आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू अविभक्त कुटूंबाची (HUF) निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जाते. परंपरागत मालमत्ता, असलेल्या मालमत्तेतून निर्माण झालेली संपत्ती, सदस्यांनी दिलेली मालमत्ता, देणगी यामुळे त्यात भर पडत असते.
असे असले तरी ही मालमत्ता व्यक्तीची नसून पूर्ण कुटुंबाची असते आणि त्यातील सर्व सदस्यांचा त्यावर अधिकार असतो. जन्म, लग्न आणि दत्तक विधान याद्वारे याचे सभासदत्व आपोआपच मिळते. या सर्व सदस्यांचे मालमत्तेत समान अधिकार असल्याचे अलीकडील न्यायालयीन आहेत.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने या रचनेस परंपरेचे अधिष्ठान आहे. हिंदू अविभक्त कुटुंबास कायद्याने स्वतंत्र अस्तीत्व असून ते व्यक्तीपेक्षा वेगळे आहे. यास स्वतंत्र व्यक्तिप्रमाणे कर आकारणी होऊन वेगळ्या करसवलती मिळतात. हिंदू अविभाज्य कुटुंब निर्माण करणे सोपे असले तरी ते रद्द करणे अत्यंत कठीण आहे.
काळाच्या ओघात एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत चालली असल्याने, त्यातील सदस्यांचे राहणीमान, विचार करण्याची पद्धत बदलली आहे, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने यातील सदस्य विविध प्रांतात, देशात गेल्याने त्याच्या मालमत्ता तेथेही निर्माण झाल्या आहेत, तेथे असलेल्या कायदेशीर तरतुदी वेगवेगळ्या आहेत.
या बदलाचा एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी विचार करताना काळाबरोबर जाणारी एखादी पद्धत असावी असा विचार करून आपल्या विशेष हक्काची जपणूक करण्यासाठी विशेषतः त्यातील लाभार्थी, सदस्य, विवाहित स्त्री सभासदांचे हक्क यातून निर्माण होणारे वाद गैरसमज यावर मात करता येऊ शकेल का? याचा विचार करून आता काही लोक खाजगी कौटुंबिक न्यास (Private Family Trust) निर्माण करीत आहेत.
नक्की वाचा : जेष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध करसवलती
बदलत्या मानसिकतेस अनुसरून आपल्या मर्जीनुसार याची रचना करता येते. यात लाभार्थ्यांच्या स्वातंत्र्याची जपणूक होऊन यातील मालमत्तेचे कमी अधिक प्रमाणात लाभ मिळून त्यांच्या लाभार्थीना मिळून त्यात आवश्यक असल्यास गरजेनुसार बदल करता येतात. अशा (PFT) ट्रस्टचे व्यवस्थापन हे स्वतंत्र असते. या व्यवस्थापन मंडळात नातेवाईक, मित्र, कुटुंबातील अथवा परिचयातील वकील, सनदी लेखापाल यासारखी तज्ञ मंडळी व्यवस्थापक म्हणून असू शकतात. याची रचना त्यातील मालमत्तेचे व्यवस्थापन, लाभार्थींना मिळू शकणारा मोबदला याचे निश्चित धोरण स्वीकारता येईल.
कुटुंबाची मालमत्ता व्यवसाय याची मालकी निश्चित हेतूने न्यासाकडे असेल यासाठी भारतीय न्यास कायदा (Indian Trust Act 1882) चा आधार घेता येईल. अशा ट्रस्टकडे आपली वैयक्तिक मालमत्ता हस्तांतरीत करून निर्माता म्हणून त्याचा वापर वैयक्तिक आणि निश्चित अशा कुटुंबातील व्यक्तींसाठी करू शकेल. याशिवाय मृत्युपत्राद्वारे ही मालमत्ता देता येईल यामुळे त्यांचे किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे भवितव्य उज्वल होईल.
