अनंत चतुदर्शीला सर्वांचा लाडका विघ्नहर्ता भक्तांचं विघ्न दूर करण्याचा आशिर्वाद देऊन परतीच्या प्रवासाला निघून गेला. पण पुढच्या वर्षी पुन्हा येणार हे मूक आश्वासन देऊनच.
प्रत्येक गुंतवणूकदाराने गणपती स्तोत्र म्हणतांना “विदयार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं” या ओळीचा उच्चार मनोभावे केला असेल.
माणूस आठवणींशिवाय जगू शकत नाही. मग आठवण बनवतं कोण? खरंतर आठवण ही अनुभवलेल्या, जगलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या क्षणांनी बनत असते. गेल्या १० दिवसांत मंदीची आठवण पुसट होऊन मांगल्य अवतरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.
मागील लेखात आपण, “म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यासाठी किती मध्यस्थ स्वतंत्रपणे काम करत असतात” याची सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण नियंत्रकांची भूमिका तसेच आवश्यक कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
- सेबी (SEBI) भारतात शेअर बाजाराशी निगडीत सर्व व्यवहारांवर नियंत्रक म्हणून देखरेख ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. तसेच म्युच्युअल फंडाशी निगडीत सर्व मध्यस्थांवर नियंत्रक म्हणून देखील सेबी काम करत असते. अधिक माहितीकरिता सेबीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घेऊ शकता.
- म्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.
- सेबीने घालून दिलेल्या नियमांनुसार AMCs ना काम करावे लागते. कुठलीही योजना (Scheme) सुरु करतांना पुढील मुद्द्यांचे पालन सेबीच्या दंडकानुसार करणे बंधनकारक असते.
- गुंतवणूकीचे वस्तुनिष्ठ ध्येय:- उदा. – ही योजना भांडवल वृद्धीसाठी समभाग सलंग्न साधनांमधे गुंतवणूक करेल.
- गुंतवणूकीचे धोरण:- उदा. – या योजनेच्या यादीत किमान ३० ते कमाल ३९ कंपन्यांचे शेअर्स असतील.
- गुंतवणूकीची रचना:- उदा. – या योजनेत तरलता अथवा विशिष्ट सेक्टरमधे गुंतवणूक असेल.
- वरीलपैकी मुद्दा क्रमांक १ व २ योजनेच्या माहितीपत्रकाचे अविभाज्य भाग असून गुंतवणूक रचना वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन बदलू शकते. म्हणूनच कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीत “Mutual Fund Investments are subject to Market Risks, read all the scheme related documents carefully” असे नमूद केलेले असते.
- आपण डायरेक्ट गुंतवणूक करत असाल तर योजनेचे माहितीपत्रक (Scheme Information Document) नक्कीच वाचत असाल.
- प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला (AMC) AMFI (Association Of Mutual Funds In India) चे सभासद असणे अनिवार्य आहे. AMFI नियंत्रक म्हणून नव्हे तर AMCs, म्युच्युअल फंड विक्रेते व गुंतवणूकदार यांच्यासाठी विविध नियंत्रकांसोबत मध्यस्थ म्हणून काम करत असते.
गुंतवणूकदाराचे अधिकार व कर्तव्य –
यात बरेच अधिकार असून लिहावयास गेल्यास वाचकांना देखील कंटाळवाणे होईल. काही म्हत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे.
-
- नवीन योजना सुरु करतांना जाहीर करतात त्याला New Fund Offer (NFO) म्हणतात.
- यासोबत अजून दोन महत्वाचे पत्रकं असतात.
- Scheme Information Document (SID):- यात योजनेची सविस्तर माहिती दिलेली असते.
- Statement of Additional Information (SAI):- यात योजना घेऊन येणाऱ्या म्युच्युअल फंड घराण्याची कायदेशीर माहिती नमूद केलेली असते.
- योजनेतून पैसे काढून घेण्याची ऑर्डर दिल्यानंतर ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा पैसे देण्यास जास्त वेळ घेतल्यास AMC ला वार्षिक १५% दराने परतीच्या रकमेवर गुंतवणूकदाराला व्याज दयावे लागते.
- गुंतवणूकदाराला खाते उतारा (Folio Statement) मागणी केल्यानंतर ५ दिवसांत देणे बंधनकारक आहे. इतरवेळी प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या १० दिवसांत मागणी न करता देणे क्रमप्राप्त आहे.
- सर्व योजनांचे नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value) दररोज सकाळी १० पर्यंत AMFI व AMC च्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केले पाहिजेत असा दंडक आहे.
- गुंतवणूकदार जास्तीत जास्त ३ जणांना वारस म्हणून नेमू शकतो.
- गुंतवणूकदार लेखी अर्ज करून त्याचा वितरक बदलू शकतो.
- गुंतवणूकदार त्याचे युनिटस डीमॅट स्वरुपात ठेवू शकतो. त्यासाठी लागणाऱ्या पूर्तता मात्र गुंतवणूकदाराने केलेल्या असल्या पाहिजेत.
