कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन
कोरोना महामारीसारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत आणि गुंतवणुकीची पुंजी आहे, अशा नागरिकांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. शिवाय व्यापार उदीमावर मोठा परिणाम झाल्यामुळे अनेकांना रोजगार मिळणेही कठीण होणार आहे. मध्यमवर्गीय नागरिकांनाही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात अनेक बदल करावे लागणार आहेत. या बदलांचा स्वीकार करणे, क्रमप्राप्त आहे. असे हे बदल कोणते असू शकतात आणि त्या संदर्भात त्यांना निर्णय घेण्यास मदत व्हावी म्हणून ही दहा कलमी आर्थिक नियोजनाची मांडणी...
तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? – भाग १…
दहा कलमी आर्थिक नियोजन –
१. पैसे जपून वापरा –
- सध्याच्या परिस्थितीमध्ये आर्थिक नियोजन करणे म्हणजे आपल्याकडे असलेली पुंजी हे कोरोना साथीचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत जपून वापरणे आवश्यक आहे.
- जोपर्यंत उत्पन्न सुरु होत नाही, तोपर्यंत अनावश्यक खरेदी लांबणीवर टाका.
- सर्वांनीच असे केले तर अर्थव्यवस्थेचे काय होणार, असे प्रश्न विचारले जातात, पण आपल्याकडे पुंजी नसेल, तर तिला गती देण्याची जबाबदारी आपली नाही, हे लक्षात ठेवा.
२. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या –
- उत्पन्नावर मर्यादा आल्या असतील, तर आवश्यक खर्चाची नोंद करून त्यानुसारच दर महिन्याला खर्च होतो आहे ना, याची काळजी घ्या.
- कुटुंबातील सदस्यांना कल्पना दया. एकमेकांशी सल्लामसलत करून आर्थिक नियोजन सुरु करा.
संकटकाळातील आर्थिक नियोजन…
३.कर्जफेड मुदतवाढीचा लाभ –
- इन्कमटॅक्स रिटर्न, घराचे कर्जाचे हप्ते, विमा पॉलिसीचे हप्ते, वाहन विमा, आरोग्य विमा हप्ते अशा अत्यावश्यक गोष्टींसाठी सरकारने सवलत जाहीर केली आहे.
- हा सर्व पैसा या काळात नागरिकांच्या खिशातून लगेच जाणार नाही, यासाठी या सर्व हप्त्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. पुरेशी रक्कम नसेल तरच या सवलतींचा फायदा घ्या.
- पुंजी असेल तर अशा सर्व हप्त्यांचा भरणा वेळच्या वेळी करणे, आपल्या हिताचे आहे. कारण आता नाही भरले, तर नंतर सर्व व्याज भरावेच लागणार आहे.
४. गुंतवणूक नियोजन –
- एफडी, पीपीएफ, युलिप योजना, म्युच्युअल फंडातील रक्कम ही अशा वेळी कामाला येते. पण म्हणून ती काढून घेतलीच पाहिजे असे नाही.
- गुंतवणुकीतील रक्कम काढल्यास त्या गुंतवणुकीचे दीर्घकालीन काही फायदे आपल्याला गमवावे लागतात. त्यामुळे शक्य तेवढी कमी रक्कम काढा.
- दीर्घकालीन गुंतवणूक ही आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजनामधला अत्यावश्यक भाग आहे.
कोरोनाव्हायरस आणि करिअर…
५. कर्ज सुविधा –
- आर्थिक अडचण असेल, आणि आपल्याकडे एलआयसीच्या पॉलिसी असतील तर (त्यावर कर्ज मिळण्याची सुविधा असेल तर, बहुतांश पॉलिसींवर ती उपलब्ध आहे.)
- ते कर्ज घेणे तुलनेने खूप सोपे आहे. एलआयसी त्यावरील व्याज दर सहा महिन्यानी घेते.
