बी.कॉम. नंतरचे करिअर…
ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन नंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती आपण या लेखमालेतून घेणार आहोत. या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय’ कोणते आहेत, याबद्दल माहिती घेऊया.
एक प्रसंग … कालावधी साधारण 1980 ते 1990 चे दशक …
आई म्हणते वडिलांना – अहो ऐकलं का? आज आपला मुलगा पदवीधर झाला. बी. कॉम. 64 टक्के मार्क्स मिळवून, पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण.. याचा वडिलांना खूप आनंद. चला आता मुलाच्या नोकरीचे बघूया. मग पुन्हा आई म्हणते, “अहो कोणा ओळखीच्यांना सांगून ठेवा हं.. बँकेत, सरकारी, पतपेढ्यांवर, नगरपरिषदा, मनपा अगदी कुठेही चांगली नोकरी मिळाली तरी चालेल.. त्यावर मुलगा आणि वडील पण आनंदात.. मग पुढे काही दिवसांतच अशी एखादी नोकरी मिळते आणि पुढच्या 5, 6 वर्षात आई-वडिल त्या मुलाच्या लग्नाचे बघायला लागतात..
तर असा हा वरचा प्रसंग पूर्वी अगदी 90 च्या दशकापर्यंत घराघरात दिसायचा. तसा तो खूपच सामान्य होता मध्यमवर्गीयांच्या घरात.. पण आता आहे का हो हे शक्य? पहिल्या श्रेणीत पदवीधरच काय अगदी दोन किंवा तीन पदव्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केले तरी अशा इतक्या सहजतेने मिळतील का आज नोकऱ्या?
विशेष लेख: भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय
मंडळी विचार करा.. केवळ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर काय आहे भविष्य आजच्या या अत्यंत फास्ट आणि सतत बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात..
- हल्लीचा जमाना फास्ट फुड, फाडफाड इंग्रजी बोलणे, इंस्टंट गोष्टी, शॉर्ट कोर्सेस असा एकूणच सतत बदलता माहोल सारखा झालाय. काही शाश्वत आहे असं वाटतच नाही.
- आजच्या नव्या गोष्टी उद्या जुन्या होतात नव्हे थेट बदलूनच जातात. सर्व काही डिजिटलाईज होतेय आणि जमानाच ऑनलाईन होतोय असं आपण 2020 उजाडले तरी नुसतं म्हणतच होतो. काही बाबतीत ते बदल पाहातही होतो, मात्र मार्च ते ऑक्टोबर 2020 या 8 महिन्यात जणू सारे जगच बदलले आणि आता खरोखर सगळं काही ऑनलाईन झाले.
- अगदी भारतासारख्या विकसनशील देशातही केवळ 8 महिन्यात शिक्षणसुद्धा ऑनलाईन झाले. कोरोनाने जगाची इकॉनॉमी थांबवली असेलही मात्र आपल्या सारख्या अनेक विकसनशील देशांत अतिशय वेगाने डिजिटल युगाची क्रांती झाली हे सत्य नाकारता येणार नाहीच.
- मग विचार करुया .. जी नवतरुणाई आहे, जी पदवी परीक्षेच्या उंबरठ्यावर आहे किंवा अगदी गेल्या 1-2 वर्षात त्यांनी पदवी घेतलेली आहे त्यांनी आज काय करणे अपेक्षित आहे?
- जग झपाट्यानं बदलतंय.. विविध क्षेत्र नव्याने खुली होत आहेत, त्यातच आपलं सरकार म्हणतंय, आत्मनिर्भर व्हा.. कसे होणार तुम्ही आत्मनिर्भर? केवळ पदवीच्या जोरावर?
- आत्ताच विचार करा आणि ज्यांनी बी.कॉम पदवी घेतली आहे किंवा लवकरच घेणार आहेत, खास अशा विद्यार्थ्यांसाठी बी.कॉमच्या पुढच्या नव्या संधींची माहिती देणारा हा लेख. यामध्ये बी.कॉम नंतर स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देणाऱ्या काही अभ्यासक्रमांबद्दल आपण इथे जाणून घेऊ.
