विनाभांडवल व्यवसायाचे पर्याय
कोण म्हणतं व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतंच. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा लेख वाचाच. आजच्या लेखात आपण “विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय” कोणते आहेत याबद्दल माहिती घेऊया.
“वो सिंकंदरही दोस्तो कहलाता है…
हारी बाजी को जितना जिसे आता है….”
किंवा
“पापा कहते हैं बडा नाम करेगा….” ऐकत मोठी झालेली पिढी असो वा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा” आवडणारी पिढी असो, बिझनेस करणे हे तरुणवयात जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. अर्थात हे स्वप्न पूर्ण होणार नाही याची जाणीवही अनेकांना असते.
हे नक्की वाचा: नोकरी करू की व्यवसाय?
- काही वर्ष नोकरी केल्यावर आपला स्वतःचा बिझनेस सुरु करावा ही इच्छा पुन्हा मनात उर्मी जागवते. पण एव्हाना काळ बराच पुढे निघून गेलेला असतो. तारुण्याची सळसळ, बिनधास्तपणा कुठेतरी हरवलेला असतो. अंगावर कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे नोकरी सोडायचा धीर होत नाही.
- अनेक गृहिणी, मग यामध्ये अगदी उच्च्शिक्षित असूनही नाईलाजाने नोकरी सोडलेल्या असोत वा स्वखुशीने गृहिणीची जबाबदारी पेलणाऱ्या असोत; काही वर्षांनी आपलं स्वतःच असं काहीतरी कमवावं, संसाराला हातभार लावावा असं त्यांना वाटत असतं.
- अगदी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांपासून ते निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना छोटासा का होईना, पण व्यवसाय करायची इच्छा असते. तसंच, काहींना पर्यायी उत्पन्न म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं वाटत असतं.
- पण करायचं काय? त्यासाठी लागणारं भांडवल कुठून आणायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. म्हणूनच या लेखात आपण वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेणार आहोत ज्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज लागणार नाही व तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही हे व्यवसाय करू शकता आणि त्यात यश मिळाल्यानंतर ते वाढवून, यशस्वी व्यावसायिकही बनू शकाल.
विनाभांडवल व्यवसायाचे १० पर्याय:
१. सोशल मीडिया मार्केटिंग:
- सोशल मीडिया म्हणजे ‘वेस्ट ऑफ टाइम’ असं वाटत असेल तर दृष्टिकोन बदला. सध्या सोशल मीडियावरच्या पोस्ट होणाऱ्या जाहिरातींना इतर पर्यायांच्या तुलनेत जास्त लोकप्रियता मिळते. त्यामुळे सोशल मीडिया मार्केटिंगला अनेक कंपन्या, संस्था पसंती देत आहेत.
- अनेक कंपन्या त्यासाठी आउटसोर्सिंगची डिपार्टमेंटची व्यवस्थही केली आहे. सोशल मीडिया मार्केटिंगसाठी ब्लॉग लिहिणं, कंटेन्ट रायटिंग करणं अथवा जाहिरातींची कन्सेप्ट तयार करून देणं अशी कामे तुम्ही नोकरी सांभाळून घरबसल्या करू शकता.
महत्वाचा लेख: श्रीमंतीची ‘वही’वाट
२. कोचिंग क्लासेस:
- अनेकजण या पर्यायाचा विचार करू शकतात. कोचिंग क्लासेस ‘ऑनलाईन’ ‘ऑफलाईन’ व ‘होम ट्यूटर’ अशा तिन्ही प्रकारे घेऊ शकता.
- आजकाल अगदी पहिलीपासून मुलांना क्लासेस लावले जातात. त्यामुळे कोचिंग क्लासेसला सध्या चांगली मागणी आहे. यामुळे ओळखीही वाढतील आणि शिकवण्याचं एक वेगळंच समाधानही मिळेल.
३. आर्थिक सल्लागार:
- जर तुम्हाला आर्थिक विषयांसंदर्भात व गुंतवणुकीबद्दलचे पुरेसे ज्ञान किंवा आवड असेल तर, यातील तांत्रिक गोष्टी समजून घेऊन, त्यासाठी असणारे वेगवेगळे कोर्सेस करून, तुम्हीही आर्थिक सल्लागार बनू शकता.
- या कोर्सेसची फी अगदी कमी असते. शिवाय ते घरी बसूनही ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करता येतात. यामुळे तुम्हाला तुमचे वैयक्तिक आर्थिक निर्णय घेतानाही मोलाची मदत होईल.
४. इव्हेन्ट मॅनेजमेंट:
- अगदी वाढदिवसापासून डोहाळे जेवणापर्यंत सगळे कार्यक्रम एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरे केले जातात. या जोडीला कॉर्पोरेट पार्टीज, गेट टुगेदर असे कार्यक्रम पण फार मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
- या कार्यक्रमांची आखणी वेगळ्या आणि कलात्मक पद्धतीने करण्याची मागणी आजकाल वाढत आहे. त्यामुळे तुमचा कलात्मक दृष्टिकोन वापरून तुम्ही ग्रूपमध्ये किंवा वैयक्तिकही ‘इव्हेन्ट मॅनेजमेंटचे’ काम करू शकता.
हे नक्की वाचा:तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?
५. आर्ट, क्राफ्ट व हॉबी क्लासेस:
- ‘इको फ्रेंडली’ वस्तू ही काळाची गरज आहे. आर्ट व क्राफ्ट या प्रकारांमध्ये ‘इको फ्रेंडली’ ही संकल्पना नव्याने सुरु झाली आहे. तुम्ही टाकाऊतून टिकाऊ अशा सजावटीच्या वस्तू, कागदी फुले अथवा सजावटीसाठी लागणारे साहित्य असे प्रकार बनवून स्वतंत्रपणे त्याचा व्यवसाय करू शकता अथवा एखाद्या इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करून त्या टीमचा एक भाग होऊ शकता.
- तसेच, आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ अभ्यासी ज्ञान असून भगत नाही. या जगात टिकायचं असेल तर, वेगवेगळी कला- कौशल्यही आत्मसात करावी लागतात. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, इत्यादी अनेक प्रकारांच्या क्लासेसला सध्या जबरदस्त मागणी आहे. तुम्ही जर यापैकी कोणत्याही कलेत पारंगत असाल तर तुम्ही ते क्लासेस सुरु करू शकता.
पुढील भागात आपण उर्वरित पर्यायांची माहिती घेऊ. विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २