Reading Time: 4 minutes

आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने विचार केल्यास ढोबळमानाने आपल्या आयुष्याचे तीन भाग पडतात. वयाच्या बाविशी-पंचविशी पर्यंतचा शिक्षणाचा काळ, जेव्हा आपण स्वतःमध्ये गुंतवणूक करत असतो. त्यापुढील साधारण साठीपर्यंतची सुमारे  ३५ वर्षे ही आर्थिक कमाई करण्यासाठी आणि त्यापुढील २०-२५ वर्षे ही सेवानिवृत्ती म्हणजेच रिटायरमेंटची. 

यातल्या मधल्या आर्थिक कमाईच्या काळात आपल्या पुढील पिढीचे शिक्षण आणि आपल्या रिटायरमेंटसाठीच्या निधीची साठवणूक अशा दोन प्रमुख जबाबदाऱ्या आपण पार पाडत असतो. सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की लोक मुलांच्या शिक्षणासाठीच्या आर्थिक गरजांविषयी जेवढे जागरूक असतात तेवढे स्वतःच्या सेवानिवृत्तीविषयी नसतात. बहुतेकांचे या विषयीचे प्लॅनिंग वयाची पंचेचाळीशी उलटली किंवा मुलं कॉलेजला जायला लागली की मग सुरू होतं. अर्थातच ही एक महागडी चूक आहे.

  • रिटायरमेंटसाठीचं नियोजनाबद्दल विचार करताना सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की तो आपल्या जीवनातील एक अपरिहार्य टप्पा आहे. नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीसाठी ठराविक वयोमर्यादा असते. पण उद्योजक किंवा व्यावसायिकांना देखील कधी ना कधी सर्व व्यापातून बाहेर पडून निवांतपणा गरजेचा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे, निवृत्तीनंतर आपलं उत्पन्न थांबणार असतं पण खर्च वाढतच जाणार असतात. आणि तिसरी गोष्ट, वाढत्या पाश्चात्यीकरणामुळे पुढील पिढी उतारवयात आपला सांभाळ करायला जवळ असेलच याची खात्री नाही. त्यामुळे आपणच पुरेशी पुंजी जमा करणे महत्त्वाचे ठरते.
  • सेवानिवृत्तीनंतरच्या किती काळासाठी आपल्याला नियोजन करण्याची गरज आहे याचा अंदाज अनेकांना नसतो. १९६० मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ४० वर्षांचं होतं. ते वाढून आता ६८.५ वर्षांपर्यंत पोचले आहे. महाराष्ट्रात ते ८० वर्षांपेक्षा अधिक आहे. भविष्यात ते अजून वाढतच जाणार आहे. ‘मिलेनिअल’ किंवा १९८०-९९ या काळात जन्मलेल्या लोकांचे सरासरी आयुष्यमान ७५ हुन अधिक असेल तर नवीन सहस्रकात जन्मलेल्या व्यक्तींचे सारासरी आयुष्यमान ८५-९० वर्षे असेल असा अंदाज आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये हीच सरासरी जास्त असेल. त्यामुळे वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त होण्याचे ठरवणाऱ्या व्यक्तीने पुढील किमान ३० वर्षांसाठी आर्थिक नियोजन केलेले असले पाहिजे.
  • सध्या तरुणांमध्ये लवकर रिटायर होण्याचं एक स्वप्न फॅशन किंवा फॅड सारखं दिसून यायला लागलंय. वयाच्या ४५-५० वयापर्यंत उत्पन्न, जबाबदाऱ्या वगैरे विवंचनेतून बाहेर पडून पुढचं ‘लाईफ एन्जॉय’ करायचं. मात्र हे व्यवहारात उतरवण्यात एक मोठी समस्या असते. लवकर रिटायरमेंटमुळे एकीकडे कमाईची आणि गुंतवणुकीची वर्षे कमी होतात, तर दुसरीकडे साठवलेली पुंजी जास्त वर्षे पुरवावी लागते. म्हणजेच ४५व्या वर्षी रिटायरमेंट घेणाऱ्याला निधी जमा करायला वीसच वर्षे मिळतात आणि ती पुंजी वयाच्या नव्वदीपर्यंत म्हणजे पुढील ४५ वर्षे पुरवणे गरजेचे ठरते. अर्थातच त्यासाठी कमाईच्या वर्षात बचत किंवा गुंतवणुकींसाठी उत्पन्नाचा फार मोठा भाग बाजूला काढावा लागतो. हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही.
  • सेवानिवृत्ती आणि त्यानंतरचे नियोजन हे प्रदीर्घ काळाचे असल्याने आपल्याला महागाईचा परिणाम नक्की काय होईल, याचा अंदाज येत नाही. गेल्या तीन दशकांमध्ये भारतातील महागाईचा दर सरासरी ७% पेक्षा अधिक होता. अशीच महागाई भविष्यात कायम राहील असे गृहीत धरले तर ३० वर्षात आपला मासिक खर्च आजच्या ८ पट वाढलेला असेल. म्हणजे आज ३० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मासिक खर्च रू २५,०००/- आहे असे मानले तर तीस वर्षांनी रिटायरमेंट वेळेस तिचा दरमहा खर्च दोन लाख रूपये झालेला असेल. तर रिटायरमेंटनंतर वाढत वाढत अजून २५ वर्षांनी तोच मासिक खर्च तब्बल १२ लाख झालेला असेल!  ज्यांना हे आकडे फार जास्त वाटत असतील त्यांनी गेल्या ५५ वर्षात मासिक घरगुती खर्च किती वाढलेत त्याचा विचार करावा. 
  • १९६५ साली ३० वर्षे वयाच्या काहीशे रूपये महिना कमावणाऱ्या मध्यमवर्गीय व्यक्तीला कोणी सांगितले असते की २०२० मध्ये तुमचा मासिक खर्चच २५,००० वर जाईल तर तिला ते खरे वाटले असते का? अर्थात महागाई दराप्रमाणेच जीवनशैलीतील खर्चिक बदल देखील याला कारणीभूत आहेत.

