परवाची गोष्ट , सोसायटीच्या आवारात 7-8 बायका घोळका करून काहीतरी बोलत होत्या. त्यांच्या आवाजावरून आणि एकंदरीतच बोलण्यावरून काहीतरी विशेष झाल्याचे जाणवत होतं. तेवढ्यात माने मावशींनी थांबवून माझ्याशी बोलायला सुरुवात केली, “ काही कळलं का तुम्हाला ? अहो, शर्माजींना म्हणे काही दिवसांपूर्वी कुणाचा तरी कॉल आला आणि तुम्ही कुठल्यातरी मोठ्या प्रकरणात अडकले आहे आणि त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर दोन लाख रुपये पाठवा, असं म्हणाले.” “मिसेस शर्मा तर रडून रडून सगळ्यांना सांगतात ए ”. मी म्हटलं मग दोन लाख रुपये पाठवले का ? तर चक्क हो म्हटल्या त्या ! “ काहीतरी डिजिटल अरेस्ट का बिरेस्ट असं म्हणत होते ते लोक,असं सांगितलं मिसेस शर्मानी ! ” दोन दिवस घरात बसून राहिले, ते ही कुणालाही, काही न सांगता, आज न राहून मन मोकळ्या करताय हो सगळ्यांकडे . ” इति माने मावशी !
मागच्या काही दिवसात, तुम्हीही असा काही प्रसंग ऐकला किंवा वाचला असेल.
एआयच्या आभासी युगामधला ‘डिजिटल अरेस्ट’ हा एक जबरदस्त असा ट्रेंडिंग शब्द सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतोय. वर्तमानपत्रात सायबर गुन्हा या मथळ्याखाली डिजिटल अरेस्ट केलेल्या अनेक बातम्या येत आहेत. न केलेल्या चुकीसाठी आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल, वास्तवात न झालेली अटक म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’ असे आपण म्हणू शकतो !
- डिजिटल आणि एआयच्या माध्यमांचा गैरवापर करून लोकांची अतिमहत्त्वाची माहिती चुकीच्या पद्धतीने मिळवून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढत आहे. पण तरी सुशिक्षित आणि ‘डिजिटली अवेअर’ असणारे सगळ्याच वयोगटातली मंडळी या गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजपणे अडकून लाखों रुपये गमवतात.
- मानसिक त्रास देणारी आणि भीतीपोटी, अस्तित्वात नसणारी अशी गोष्ट मान्य करायला लावणारी घटना आहे.
- गुन्हेगार या गुन्ह्याची सुरुवात एका फोन कॉल द्वारे करतो. समोरील व्यक्तीला फसवण्यासाठी एक आराखडा आखला जातो आणि त्या व्यक्तीला अडकवण्यासाठी एक कारण वापरले जाते जसे की, तुम्ही मागवलेले कुरियर सध्या आमच्याकडे असून त्यामध्ये अमली पदार्थ सापडले आहेत.
- हे कुरिअर ज्यांनी पाठवले आहे तो माणूस आमच्या ताब्यात आहे आणि त्यांनी तुमचे नाव घेतले आहे. ही टोळी मोठी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्हाला या प्रकरणाचा कसून तपास करायचा आहे.
- तुम्ही या प्रकरणात अडकले असून सेंट्रल लॉ एनफोर्समेंट या डिपार्टमेंटचे अधिकारी तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
असे सांगून मेसेजेस, फोन कॉल, व्हिडिओ कॉल यांचा सतत काही तास भडीमार करून तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली आहे असे भासवले जाते. यासंदर्भात कोणाशीही काहीही न बोलण्याची तंबी दिली जाते. तुमचे सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील अशीही धमकी दिली जाते. त्यामुळे फोनवरची व्यक्ती मानसिक दबावाखाली येते.
महत्वाचे : फसव्या जाहिरातींना भुलू नका !
- अर्थात हे सगळं ऐकून सहाजिकच फोनवरची व्यक्ती घाबरून आणि हतबल होऊन या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवते आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक मागणीला प्रतिसाद देऊन शिस्तबद्ध पद्धतीने गुन्हेगाराच्या तावडीत अडकते.
- पण हे सगळं होत असताना एक गोष्ट विसरली जाते की डिजिटल अरेस्ट असा कुठलाच प्रकार भारतीय कायद्यानुसार अस्तित्वात नाही आणि गुन्हेगारांनी केवळ पैसे उकळण्याचा नवीन प्रकार शोधून काढला आहे.
- हे त्रिवार सत्य जर प्रत्येकाने मनात बिंबवले तर गुन्हेगारांचा पहिला फोन कॉल आल्यानंतर गोष्ट पुढे सरकणार नाही.
- आणि कदाचित यासाठी आणि कुटुंबासाठी वर्षानुवर्षे जमवलेले पैसे असे सहजपणे आपणहून गुन्हेगारांच्या हातात देण्याची वेळ पडणार नाही.
- “पहीला फोन आल्यावरच गोंधळून न जाता, शांतपणे आपण असं काही पार्सल किंवा कुरियर पाठवलं नाहीये. आणि तुमच्याकडे आलं असेल तर त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. तुम्हाला हवं तर खुशाल मला अटक करायला या. मी मात्र तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करायला जात आहे” असं ठणकावून सांगितलं तर वर्तमानपत्रात नक्कीच काहीतरी वेगळं वाचायला मिळेल, नाही का?
कोणत्या चुका टाळल्या पाहिजे ?
- समाज माध्यमांवर तुमची वैयक्तिक आणि अतिमहत्त्वाची माहिती देऊ नका.
- याचा वापर तुम्हाला फसवण्यासाठी केला जाऊ शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
- अनोळखी व्यक्तीसोबत बँक खात्याची माहिती, खाते क्रमांक, पासवर्ड, बँक शाखा अशा कोणत्याही स्वरूपाच्या माहितीची देवाण-घेवाण करू नका.
- मोबाईल नंबर, ईमेल-आयडी, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, पिन नंबर,आधार कार्ड अशी वैयक्तिक माहिती फोनवरून कोणालाही देऊ नका. सार्वजनिक ठिकाणी यासंदर्भात बोलणे टाळा.
डिजिटल अरेस्ट सारखा काही प्रकार तुमच्या सोबत घडला तर आपले जवळचे नातेवाईक किंवा मित्र मंडळी यांच्यासोबत मोकळेपणाने बोला.
घरात जेष्ठ नागरिक असतील तर याबाबत त्यांना सतर्क राहायला सांगा. तसेच कुठल्याही प्रकारची लिंक आणि मेसेजेसला प्रतिसाद देऊ नका याची दक्षता घ्या.