महत्वाचा लेख: करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे? लक्षात ठेवा या ८ गोष्टी
बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय
1. मास्टर ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन (एमबीए)
- हा किमान 2 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.
- यासाठी कॅट ही परिक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणे आवश्यक.
- देशातील नामांकित आय.आय.एम. संस्थेतून एमबीए करायचे असल्यास कॅट परिक्षेत टॉप 400 पर्यंत रँकिंग असणे आवश्यक आहे.
- दुसरा पर्याय म्हणजे राज्या-राज्यांची सीईटी परीक्षा. ही उत्तीर्ण झाल्यावर संबंधीत राज्यांतील कॉलेजेस किंवा नामांकित संस्थांमधून एमबीएची डिग्री घेता येते.
- यामध्ये तुम्ही जो विषय स्पेशलायझेशनला निवडाल त्याचा सखोल अभ्यास करुन त्यात पारगंत होता येते.
- पूर्णवेळ शक्य नसल्यास तुम्ही अर्ध-वेळ एमबीए देखील करू शकता. मात्र त्या डिग्रीला फारसे ग्राह्य धरले जात नाही.
2. चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए)
- बी.कॉम आणि एम.कॉम नंतर करिअरचा सर्वोत्तम पर्याय म्हणून याकडे गेली अनेक वर्षे पाहिले जाते.
- एकूण 3 टप्प्यांमध्ये हा कोर्स पूर्ण होतो. डिग्री कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थी यासाठी नोंदणी करू शकतात.
- पहिला आणि दुसरा टप्पा हा साधारणपणे बी.कॉम डिग्रीच्या सोबतच पूर्ण होवू शकतो. मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची तयारी हवी.
- दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर किमान अडीच वर्षांसाठी आर्टिकलशीप करणे अनिवार्य आहे. ( या नियमांमध्ये बदल होवू शकतात, कृपया सीए संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर सद्यस्थिती जाणून घ्यावी.)
- सर्टिफाईड सी.ए. कडे ही आर्टिकलशिप पूर्ण करावी लागते. त्यादरम्यान काही मानधन मिळू शकते. त्यानंतरच सी.ए. परिक्षेचा शेवटचा आणि महत्त्वाचा तीसरा टप्पा तुम्ही देऊ शकता.
- तीसरा टप्पा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला संबंधित डिग्री सर्टिफिकेट मिळते. या डिग्रीनंतर नोकरीच केली पाहिजे असे नाही, तुम्ही स्वतःचा बिझनेस, स्वतःची सीए फर्मदेखील सुरू करू शकता.
3. कंपनी सेक्रेटरी किंवा कंपनी सचिव (सी.एस.)
- सीए प्रमाणे सीएस होता येते. हा अभ्यासक्रम पूर्णपणे कंपनीचे व्यवस्थापन आणि कायदेशीर बाबी यांच्याशी निगडीत आहे.
- कंपनी सेक्रेटरीचा मूळ उद्देशच कंपनी किंवा संस्थेच्या सर्व कायदेशीर बाबींचे पूर्ण व्यवस्थापन करणे हा असतो.
- कंपनी सेक्रेटरी सहसा कंपनीच्या कर परताव्याची काळजी घेतात, करासंबंधीचे रेकॉर्ड ठेवतात, संचालक मंडळाला कार्यक्षम सल्ले देतात आणि हे सुनिश्चित करतात की कंपनीच्या बाबतीत सर्व कायदेशीर आणि वैधानिक नियम पाळले गेले आहेत.
- या अभ्यासक्रमामध्ये कंपनीचे सर्व कायदे, कर, सर्व बाबतीतील पत्रव्यवहार आदींचा समावेश असतो.