नक्की वाचा – अशा पद्धतीने वाचवा कर
असे ट्रस्ट दोन प्रकारचे असू शकतील. विवेकाधिन (Discretionary) आणि विवेकाहीन (Non-Discretionary). यातील विवेकाधिन ट्रस्टचा निर्माता यातील आपल्या मनाप्रमाणे यातील मालमत्ता उत्पन्नाची विभागणी करेल तर विवेकहीन ट्रस्टमध्ये त्यातील लाभार्थींचा निश्चित वाटा ठरवण्यात येईल. निर्माता ट्रस्टची मालमत्ता यातून मिळणारे उत्पन्न यांची विल्हेवाट कशी लावायची याचे नियोजन विश्वस्तांच्या मार्गदर्शनानुसार ठरवू शकेल. यातील लाभार्थींचे अधिकार जबाबदारी निश्चित असेल. या खाजगी कौटुंबिक न्यासामुळे –
- मालमत्तेचे रक्षण होईल. ट्रस्टकडे हस्तांतरण केलेल्या मालमत्तेस दोन वर्ष होऊन गेल्यावर त्यावर न्यायालयीन टाच आणता येणार नाही.
- सदस्यांमधील सामंजस्य राखले जाईल.
- कौटुंबिक परंपरा आणि मूल्यांची जोपासना होईल.
- बाहेरील व्यावसायिक मदतीने मूल्यवृद्धी होऊ शकते.
- अनावश्यक कायदेशीर लढाया थांबतील.
यासारखे फायदे होऊ शकतात.
करभार कमी करण्याचा कायदेशीर मार्ग म्हणून याचा वापर करता येईल. प्रचलित आयकर कायद्याच्या दृष्टीने व्यक्तीने आपली संपत्ती खाजगी कौटुंबिक न्यासास दिली तर त्यावर कोणताही कर द्यावा लागत नाही. त्याचप्रमाणे न्यासकडून सभासदांना मिळालेली अंतिम वाटणी किंवा अंतरिम मोबदला यावरही कर द्यावा लागत नाही. न्यासाची रचना कशी असेल त्याप्रमाणे न्यासाचे उत्पन्न हे ट्रस्टकडे किंवा सभासदांना दिले जाईल यावर रचनेनुसार नियमाप्रमाणे लागू असलेला किमान समान कर अथवा उत्पन्नानुसार कर भरावा लागेल.
मालमत्ता रक्ताच्या नातेवाईकांत हस्तांतर होणार असल्याने प्रत्येक राज्यात असलेल्या नियमांनुसार नोंदणी फी मध्ये सवलत मिळेल. यामुळे आपण योजलेल्या अपेक्षा पूर्ण होतील. मालमत्ता सुरक्षित ठेवता येईल, त्यात भर घालता येईल. आपल्या कुटुंबियांचे शिक्षण, आरोग्य, पर्यटन, लग्न या सारख्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अप्रत्यक्षपणे हातभार लावून तो विसर्जित करता येईल.
आपल्या मनातील अनेक गोष्टींची पूर्तता खाजगी कौटुंबिक न्यास स्थापून होत असेल तरी असा न्यास स्थापन करण्यापूर्वी तो स्थापन करण्यासाठी येणारा खर्च, त्याच्या व्यवस्थापणास लागणारा खर्च यांची तुलना ट्रस्टकडे उपलब्ध होणारी मालमत्ता आणि त्यातून मिळत असलेले किंवा मिळू शकणारे उत्पन्न याचा विचार करावा. कारण अशा पद्धतीने न्यास निर्माण करणे हे थोडे खर्चाचे काम आहे. त्यात नियमितपणे करावा लागणाऱ्या संभाव्य खर्चाची जसे हिशोब, उत्पन्न आणि खर्च यांचे मूल्यांकन मूल्यमापन यासाठीची तरतूद या सर्वांचा विचार करायला हवा.
असा न्यास निर्माण करताना यातील कायदेशीर बाबतीत तज्ञ विधिज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. हा लेख हिंदू अविभाज्य कुटुंब या संकल्पनेला असलेल्या उपलब्ध पर्यायाची माहिती देण्याच्या शैक्षणिक हेतूने लिहिला असून तो कोणत्याही पर्यायाची शिफारस करत नाही याची नोंद घ्यावी.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून या लेखातील व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे)