गुरुवार (28 मार्च) पासून भारतीय शेअरबाजारात एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होत आहे. बाजारात सध्या होणाऱ्या सर्व व्यवहाराची सौदापूर्ती T+1 या पद्धतीने 27 जानेवारी 2023 पासून होत आहेत म्हणजेच खरेदी केले असल्यास शेअर्स किंवा विक्री केली असल्यास पैसे यांची देवाणघेवाण ब्रोकरच्या खात्यात दुसऱ्या कामकाज दिवशी होते आणि त्याच दिवशी ग्राहकाला शेअर्स किंवा पैसे मिळतात.
यापूर्वी हे व्यवहार T+2 असे म्हणजे व्यवहार झाल्यावर कामकाजाच्या दोन दिवसानंतर होत असत. यात टप्याटप्याने सुधारणा होऊन आज चीन नंतर भारत हा जगातील दुसरा असा देश आहे तेथे शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती T+1 पद्धतीने होत आहे. जगभरात अन्य देशात अजूनही सौदापूर्ती T+2 किंवा T+3 या पद्धतीने होत आहेत. अमेरिका आणि जपान हे देश आता याबाबत विचार करीत असून काही देश या वर्षी टप्याटप्याने या चळवळीत सामील होतील.
आज आपण तात्काळ सौदापूर्तीच्या दिशेने जाणारे पाहिले पाऊल उचलले असून आपण याबाबत T+0 (म्हणजे त्याच दिवशी) मर्यादित अशी सौदापूर्ती करणार आहोत. अशी पद्धत मर्यादित शेअर्ससाठी होंकाँग, तैवान, रशिया, दक्षिण कोरियात उपलब्ध आहे. आपले उद्दिष्ट यापुढील म्हणजे सर्वच शेअर्सच्या बाबतीत तात्काळ सौदापूर्ती हे आहे. सौदापूर्तीचा कालावधी जितका कमी तेवढी त्यातील जोखीम कमी होते, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते.
लवकरच सर्व व्यवहार ऐच्छिकरित्या T+0 म्हणजे, व्यवहार ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याची सौदापूर्ती होईल आणि भविष्यात तात्काळ (spot) सौदापूर्ती होईल. सेबीने यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करून जनतेकडून त्यांवरील सूचना 12 जानेवारी 2024 पर्यंत मागवल्या होत्या. त्याचाच विचार करून प्रायोगिक तत्त्वावरील हे पहिले पाऊल उचलले असून सध्या ज्या सुलभतेने आपण यूपीआयचा वापर करून आता कुणालाही तात्काळ पैसे पाठवू शकत आहोत त्याचप्रमाणे भविष्यात शेअर्समधील खरेदी विक्रीचे व्यवहार सहज आणि तात्काळ करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
नक्की वाचा – तात्काळ सौदापूर्तीच्या दिशेने
सेबीने जाहीर 21 मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्रायोगिक तत्वावर 25 कंपन्यांच्या शेअर्ससाठी निवडक ब्रोकर्सकडे 28 मार्च 2024 पासून ही सुविधा उपलब्ध होईल.
या आहेत त्या 25 कंपन्या-
- AMBUJA CEMENTS LTD.
- ASHOK LEYLAND LTD.
- BAJAJ AUTO LTD.
- BANK OF BARODA
- BHARAT PETROLEUM CORPORATION LTD
- BIRLASOFT LTD
- CIPLA LTD.
- COFORGE LTD
- DIVIS LABORATORIES LTD.
- HINDALCO INDUSTRIES LTD.
- INDIAN HOTELS CO.LTD.
- JSW STEEL LTD.
- LIC HOUSING FINANCE LTD.
- LTIMINDTREE LTD
- MRF LTD.
- NESTLE INDIA LTD.
- NMDC LTD.
- OIL AND NATURAL GAS CORPORATIO
- PETRONET LNG LTD.
- SAMVARDHANA MOTHERSON INTERNATIONAL LTD
- STATE BANK OF INDIA
- TATA COMMUNICATIONS LTD.
