक्षा मिळवलेला अधिक आकर्षक परतावा.
  4. अनेक भविष्यवेधी कंपन्यामध्ये त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करता येणे शक्य.

जगभरातील कोणत्याही बाजारात अशी गुंतवणूक आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने त्यावरील करांचा आपल्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन करता येऊ शकते-

प्रत्यक्ष गुंतवणूक

1.परदेशातील गुंतवणुकीचे खाते आपल्या देशातील ब्रोकरमार्फत उघडणे.

2.परदेशातील ब्रोकरच्या भारतातील फर्म मधून परदेशात गुंतवणूक करण्याचे खाते उघडणे.

अप्रत्यक्ष गुंतवणूक –

1.विदेशी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे युनिट घेणे.

2. ईटीएफ खरेदी करणे.

3.परदेशी उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी स्थापना केलेले स्टार्टअप उद्योग.

हेही वाचा –  Stock Settlement Cycle: सेबीचे (कदाचित) घुमजाव…

 

गिफ्टसिटीतील आंतरराष्ट्रीय शेअरबाजारास सुरुवात होऊन जवळजवळ तीन वर्षे होतील. निवासी भारतीय गुंतवणूकदारांना येथे गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती. अलीकडेच अशी परवानगी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे या बाजारात 3 मार्च 2022 पासून अल्फाबेट, टेक्सला, अमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, अँपल, वॉलमार्ट या 8 प्रमुख अमेरिकन कंपन्यात व्यवहार होण्यास सुरुवात झाली यातील अल्फाबेट ही गुगलची आणि मेटा ही फेसबुकची मूळ कंपनी आहे. नजीकच्या काळात 50 विदेशी कंपन्यांची नोंद होईल. यात बेकशेअर हॅथवे, मास्टरकार्ड, जेपी मार्गेन चेस, मॉर्गन स्टेंली, पेपल, फायझर, नायके, पेप्सीको, इंटेल यांचा समावेश आहे. याचा अर्थ या शेअर्सची बाजारात नोंदणी होणार नसून त्याच्या डिपॉजीटरी रिसप्ट नोंदवल्या जातील त्या बाजार पुरस्कर्त्यांनी विदेशी बाजारात शेअर खरेदी केले असतील त्याचे अपुरस्कृत डिपॉजीटरी रिसीटच्या छोट्या छोट्या भागात विभाजन करण्यात येईल या विभाजित भागात  त्यांची खरेदीविक्री करता येईल. याशिवाय जगातील इतर बाजारातील शेअर येथे लवकरच खरेदी विक्री करण्यास नोंदवण्यात येतील. आयएफएससी एथोरिटी हे याचे नियामक असून सर्व व्यवहारांवर त्त्यांचे नियंत्रण असेल. डे ट्रेडिंग करता येईल पण शॉर्ट सेलिंग करता येणार नाही. त्याचप्रमाणे ब्रोकरेज आणि भाव वरखाली होण्याची पातळी किती असावी ते आधीच निश्चित केलेले आहे.   गुंतवणूकदारांना वेगळे डी मॅट, ट्रेडिंग आणि गिफ्टसिटी मधील बँकेत खाते उघडावे लागेल हे व्यवहार डॉलर्स या चलनात होतील. वर उल्लेख केलेली रक्कम दरवर्षी प्रत्येक भारतीयांस या खात्यात ट्रान्सफर करून डॉलर्समध्ये कोणतीही अन्य परवानगी न घेता प्रचलित दरात बदलता येईल. अशीच खरेदी विक्रीची सुविधा मुंबई शेअरबाजाराच्या इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंजवर उपलब्ध असेल ज्यात मुंबई शेअरबाजार स्वतः ब्रोकर म्हणून स्वतःचा परिचय करून देईल. या डिपॉजीटरी रिसप्टमध्ये केलेली गुंतवणूक ही परकीय शेअरमध्ये केलेली गुंतवणूक समजण्यात येऊन त्यावरील नफा भांडवली नफा समजण्यात येईल. तो दोन वर्षांच्या आत झाला असल्यास अल्पमुदतीचा भांडवली नफा समजून त्यावर नियमित दराने, तर दोन वर्षाहून अधिक कालावधी झाल्यास दिर्घमुदतीचा समजण्यात येऊन त्यावर इंडेक्सेशनची सवलत घेऊन 20% कर द्यावा लागेल. येथे उद्योगांना असलेली कर सवलत निवासी भारतीय गुंतवणूकदारांना मिळेल की नाही याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अजून कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही. जर अशी सवलत इतर गुंतवणूकदारांना मिळत असेल तर सर्वानाच मिळायला हवी, पण फक्त उद्योगांनाच अशी सवलत असेल असा माझा अंदाज आहे. असे असले तरी यामुळे परकीय कंपन्यांत गुंतवणूक करण्याचे एक नवे दालन सर्व निवासी भारतीयांना या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…