विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

Reading Time: 2 minutes

मागच्या भागात आपण विना भांडवल व्यवसायाच्या ५ पर्यायांची माहिती घेतली. या भागात आपण उर्वरित पर्यायांची माहिती घेऊया. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय:

६. केटरिंग:

 • सध्याच्या काळातला भरपूर नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे केटरिंग. शिक्षण, नोकरी, ट्रेनिंग अशा अनेक कारणांनी घराबाहेर राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रोज हॉटेलचं खाणं आरोग्य आणि खिसा दोघांनाही परवडणारं नाही. 
 • त्याचबरोबर व्यस्त जीवनशैलीमुळेही अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रिया अशा प्रकारच्या डब्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे घरगुती जेवणाच्या डब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. 
 • याचबरोबर इडली, उपमा, पोहे, साबुदाणा खिचडी, मिसळ, थालीपीठ, पराठे असे न्याहारीचे (breakfast) पदार्थ किंवा चकली, चिवडा, शंकरपाळे, लाडू अशा साठवणीच्या पदार्थानांही खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. 
 • तसेच, सततच्या फास्ट फूडला कंटाळली पिढी त्यांच्या सतत चालणाऱ्या विकेंड ट्रिप्स, छोट्या छोट्या पार्टीज, गेट टुगेदर यासाठीही घरगुती खाद्यपदार्थांनाच पसंती देत आहेत. त्यामुळे यापैकी कुठलाही पर्याय निवडून तुम्ही तुमचा केटरिंगचा व्यवसाय सुरु करू शकता. 

७. फिटनेस क्लासेस:

 • जर तुम्हाला फिटनेसची आवड असेल तर योगा, एरोबिक्स, झुंबा अशा गोष्टी शिकून त्याचे क्लासेस सुरु करू शकता. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अशाप्रकारच्या फिटनेस क्लासेसला जाणं पसंत करतात. सध्या फिटनेसला असलेलं महत्व लक्षात घेता, अशाप्रकारचे क्लासेस चांगला पैसा मिळवून देऊ शकतात. 
 • याच्या जोडीला न्यूट्रिशन सल्लागारासाठी असणारा एक कोर्स करून तुम्ही न्यूट्रिशन सल्लागार म्हणूनही काम करू शकता. सध्या फिटनेस व डाएट या गोष्टींना प्रचंड महत्व आलं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एका जागी उपलब्ध झाल्या तर त्याला मागणी येणारच. 

८. होममेड चॉकलेट व केक:

 • हा व्यवसाय केटरिंगचा भाग नाही. चॉकलेट आणि केक म्हटलं की आबालवृद्ध सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. पण बाजारातील चॉकलेटपेक्षा वेगवेगळ्या आकारांचे चॉकलेट व केक वाढदिवसांपासून लग्न कार्यापर्यंत अनेक कार्यक्रमात लक्ष वेधून घेतात. चॉकलेट बुकेला तर प्रचंड मागणी आहे. 
 • त्यामुळे चॉकलेट व केक मेकिंगचा क्लास करून तुम्ही त्याचा व्यवसाय चालू करू शकता किंवा त्याचे क्लासेसही घेऊ शकता. दोन्ही मार्गानी उत्पन्न मिळवून देणारा हा एक अतिशय चटकदार पर्याय आहे. 

९. इंटेरिअर डेकोरेशन: 

 • अनेकांना याबद्दल उपजतच ज्ञान असतं. यासाठी खरंतर प्रोफेशनल कोर्सची गरज असतेच असं नाही. पण कोर्स केल्यास तुम्ही तुमची कला, कौशल्य अजून चांगल्या प्रकारे विकसित करू शकता. 
 • तसेच, कोर्स केल्यानंतर तुम्हाला या फिल्डसाठी कॉर्पोरेट क्षेत्राचे दरवाजेही उघडे होतील. नोकरी सांभाळून हा व्यवसाय करणं अवघड असलं तरी, अशक्य मात्र अजिबात नाही. हे काम तुम्ही ऑफिस सुटल्यावर अथवा सुट्टीच्या दिवशीही करू शकता.  

१०. कुकिंग क्लासेस:

 • जागतिकीकरणामुळे विविध ठिकाणच्या खाद्यसंस्कृतींनी भारतीय जेवणात स्थान मिळविले आहे. त्याचबरोबर  पुरणपोळी, साटोरी, वडा पाव, उकडीचे मोदक असे पदार्थ तर परदेशातही लोकप्रिय होत आहेत. 
 • त्यामुळे पारंपरिक, देशी, विदेशी अशा खाद्यपदार्थांचे क्लासेसही चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. तुम्हला जर पाककलेची  आवड असेल तर असे क्लासेस तुम्ही सुरु करू शकता. 

विना भांडवल व्यवसायाचे असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. परंतु अनेक वेळा हे काय करायचं? असं म्हणून या छोट्या पण चांगला नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांकडे दुर्लक्ष करतो. मॅक्डोनल्ड, पिझ्झा हट, डॉमिनोज यासारख्या फूड चेन किंवा मॉन्जिनीजसारख्या केक शॉपनी आज भारतातल्या छोट्या शहरातही आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. फिटनेस, न्यूट्रिशन या क्षेत्रांतील व्यक्तींना मोठमोठे सेलिब्रिटी विशेष मान देतात. ऋजुता दिवेकर यांनी याच क्षेत्रात काम करून स्वतःचं करिअर घडवलं आहे.

“कुठलंही काम सोपं नसतं आणि कमीपणाचंही नसतं.” जेव्हा ही गोष्ट तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या व्यावसायिक होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु होईल. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

नोकरी करू की व्यवसाय?

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा: फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]