- TRENT LTD.
- UNION BANK OF INDIA
- VEDANTA LTD
नक्की वाचा – युपीआय मधील बदल
- ही सुविधा फक्त कॅश सेगमेंट साठी उपलब्ध आहे
- एकाच शेसर्सचे T+1 आणि T+0 असे दोन्ही सेगमेंटचे भाव स्क्रीनवर वेगवेगळे दिसतील. समजा ही कंपनी Vedanta ltd असेल तर तिचा भाव T+1 सेगमेंटमध्ये Vedanta ltd पुढे चालू बाजारभाव तर T+0 सेगमेंटमध्ये Vedanta ltd पुढे चालू बाजारभाव या पद्धतीने दर्शविला जाईल. कंपनीच्या ISIN क्रमांकात काहीही फरक नसेल.
- दोन्ही सेगमेंटसाठी शोध होऊन मान्य झालेल्या भावातील फरकाची मर्यादा जास्तीतजास्त 10% असेल, ही 5% मर्यादा गाठल्यावर रिसेट केली जाईल.
- या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यत केलेले T+0 चे सर्व व्यवहार त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यत पूर्ण केले जातील. या संबंधित नियम शेअरबाजाराच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.
- दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यत क्लायंट कोड मध्ये दुरुस्ती करायची असल्यास करता येईल.
- दुपारी दीड नंतर केलेले सर्व व्यवहार T+1 या यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीने होतील.
- सौदापूर्तीचा विचार करता या दोन्ही प्रकारच्या पद्धतीसाठी सध्याच्या जोखीम व्यवस्थापन धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त T+0 मधील व्यवहार त्याच दिवशी पूर्ण केले जातील.
- इंडेक्सची मोजणी सध्याच्या T+1 सेगमेंट मधील व्यवहारांवर केली जाईल. T+0 साठी वेगळा बंद भाव असणार नाही. त्याच प्रमाणे T+0 या सेगमेंट साठी प्रि ओपनिंग आणि पोस्ट क्लोजिंग सेशन असणार नाही.
- शेअरबाजार, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉजिटरी दर 15 दिवसांनी नवीन पद्धतीने होणाऱ्या व्यवहार कामकाजाचा आढावा घेतील.
- त्याचा विचार करून व्यवहार होणाऱ्या कंपन्या आणि व्यवहार करू शकणारे दलाल यांच्या संख्येत भर पडेल.
थोडक्यात,
- सुरुवातीला काही शेअर्सच्यासाठी T+0 चे व्यवहार मर्यादित काळासाठी आणि निवडक ब्रोकर्सकडेच उपलब्ध असतील.
यामुळे
- ●खरेदीदारास तात्काळ व्यवहार करायचा असेल आणि विक्रेत्यास तो दुसऱ्या दिवशी चालणार असेल तर असे व्यवहार होऊ शकणार नाहीत.
- ज्यांना डे ट्रेडिंग करायचं आहे ते T+0 किंवा भविष्यात उपलब्ध होणाऱ्या तात्काळ व्यवहाराकडे जाणारच नाहीत, कारण त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल.
बाजारात एकाच वेळी एका कंपनीच्या शेअर्सचे T+1, T+0 दीड वाजेपर्यंतचे असे वेगवेगळे भाव दिसतील. हे भाव ओळखून त्यातील फरक समजून घेण्यासाठी गुंतवणूकदार अधिक शिक्षित आणि जागृत असणे जरुरीचे आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार एकाच शेअर्सच्या वेगवेगळ्या व्यवहार प्रकारातील (segment) भावातील फरकामुळे त्या शेअर्सची प्रत्येक प्रकारातील खरीखुरी किंमत निश्चित होण्यास मदतच होईल. भावातील या फरकामुळे निर्माण होणाऱ्या नव्या गुंतवणूक संधी शोधणाऱ्या शोधकांना दोन्ही सेगमेंटमधील भावाच्या फरकाचा लाभ घेता येईल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पण पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)