- सीए प्रमाणेच तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. ही पदवी मिळवल्यानंतर तुम्ही एकाच ठिकाणी नोकरी करू शकता किंवा स्वतःची कंपनी सुरू करुन अन्य कंपन्या, संस्था आणि आस्थापनांसाठी लिगल कन्सल्टंट म्हणून काम करू शकता.
इतर लेख: विद्यार्थी दशेतील आर्थिक नियोजन
4. चार्टर्ड फायनान्शियल अँनालिस्ट (सीएफए)
- सीएफए संस्थेने देऊ केलेली ही पदवी जागतीक स्तरावर काम करण्यास मान्यता प्राप्त आहे.
- सामान्यत: सीएफए अभ्यासक्रमाचा कालावधी 2.5 वर्षांचा असतो.
- या अभ्यासक्रमात आकडेवारी, अर्थशास्त्र, संभाव्यता सिद्धांत, कॉर्पोरेट फायनान्स, सुरक्षा विश्लेषण, आर्थिक विश्लेषण, निश्चित उत्पन्न, डेरिव्हेटिव्ह्ज, पर्यायी गुंतवणूक आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन यांसह प्रगत गुंतवणूक विश्लेषणाच्या क्षेत्रातील अनेक विषयांचा समावेश आहे.
- बी.कॉम, एम.कॉम नंतर जर तुम्ही खरोखरंच वेगळी वाट निवडण्याचा विचार करत असाल तर, हा एक उत्तम पर्याय आहे.
- ही डिग्री मिळवण्यासाठीदेखील तीन-स्तरीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हैदराबाद येथे या संस्थेचे मुख्यालय आहे.
- सीएफए हा उद्योग जगतातील उच्च दर्जाचा कोर्स मानला जातो.
- जेपी मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, यूबीएस, ब्लॅकरॉक, मॉर्गन स्टॅनले आणि रॉयल बँक ऑफ कॅनडा सारख्या काही अव्वल कंपन्यांकडून सीएफएची भरती केली जाते.
5. स्टॉक ब्रोकर
- फायनान्स आणि अर्थकारण यातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत आकर्षक पर्याय म्हणजे स्टॉक ब्रोकर बनणे.
- या प्रक्रियेच्या मूलभूत गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी, विद्यार्थी स्टॉक ब्रोकिंग प्रोग्रॅममध्ये सामील होऊ शकतात. जिथे त्यांना व्यक्ती तसेच कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी-विक्रीचे प्रशिक्षण दिले जाते.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजार, निफ्टी आदींचे सखोल प्रशिक्षण या कोर्स मध्ये उपलब्ध आहे. यानंतर शेअरमार्केटमध्ये थेट काम करण्यास संधी उपलब्ध होऊ शकते.
6. बिझनेस अकौंटिंग आणि टॅक्सेशन (व्यवसाय लेखा आणि कर)
- उद्योग जगतातील तज्ज्ञांकडून हा पर्याय तयार करण्यात आला आहे.
- या अभ्यासक्रमात ईआरपी सॉफ्टवेअरचा उपयोग करून आर्थिक अहवाल देणे, फायनान्शिअल स्टेटमेन्टचे अंतिमकरण, वस्तू व सेवा कर (जीएसटी), थेट कर आकारणी, वेतनाच्या निकषांवर आधारीत ईएसआयसी सुविधा आणि एक्सेल आणि एमआयएस रिपोर्टिंग सारख्या विषयांचा समावेश आहे.
- हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तुम्ही कर सल्लागार, कॉर्पोरेट कायदेशीर सहाय्यक, कंपनी कायदा सहाय्यक, वित्त व्यवस्थापक, खाती कार्यकारी आणि कर विश्लेषक यांसारख्या आश्वासक नोकऱ्या निवडू शकता.
7. प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल (सीएमए)
- तुम्ही जर बी.कॉम नंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण आणि नोकरीचा विचार करत असाल तर वरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
- आपल्याकडे हे प्रमाणपत्र असल्यास, आपण आर्थिक नियोजन, विश्लेषण, नियंत्रण, निर्णय समर्थन आणि व्यावसायिक नीतिशास्त्र यासारख्या क्षेत्रात काम करू शकाल.