- मुद्दल तुम्ही दर सहा महीन्यांनी किंवा तुमची पॉलिसी मॅच्युअर झाली तेव्हाही देऊ शकता.
६. बचत व गुंतवणूक –
- आपण आधी बचत तसेच गुंतवणूक करायला हवी होती, असे अशा संकटाच्या काळात आपल्याला वाटू लागते.
- कोणतीही चांगली गोष्ट करण्यास उशीर होत नसतो, असे म्हणतात. त्यामुळे आता ती सुरवात करा. सुरवात अगदी छोटी केली तर चालेल.
आली सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याची वेळ !…
७. आरोग्य विमा –
- गुंतवणुकीची सुरवात करताना सर्वाधिक महत्वाची गुंतवणूक ही आरोग्य विम्याची आहे. तो अजून काढला नसेल तर आधी तो काढा. आणि तो सर्व कुटुंबाचा काढा.
- दरवर्षी विशिष्ट रक्कम तिचा हप्ता म्हणून जाते, त्यामुळे आपल्याला काहीच मिळत नाही, असे वाटू शकते. पण जेव्हा घरातील सदस्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासारखा आजार होऊन अधिक खर्च येतो, तेव्हा या विम्याचा जो आधार मिळतो,
- आरोग्य विमा आपले कुटुंब आर्थिक संकटातून वाचू शकते.
८. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना –
- जे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना खात्रीची गुंतवणूक करावयाची आहे, त्यांच्यासाठीच्या दोन सरकारी गुंतवणूक योजना ७ टक्के व्याज मिळवून देणाऱ्या आहेत.
- बँक एफडीचे व्याजदर आता कमी होत असले तरी ज्येष्ठ नागरिकांना सरकारने खास सवलत जाहीर केली आहे.
- सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि प्रधान मंत्री वय वंदन योजनेत गुंतवणूक केल्यास अजूनही तुम्ही ७ टक्के व्याज मिळवू शकता. (ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत खुली करण्यात आली आहे.)
- ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर गुंतवणूक आणि त्यातील जोखीमीचा अनुभव नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही अधिक परताव्याच्या गुंतवणुकीचा मोह बाजूला सारून या दोन योजनांचा फायदा घेतला पाहिजे.
SIP- म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करतांना……
९. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
- कोरोनाच्या संकटात आणि त्यानंतर जगाच्या आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत नजीकच्या भविष्यात अनेक चढउतार येणार आहेत. त्यामुळे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही अधिक जोखीमीची ठरू शकते.
- एकाच वेळी अधिक रक्कम अशा गुंतवणुकीत गुंतवू नका. मात्र या गुंतवणुकीचा परिचय असल्यास एसआयपी पद्धतीने म्हणजेच दर महिन्याला विशिष्ट रक्कम अशी गुंतवणूक सुरु करा.
- हे संकट मागे पडले की भारताची अर्थव्यवस्था लवकर म्हणजे पुढील वर्ष दोन वर्षात झेप घेवू शकते.
१०. ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेज –
- अर्थव्यवस्था लवकर पटरीवर यावी, यासाठी सरकारने २० लाख कोटी रुपयांचे ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेज जाहीर केले आहे. त्यात अनेक क्षेत्रांना मदत जाहीर केली आहे.
- विशेषतः उद्योग व्यवसायांना पतपुरवठा होत राहील, याची काळजी घेतली आहे. त्यातील कोणत्या सवलतींचा आपण फायदा घेऊ शकतो, याचा अभ्यास करा.
- ज्यांनी आतापर्यंत आपले व्यवहार बॅंकांमार्फत केले आहेत आणि ज्यांची क्रेडीट हिस्ट्री चांगली आहे, त्यांना बँका कर्ज देण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे अशा सवलतींचा लाभ घ्या.
कोरोनाव्हायरस आणि करिअर…
– यमाजी मालकर
(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
1 comment
खुपच छान माहितीपूर्ण लेख