  • वाढत्या खर्चांच्या रेट्याला तोंड देऊन रिटायरमेंटसाठी लागणारी पुंजी तयार करण्यासाठी महागाईदरापेक्षा जास्त परतावा देऊ शकेल अशा दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांची निवड अपरिहार्य ठरते. 
  • प्रॉव्हिडन्ट फंड किंवा आयुर्विम्याच्या एंडोमेन्ट पॉलिसीज त्यासाठी तोकड्या पडतात कारण त्यातील पैसे सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवले जातात. त्यातून महागाईदरापेक्षा विशेष जास्त परतावा मिळू शकत नाही. किंबहुना आयुर्विमा पॉलिस्या वार्षिक सरासरी ५-५.५% पेक्षा जास्त परतावा देत नाहीत त्यामुळे क्रयशक्तीचा विचार करता त्यात आपले नुकसानच होते. त्यामुळे जरी जोखीम जास्त असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडांमधे गुंतवणूक करणे गरजेचे ठरते.
  • तुमचं वय किती आहे आणि दरमहा खर्च किती आहे त्यावरून तुम्ही साठाव्या वर्षी सेवानिवृत्त होताना किती पुंजी जमा केलेली असावी त्याचे सुलभ अंदाज पुढील कोष्टकात दिले आहेत. त्याच्या आकडेमोडीसाठी सरासरी महागाई दर, गुंतवणुकीवर मिळू शकणारा नक्त परतावा, निवृत्तीपश्चात आयुष्यमान इत्यादी गोष्टींविषयी वास्तववादी गृहीतके वापरली आहेत. 

  • या तक्त्यावरून दिसून येतं की आज २५ वर्षे वय आणि दरमहा २०,००० चा खर्च असलेल्या व्यक्तीला वयाच्या साठीपर्यंत रू ५ कोटी जमा केले पाहिजेत, तर त्या पुंजीवरील परताव्यातून तिचे पुढील आयुष्य शांतपणे व्यतीत करता येईल. मात्र एक महत्त्वाची बाब नमूद केली पाहिजे की आजच्या दरमहा २०,००० खर्चाची जीवनशैलीच त्या रकमेतून भागवता येईल. 
  • जर जीवनशैलीतील बदलांमुळे खर्च वाढले तर त्याप्रमाणात निधी जमा करण्याची गरज सुद्धा वाढत जाईल. आपल्या कमाईच्या काळात निवृत्तीपश्चात लागणारी पुंजी तयार करणारे एम्प्लॉयी प्रॉव्हिडन्ट फंड (EPF) किंवा पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड (PPF) हे जसे महत्त्वाचे पर्याय आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा देखील एक चांगला पर्याय आता उपलब्ध आहे. मात्र त्यांच्या बरोबरीने योग्य पद्धतीने इक्विटी म्युच्युअल फंडातून दीर्घकालीन गुंतवणूक करून ती दरवर्षी हळूहळू वाढवत नेली पाहिजे. 

रिटायरमेंटची सोनेरी वर्षे निश्चिन्तपणे मजेत घालवायची असतील तर त्यासाठी पैसे कमवायला सुरुवात केल्यापासूनच गुंतवणूकीला देखील सुरुवात करणे हे क्रमप्राप्त आहे.

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजन तज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा : http://pro-f.in/contact-us/ )

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे भाग १

निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.