- अमेरिकेसह अन्य देशांतही हे प्रमाणपत्र स्वीकारार्ह असल्याने बाहेरच्या देशात जाऊन तुम्ही नोकरीच्या संधी शोधू शकाल.
- सीएमए-प्रमाणित व्यावसायिक होण्यासाठी आपण परीक्षेचे दोन टप्पे पूर्ण केले पाहिजेत आणि दोन वर्षांचा कामाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.
महत्वाचा लेख: या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य
8. प्रमाणित आर्थिक नियोजक (सी.एफ.पी.)
- बीकॉम नंतर सीएफपी हा आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.
- याचा कालावधी 6 महिने आहे आणि पदवीधरांसाठी आर्थिक सल्लागार आणि विमा सल्लागारसारखे करियरचे पर्याय उपलब्ध आहेत.
- एक प्रमाणित आर्थिक नियोजक त्याच्या ग्राहकांना गुंतवणूक योजना, विमा निर्णय, कर प्रकरणे आणि वैयक्तिक आर्थिक सल्ला देऊ शकतो.
9. सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट बँकर (सी.आय.बी.)
- सदर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
- यात प्रामुख्याने बँकरला त्याच्या ग्राहकांना इक्विटी विकून आणि कंपनीत कर्ज काढून भांडवल उभारणी कशी करावी याविषयीचे अत्यंत मौलिक मार्गदर्शन करावे लागते.
- सीआयबी ही एक ग्लोबल सर्टिफिकेशन परीक्षा आहे. जी विशेषतः आपल्या बँकिंगमधील ज्ञान, समज आणि कौशल्य मूल्यांकन करण्यासाठी तयार केली गेली आहे.
- सीआयबी कार्यक्रम सहा महिन्यांचा असतो. त्यात विलिनीकरण, अधिग्रहण, एलबीओ, आयपीओ, कॉर्पोरेट क्रिया आणि पुनर्रचना, आर्थिक संदर्भात सूचीबद्ध आणि असूचीबद्ध अशा दोन्ही कंपन्यांचे मूल्यांकन निश्चित करणे आदी अभ्यासक्रमाचा समावेश असतो.
10. मार्केट रिसर्चर (बाजारपेठ संशोधक)
- कुठल्याही नवीन उत्पादनास लाँच करण्यापूर्वी बाजारपेठेच्या संशोधकाचे कार्य म्हणजे बाजाराच्या प्रवृत्तीचा आणि बाजारातील प्रतिष्ठीत आणि नव्या प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करणे.
- बाजारपेठेच्या संशोधकाची वेगवेगळी कामे आहेत, जसे की, संशोधन प्रकल्पांवर बोलणी करण्यासाठी आणि त्यावर सहमत होण्यासाठी ग्राहकांशी बैठक आणि संपर्क साधणे, सर्वेक्षण आणि फोकस ग्रुप ट्रान्स्क्रिप्ट यासह नमुने आणि निराकरणे ओळखण्यासाठी डेटाचे विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे. यातूनच पुढे ते संशोधन कार्यकारी, ज्येष्ठ संशोधक, खाते संचालक इत्यादी पदांवर कार्यरत होऊ शकतात.
हे होते, उत्तम करिअर घडवता येण्याजोगे बी.कॉम. नंतरचे 10 करिअर पर्याय. याव्यतिरिक्तही काही पर्याय उपलब्ध असतात, जे केवळ कॉमर्स ग्रॅज्युएट मुलांसाठीच नाही, तर कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी निवडू शकतात.
आजच्या लेखाचा विषय, ‘बी.कॉम. नंतरचे करिअर पर्याय’ असा असल्याने विषयाशी निगडित 10 महत्वाचे पर्याय लेखात नमूद केले आहेत.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: career after B.Com. Marathi Mahiti, career options After B.Com Marathi Mahiti, career after B.Com. in Marathi, career options After B.Com in Marathi