- ६ महिन्यातून एकदा AMC ला प्रत्येक योजनेतील केलेल्या गुंतवणूकीचा तपशील जाहीर जाहीर करावी लागतो.
- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी PAN नंबर, KYC आणि बँकेत खातं असणे अनिवार्य आहे.
- जर तुम्ही SIP च्या द्वारे गुंतवणूक करत असाल तर ठरलेल्या तारखेला खात्यात न चुकता शिल्लक ठेवा. अन्यथा धनादेश न वटविल्याबद्दल (Cheque dishonored) दोन्ही बाजूचा दंड गुंतवणूकदाराच्या नावे पडतो.
एका वाचकाने प्रश्न विचारला आहे की, “एवढया सगळ्या कायदेशीर तरतुदी व नियंत्रक असून देखील एखादी म्युच्युअल फंड योजना बंद पडली तर किंवा म्युच्युअल फंड कंपनीच पळून गेली तर माझ्या गुंतवणूकीचे काय?”
- याचं उत्तर मागच्याच लेखात दिलं आहे. तरी देखील पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करू.मालमत्ता व्यवस्थापन आस्थापना (AMC) योजनेतील गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्याचे काम करत असते. तर योजनेतील मालमत्ता (Assets) सांभाळण्याचे काम ताबेदार (Custodian) कडे असते. आणि या दोघांचे कामकाज विश्वस्तांच्या (Trustees) नियंत्रणाखाली सुरु असते. एखादा व्यवसाय चालविण्यासाठी एवढी पारदर्शी व गुंतवणूकदारांचे हित जपणारी भक्कम व्यवस्था सापडणे दुर्मिळ आहे.
- जर प्रवर्तकांनी (Sponsors) व्यवसायातून बाहेर पडायचे ठरविल्यास त्यांना सेबीला मान्य असतील. असे नवीन प्रवर्तक शोधून आणल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.
- अलीकडेच उदाहरणार्थ बघायचे ठरल्यास DHFL-PRAMERICA या म्युच्युअल फंड घराण्याचे पाहता येईल. DHFL ने व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी नवीन प्रवर्तक म्हणून PGIM या प्रवर्तकास हिस्सा विक्री करण्याचे ठरविले. त्या व्यवहाराला सेबीने मंजुरी दिली. त्यानंतरच DHFL-PRAMERICA नावाने पूर्वी सुरु असलेल्या योजनांचे नवीन नामकरण PGIM या नावाने झाले. आजही सर्व योजना सुरळीत आणि व्यवस्थित सुरु आहेत.
- भारतीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील समभाग गुंतवणूकीचा हिस्सा ८% एवढाच सिमित आहे. तर म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमधे २.७४ कोटी ‘एसआयपी’च्या (SIP) माध्यमातून भारतीय गुंतवणूकदार दर महिन्याकाठी ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत.
- भारतात ‘व्हाट्स अप’चे (Whatsapp) वापरकर्ते ५० कोटींच्या घरात आहेत. ‘व्हाट्स अप’चा वापर करण्यासाठी महिन्याला किमान १३५ रुपये खर्च करतात. काही फंड घराणी आता १०० रुपयांची देखील एसआयपी (SIP) सुरु करून देतात. पण ते करण्याऐवजी ‘व्हाट्स अप’वरून ते करत नसलेल्या गुंतवणूका कशा चूकीच्या आहेत, हे सांगण्याचे आद्य कर्तव्य समजतात.
- वॉरेन बफेंच्या कंपनीची त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी दरवर्षी एक सभा भरते. तिला हजेरी लावणे म्हणजे गंगेत न्हाऊन पवित्र होण्यासारखे असते. ८९ वर्षीय बफेंनी नव गुंतवणूकदारांना दिलेला संदेश खूप मोलाचा आहे. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे-
- गुंतवणूकीबाबत सतत वाचन केले पाहिजे.
- तुम्हाला काय माहित नाही, याची माहिती असली पाहिजे.
- पहिल्यांदा केलेल्या गुंतवणूकीने त्यांना साधारण ३० वर्षांनी अतिश्रीमंत बनविले.
- आमचे प्रत्येक गुंतवणूक धोरण यशस्वी झाले, असे घडले नाही.
- आयुष्य गुंतवणूकीची संधी दररोज उपलब्ध करून देत असते.
जगलेला ‘काल’ हा आज ‘आठवण’ बनून उदयाच्या उदयासाठी आजन्म जिवंत असतो… “आठवणीत”.
असंच काहीसं यावर्षीचे बाप्पा आता आठवणीत गेले असतील.
पण पुढच्या वर्षी त्यांना मागच्या वर्षी काय केलं, याचा ताळेबंद काय देणार?
– अतुल प्रकाश कोतकर
(आर्थिक सल्लागार)
9423187598
म्युच्युअल फंड क्या है? – भाग २
म्युच्युअल फंड क्या है? – भाग १
एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय
म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.